Friday, January 21, 2011

रंगरंगोटी.

“सरतेशेवटी तुझ्या म्हणण्य़ावरून माझं मत मी तुला सांगतो.सौन्दर्य प्रसाधनं लावून चेहर्‍याची रंगरंगोटी माननीय दिसायला हवी.आणि त्याकडे कुणी उपेक्षितपणे पाहता कामा नये.”

शुभदाची लहानपणापासूनची ख्याती म्हणजे साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी.अशी मी तिला बरेच वर्ष पहात आलो आहे.मधे तिचा माझा संपर्क कमी झाला.शुभदा एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करण्यासाठी बंगलोरला गेली आहे असं तिचे वडील मला एकदा बोलल्याचं आठवतं.एक वर्षासाठी तिला युरोपला तिच्या कंपनीने पाठवलं होतं,हेही मी ऐकलं होतं.
शुभदा बंगलोरवरून रजेवर येणार आहे असही तीच्या वडीलानी मला सांगीतलं होतं.
त्यादिवशी तिच्या घरी फोन केला आणि तो शुभदानेच उचलला.मला घरी येण्याचा फार आग्रह केला.रोज दिसणार्‍या माणसाला,खूप दिवसाच्या अंतराने परत भेटायला नक्कीच बरं वाटतं.मी रविवारी तिच्या घरी गेलो होतो.

बेल वाजल्यावर दरवाजा उघडून शुभदाच समोर आली होती.माझ्या चेहर्‍यावर कसलाच भाव न पाहिल्याने,कारण मला तिने ओळखलं,पण मी तिला अजीबात ओळखलं नव्हतं, जोर जोरात हंसून माझ्याकडे पहात राहिली. माझ्या लक्षात आल्यावर मी तिला आवर्जून सांगीतलं,
“तू एव्हड्या जोरात हंसली नसतीस तर खरंच मी तुला ओळखलं नसतं.रस्त्यात दिसली असतीस तर शंभर टक्के तू म्हणून ओळखली नसती.”

“हो,माझ्या रहाणीत खूप फरक झाला आहे.आता मी पूर्वीची राहिली नाही.”
मला शुभदा म्हणाली.
“तुझ्या चेहर्‍यावरच्या रंगरंगोटीवरून आणि तुझ्या पेहरावावरून मला ते उघडंच झालं.पण तू कुठेतरी बाहेर जात आहेस वाटतं?”
मी शुभदाला प्रश्न केला.

“तुम्ही माझ्या बाबांबरोबर गप्पा मारीत बसा.एका तासात मी येते.माझी एक मैत्रीण बंगलोरहून आली आहे.तीला भेटून येते.ती जवळच रहाते.”
असं सांगून शुभदा खाली उतरली.

मी शुभदाच्या बाबांशी गप्पा मारताना म्हणालो,
“सगळं जग बदलत चाललेलं आहे.माझ्याही विचारसरणीत मी बदल करीत असतोच.पण कधी कधी एखाद्या व्यक्तिचा आपला मनात इमेज असतो.तुझी शुभदा पावडरसुद्धा चेहर्‍याला लावत नसायची.आज तीचा मेकअप पाहून आणि पेहराव पाहून मी अचंबीत झालो.”

“तिलाच येऊदे.तिलाच तू विचार.तिची बाजू तिच मांडील.”
मीतभाषी शुभदाचे वडील मला म्हणाले.

शुभदा आल्यावर मी तिला म्हणालो,
“बंगलोरला राहून तू फारच बदललीस.अर्थात हल्ली मुली घरात सुद्धा मेकअप करून रहातात.निदान टीव्हीवरच्या मालीकेत सगळी घरातली मंडळी विशेष करून बायका मंडळी अगदी बाहेर जायला निघाल्यासारखी टाप टीप,रंगरंगोटी करून, चेहर्‍याची सजावट करून, रहातात असं दाखवतात.अर्थात त्यात गैर काही नाही.जमाना बदलतो आहे.आणि बदललापण पाहिजे.”
शुभदाला जरा तीची कळ काढल्या सारखंच म्हणालो.

