Sunday, June 5, 2011

स्मिताचं स्मित.


कुणीतरी एका गाण्यात म्हटलेल्या दोन ओळी मला आठवतात,

“पोशाख करूनी होशिल तू संपन्न
देऊनी स्मित करिशी जेव्हा प्रसन्न”

ह्या दोन ओळी मी स्मिताशी बोलत होतो तेव्हा तिला म्हणून दाखवल्या.आणि तिला पुढे म्हणालो,
“अमेरिकेत चेहर्‍यावरच्या हास्याला खूप मानतात. दाताच्या डॉक्टरला भरपूर पैसे देऊन सगळ्य़ात उत्तम हास्य चेहर्‍यावर दाखवता येईल ह्याची योजना करायला लावतात.हसल्यावर चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरेच लोक कुठच्याही सीमेला जाऊन पैसे खर्च करायला तयार असतात.काही ख्यातिप्राप्त व्यक्तिंचा हास्य हा खास मिळकतीचा भाग असतो.त्यावर काही लोक विमा घेतात. पुढे कधी चेहर्‍यावर हास्य ठेवता आलं नाही तर पैसे वसूल करतात.”
मी स्मिताशी हास्य ह्या विषयावर बोलत होतो.

स्मिता हसली किंवा तिने साधं स्मित करून दाखवलं तरी ती खूप सुंदर दिसते.एव्हडंच नाही तर स्मिताला ती बोलत असलेल्या प्रत्येक वाक्यागणीक, हसण्याची सवय आहे.तिच्या हसण्याच्या सवयीचं मला काय वाटतं हे सांगण्यासाठी मी हा विषय तिच्याकडे काढला.

मी दिलेली माहिती ऐकून स्मिता मला म्हणाली,
“ह्या गाण्यातल्या ओळी सर्वांनाच लागू आहेत.जास्तकरून मला.
मला ठाऊक आहे की माझ्या चेहर्‍यावरची एकच स्मित-रेषा माझा रूप-रंग बदलून टाकते,मग मी कसलेही कपडे घालेना.
मला हास्याबद्दल विशेष वाटतं.चेहर्‍यावरचं एक हास्य सुखाचं लक्षण आहे.हे जगत-मान्य आहे.

एक स्मित निरनीराळ्या गोष्टी प्रतित करतं.जेव्हा एखाद्याकडून भावनेचा आवेग येतो तेव्हा हास्य लपवलं जात नाही.सचिनने जेव्हा पहिल्यांदा माझ्याशी लग्न करण्याची कबूली दिली तेव्हा कित्येक मिनीटं माझ्या चेहर्‍यावरचं उत्तेजीत हास्य मला लपवता आलं नाही.”

स्मिताच्या हसण्यातली मनोहरता तिच्या दातात आहे असं मला वाटतं.अगदी लहानपणापासून तिचे बाबा तिला डेन्टीस्टकडे घेऊन जायचे हे मी पाहिलं आहे.काही काळ स्मिता ब्रेसिस वापरायची.अगदी नियमीतपणे डेन्टीस्टकडून दातातल्या कॅव्हिटीझ तपासून दात साफ करून घ्यायची.

“हो, मी लहान असताना माझ्या बाबांवर खूप रागवायची.मला डेन्टीस्टकडे जायला खूप कंटाळा यायचा.तोंड खूप दुखायचंसुद्धा.
पण माझे बाबा त्यावेळी माझ्यावर सक्ती करायचे.आणि आता त्या सक्तीचं फळ काय आहे ते मला कळायला लागलं आहे.”
स्मिता आपल्या लहानपणाची आठवण काढून मला सांगत होती.

मी स्मिताला म्हणालो,
“बाकी आमच्या सारख्यांना,आपल्या मनातल्या भावना प्रदर्शीत करायला हसू हे एक साधन आहे. आनंद,आशा-आकांक्षा, अभिमान,आणि प्रसन्नता दाखवायला एक साधं दात दाखवून हसण्याचं साधन आहे. कधी कधी हास्य भ्रामक असू शकतं. एखाद्या चित्रपटात व्हिलन,आपला प्लॉट यशस्वी झाल्यावर,चेहर्‍यावर एक बनावटी हसू आणतो ते आपल्या सहज लक्षात येतं.

खरं पाहिलस तर,मला,वाईट,कुत्सित हास्यापेक्षा,मनोहर हास्यांची जास्त जाणीव असते.मला सर्वात आवडणारं हास्य,ज्या हास्याची बरोबरी इतर कुठल्याही हसण्यात करता येणार नाही,ते म्हणजे एखाद्या निष्पाप,निरागस मुलाचं हसणं.अगदी अवर्णनीय हास्य. हसताना त्याच्या नजरेतच निर्मळ आनंद दिसतोच शिवाय त्याचं हसू तो रोखून धरूच शकत नाही असं भासतं. फ्लूच्या साथीपेक्षा हे हास्य संसर्गजन्य असतं असं मला नेहमीच वाटतं.”

स्मिता मला म्हणाली,
“मी नेहमीच ऐकत आले आहे की कपाळाला आठ्या घालण्यास लागणारे मसल्स हे हास्य दाखवण्यासाठी लागणार्‍या मसल्सपेक्षा खूपच जास्त असतात.मला गंमत काय वाटते की,अस असूनही लोकं आठ्या घालणं जास्त पसंत करतात.
अगदी सहजपणे पाहिलंत तर तोंडाचे दोन कोपरे वर करायला एव्हडी काही मेंदूची शक्ती किंवा एव्हडे काही कष्ट वापरावे लागत नाहीत.मग प्रयत्न करायला काय हरकत असावी.?”

“दरदिवशी तुझ्या पोशाखाला पूर्णत्व यायला एक परस्पर पूरक हास्याची तू भर घालतेस.तुला तसंच तुझ्या समोरच्याला एक हास्याचा मस्त तोफा तू देत जातेस असं म्हणायला मला हरकत नाही”.

मी स्मिताचं कौतुक करण्याच्या दृष्टीने तिला म्हणालो.
मला थॅन्क्स म्हणून सांगण्याऐवजी स्मिताने आणखी एक मोहक हास्य दाखवून माझे थॅन्क्स मानले असं त्यावेळी मला भासलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamail.com