Sunday, January 30, 2011

आवेश.

“अगदी खरं सांगायचं तर,ही ठिणगी माझ्यात केव्हा पडली की ज्यामुळे मी रंगमंचावर प्रज्वलित होऊ शकले ह्याची मला कल्पनाच नाही.आणि ह्यातच सर्व महात्म्य पुरून उरलं आहे.”

ह्यावेळी कोकणात मी सुनंदाबाई वाडकर यांच्या घरी गेलो होतो.
सुनंदाबाई आता खूपच थकल्या आहेत.आमच्या लहानपणी त्या दहीकाल्यात आणि छोट्या,मोठ्या नाटकात कामं करायच्या.माझी त्यांची ओळख होती.दिगसकर नाटक कंपनी,पारसेकर नाटक कंपनी ह्या नावाच्या दोन तिन नाटक कंपन्या होत्या. त्यात ती कामं करायची.सुनंदाची मुलगी कधीही नाटकात रमली नाही.तिचं मुंबईतल्या एका व्यापार्‍याशी लग्न झालं आणि ती आपल्या संसारात रममाण झाली.पण तिची मुलगी रेवती मात्र आपल्या आजीच्या वळणावर गेली.

रमाकांत परूळेकराने मला ही सर्व माहिती दिली.रेवती लहान असताना कोकणातल्या खेडेगावांत नाटक कंपनीतून कामं करायची.तिची कंपनी मुंबईला आल्यावर भायखाळ्याजवळ एका लहानश्या नाट्य-गृहात त्यांचे खेळ व्हायचे.रमाकांतला नाटकाचं फार वेड होतं.फार पूर्वी एकदा मी त्याच्या बरोबर असंच एक नाटक बघायला भायखाळ्याला गेलो होतो.पार्ल्याचं दिनानाथ नाट्य-गृह,वरळीचं नाट्य-गृह,दादरचं नाट्य-गृह,गिरगावातल्या केळेवाडीतलं नाट्य-गृह अशी मोठमोठाली पांढरपेशा वस्तीतली नाट्य-गृह जरी असली तरी ह्या भायखाळ्यातल्या छोटश्या नाट्य-गृहात आजुबाजूच्या वस्तीला लहान नाटक कंपन्यांची नाटकं बघायला आवडायची.मलाही हे नाट्य-गृह पहिल्यांदाच पाहायला मिळालं होतं.

त्यावेळेला रमाकांतने माझी रेवतीशी ओळख करून दिली होती.आपण सुनंदा वाडकरची नात हे मला तिनेच सांगीतलं होतं.
अलिकडे रेवतीने स्वतःचीच नाटक कंपनी काढली आहे आणि तीही नाटकं करते.आणि ती पण कंपनी घेऊन कोकणात दौर्‍यावर जाते.तिची आजी आजारी आहे हे मला तिनेच अलीकडे सांगीतलं.म्हणून मी कोकणात सावंतवाडीला सुनंदाला भेटायला गेलो होतो.

रेवती अशिक्षीत राहिली नाही.तिने बीऐ पर्यंत शिकून पुढे नाटक कला शिकायला एका इन्स्टीट्युटमधे कोर्स केला होता. वडील व्यापारी असल्याने रेवतीला पैशांची समस्या नव्हती.
सुनंदा मला म्हणाली की तिच्या नातीचं आता बरं चाललं आहे आणि ती आता चांगलीच श्रीमंत झाली असून मुंबईला प्रकाश पेठे मार्गावर एका बिल्डिंगमधे तिने एक मजला विकत घेतला आहे.रेवतीचा पत्ता घेऊन तिलाच भेटायला अलीकडे मी गेलो होतो.

मी रेवतीला म्हणालो,
“तुझी नाटकं मला फार आवडतात.तू मुंबईला आलीस की मी तुझं नाटक बघायला वेळ काढून येतो.सगळ्यात चांगली गोष्ट तू केलीस म्हणजे आवश्यक ते शिक्षण घेतलंस.आणि मग ह्या नाटकाच्या फंदात पडलीस.तुझी आजी नाटकात काम करायला खूप तरबेज होती.पण त्यावेळी लोकांना शिक्षणाचं महत्व तितकसं नव्हतं.आणि शिक्षण घ्यायला पैसापण नव्हता.”

मला रेवती म्हणाली,
“माझ्या वडीलांच्या उपदे्शामुळे आणि आमच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे मला हे करायला जमलं.मी जरी इन्स्टिट्युट मधून शिकले असले तरी वेळो वेळी मी माझ्या आजीचा सल्ला घेत असते.कोकणात तिला भेटायला गेल्यावर आमच्या दोघांच्या नाटकाच्याच विषयावर गप्पा चालतात. माझी आजी आपल्या भाषेत मला भुमिके विषयी समजावून सांगत असते.आवेश बाळगून भुमिका करावी असं ती मला नेहमी सांगत असते.”

