Monday, June 20, 2011

जाळीमंदी पिकली करवंदं.



“पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा”

मला आठवतं मी आणि माझे वडील माझ्या लहानपणी जून महिन्यात खानोलीच्या घाटीवर चढून जाऊन करवंदं गोळा करायचो.आज शहरातल्या बाजारात एक बाई टोपलीभरून करावंदं विकायला बसली होती.ती पाहून मी, आठ-दहा वर्षाचा असतानाच्या, जीवनातून माझ्या स्मृती जागृत करायला लागलो.मी पुन्हा आठ वर्षाचा व्ह्यायचा प्रयत्न केला.आणि क्षणभर का होईना आनंदात डुबून गेलो.

कोकणात आमच्या घरातून बाहेर पडल्यावर पोस्टाच्या गल्लीत प्रथम वळावं लागायचं.पोस्टाची जागा घाटीच्या पायथ्याशी होती.त्यामुळे पोस्ट संपल्यावर दमाने घ्यावं लागायचं.घाटीची सुरवात होता,होता करवंदाची झुडपं दिसायला लागायची.वस्तीच्या जवळ असल्याने ह्या झुडपावरची फळं कधीच खुडायला मिळायची नाहीत.पोस्टात येणारे लोक,पोस्टात काम करणारे लोक करावंदासाठी आकर्षित व्हायचे.

माझ्या वडलांचा जन्म दिवस जून महिन्यातला.त्यावेळी फादर्स-डे असला काही प्रकार नसायचा.पण आता जून महिन्यातला करवंदांचा बहर पाहिल्यावर माझ्या वडलांच्या जन्म-महिन्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

आम्ही दोघं लांब हाताचे शर्ट घालून करवंदं काढायला जायचो.
करवंदांच्या झुडपात डहाळ्याना बरेच काटे असतात.आतली करवंदं खुडायला हात घातल्यावर काट्यामुळे सबंध हाताला चरे यायचे.कधीकधी रक्त दिसायचं.माझे वडील त्यावेळी आयोडीन सारखं औषध बरोबर घेऊन यायचे. एक दोन नव्हे तर पाच पंचवीस झुडपातून टोपलीभरून करवंदं खुडायची झाल्यास तेव्हडं खरचटायला होणं स्वाभाविक असायचं.पण मजा यायची.करवंदं भरून घेण्यास आम्ही गोणपाटाची पिशवी न्यायचो.त्यात करवंदं
चिरडली जायची नाहीत.

घाटी चढून जाताना ताज्या,रसबाळ,टपोरी करवंदाच्या झुडपाची झुडप माझी आणि माझ्या वडीलांच्या मालकीची आहेत असं आम्ही समजूत करून घ्यायचो.खरंतर डोंगरावरच्या झाडाची मालकी कुणाचीच नसायची.आणि आमच्यासारखे करवंदं गोळा करायला कुणी क्वचीतच यायचे.झुडपात करवंदं पाहिल्यावर लालसर रंगाची करवंदं सहज दिसायची.पण ती खायला आंबट असायची. अगदी झुडपाच्या आत काळीकुट्ट आणि कधीकधी वांगी रंगाची करवंदं दिसायची.त्याचबरोबर जिथे वांगी रंगाची फळ दिसायची त्याच्या जवळ काळी फळं नक्कीच असायची.काळी करवंदं अतिशय गोड लागायची.

मला मात्र जास्त न पिकलेली वांगी रंगाची फळं आवडायची.ती गोड-आंबट चवीला लागायची.करवंदं हातात फुटल्यावर हाताचा तळवा जांभळा व्हायचा आणि तोंडात टाकल्यावर जीभ तशीच लाल जांभळी दिसायची. करवंदाचा रस गोड आणि मिरमिरीत लागायचा.

