Monday, January 24, 2011

सुट्टी

“उत्तम उपाय म्हणजे आता लग्न कर.म्हणजे सुट्टीचा आनंद घ्यायला आणि कामाचा तणाव कमी वाटायला हा पण एक उत्तम उपाय आहे हे तुला दिसून येईल.”

आमच्या फ्लॅटमधून बाहेर आल्यावर खाली उतरताना दुसर्‍या मजल्यावर कमलाकर रहातो.रोज मी सकाळी कामावर जाताना त्याच्या फ्लॅटच्या दरवाजावर भलं मोट्ठं कुलूप बघतो.आणि तसंच संध्याकाळी येताना कुलूप दिसतं.त्याचा अर्थ कमलाकर माझ्या अगोदर निघून जातो आणि माझ्या नंतर घरी येतो.कमलाकर कुठे बाहेर गावी जायचा झाल्यास आमच्या घरी तसा निरोप ठेवून जातो.
गेले दोन तिन दिवस पहातोय त्याच्या दरवाजावर कुलूप नसतं.तो घरीच असावा असा मी अंदाज केला.पण दोन चार दिवस घरी रहाणारा कमलाकर नाही.कमलाकरची आई दोन महिन्यासाठी कोकणात गेली आहे हे मला माहित होतं.पाचव्या दिवशी घरी येताना कमलाकरच्या दरवाजावर कुलूप नाही असं पाहून मी बेल दाबून पाहिली.त्यानेच दरवाजा उघडला.

“इतके दिवस घरीच आहेस,तेव्हा आजारी वगैरे आहेस काय म्हणून कुतूहलाने मी तुझी चौकशी करावी म्हणून बेल दाबली.”
मी कमलाकरला त्याच्या घरात प्रवेश करताना म्हणालो.

“इतके दिवस म्हणजे मी चक्क दोन आठवड्याची सुट्टी घेऊन घरी आहे.सुट्टी नसती घेतली तर मात्र आजारी पडलो असतो हे खचित”
हंसत,हंसत मला कमलाकर म्हणाला.
पुढे सांगू लागला,
“मला सांगावसं वाटतं की,प्रत्येकाने थोडी सुट्टी घ्यावी.सतत काम करून शारिरीक आणि मानसिक ताण येतो.नकळत थकवा येतो.सुट्टीमुळे ह्या गोष्टी दृष्टीप्रांतात येतात.ह्या बाबतीत प्रत्येकाचं सांगण्यात एक यमक असतं,किंवा कामामुळे ताण येतो हे ठळक कारण दिलं जातं.

असंच मला माझ्या कामाबद्दल वाटत असतं.आत्ताच मला सुट्टी घ्यावी लागली.दोन आठवड्याची सुट्टी घेऊन मी कुठेही गेलो नाही,सुट्टीचा उधळेपणा केला नाही..माझ्या घरातच चिकटून राहिलो.मला किती बरं वाटलं हे सांगण्या पलीकडचं आहे.दोन आठवडे मी माझ्या कामाचा विचारपण मनात येऊ दिला नाही.त्यामुळे मन इतकं ताजं-तवानं राहिलं की परत कामावर गेल्यावर मस्त वाटणार आहे.”

मी म्हणालो,
“मला माहित आहे प्रत्येकाला आपलं काम निराळं वाटत असेल.पण प्रत्येक काम तिच समस्या उभी करतं.मानसिक आणि शारिरीक थकवा.
काम तुमच्या मनाशी खेळ खेळतं.तुमच्यात आहे नाही ते सर्व काढून घेतं.म्हणून मला वाटतं प्रत्येकाने सुट्टी घ्यावी. कटकटीच्या समस्यातून थोडा विरंगुळा मिळतो.कधी कधी हेच काम तुम्हाला एव्हड्या खोल खड्यात खेचून घेतं की त्यातून बाहेर येणं मोठं जिकीरीचं होतं.”

माझं हे ऐकून कमलकर म्हणाला,
“एकदा तर गम्मतच झाली.एव्हडा कामाच्या भाराखाली मी चेपून गेलो असताना माझा बॉस माझ्याकडे येऊन दुसर्‍याचं काम माझ्यावर टाकून गेला का तर त्यांच्याकडून त्याला दुसरी काही कामं करून घ्यायची होती.मी हतबल झालो.पण आठ तास काम करीत राहिलो.दिवसाच्या शेवटी एव्हडा थकलो की घरी जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.
घरी आल्यावर एव्हडा थकलो होतो की,माझी वैयक्तिक कामं करायला पण कठीण झालं.

रोज कामावरून घरी येईपर्यंत,ट्रेन,बस,गर्दीतून चालणं पार पाडल्यावर,जीव अगदी मेटाकूटीला येतो.आल्या,आल्या सरळ कोचावर पडून रहावसं वाटतं.
दुसर्‍या दिवशी पुन्हा कामावर जाण्या अगोदर जेव्हडी विश्रांती मिळेल तेव्हडी घ्यावी असं वाटतं.सुट्टी,माझ्या सारख्याला,एक विस्मयकारक औषध वाटतं.”

“कुणीही जरा विचार करावा.दिवसा मागून दिवस काम केल्याने एक प्रकारचं दडपण येतं.तुम्हाला सुट्टी आवश्यक असते. सुट्टी हा एक,मनावरचा भार कमी करायला आणि शरिरावरचं द्डपण कमी करायला,विस्मकारक मार्ग आहे.”
मी कमलाकरला म्हणालो.

“माझ्या दोन आठवड्याच्या सुट्टीत मी कुठेही न गेल्याने,घरात पडून राहिलेली बरीच कामं मला करता आली. नातेवाईकांशी आणि मित्र मंडळीशी वेळ घालवायला मिळाला.खरंच,सुट्टीही,कामापासून होणार्‍या तणावावर,चारही बाजूने होणारा इलाज आहे हे नक्की.”

कमलाकरचं हे ऐकून मी उठता उठता त्याला म्हणालो,
“उत्तम उपाय म्हणजे आता लग्न कर.म्हणजे सुट्टीचा आनंद घ्यायला आणि कामाचा तणाव कमी वाटायला हा पण एक उत्तम उपाय आहे हे तुला दिसून येईल.”
नेहमी प्रमाणे कमलाकर गालातल्या गालात हंसला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com