मी रेवतीला म्हणालो,
तुझ्या आजीची मी लहान असताना नाटकं बघीतली आहेत.त्यावेळच्या नट-नट्या अंगात आवेश आणूनच कामं करायची.प्रत्येक भुमिका जरा जास्त नाटकी वाटली तरी नाटक पहाण्यात मजा यायची.”
आपल्या आजीची नाटकं पाहिलेला मी पहिलाच तिला भेटलो असावा.आजी आवेशपूर्ण नाटकं कशी करायची हे माझ्याकडून कळायला तिला उत्सुकता होती.
मला म्हणाली,
“आवेशाबद्दल मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे.माझी आजी नाटकातली निरनीराळी आणि लांब लांब वाक्यं आवेशात कशी म्हणायची ह्याचं प्रात्यक्षीक करून मला दाखवतेच पण तुमचे विचार मला ऐकायचे आहेत.”
हे ऐकून मलाही बरं वाटलं.रेवतीच्या आजीची-सुनंदाची-आणि आता हिची-रेवतीची- नाटकं मी बघीतली असल्याने मला जे काय आवेशाबद्दल वाटतं ते मी रेवतीला सांगण्याचा प्रयत्न केला.
मी म्हणालो,
“आपल्या अंगात आवेश कुठून येतो याची मला नेहमीच जिज्ञासा राहिली आहे.आवेश जीवनात गती आणतो. आवेश, सकारात्मक दृष्टीकोनात आपले रूपांतर करून, जास्तीत जास्त वास्तवीक व्हायला,आणि त्यादृष्टीने प्रयत्नात असायला कारणीभूत होतो.

आवेशात कधीही न उलगडणारी अशी जादू असते; तो घामाघूम करतो,रडवतो,दुखावतो,त्याच्याकडून मरणही उद्भवलं जातं.आणि कुणालाही कळत नाही की,असं असूनही माणसं एव्हडी आवेशात का जातात.मला वाटतं की, आवेश येऊ पहात आहे अश्या क्षणाला,तुमच्यातलं काहीतरी, तुमच्या अस्तित्वासंबंधीच्या आकर्षणाला पकडून ठेवतं आणि त्याची पकड एव्हडी घट्ट असते की,तुम्ही त्याला सोडून देऊ शकत नाही. जे साधं म्हणून करायला जाता ते तुमच्या रोजच्या जीवनाचा, तुमच्या हृदयाचा,आणि आत्म्याचा एक भाग म्हणून रहातो.”

रेवतीला, माझं हे ऐकून, तिचा भूतकाळ आठवला.
मला म्हणाली,
“मला माझ्या लहानपणाच्या आठवणी आहेत.
मी लहानपणी शाळेतल्या रंगमंचावर पु.ल.देंच्या
“नाचरे मोरा”
ह्या गाण्याच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर,
हायस्कूल मधल्या,
“मज आणून द्या तो, हरीण अयोध्यानाथा”,
ह्या गदिमांच्या गीत रामायणातल्या गाणेवजा नाचात भाग घेतल्या नंतर, कॉलेजात हिंदी सिनेमातल्या
“होंठों में ऐसी बात मैं दबाके चली आई”
ह्या नाचात भाग घेतल्या नंतर…..आणि हे आणखी असेच काही स्नॅपशॉट्स माझ्या स्मृतिंच्या कॅटलॉगामधे विशेष लक्ष दिलेल्या गोष्टी म्हणून आहेत असं समजत गेले आणि तेच माझं जीवन झालं आहे.ह्या सर्व घटनांमुळे मी सुखदरूपाने आनंदी होत असते,त्यांचा विचार केल्यावर माझ्या मनात प्रश्न आल्यावाचून रहात नाही की ह्यांचा रंगभूमीशी,गाण्याशी, नाचण्याशी आणि भुमिका करण्याशी काय संबंध असावा.
माझ्या लहानपणी निरनीराळ्या चालीची गाणी ऐकल्यामुळे, किंवा मोठेपणी नावाजलेली नाटकं पाहिल्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर झाला असावा.

अगदी खरं सांगायचं तर,ही ठिणगी माझ्यात केव्हा पडली की ज्यामुळे मी रंगमंचावर प्रज्वलित होऊ शकले ह्याची मला कल्पनाच नाही.आणि ह्यातच सर्व महात्म्य पुरून उरलं आहे.”

