Saturday, June 11, 2011

ती घाणेरीची फुलं.


Posted: Sun, 12 Jun 2011 00:51:57 +0000

“कधीकधी प्रभावशाली,काळाला थोपवून ठेवणारा,जीवनात परिवर्तन आणणारा क्षण,एखाद्या फुलाच्या अगदी साध्या,कोमल,पाकळीच्या पापुद्र्यात लिपटलेला असतो.”

असंच एकदा मी वाचत असताना, एका ब्लॉग लिहिणार्‍याने अनेक विषयावर जे ब्लॉग लिहिले जातात त्यावर आपलं मत दिलं होतं, ते मत माझ्या वाचनात आलं.सरतेशेवटी त्याला म्हणायचं होतं की अमुकच विषयावर ब्लॉग लिहावेत,आणि अमुक विषयावर ब्लॉग लिहू नयेत.त्याला बर्‍याच वाचकाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या.मी त्याला नेहमीप्रमाणे कविता लिहून प्रतिक्रिया दिली होती.ती आज मला आठवली.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देऊनी सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
काय वाटेल ते लिहूनी
कर लेखनाची समृद्धी

आणि ह्या कवितेतून आठवायचं विशेष म्हणजे,त्या कवितेतला फुलांचा उल्लेख.त्यातल्यात्यात घाणेरीच्या फुलांचा उल्लेख.
वेळात वेळ काढून घाणेरीची फुलं पहायला,त्यांचा वास घ्यायला मला फार आवडतं.घाणेरीची निरनीराळ्या रंगाची फुलं न्याहाळत रहाण्याची माझी हौस अलीकडे जवळ जवळ संपुष्टात आल्यासारखं झालं आहे.

ही फुलं गुच्छात उमलतात.ही फुलं अतिशय सुंदर दिसत्तात. पण हिची लागवड मुद्दाम कोणी करत नाही.हे कुठेही उगवते आणि माजते.घाणेरी या नावाचा घाणीशी काही संबंध नाही कदाचित सांडपाण्यावर,शेताच्या आजुबाजूने किंवा बांधावर ही आपोआप उगवते म्हणूनच आपण हिला घाणेरी असं नाव दिलं असेल.या झुडपाच्या पानांना विशिष्ट प्रकारचा उग्र वास असल्याने याला घाणेरी म्हणत असावेत असं मला वाटतं.

गुजराथमधे घाणेरीला “चुनडी” असं म्हणतात.गुजराथी लोकांमधे हिच्या अनेकरंगी सुंदर फुलांमुळे हिला “चुनडी” असे नाव आहे असं मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं.
वेगवेगळे रंग किंवा एकाच रंगांची अनेक फुलं अश्या स्वरूपात ही असतात.
पिवळे ठिपके,निळा,पांढरा,लाल,जांभळा लाल ठिपके असे अनेक प्रकार आहेत..शिवाय या फुलांना मुंग्या लागतात.सहाजीकच ह्या फुलात मध असावा.
घाणेरीला कुणी टणटणीही म्हणतात.तिची काळी फळं चविला मधूर असतात.झुडपाची पानं खरखरीत असतात.घाणेरी झुडपांसाठी उत्तम म्हणायला पाहिजे.जनावरं हिची पानं खात नाहीत.अनेक पक्षी ह्या झुडपामधे घरटी बांधतात.त्यावरची फळं खातात.त्यांच्या विष्टेतून घाणेरीचा प्रसार होतो.
कलमं करून लागवड केल्यास बागेत लावायची विविध रंग असलेली रोपं तयार होतात.अमेरिकेत ही झाडं लोक आपल्या बागेत लावतात.ही कमी उंचीची फुलझाडं बागेला अतिशय शोभा देतात.

जीवनातली सहजता आणि सौन्दर्य,प्रौद्योगिक आणि काळ-प्रचलित संस्कृतिच्या भारा खाली अगदी अस्तगत झाल्यासारखी वाटल्यास नवल नाही. जीवनातल्या घाईगर्दीत,माझं नित्याचं अस्तित्वच एव्हडं लयाला गेल्यासारखं झालं आहे की माझ्या मलाच सततचं ध्यानात आणून द्यावं लागतं की,
“बाबरे! जरा सबुरीने घे.जीवनाचा आनंद लूट.”

कधीकधी प्रभावशाली,काळाला थोपवून ठेवणारा,जीवनात परिवर्तन आणणारा क्षण,एखाद्या फुलाच्या अगदी साध्या, कोमल, पाकळीच्या पापुद्र्यात लिपटलेला असतो.
घाणेरीच्या फुलांची गंमत म्हणजे,कोकणात ती कुठेही सापडू शकतात.त्यासाठी जगभर हिंडण्याची गरज भासत नाही.शिवाय मोठ्या कौशल्याने त्यांना जमा करायचीही मला गरज भासत नाही.

