Wednesday, January 12, 2011

रंगमंच.

“मी ती धून नुसतीच वाजवली नाही तर मी वन्स-मोअर घेतला.”

लग्नाचा समारोप झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी एकाच्या घरात पार्टी होती.मला त्या पार्टीला आमंत्रण होतं.रात्री गाण्याचा कार्यक्रम होणार होता हे मला माहीत नव्हतं.पार्टी संपल्यावर मी निघून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या घराची बेल वाजली आणि बघतोतर मृणाल खरे आणि तिच्याबरोबर पेटी,तबला,व्हायोलीन वाजवणारे दोन-तीन लोक होते.मला पाहून मृणालला आश्चर्य वाटलं.
“जाता कुठे थांबा ना!”
मला मृणाल म्हणाली.
तेव्हड्यात घरातले यजमान पण म्हणाले,
“तुमच्या आमंत्रणात पार्टीनंतर गाणं आहे हे लिहिलेलं होतं.घरी जाऊन खास काम नसेल तर बसा.आज शनिवार आहे.उद्या सुट्टीच आहे.थोडं जागरण झाल्यास हरकत नसावी.”
एव्हडा दोघांकडून आग्रह होताच मी गाण्याला बसायचं ठरवलं.त्याशिवाय मृणालचं गाणं मी कित्येक युगांत ऐकले नव्हतं.ती लहान असताना लहान,लहान कार्यक्रमात गायची त्या कार्यक्रमाला मी हजर असायचो.आता ती कुणाच्या घरी जाऊनसुद्धा गाणं म्हणते हे मला आजच कळलं.त्यादिवशी पहाटे पर्यंत गाण्याचा कार्यक्रम मस्त एन्जॉय केला.
“तुझ्या घरी मला एक दिवस यायचं आहे.”
मी मृणालला त्या पहाटे घरी जाता जाता म्हणालो.
“नक्कीच या मला खूप आनंद होईल.”
मला मृणाल म्हणाली.

असाच एकदा तिला वेळ आहे हे समजल्यावर तिच्या घरी गेलो होतो.अर्थात गप्पा झाल्याच.
मी मृणालला म्हणालो,
“तुझ्या लहानपणी मी तुझ्या गाण्याचे कार्यक्रमाना हजेरी लावली आहे.आता तर तुझी चांगलीच प्रगती झाली आहे.त्यादिवशीच्या कार्यक्रमात मला तू अगदी निपूण झालेली दिसलीस.”

मृणाल जरा हंसली.मला म्हणाली,
“मी जेव्हा शाळा संपवून कॉलेजात जाण्याच्या मार्गावर होते,तेव्हा माझ्या आईची जवळ जवळ खात्रीच झाली होती की मी कॉलेजच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून नाटक-गाण्याच्या उपक्रमात जास्त लक्ष केंद्रीत करणार आहे.त्यामुळे मुळ अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मी माझी करियर निष्फळ करून घेणार आहे.
तसं मला नाटक-गाण्याच्या कलेत मनापासून आवड होती.पण मी शाळेत असताना ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं.

माझी आई मला सतत आठवण करून द्यायची की,
“तुला कॉलेजमधे शिकण्याचा एकच चान्स आहे.”
खरंतर,माझी आवड मी जर का शाळेत असताना करण्याच्या प्रयत्नात राहिली असती तरी आई काय म्हणायची त्याची मला कसलीच भीति वाटली नसती.परंतु,नंतर मला माझी वाट पूर्ण मोकळी झाल्याचं भासत होतं.

मी शाळेत एखाद-दुसर्‍या कार्यक्रमात गायची.एखाद-दुसर्‍या नाटकात भाग घ्यायची.शाळेच्या वाद्यवृंदात पेटी किंवा व्हायोलीन वाजवायची.शाळेच्या मुला-मुलींच्या ग्रुपमधे कसल्याही उपक्रमात माझा भाग असायचाच.रंगमंचावर मी हटकून असायची.हायस्कूलमधे जाण्यापूर्वी मी भीत,भीतच काम करायची. पण तेव्हडी मजा येत नव्हती.मला आवड होती म्हणून मी हिरीरीने भाग घ्यायची.”