मी रेवतीला म्हणालो,
“तुमच्या जीवनात विशेष काहीच रोमांचक घडत नाही अ्से बरेच क्षण येतात.पण कधीतरी विजेचा झटका अंगातून आरपार निघून जातो.मला वाटतं,असं काहीही घडत असेल की तसं वाटायला हा झटका तुम्हाला सक्रिय करतो.आणि त्यातला उत्तम भाग तो की, तुम्हाला हे कुठून घडलं हे कळतच नाही.
कधी ध्यानातही नसलेलं एखादं स्पंदन तुमच्यातून निघून जातं आणि सांगतं की,ह्या क्षणाला तुमचं जीवन उच्चतम आहे. तुम्ही हंसा,होत आहे त्या घटनेचा आनंद भोगा आणि तुम्ही कुठे आहात,कुणाबरोबर आहात,आणि काय करीत आहात ह्याचं बारीक निरक्षण करून त्याचं डबोलं करून तुमच्याजवळ ठेवा.”

आपल्याला कार्यक्रम करताना काय वाटतं हे सांगण्यासाठी रेवती उत्सुक्त होती.
मला म्हणाली,
“मी ज्यावेळी गाते,भुमिका करते त्यावेळी मला असंच भासत असतं.त्या हर्षोत्फुल्ल घटनेचा गुप्त मार्ग माझ्याकडून हाताळला गेला आहे असंही भासत असतं.रंगमंचावरच्या दिव्याच्या झगमगाटाने माझे डोळे दिपले गेले असताना, माझ्या अंगठ्याने मी मायक्रोफोनचं बटन दाबते. एक आंवढा गिळते, चांगला श्वास घेते,नंतर उच्चतम स्वरात गाण्यासाठी गळ्याचा पडदा तयारीत ठेवते. दिवे,प्रेक्षक,स्वरात गाण्यासाठी ताणलेल्या माझ्या शिरा ह्या सर्व गोष्टी मला उत्तेजीत करतात.वर्णन करता येणार नाही असा आनंद मला सुखदायी वाटतो.उचंबळून आलेल्या माझ्या भावना मला नशेत आणतात. मला गिळंकृत करून टाकतात. माझ्या रंद्रा,रंद्रातून ओथंबून बाहेर येणारा आवेश मला प्रेरित करीत असतो. रंगमंचावर तुमची भुमिका तुम्ही क्रियान्वीत करीत असताना,आवेश येणं आणि आवेश जगणं हा नुसता त्या स्वर्गसुखाचा आनंद भोगणं एव्हड्यापुरतंच नसतं तर—
माझ्याकडून झालेली चूक प्रेक्षकांच्या आलोचनात्म्क नजरेत पाहून रडू कोसळण्यातला आवेश,चालू असलेल्या कार्यक्रमासाठी घेतलेल्या पूर्वतयारीच्या मेहनतीचा आवेश.असे हे आवेश,तुमची उन्नति होण्यासाठी घेतलेली जोखिम असते असं मी माझ्या मनात म्हणत असते.नाटकातलं एखादं कठीण गाणं,आळवून,आळवून गाण्यात घेतलेलं धैर्य, आणि भुमिका करीत असताना स्वतःची गैरसोय करून टोकाचा सीन करण्याची तयारीत असणं, ह्या गोष्टी जोखिमीच्या सदरात मोडतात असं मी मनात ठरवते.

हो,हा आवेश कुठून येत असतो हे माझ्या मनातलं नेहमीचंच गुढ आहे.आणि मला वाटतं हे गुढ माझ्या मनात कायमचंच असणार.
आपल्या ह्या समाजात जे माहित नाही ते हुडकून काढण्यात लोक नेहमीच चिंतीत असतात.सर्वच गुढं उकलली जात असताना,मला वाटतं,हा आवेश कुठून येतो ह्याबद्दल वाटणारं एखादं गुढ उकललेलं राहिलं तरी हरकत नसावी.

मला आवेशाबद्द्ल आणि ते आमच्या जीवनात काय परिणाम करतं ह्याच्याबद्दल विशेष वाटतं.डोळे दिपून जावेत,ह्रुदय जोरात धडधडावं,कार्यक्रमाची पूर्व तयारी करीत रहावं,प्रयत्न करावेत,अपयशी व्हावं,आणि यशसंपादावं ह्याबद्दल मला विशेष वाटत असतं.”

“नुसतीच नाटककला,गाण्याची कला ह्याचीच तुला आवड नाही,तर तुझ्या मनातले विचार तुला दुसर्‍याला समजावून सांगायला तुझ्याकडे शब्द पण आहेत हे पाहून मला आनंद होतो.मला वाटतं तू चांगली शिकलीस म्हणून हे तुला साध्य होत असावं.तुझ्या आजीतला आणि तुझ्यातला हा फरक मला प्रकर्षाने जाणवला.अर्थात हा पिढी-पिढीतला फरक आहे हे उघडंच आहे.पण जुन्या लोकांकडून एखादं मार्मिक वाक्य,जसं तुझी आजी तुला म्हणयची,
“आवेश बाळगून भुमिका करायची”
हे वाक्य सर्व काही सांगून जातं.हे ही तितकच खरं आहे.तुझ्याशी चर्चा करून मजा आली.”
असं म्हणून मी जायला उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com