घाणेरीचं लहानात लहान फुल एखाद्या नवजात बालकाच्या इवलुश्या पायाच्या इवलुश्या बोटांइतकं चिमुकलं असतं,शिवाय झुडपावरचा सर्व फुलांचा बहरलेला झुपका पाहिल्यावर सूर्यास्तावेळी रंगाने पसरलेल्या पश्चिमेच्या आभाळासारखा दिसतो.तसंच एखाद्या शेताच्या सभोवती कुंपणासाठी ही घाणेरीची झुडपं वापरली जातात त्यावेळी बहरून आलेली त्यावरची ही फुलं पाहून, गावातल्या मैदानात जेव्हा लहान लहान मुलं एकत्र खेळत असताना,पोटभरून हसत असतात त्या त्यांच्या हास्यात मला ही फुलं दिसतात. ह्या फुलांचा बहरून आलेला झुपका किती मोठा आहे किंवा ती झुडपावर कुठच्या जागी बहरलेली आहेत ह्यात काही विशेष वाटत नाही.जिथे मी असेन तिथेच त्यांची मोहकता माझ्या डोळ्यात भरते.

घाणेरीची फुलं शोधून काढायला एव्हडं काही कठीण नसलं तरी ती फुलं अलगत खुडून काढायची असतील तर मात्र गोष्ट निराळी. कोकणात गेल्यावर मला भरपूर वेळ सापडतो.पण त्यावेळी कामात असताना काम आवरतं घेऊन घाणेरीची फुलं जमा करायला जायला जरा कठीण व्हायचं.
तसं पाहिलंत तर ही फुलं दिसायला अगदी साधी-सुधी,त्यामुळे त्यांचा थाटमाट कुणालाही ताबडतोब आकर्षित करून घेईल अशातला भाग नाही.कुणाला तरी मुद्दाम त्या फुलांची दखल घ्यावी लागेल.त्याचाच अर्थ वाटचालीपासून जरा बाजूला होऊन त्यांच्या जवळ जाऊन थोडं वाकून त्यांचं परिक्षण करावं लागेल.

त्यावेळी माझ्या हे ही लक्षात यायचं की,खूप प्रयत्नशील राहूनसुद्धा ही फुलं जमा करणं म्हणजे नेहमीच एक आकस्मिक प्रकार असायचा.बरेच वेळा एखादी योजून केलेली गोष्ट,जी रोजमरं काम दूर ठेवून आनंद उपभोगायला संधी देते, त्याबद्दल काहीतरी निश्चित असं सांगता येतं.परंतु,घाणेरीची फुलं जमा करायची असतील तर तो उपक्रम ह्या योजनेत मोडणार नाही.विशेषतः मी त्या आनंदाच्या क्षणाबाबत म्हणतोय की जे क्षण रोजमरं काम करीत असताना किंवा कधीकधी करीत नसतानाही उपभोगले आहेत. घाणेरीची फुलं जमा करणं हा काही एकदाच घ्यायचा अनुभव नाही.तो एक मनोनीत अनुभव असायला हवा.

तेव्हा कोकणात असताना मी कुठे कुठे म्हणून ही फुलं पहावीत?ती नेहमीच माझ्या अवती-भोवती असायची.बरेच वेळा घाणेरीचं फुल,एखाद्या लहान मुलाच्या हास्या सारखं वाटायचं.किंवा आमच्या मांगरावरच्या पत्र्यावर पडणार्‍या वादळी पावसाच्या थेंबातून निर्माण होणार्‍या संगीतासारखं वाटायचं.फुलं सापडायची झाली तर त्याची गुरूकिल्ली म्हणजे ती झुडपातून शोधून काढायची. ठरवून-सरवून पहायला गेल्यास मिळायची नाहीत पण कधीतरी झुडपात फटदिशी अचानक उपटायची.भविष्यात माझ्या स्मरणात भर घालण्यासाठी राहून जाणारी, पुढचा विचार म्हणून, असंख्य घाणेरीच्या फुलांकडे मी अपेक्षेने पहात आहे.ह्या मला वेड लावणार्‍या, अनोख्या, असाधारण असलेल्या जीवनातल्या अनुभवाचा आनंद उपभोगायला,मी कुठेही असलो तरी इतका काही व्यस्त असणार नाही.हे श्वास रोखून धरणारे आनंदाच्या अनुभवाचे क्षण उपभोगायला न मिळावे हे मला परवडण्यासारखं नाही,कारण ह्या दुनियेत माझं अस्तित्व क्षणभंगूर आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com