Sunday, July 17, 2011

आईचं जेवण.

“आईबरोबर वेळ घालवणं,खरंच मजेचं असतं आणि जरूरीचंपण असतं.त्या आठवणी हृदयात जपून ठेवणं म्हणजेच त्या आठवणी जीवनभर आपल्याजवळ ठेवणं असं होईल.”

मला आठवतं तो शुक्रवारचा दिवस होता.मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी राजकोटला गेलो होतो.आठ दिवस हाटेलमधे राहून रेस्टॉरंटचं जेवण जेवून कंटाळलो होतो.
बघुया,बाजार गल्लीत एखादं मास्यांचं जेवण,मालवणी किंवा गोवा पद्धतिचं नसलं तरी, बनवणारी खानावळ दिसते का म्हणून धारीष्ट करून खाली उतरलो.शंभर टक्के अशक्य होतं.पण मला कुणीतरी सांगीतलं होतं की नदीतले मासे बाजारात विकायला येतात.काही गुजराथी समाज मासे खातात. मास्यांच्या बाजारातच गेलो.

पाठमोरी उभी असलेली आणि मासे विकत घेणारी एक मुलगी मला दिसली.एका बाजूने तिला पाहिल्यावर ही वीणाच असेल काय?असं मनात आलं.तिच्या मागे उभा राहून हलक्या आवाजात वीणा असं म्हणालो.त्या मुलीने चटकन मागे वळून पाहिलं.काय योगायोग? माझं अनमान अगदी खरं ठरलं.

“अय्यो,काका?तू हांगां खंय?”
असं चक्क गोव्याच्या कोकणीत मला वीणाने आश्चर्यकरून प्रश्न केला.
“तू खंय हांगा ता माका आदी सांग”
माझ्या मोडक्या तोडक्या गोव्याच्या कोकणीत मी वीणाला विचारलं.

“म्हणजे काय? गेली पाच वर्ष मी गुजराथेत वास्तव्य करून आहे.सध्या राजकोटमधे पोस्टींग झालं आहे माझं.”
वीणा मला म्हणाली.

“मी बरेच दिवसानी राजकोटला कामानिमीत्त आलो आहे. इकडचं जेवण जेवून कंटाळलो.कुतूहल म्हणून मासेबाजारात मासे बघायला आलो.आणि खरंतर तुझी भेट व्हायची होती. त्यामुळे मला ही बुद्धी सुचली म्हणावं लागेल.”
मी वीणाच्या पिशवीत ताजे मासे घेतलेले पाहून जरा खूश होऊन म्हणालो.

“चला तर माझ्या घरी.इकडचं गोड जेवण जेवून गाठ कंटाळलेल्या दोन जीवाना आंबट-तिखट मास्यांचं जेवण जेवायला पर्वणी आली आहे.आज रात्रीचं मी केलेलं मास्यांचं डिनर घेत गप्पा मारूया.”
वीणा मला म्हणाली.

“आंधळा मागतो— ” तसंच मला झालं.

“.अगदी गोव्याचे बांगडे नसले तरी बांगड्या सारखे नदीतले मासे मला सापडले आहेत.शिवाय कोलंबी घेतली आहे.ती तर कुठेही मिळते म्हणा. बांगड्यांची शाक आणि धणे घालून कोलंबीचं सुकं करते.इकडचा तांदूळ पण चवदार असतो.त्याचा भात करते आणि सोलाची कढी.”
वीणाने माझ्या चेहर्‍याकडे पाहून माझी सम्मती गृहीत धरून मला सांगीतलं.

मासे नीट करता कराता मला वीणा सांगू लागली,
“आईबरोबर वेळ घालवणं,खरंच मजेचं असतं आणि जरूरीचंपण असतं.त्या आठवणी हृदयात जपून ठेवणं म्हणजेच त्या आठवणी जीवनभर आपल्याजवळ ठेवणं असं होईल. माझ्या लहानपणी मला माझ्या आईने केलेलं जेवण अप्रतिम वाटायचं. गुजराथी टाईपचं जेवण आणि आमचं गोवा टाईप जेवण ह्यातला फरक मला लहानपणी नक्कीच माहित नव्हता. मी नेहमीच धरून चालायचे की माझ्या आईने केलेलं जेवण हेच माझ्यासाठी उत्तम जेवण आहे.

पण इकडे गुजराथला नोकरी निमीत्त आल्याने आणि बरेच दिवस इथे वास्तव्य झाल्याने माझ्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही की गुजराथी जेवणापेक्षा गोव्याचं जेवण मी जास्त जेवले आहे.

शाळा संपून घरी आल्यावर माझी आई माझ्यासाठी अगदी साधं पण चवदार जेवण करायची.शेवग्याची शेंग घालून तुरीच्या डाळीची आमटी,वालीची भाजी,उकड्या तांदळाचा भात आणि एखादा लहानसा पेडवा किंवा गुंजूला सारखा खोबर्‍याच्या तेलात तळलेला मासा असायचा.भूक एव्हडी लागायची की जेवण केव्हा फस्त केलं हे कळायचंच नाही. माझ्या आईने केलेल्या काही डिशीस साध्या पण पक्क्या गोव्या पद्धतिच्या असायच्या.आईने केलेली माझी आवडती डिश म्हणजे बांगड्याची शाक.त्यावेळी,ती मला आवर्जून सांगायची,
“अगं,बाहेर गावी कुठे गेलीस तर तुझ्या तुला कराता यावी म्हणून शिकून घे.”