करवंदं काढताना हाताला जरी चर्‍या आल्या तरी गोणपाटाची पिशवी भरली जायची ह्याचं समाधान वाटायचं.घरी आणून पिशवी मी माझ्या धाकट्या बहिणी जवळ द्यायचो.चिमटलेली फळं बाजूला करून गार पाण्यात उरलेली फळं धुऊन ती सर्व करवंदं माझी बहिण माझ्या आईकडे द्यायची.माझी आई त्यातही कच्ची असलेली फळं निवडून ती कापून त्याला मीठ-तिखट लावून त्याची करमट करायची.ती करमट खायला पण मस्त मजा यायची.मी लहानपणी माझ्या बहिणीबरोबर,”कोंबडा की कोंबडी” हा खेळ खेळायचो.प्रत्येकाच्या वाटयाला आलेल्या करवंदातून एकाने आपल्याकडच्या करवंदाचा चावा घेऊन ते आतून लालबुंद आहे की फिके आहे ते पहाण्यापूर्वी दुसरा ते काय असेल याचं भाकीत करायचा.कोंबडा म्हणजे लाल रंग आणि कोंबडी म्हणजे फिका रंग.ज्याचं भाकीत चुकेल त्याने समोरच्याला आपल्या वाट्यातलं करवंद द्यायचं.माझी बहिण नेहमीच हरायची. कारण मी माझ्या वडलांबरोबर करवंदं खुडायला जात असल्याने करवंदाच्या बाहेरच्या रंगावरून मला ते आतून लाल असणार की फिकं हे बरेच वेळा हटकून समजायचं.

आम्ही शहरात रहायला आलो तरी मी आणि माझे वडील खानोलीच्या घाटीवर जून महिन्यात करवंदं खुडायला यायचो.
नंतर काही वर्ष आम्हाला तिकडे जाता आलं नाही.अलीकडे मी घाटी चढून गेलो होतो.पूर्वी सारखं काही राहिलं नव्हतं.झुडपं होती पण करवंदं नसायची.
वरदळ वाढल्याने जो तो फळं काढून फस्त करायचा.पण मी जेव्हा जेव्हा घाटी चढून जातो तेव्हा तेव्हा माझं लहानपण अजून तिथेच आहे असं मला वाटतं.आणि ते नेहमीच तिकडे असणार.

मला वाटतं प्रत्येकाने मोठं होत रहाणं आवश्यक आहेच आहे.पण मागे लहानपण सोडून जाऊ नये.ह्या साध्यासुध्या आठवणीतून मिळणार्‍या असली आनंदाचा आणि सु्खाचा मी कधीही विसर पडू देणार नाही.ह्या लहान लहान गोष्टीचं आलोकन करायला मला आवडतं.त्यातल्या बारीकसारीक गोष्टीच मला आनंद देतात.कारण त्याही साध्या असतात.मोठ्या वयात येणार्‍या तणावपूर्ण आणि खिचकट जबाबदार्‍या जीवन कष्टप्रद करतात.

मोठं होऊ नये असं मला मुळीच म्हणायचं नाही. लहानपण्याल्या निरागस,निष्पाप आठवणी, जीवनाचा अंत येईपर्यंत सुखात ठेवतात असं मला म्हणायचं आहे.
आज फादर्स-डे असल्याने करवंदाच्या जाळीकडे मी माझ्या वडीलांबरोबर जायचो ते आठवलं.ते माझ्याशी कसे वागायचे तेही आठवलं, आणि त्याबरोबर नव्या धकाधकीच्या जमान्यात मी माझ्या मुलाकडे कसा वागतो तेही आठवलं.

वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
“माफ करा”असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो

“करा माफ”मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर

आपल्या घरी
स्थिती असते निराळी
लहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून

झाली त्यादिवशी एक गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या एकाग्रतेचा भंग

“हो बाजूला”
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होऊन
रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून
मी घेतली मनाशी

पाहता फुलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी
आला होता घेऊन ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात
आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गून्हा
जाऊन त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी

पुसता फुलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो मज भारावूनी
“घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो मी तुमच्याकडे
कारण आजच आहे “फादर्स डे”

मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी

पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा

रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून

आवडशी तू मला अन
मुकलो मी तुझ्या
आश्चर्याच्या आनंदाला
दिसलास सुंदर तू फुलांमुळे
होते सुंदर तुझे ते फूल निळे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com