Friday, June 17, 2011

साध्याश्या गोष्टीतून मौज-मजा



“माणूस गर्भ-श्रीमंत असूनही त्याची आनंददायक बाब अल्पमोलाची असू शकते.”

आज सकाळी माझ्या कपात मी कॉफी ओतत होतो.माझ्या नाकाकडे दरवळून येणार्‍या त्या कॉफीच्या सुगंधाबरोबर सहजगत्या,गिळल्या जाणार्‍या त्या कॉफीच्या स्वर्गीय घोटामुळे, होणार्‍या आनंदाची बर्‍यापैकी मौज मी गेली कित्येक वर्ष रोज सकाळी लुटत आलो आहे.कॉफीचा स्वाद घेण्याच्या ह्या सहजचच्या कृतीचा विचार केल्यावर मला लक्षात आलं की ही सामान्य दिसणारी मजा जास्तीत जास्त दिलासा देते आणि जीवनातल्या अडचणी आणि दुःख सहनकरण्याजोगी अंगात क्षमता आणते.

घाई-गर्दीचं जीवन जगताना,नगण्य भासणार्‍या गोष्टी,जशा रुपयाचं नाणं मिळावं आणि लहानपणाची आठवण येऊन त्यावेळी ते खर्च करण्यातला रोमांच आठवावा.
तो रुपया,ओठ आणि टाळा चुरचूरून टाकणारं एखादं,पेय पिण्यात खर्च करायचा की त्या धनाच्या हंड्यातून, रस्त्यावरच्या भय्याच्या गाडीवरून, चार आण्याचा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा घ्यायचा आणि उरलेल्या पैशातून कोपर्‍यावरच्या मिठाईच्या दुकानातून, पारदर्शक कागदात बांधलेले, बदामी हलव्याचे लाल आणि पिवळे गड्डे घ्यायचे असा संभ्रम व्हायचा.असं ते बालपण आठवायचं.

बरेच आपण साध्याश्या गोष्टीतून मौज-मजा करून घेत नाही-मान्सून चालू झाल्याबरोबर धडाकेबाज ढगांच्या गडगडातून,विजेच्या चकमकेतून,धो,धो पडणार्‍या पावसाच्या सरीतून,समुद्रावर जाऊन मिळणार्‍या मजेतून,किंवा पाऊस थांबायचं नावच घेत नाही असं भासत असताना घरात बसून पाडगांवकरांचा काव्य-संग्रह वाचण्यात दंग होऊन,गरम गरम चहा आणि तिखट कांद्याच्या भज्यांचा आनंद लूटण्यातून.

उलटपक्षी आपण काहीसं निरंतर कर्मोपासना समजून, सेल-फोनचा वापरकरून,लॅप-टॉपचा वापरकरून,किंवा तत्सम उपकरणांचा वापर करून,”स्टार-ट्रेक” मधल्या अर्धा माणूस अर्धं यंत्र असलेल्या काल्पनीक माणसासारखं भासवून जीवन जगतो. आपण आपल्यालाच अतिताण देऊन थकावट आणण्यास कारणीभूत होतो.

अलीकडेच मी कोकणात थोडे दिवस रहायला गेलो होतो.फिरायला म्हणून निघालो होतो.डोक्यात एक विचार आला आणि माझा मीच मनात वाद घालून समस्या कशी सोडवावी ह्याची चिंता करीत होतो.घाटी चढून झाल्यावर आणि उतार आल्यावर संथ वहात जाणारी मोचेमाडची नदी पहाण्यात दंग झालो.बाजूने एक गाडी वेगाने निघून गेली.त्यात परदेशी पर्यटक होते.ते बहुतेक गोव्याला जाण्यासाठी निघाले असावेत.गाडीच्या मागच्या खिडकीत माझं लक्ष गेलं.

एक लॅबरॅडोर जातीचा कुत्रा खिडकीच्या बाहेर डोकं काढून, आपले कान मानेवर फडफडते ठेवून,तोंड आवासून उघडं ठेवून,लांब जीभ, जबड्याच्या एका बाजूला लोंबती ठेवून, बाहेरची मजा लूटण्यात दंग दिसला.त्याचा तो हास्यास्पद वाटणारा चेहरा बघून मीच दात विचकून हसायला लागलो. आणि माझा उत्साह वाढला.मी माझ्या समस्येचा विचार दूर करून, त्या लॅबरेडॉरचा चेहरा आठवून,माझ्या समस्येऐवजी दूर वरून येणार्‍या वार्‍यामधून नदीच्या पाण्यात असलेल्या मास्यामुळे निर्माण झालेला एक प्रकारचा मला आवडणारा सुगंधाचा वास अनुभवून तल्लीन होत होतो,त्या कुत्र्यासारखा.

लहान लहान गोष्टी आपल्या उराशी बाळगून राहिल्याने, महत्वाचं काय आहे आणि त्याच्याशी आपला संबंध काय आहे ह्याची आपल्याला आठवण करून दिली जाते.ह्यामु्ळे कधीकधी आपण विनयशील बनतो-ज्याची आपल्याला वेळोवेळी पुन्हा ओळख करून घेण्याची जरूरी भासत असते.

हल्लीचीच झालेली गोष्ट सांगतो,मी घरी आल्यावर दाराशी एक मोठं पार्सल आणून ठेवलेलं पाहिलं.देवगडचे हापूस आंबे होते हे समजल्यावर मला हसू आलं.
माझी चुलत बहिण,मी शहरात राहत असल्याने, खर्‍या हापूस आंब्याना कसा दूरावतो,हे लक्षात घेऊन कोकणातून दरवर्षी एक आंब्याचं पार्सल पाठवीत असते.माझ्या घराच्या दरवाजावर टेकून ठेवलेलं ते पार्सल पाहून माझ्या मनात माझ्या बहिणीविषयी स्नेहशीलतेची अचानक प्रतिक्रिया उचंबळून आली.माझ्या बहिणीची दयाशीलता आणि औदार्य पाहून तिच्याविषयी आदर द्विगुणीत झाला.

कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“माणूस गर्भ-श्रीमंत असूनही त्याची आनंददायक बाब अल्पमोलाची असू शकते.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com