पण त्यावेळी मी शिकण्यापेक्षा खाण्याकडे जास्त आकर्षित होते.आणि ती चूक मला आता जाणवते.मागल्या खेपेला मी आईला भेटायला गेले असताना शाक कशी करायची ते लिहून आणलं.पण इथे राजकोटला बांगडे कुठे मिळतात?. जवळच्या नदीतले ताजे मासे संध्याकाळच्या वेळी बाजारात विकायला येतात.नदीतल्या मास्यांना गोडे मासे म्हणतात.समुद्रातले मासे चवीला खारट असतात.त्यामुळे ते जास्त चवदार वाटतात.पण काय करणार दुधाची तहान ताकावर भागवून घेतल्यासारखं होतं झालं.”

“गरजवंताना अक्कल नसते” असं काहीसं म्हणतात.गोव्याचे खार्‍या पाण्यातले बांगडे कुठे? आणि हे गोडे मास कुठे? ह्यात वाद नाही.
मी वीणाला म्हणालो.

“गोव्याहून येतान मी तीरफळं,आणि लाल संकेश्वरी मिरची न विसरता घेऊन आले आहे.ह्या दोन गोष्टी नसल्या तर बांगड्याच्या शाकेत मजा येत नाही.तीरफळाचा वास आणि मिरचीचा तिखटपणा आणि लाल रंग काही औरच असतो. आईची दूसरी डीश म्हणजे भरपूर धणे घालून केलेलं कोलंबी बटाट्याचं सुकं किंवा मुडदूशाचं सूकं.ही डीश भाकरी बरोबर खायला जाम मजा यायची. आणि कदाचीत उरलं तर दुसर्‍या दिवशी खायला मस्त वाटायचं.मला आवडणारी माझ्या आईची तिसरी डीश म्हणजे एल्लापे.

माझे बाबा बरेच वेळा कामा निमीत्त कर्नाटकात जायचे.तिकडे त्यांना एका मित्राच्या घरी ही डीश खायला मिळाली.गरम गरम चहाबरोबर एल्लापे खायला खूपच मजा येते असं बाबा सांगायचे.त्यांनी ही डीश आईकडून करवून घेतली एल्लापे तयार करायचं एक खास बिडाचं पात्र असतं आता नॉनस्टीक पात्र पण मिळतं.एल्लाप्याच्या आकाराचे त्या भांड्यात गोल कप्पे असतात.तादुळ,चण्याची डाळ आणि उडदाची डाळ भिजवून भरडून त्या्ची पेस्ट करतात.
आणि मग त्यात गुळ,वेलची,काजू किंवा शेंगदाणे घालून,थोडं दूध घालून पिठीचा गोळा करून लहान लहान आकाराचे गोल गोळे, कप्प्यात थोडं तेल टाकून, ठेवतात. मंद चुलीवर एल्लापे संथ भाजले जातात.कप्यात खालून जास्त भाजलेले हे एल्लापे खायला खरपूस लागतात.काही लोक तिखट एल्लापे पण करतात.पण मला गोड आवडतात.

त्यावेळी मी माझ्या आईबरोबर असताना, जेवण स्वतः करण्याबाबतची एव्हडी कदर केली नाही.पण आता इथे गेली पाच वर्ष एकटीच रहात असल्याने आईच्या जेवणाची किंमत पावलो पावली कळायला लागली.इकडे मला स्वतःसाठी एकटीलाच जेवण करावं लागतं.आज काय जेवण करणार? आज काय खाणार?असे प्रश्न पडतात.

सुरवातीला गुजराथी जेवणाच्या थाळ्या मागवून जेवायचे.पण ते गोडूस जेवण जेवून खरोखरच कंटाळा यायला लागला. चमचमीत आंबट-तिखट खाणारी मी.मागच्या खेपेला गोव्याला गेले होते तेव्हा आईकडून मला आवडणार्‍या डीशीस शिकून घेतल्या आणि रेसपी लिहून आणल्या.घरी जेवण करून मग जेवायला आता मजा येते.अगदी आई करते तशीच माझ्या जेवणाला चव येत नसेलही.पण माझी गाठ मात्र कंटाळत नाही.”
असं सांगत सांगत वीणा स्वयंपाक करीत होती.मासे जेव्हा तिने फोडणीला टाकले तेव्हा त्याचा वास माझ्या नाकात गेल्यानंतर मला रहावेना.

मी वीणाला म्हणालो,
“असे हे फोडणीचे आवाज आणि त्याचा वास रात्रीच्या अश्यावेळी गोव्याला घरोघरी अनुभवायला मिळतात. राजकोटमधे मी आहे हे क्षणभर विसरूनच गेलो आहे.”
थोड्याच वेळात “पाट पाणी” घेतलं आणि आम्ही जेवायला बसलो.

जेवता जेवता वीणा मला म्हणाली,
“मी तशी वयाने जरी मोठी झाली असली तरी मला माझ्या आईचं जेवण जेवण्याची इच्छा होत असते.इकडे काम भरपूर असल्याने वरचेवर मला गोव्याच्या ट्रिप्स मारता येत नाहीत. म्हणून ह्यावेळेला गेले होते तेव्हा तिच्या हातचं जेवण भरपूर जेवून आले. आईच्या जेवण्याचा त्याग मी कदापी करू शकणार नाही.तिच्या जेवणात मी एकरूप झाली आहे,आणि माझी आई जे जेवण तयार करते तसलं जेवण जेवून मी मला घडवणार आहे.”

जेवण झाल्यावर आणि गप्पा संपल्यावर जाता जाता मी वीणाला म्हणालो,
“वीणा,तुझं आजचं हे जेवण जेवून आज तरी तू मला घडवलं आहेस.मी तृप्त झालो आहे.तुझे थॅन्क्स मानावे तेव्हडे थोडेच.”

माझं हे ऐकून वीणाला खूप आनंद झाला.
मला म्हणाली,
“तुमच्या चेहर्‍यात मला माझी आई दिसते.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com