Friday, July 8, 2011

बाथरूम गवई.



“नेहमीच हसणं-खिदळणं,विनोदी वृत्तीत रहाणं अशा वातावरणातल्या आमच्या घरात मी वाढलो असल्याने,अगदी लहानपणापासून बाथरूममधे मी गायला शिकलो.”

मला केव्हाही कोकणात जायचं असेल तर मी रेल्वेच्या तिकीट खिडकी जवळ तिकीट काढण्यासाठी रांगेत जाऊन उभा रहात नाही.त्याचं सर्व श्रेय गुरूनाथला द्यावं लागेल.गुरूनाथ मुळचा कोकणातला.त्याचं कोकणात भलं मोठं घर आहे.वाडवडीलांनी घर बांधलं असावं.
माझी आणि गुरूनाथची आमच्या समाईक मित्रातर्फे ओळख झाली.गुरूनाथ रेल्वेत काम करतो.रेल्वेच्या तिकीट खिडकीवर तिकीट देणार्‍या स्टाफवर तो सुपरवाईझर आहे.
मला कोकण रेल्वेतून कोकणात जायचं असेल तेव्हा,फक्त गुरूनाथला फोन करून कळवतो.अमुक अमुक तिकीटं, अमुक अमुक दिवशी जाण्याची.
गुरूनाथ तिकीटं घरपोच करतो.कधीकधी तो स्वतःही माझ्या घरी तिकीटं घेऊन येतो.

ह्यावेळी मी त्याला म्हणालो,
“गुरूनाथ,मीच तुझ्या घरी येऊन तिकीटं घेऊन जातो.”
रविवारचा दिवस होता.गुरूनाथच्या बायकोनेच दरवाजा उघडला.मला म्हणाली,
“गुरूनाथ शॉवर घेतोय,तोवर तुम्ही हे मासिक वाचत बसा.तुम्ही येणार आहात ते मला त्याने सांगीतलं होतं.”
गुरूनाथची बायको गलातल्यागालात हसत होती.मला पण हसू आवरत नव्हतं आणि त्याचं कौतूकही वाटत होतं.
मला म्हणाली,
“ह्या तिन्ही भावाना-गुरूनाथला आणि त्याच्या दोन भावाना-शॉवर खाली गायची सवय आहे.बाथरूम गवई आहेत ते तिघे.”
मी तिला म्हणालो,
“मला माहित नव्हतं,गुरूनाथ इतका गोड गातो ते.”
बाथरूममधून मला त्याचं गाणं स्पष्ट ऐकायला येत होतं.बाबुजींच गीतरामायणातलं,

“दैवजात दुःखे भरता दोश ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”

हे गाणं आळवून आळवून गात होता.नंतर टुवालाने केस फुसत फुसत माझ्या जवळ हलो करायला आला आणि मला म्हणाला,
“मी तुमच्या घरी तिकीटं घेऊन आलो असतो.तुम्ही इकडे यायचा का त्रास घेतला?”
मी तसंच त्याला म्हणालो,
“मी आलो नसतो तर तुझ्या गळ्यातून गायलेलं हे गोड गाणं मला ऐकायला कसं मिळालं असतं.?”
छान गातोस.आमच्या घरात तुझ्या गाण्याचा कार्यक्रम करायला हवा.”

मला गुरूनाथ म्हणाला,
“बाथरूममधे आंघोळकरताना गाणं म्हणण्याच्या सवयीबद्दल मला विशेष वाटतं.कुणी कबूल होवो न होवो,पण जीवनात एकदातरी आंघोळ करताना गाणं म्हटल्याचं कुणालाही नाकारता येणार नाही.
गायक,अभिनेते,लायब्ररीयनस,हिशोबनीस,आई,बाबा कुणाचेही हेच झालं आहे.
म्हणून मला प्रश्न पडतो की,लोकं का गातात?-मी म्हणत नाही, गाणं अगदी गानपटू सारखं नसेलही.पण गायलं जातं हे नक्कीच.
पण तेच जर का एखाद्याला कुणासमोर किंवा स्टेजवर गाणं म्हणायला सांगीतल्यास पोटात कालवाकालव होत असते. माझंही तसंच आहे.”

मी गुरूनाथला म्हणालो,
मला वाटतं,बाथरूममधे गाण्याचं, मुख्य कारण एकलेपण असावं. शॉवर खाली आंघोळ करीत असताना सगळ्य़ा जगाशी संपर्क तुटलेला असतो.
बाथरूमच्या चार भिंतीत किंवा आतलं बाहेर न दिसणार्‍या काचेच्या बाथरूममधे असल्याने, घरातल्या जीवनाचा, कामावरच्या जीवनाचा,सतत ताण असलेल्या जीवनाचा,संपर्क तुटलेला असतो.
ह्या अशा एकलेपणाच्या सभोवतालामुळे,स्वातंत्र्याची हमी मिळते,आपण काहीही करू शकतो,आपल्याला कुणी पहात नाही,कुणी निर्णयाला येत नाही किंवा कोण घड्याळ लावून बसलेला नसतो.अशा सभोवतालच्या वातावरणात,गाणं गायची इच्छा असणं आणि प्रत्यक्ष गाणं गाण्याची क्रिया करणं ह्यामधे कोणही आलेला नसतो.”
माझं म्हणणं गुरूनाथला एकदम पटलं.

