Tuesday, January 4, 2011

शोभनेची सहजता.

“मला एव्हडं माहीत झालं आहे की,जीवनातल्या साध्या गोष्टी,ज्या मामूली आणि नगण्य वाटतात त्याच खरं जीवन जगण्यालायक करतात.”

शोभना न्युरॉलॉजीमधे पीएचडी आहे.इंग्लंडला शिकली.तिकडेच प्रकाश जोशी ह्या बिझीनेसमनशी ओळख झाल्यावर काही दिवसात प्रेमात पडली.अलीकडेच ती दोघं मायदेशात लग्न करण्यासाठी आली आहेत.
मी तिच्या सर्व लग्न सोहळ्यात सहभागी झालो होतो.जीन आणि टॉपमधे दिवसभर रहाणारी शोभना,लग्नात नऊवारी लुगड्यापासून,नथ,हार बांगड्या, हिरव्या काचेच्या बांगड्या हातात भरून,हाताला मेंदी लावून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि रुढीनुसार लग्न करायला सज्ज झाली होती.

लग्न व्यवस्थीत पार पडून झाल्यावर एकदिवशी मी शोभनाबरोबर गप्पा मारायला बसलो होतो.
उत्तमपणे पार पाडलेल्या तिच्या सोहळ्याचं अभिनंदन करून मी तिला म्हणालो,

“सहजता”,म्हणजेच,सहज वाटणार्‍या गोष्टी,जशा वळवाचा पाऊस,नीळं आकाश,लहानशा मुलांचं हंसणं.
वयस्कर मोठ्या आवाजात सांगताना ऐकलं असेल
“ह्याच गोष्टीने लक्ष वेधलं जातं”
मग ह्या सर्व गोष्टींना साधं,सोपं का म्हणावं?”
असा कुणीतरी प्रश्न केल्याचा मला आठवतं.तुझं काय म्हणणं आहे?”
मी शोभनाला प्रश्न केला.

“आपल्याच जीवनात मागे वळून पाहिलं,आणि समजा ज्या गोष्टींचा अनुभव आला किंवा ज्या गोष्टी विशेष वाटल्याने स्मरणात ठेवल्या,त्याचा विचार केल्यावर प्रथम काय मनात येतं?
ग्रॅड्युएट झाल्याची घटना?प्रथमच नोकरी लागल्याची घटना? शाळेत किंवा कॉलेजमधे प्रथमच मिळालेलं बक्षीस घेतानाचा दिवस? परदेशात शिकायला जाण्याची घटना, ह्या काही मोठ्या घटना म्हणाव्यात का?
आता मी जी आहे ती होण्यासाठी ह्या सर्व घटना कारणीभूत आहेत असं तुम्हाला वाटतं का?”
शोभनानेच मला उलट प्रश्न केला.

मी म्हणालो,
“व्यक्ति तशा प्रकृति.तुझं मत मला ऐकायचं आहे.”

मला शोभना म्हणाली,
“ह्या किंवा अशाच काहीशा आकर्षक, भुरळ घालणार्‍या घटना तुम्ही जे आहात ते व्हायला कारणीभूत झाल्या का?
माझ्या जीवनात म्हणाल तर,असल्या घटना विस्मयकारी असून आणि मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या स्मरणाने आनंद जरूर होतो ह्यात प्रश्नच नाही. परंतु,खरोखर मोठा परिणाम माझ्यावर होऊन मी जी आता आहे ते घडण्यात झाला असं मी मुळीच म्हंणार नाही.

माझ्या वयक्तिक अनुभवातून मी म्हणेन,वेळोवेळी मी शिकत आले आहे की,माझ्या जीवनाची व्याख्या करायला,आणि मला बनवायला काही अगदी साध्या साध्या गोष्टीनी मला शोभना व्हायला मदत केली आहे.मला अपूर्व अनुभव आणून देणार्‍या घटनामधे मला स्मरतात त्या माझ्या धाकट्या बहिणीबरोबर,रंजना बरोबर,झालेल्या लुटूपुटुच्या विश्वातल्या घटना. आम्हाला एकमेकाशी जखडून ठेवणार्‍या त्या अगदी साध्याश्या घटना म्हणायला हरकत नाही.

आम्ही चौपाटीवर गेल्यावर दोघी मिळून वाळूत डोंगर आणि भुयारं बनवायचो.डोंगराच्या खालून कोरून काढलेल्या भुयारातून हात घालत असताना वरचा डोंगर कोसळणार नाही ह्याची काळजी घ्यायचो.आणि एकमेकाचे हात एकमेकाला भेटल्यावर जो आनंद व्ह्यायचा त्याला सीमा नसायची.

आमच्या घराच्या समोरच्या पायवाटेवर खडूने चित्र काढायचो.झोपडी,माडाची झाडं,वहाती नदी,गाई,गुरं, नदीतून वहात जाणारी होडी असा अनेक गोष्टीचा समुदाय काढताना तासनतास मग्न व्हायचो.

शेजार्‍यांच्या पपीला झालेल्या चार पाच पिल्लाना आंघोळ घालून दुध पाजायचो,गळ्यात दोरी बांधून जवळच्या रानात फिरायला न्यायचो.ह्यात तासानतास वेळ घालवायचो.आम्हाला ह्यात प्रचंड आनंद व्हायचा.ह्या साध्या साध्या गोष्टीतून आम्हा दोघा बहिणीत निर्माण झालेला शक्तिशाली दुवा कुणीही तोडू शकला नाही.मग ह्या घटनाना साध्या घटना का म्हणावं?

माझ्या जीवनात दुसर्‍या साध्या घटनानी प्रभाव आणला त्या; माझ्या शाळेतल्या पहिल्या दिवसालाच माझ्या जीवलग मैत्रीणीने आपली प्रथम ओळख करून दिली तो दिवस,मला माझ्या आईने आणून दिलेल्या वि.स.खांडेकरांच्या वीरधवल ह्या कांदबरीचं शेवटचं पान मी वाचलं तो दिवस,मी चिं.त्र्य.खानोलकरांची कोंडूरा ही कादंबरी लायब्ररीतून स्वतः आणून वाचायला घेतली तो दिवस,मी इंग्लंडला जाण्यापूर्वी माझ्या आईने मला स्वतःलाच एकवीस उकडीचे मोदक बनवून गणपतीला नैवेद्य म्हणून ठेवायला दिलेला मान.
मी शांत बसून प्रत्यक्ष विचार करते,तेव्हा मला “मी” बनवण्यासाठी एक किंवा दोन मोठ्या घटनांकडे पाहून अचूक हेरता येत नाही.मी अनेक साध्या पण महत्वाच्या घटनांचा संग्रह आहे असं मानते.मला कुणी बाहेरच्या कव्हरवरून किंवा शिर्षकावरून ओळखू शकणार नाही.कारण मी सर्व पानं आणि सर्व शब्द ह्या मधली आहे.
मला एव्हडं माहीत झालं आहे की,जीवनातल्या साध्या गोष्टी,ज्या मामूली आणि नगण्य वाटतात त्याच खरं जीवन जगण्यालायक करतात.
सहजता वाटते तितकी साधी नसते….ती नुसती विस्मयजनक असते असं मला वाटतं.”

उठता,उठता मी शोभनेला म्हणालो,
“तुझ्या लग्नाच्या सोहळ्यात मी बारकाईने पहात होतो.मला तुझ्यात साधेपणाच जास्त दिसला.त्यामुळे मी तुला नेमका “सहजतेवर” प्रश्न केला.तुझं उत्तर ऐकून माझं कुतूहल स्पष्ट झालं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishas@gmail.com