Wednesday, June 8, 2011

कामसू कुसुम



“मात्र काळजी करू नका माझं घर नेहमीच एव्हडं अस्तव्यस्त नसतं,फक्त एव्हडंच की अलीकडे मला आणखी “महत्वाची” कामं करावी लागतात.”

बरेच दिवसानी,नव्हेतर बरेच वर्षानी मी कुसुमच्या घरी तिला भेटायला गेलो होतो.तिच्या एका गुढघ्याची सर्जरी झाली होती म्हणून मला कुणीतरी सांगीतलं म्हणून मी तिला भेटायला गेलो होतो.तिची मोठी मुलगी सुलभाच आता बारा वर्षाची झाली आहे.

मी कुसुमला म्हणालो,
“अलीकडे गुढघ्याची सर्जरी,विशेष करून बायकांची,फारच होत असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे.बरेचवेळा बायकांवरच घरची कामं करण्याची जबाबदारी येत असल्याने त्यांच्या शरीराची झीज जास्त होत असावी,आणि निसर्गानेही अगदी त्यांच्या जन्मापासून जबाबदारीची कामं त्यांच्यावर लादली असल्याने ती झीज होण्यात जास्त भर पडत असावी.
घरची सर्वच कामं ओघाने बायकानांच करावी लागतात.काहीवेळा एखाद-दुसरा पुरूष त्यांच्या मदतीला गेला की,
“ती तुमची कामं नव्हेत.तुम्ही इकडे लुडबूड करू नका.”
अशीही त्यांना प्रेमळ धमकी(?) मिळते आणि “बिचारा” पुरूष काय करणार,
“बरं तर”
असं म्हणून तो कामानिराळा (नामानिराळापण) होतो म्हणा.
हे झालं पुरूषाबद्दल.

आणि निसर्गतरी काय कमी आहे का?
प्रजोत्पति सारखी महा-जबाबदारी बायकांवर लादून, त्यांच्या शरीराची त्याने वाट लावलीच,शिवाय सहनशिलता, समजूतदारपणा, सोशीकता हे स्वभावगुण त्याना देऊन इतराना हा बायकांचाच मक्ता आहे असं अध्याहृत धरायला कारण दिलं आहे.हा सर्व भार सहन करता करता त्यांच्या शरीराची थोडी हानी होणं स्वाभाविकच आहे.त्यात भर म्हणून, शहराततरी, बायकांना व्यायाम कुठे घेता येतो?त्यामुळे शरीराचं वजन वाढून गुढघ्यावर भार पडत असावा असं मला वाटतं.
मी तर म्हणेन निसर्गाने माणसाच्या गुढघ्याचं डिझाईन करताना खास लक्ष दिलं नसावं.वय होत जातं तसं गुढघ्याचं दुखणं प्रकर्शाने जाणवतं.”

माझं हे लेक्चर कुसुम निमूट ऐकून घेत होती.तिलाही बरंच काही मला सांगायचं होतं असं दिसलं.आपलं घर स्वच्छ,टापटीप दिसावं म्हणून ती पूर्वी खूप मेहनत घ्यायची.
मी कधीही तिच्याकडे गेलो की तिच्या हातात एखादा पुसायचा कपडा किंवा पिसांची झाडू असायची किंवा मुलांच्या कपड्यांच्या घड्या करीत दिसायची.
मी कुसुमला म्हणायचो,
“अग, काम जरा बाजूला ठेऊन माझ्याशी गप्पा मारायला बस.”
मला म्हणायची,
“तुम्ही बोलत रहा मी सगळं ऐकतेय”

ह्यावेळी मात्र मला म्हणाली,
“मला असं वाटायला लागलंय की घरातली आणि घराची कामं रोखून ठेवता येतात.हे समजण्यासाठी मला खूपच काळ घालवावा लागला मात्र. जीवनातल्या महत्वाच्या कामांचं, तुमचं घर किती स्वच्छ आहे,ह्याच्याशी काही संबंध नसतो.

बारा वर्षापूर्वी माझी पहिली मुलगी सुलभा हिचा जन्म झाला होता,ते दिवस मला आठवतात.तासनतास मी घराची साफसफाई करण्यात वेळ घालवायची.कधी कधी सुलभाला कमरेवर घेऊन घर साफ करण्यात वेळ घालवायची.घरातली काम करणारी बाई काम करून जायची.तरीपण मी माझा आणखी वेळ टाकून साफसफाई करायची.खिडक्यांची तावदानं साफ कर,उंच काठी घेऊन कोळी-कोष्टकं काढ,स्टुलावार चढून व्हेन्टीलेटर साफ कर,प्रवेश दाराजवळच्या चपला,बुट नीट डाळून लाऊन ठेव अशी अनेक कामं माझ्या मी हुडकून स्वतःला व्यस्त ठेवायची.