मला म्हणाली,
“सौन्दर्य प्रसाधनाबाबत सर्वसाधारण लोकमत चांगलं नसतं. भडक सौन्दर्य प्रसाधनाचा वापर करून खोट्या रुपाच्या मागे दडण्यासाठी हिकमती लढवायला बरेच लोक टाळाटाळ करतात.हे खरं आहे.
खरा उद्देश साधण्यात ह्या मताची मदत होत नाही.मी सौन्दर्य प्रसाधनं वापरते ते माझे दोष लपवण्यासाठी मुळीच नाही. माझ्याजवळ असलेला आत्मविश्वास प्रदान करता येईल हे अनुभवण्याचं समाधान मला मिळतं.

प्रत्येका जवळ नैसर्गीक सौन्दर्य असतं.पण प्रसाधनं वापरून आपल्या आवाजावर हेच सौन्दर्य जादू करूं शकतं.मी मानते की मी ह्याबाबतीत थोडी आधीन झाले आहे.जास्त करून ह्यात माझ्याजवळ कौशल्य आहे असा माझा समज आहे.
सौन्दर्य प्रसाधनातून मी मला अभिव्यक्त करते असं मला वाटतं.माझा चेहरा हा एक तैलचित्राचा कपडा आहे,आणि माझ्या चेहर्‍याची रंगरंगोटी ही एक कला आहे असं मला वाटतं.गैरसमज करून घेऊ नका.माझ्याजवळ रचनात्मकता मुळीच नाही.मला चित्र काढायला दिलंत तर माणसाचं माकड काढलं जाईल.खरंच मी मस्करी करीत नाही.परंतु,चेहरा रंगवण्याचा कुंचला माझ्या हाताला सापडला तर माझ्या दहाही बोटांतून रचनात्मकता नुसती वाहत असते,आणि त्यातून मला हवीती कला साध्य करायला,निर्मिती करायला,ती मदत करते,आणि त्याचा मला अभिमान वाटतो.”

“किती लोक आपली कला निर्मिती आपल्या चेहर्‍यावर प्रदर्शित करून दाखवतील.?”
मी शुभदाला प्रश्न केला.माझा उद्देश तीच्याकडून आणखी ऐकायचं होतं.

माझं हे ऐकून शुभदा रंगात येऊन म्हणाली,
“चेहर्‍याच्या रंगरंगोटीचा प्रयास सहजपणे करता येतो ही समजूत चुकीची आहे.खरंतर,सुसूत्रतेची झाक,सम्मिश्रणाची झाक,आणि दुसर्‍या खिचकट कौशल्याच्या गोष्टी,निराळंच चित्र उभं करतात.
नुसतं चेहर्‍यावर रंग फासण्यापेक्षा,प्रयास घेऊन कौशल्य दाखवण्यात निराळेच फायदे असतात.ह्या फायद्यामधे,हात आणि डोळ्याचं सुसूत्रीपणा सुधारणं, तसंच निरनीराळे रंग आणि त्यांची झाक मिळून उठावदारपणा आणता येणं हे अंतर्भूत असतं.चेहर्‍यावर रंगाची नियुक्ती करणं आणि सम्मिश्रण करणं ह्यातून सहनशीलता आणि चिकाटी कशी करायची ते शिकायला मिळतं.कलाकुसर चांगली दिसण्यासाठी रचनात्मकतेवर भार वाढवल्याने हे काम जरा जिकीरीचं होतं,आणि ह्याच्याकडे बरेच वेळा दुर्लक्ष केलं जातं.
काही प्रकारचा आत्मविश्वास येणासाठी चेहर्‍यावर रंगरंगोटी करण्यातसुद्धा फायदा असतो.मला मान ताठ करून उभं रहायला,जरा खुसखुसून हंसायला बरं वाटतं. आणि माझ्या दिखावटीबद्दल मला आरामदायक वाटतं.रोज जरासा आत्मविश्वास वाढला तर कुणाला नको होईल.?”

मी शुभदाला म्हणालो,
“सरतेशेवटी तुझ्या म्हणण्य़ावरून माझं मत मी तुला सांगतो.सौन्दर्य प्रसाधनं लावून चेहर्‍याची रंगरंगोटी माननीय दिसायला हवी.आणि त्याकडे कुणी उपेक्षितपणे पाहता कामा नये.”

“अगदी माझ्या मनातलं सांगीतलंत”
असं म्हणून झाल्यावर आईने हांक मारली म्हणून शुभदा आत गेली आणि बाहेर आल्यावर चहाचा कप पुढे करून मला म्हणाली,
“तुम्ही दिलेलेल्या मताबद्दल थॅन्क्यु”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com