मला म्हणाला,
माझीच गोष्ट तुम्हाला सांगतो.कोकणात आमचं केव्हडं मोठं घर आहे ते तुम्ही पाहिलं आहे.
नेहमीच हसणं-खिदळणं,विनोदी वृत्तीत रहाणं अशा वातावरणातल्या आमच्या घरात मी वाढलो असल्याने,अगदी लहानपणापासून बाथरूममधे मी गायला शिकलो.पण जसा मी मोठा होत गेलो तसा काही गोष्टी माझ्या दृष्टोप्तत्तीस आल्या.माझा मोठा भाऊ,जो माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठा आहे,माझ्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका,खूपच लाजाळू स्वभावाचा आहे.तरीसुद्धा तो बाथरूममधे गायचा.आणि हे तो हायस्कूलमधे जाईपर्यंत करायचा.त्यानंतर मी त्याला गाताना पाहिलं नाही,माझ्यावर विश्वास ठेवा,आमच्या घरातल्या एका बाथरूममधून, जी मी माझ्या दोन भावांत मिळून वापरायचो,काहीही बाहेर ऐकायला यायचं.पाणी सोडलेल्या नळाचा बाहेर आवाज यायचा.बाबूजींच्या-सुधीर फडक्यांच्या-मधूर गाण्याच्या पुनारावृत्ती ऐकायला यायच्या.परंतु,माझ्या ह्या मोठ्या लाजाळू भावाची आम्हा लहान भावांशी इतर बाबतीत दूवा ठेवण्याच्या जरूरीमधे,बाथरूममधे गाण्याची जरूरी हळू हळू कमी कमी होत गेली.

माझा तर्क आहे की ह्याचं कारण,शरीरात वाढ करणारी द्र्व्य किंवा यौवन किंवा तुम्हाला काय म्हणयचं आहे ते म्हणा,पण माझा नक्की कयास आहे की माझ्यात आणि माझ्या भावात असणारं अंतर वाढायला लागलं होतं. मला मनोमनी असं वाटायचं की,ज्या काही कठीण समस्यांतून तो जात होता, अशावेळी अशा समस्यातून सुटका करून घेण्यासाठी,बाथरूममधे गाऊन सुटका करून घ्यायला हिच योग्य वेळ असावी.
कदाचीत मी तसा विचार करणं उचीत नसावं.कारण माझा मोठा भाऊ हायस्कूलच्या पहिल्या वर्षाला निराळा वागायचा. मला तो बरेच वेळा दिसायचा नाही.आपल्या खोलीत तो स्वतःला बंद करून बसायचा.एखाद्या अंधार-कोठडीत बसल्यासारखा.किंवा आपल्या मित्रांबरोबर,जे माझी आणि माझ्या धाकट्या भावाची कधीच पर्वा करीत नसायचे,वेळ घालवायचा.जेवणाच्या टेबलावरपण तो कधीही कुठच्याही प्रश्नाला एक दोन शब्दात उत्तर द्यायचा.”

मधेच थांबवीत मी गुरूनाथला म्हणालो,
“पण तू म्हणतोस तसा तुझा भाऊ आता दिसत नाही.एकदम गुलहौशी वृत्तीचा वाटला”

मला गुरूनाथ म्हणाला,
“मला सांगायला आनंद होतो की,माझ्या भावाची हायस्कूल मधली नाट्यभरी वर्षं जशी पुढे पुढे जात होती,तसा त्याच्या स्वभावात बदलाव येत राहिला.मला खात्रीने आठवत नाही की,ती काय घटना होती ज्याने तो पुन्हा शॉवर खाली गायला लागला.पण तो गायला मात्र लागला.त्याची वृत्ति बदलली.मला माहित असलेला आणि प्रेमळ असलेला माझा बेफिकीर वृत्तीचा भाऊ मला परत मिळाला.आम्ही एकमेकाशी बोलायला लागलो, एकमेकाला समजून घेऊ लागलो आणि मला वाटतं आमचा एकमेकातला दुवा पुन्हा सांधला गेला.त्याच्या मित्र-परिवारातसुद्धा बदलाव आला आणि त्यांच्याबरोबर वाढणार्‍या मित्रांना तो भेटायला लागला.

मी असं मुळीच म्हणणार नाही की माझा भाऊ,सगळ्यात दयाळू,सर्वांपेक्षा हुशार,बुद्धिमान किंवा सगळ्य़ापेक्षा ताकदवान होता,किंवा कसं काहीही.पण मला मात्र तो अनेक हिरो मधला एक वाटत होता.मला माहित आहे की तो माझ्यावर प्रेम करतो,आणि माझा कैवार घ्यायला तो वाटेल ते करील.मला माहित आहे की शालेय जीवन असं नाही की तुम्ही सहजपणे त्यातून पार होऊ शकाल.पण माझ्यावर विश्वास ठेवा,शॉवर खाली आंघोळ करीत गाणं,ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.”

“मी पण पूर्वी गायचो.पण आता तुझं हे ऐकून न चुकता शॉवर घेताना गाईन.”
असं मी गुरूनथला म्हणालो.नंतर मी आणि गुरूनाथ जोरजोरात हसलो.तेव्हड्यात त्याच्या बायकोने माझी तिकीटं आणून मला दिली.त्यांचे आभार मानून मी त्यांची रजा घेतली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com