एका मागून एक मुल जन्माला आल्यावर,लहान मुलांच्या कपडयांची संख्या वाढायची, त्यामुळे लॉन्ड्रीचं काम वाढायचं. इतस्ततः पडलेली मुलांची खेळणी उचलून ठेवावी लागायची. लहान-मोठ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवाव्या लागायच्या. इतकी कामं वाढायची की मी मग अग्रतेप्रमाणे कामाची वाटणी करायची.
अनेक वेळा माझ्या मैत्रीणीना घरी बोलवायचं टाळायची,फोन घ्यायला टाळायची,कामाची धामधूम टाळायची.घर टापटीप ठेवण्याच्या वेडेपणामुळे हे सर्व करावं लागायचं.

मुलं जशी मोठी होत गेली तसं माझं साफसफाईचं झपाटलेपण अगदी शिखराला जाऊन पोहोचलं. माझे आईवडील यायचे झाले, अगदी दोन तासासाठीपण,की मी आदल्या रात्री जागून बाथरूम-टॉयलेट आणि फरशा चकाचक करून ठेवायची.
सुट्ट्यांच्या दिवशी किंवा सणावारा दिवशी हे टापटीपीचं माझं पागलपण उफाळून यायचं.माझ्याबरोबर माझे कुटूंबीयपण साफसफाई ठेवण्यासाठी धडपडीत असायचे,तेसुद्धा वर्षातून एक दोन वेळा येणार्‍या पाहुण्यांसाठी.

अलीकडे मला गुढघ्याची सर्जरी करावी लागली.त्यासाठी मी पंधरा दिवस हॉस्पिटलात होते.बरेच आठवडे मला जास्त चालायचं नव्हतं.ह्याच दिवसात मी शिकले की घरातली कामं रोखून धरता येतात.कामं थांबू शकतात.मुलांत वेळ घालण्या ऐवजी मी त्यांच्या खोल्या टापटीप ठेवण्यात वेळ घालवला हे लक्षात आल्यावर माझे डोळे उघडले.माझ्या लक्षात आलं की घराची टापटीप ठेवण्यात दवडलेला माझा वेळ घरातल्या लोकांत दवडण्यात मी मुकले.

अलीकडे माझं घर अजीबात टापटीपीत नसतं.खिडकीच्या तावदनावर धुळ असते, मुलांचे खेळ बिछान्यावर किंवा बिछान्याच्या खाली पडलेले असतात,आजच्या आज सर्व कपडे धुतलेच पाहिजे असं नसतं.मुलांबरोबर वेळ घालवावासा वाटला तर हातातलं काम बाजूला ठेवून त्यांच्यात जाऊन बसते.घरची कामं करायला हवीत हे खरं आहे,म्हणून आत्ताच्या आत्ता करायला हवीत असं नव्हे.
कुणी पाहुणे यायचे झाल्यास मी पागल होऊन साफसाफाईच्या मागे लागत नाही.माझी मीच कानऊघडणी करून घेते.येतात ते पाहुणे आपल्याला भेटायला येत आहेत.बाथरूमची फरशी किती चकमकत आहे किंवा बेसिन किती साफ आहे ते बघायला येत नसावेत.

पूर्वीचं आता राहिलं नाही.आता जरका कोणी सहज म्हणून माझ्या घरी आला तर,चपला.बुटांच्या ढिगार्‍यावर त्याचे पायताण त्याला काढून ठेवावे लागतील.घरात आल्यावर एखाद दुसर्‍या जमीनीवर पडलेल्या मुलांच्या खेळावरून ओलांडून जावं लागेल. खिडक्यांवरची धुळ बघून दुर्लक्ष करावं लागेल.
परंतु,एक मात्र नक्की, माझ्याकडून कुणाचाही आदर-सत्कार नक्कीच होईल.आणि जुन्या आठवणी काढून गप्पा रंगल्यावर गरम गरम कॉफीचा घोट घेण्यासाठी कप कुणाच्याही हातात नक्कीच मिळेल.
मात्र काळजी करू नका माझं घर नेहमीच एव्हडं अस्तव्यस्त नसतं,फक्त एव्हडंच की अलीकडे मला आणखी “महत्वाची” कामं करावी लागतात.”

तिचा निरोप घेता घेता मी कुसुमला म्हणालो,
“तुला आणखी महत्वाची कामं करावी लागतात हे मला तुझ्या प्रवेशदाराच्या दरवाजावरच कळलं.कारण चपला बुटांच्या ढिगार्‍यातच मी माझी चपलं काढून ठेवली आहेत.इतर पायताणं नीट डाळून ठेवलेली मला ह्यावेळी दिसली नाहीत.”

कुसुम खजील होऊन माझ्याकडे बघून हसली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com