“मग तू कॉलेजात गेल्यावर नाटकात, वाद्यवृंदात भाग घ्यायला लागलीस का?”
मी मृणालला प्रश्न केला.
“अगदी बरोबर”
असं म्हणून मृणाल पुढे म्हणाली,
“हायस्कूलमधे गेल्यावर रंगमंचाचा चमत्कार मला दिसायला लागला.शाळेच्या शेवटच्या वर्षात मला दिसून आलं की, मी उगाचच भीतिने रहायची.
आता कॉलेजात भलामोठा वाद्यवृंद होताच त्याशिवाय नाटकाचा पण मोठा-खरंच मोठा- गृप होता.नाटकातलं एखादं गाणं मी उच्चतम स्वरात गायची.वाद्यवृंदात अक्षरशः मला कधीकधी एकटीला-सोलो-पेटीवर साथ द्यायला लागायची. आणि ह्यात भर म्हणून,काही कार्यक्रमात आमचे संगीताचे गुरूजी अख्या वाद्यवृंदात मला उभी रहायला सांगून व्हायोलीनवर धुन वाजवायला सांगायचे.त्यामुळे अख्खी धून संपेपर्य़ंत मला उभं रहावं लागायचं.अख्ख्या कार्यक्रमात इतका महत्वाचा भाग मला पूर्वी कधीच मिळाला नाही. प्रामाणीकपणे सांगायचं झाल्यास अक्षरशः माझी भंबेरी उडायची.

एकदा अशाच एका कार्यक्रमात माझ्या तणावपूर्ण मनाची फूटतूट झालेली होती.त्या, एकट्यानेच वाजवा्च्या व्हायोलीनवरच्या धूनेची वेळ येऊन ठेपल्यावर उभं रहाण्यासाठी माझे पाय लटपटू लागले.व्हायोलीनचा बो घेतल्यावर हात थरथरू लागले.रंगमंचावरचे दिवे मला जरूरी पेक्षा जास्त प्रखर दिसायला लागले.मला चक्कर येते की काय असं वाटायला लागलं.माझ्या मला मी कशी समजूत घालून घेतली आठवत नाही.दोरखंडावरून टेकडी वर चढून गेल्यावर दोरखंड कापल्यासारखं वाटलं. काहीतरी झालं खरं,एकाएकी एका हत्तीचं बळ माझ्या अंगात आलं.”

मी थोडा अधीर होऊन मृणालला विचारलं,
“मग शेवटी धून वाजवलीस का नाही?”

“मी ती धून नुसतीच वाजवली नाही तर मी वन्स-मोअर घेतला.मी हर्षोत्फुल्ल झाले ते अवर्णनीय आहे.मला आठवतं माझ्या मनात विचार आला की एखादा “घुटू” घेणारा,घेतल्यावर भावना उचंबळून कशा येतात ते सांगतो त्याचा प्रत्यंतर आला.
त्यानंतर कधीही रंगमंचावर आल्यावर मागे बघणे नाही.मला असं वाटायला लागलंय की,एखादा उपक्रम तुम्हाला आनंदी करून जात असेल तर दुसरासुद्धा तेच करणार.आवाहन घेणं म्हणजे ते अगदी चटक लावणारं असतं.निर्वाणाला गेल्यासारखं असतं.इहलोकांत नसल्यासारखं वाटतं.माझ्या मते “घुटू” न घेता बेहोशी आल्यासारखं वाटतं.”
मृणाल अगदी रंगात येऊन मला सांगत होती.

“मी तुझा गाण्याचा कार्यक्रम अलीकडेच पाहिला.मस्तच झाला.आता तुझ्या नाटकाच्या कार्यक्रमाला मला यायचं आहे.”
असं मी म्हणाल्यावर,मृणाल म्हणाली,
“अगदी अवश्य या.पुढल्याच आठवड्यात माझं नाटक आहे.मी तुम्हाला नाटकाचा पास पाठवीन.”
नंतर मी तिचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com