Monday, July 11, 2011

ते दोन भले मोठे वटवृक्ष



“गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या फांद्यावर चढलो नाही,पण एक मला माहित आहे की त्या फांद्यावर चढून जाऊन जे मी धडे शिकलो ते माझ्याजवळ जीवनभर रहाणार आहेत.”

मला आठवतं मी ज्याज्या वेळी माझ्या आजोळी जायचो त्यावेळी ह्या दोन वडाच्या झाडांना भेट दिल्याशिवाय रहायचो नाही.पण मी हायस्कूलमधे गेल्यावर भेट देणं जरा कमी झालं.त्याअगोदर,म्हणजे हायस्कूलला जाण्यापुर्वी माझ्या आजोळीच मी शिकत होतो.माझ्या आजोबांनी माझ्या आईला सांगीतलं होतं की माझ्या इतर मामेभावंडाबरोबर मला आजोळीच शिकायला ठेवावं.

ह्या वडाच्या झाडांना जवळ जवळ मी रोजच भेट द्यायचो. केवळ पायवाटेनेच जाता येईल अशा मार्गाने जात राहिल्यावर बरीच अशी झुडपं लागायची. त्यानंतर दोन मोठे वड एकमेकासमोर वाढलेले दिसायचे.ह्या वडांच्या सभोवती ना ना तर्‍हेची झाडं आणि झुडपं दिसायची.त्यात,केवड्याची अस्ताव्यस्त वाढलेली झाडं होती.करवंदाची दाट झुडपं होती. मधूनच उंचच उंच जांभळाची झाडं दिसायची.बेवारशी फणसाची झाडं पण दिसायची.मे महिन्यात ह्या फणसाच्या झाडाना खूप फणस लागायचे. गोर-गरीब झाडावर चढून फणस काढून घरी खायला घेऊन जायचे.कारण ती झाडं कुणाच्याच मालकीची नव्हती.

पण मला आणि माझ्या मामेभावंडाना त्या फळझाडात आणि त्यावरच्या फळात स्वारस्य नसायचं.नाही म्हटलं तर, केवड्याच्या झुडपातून नुकतीच वर आलेली केवड्याची फुलं आम्ही आमच्या घरी आई, आजी, माम्यांना डोक्यात माळायला घेऊन जायचो.केवड्याची फुलं आणलेली पाहून आम्हाला आमची आजी नेहमी म्हणायची,
“बाबारे तुमचं उतू जाणारं प्रेम पुरे झालं,आमचं कौतूक पुरे झालं.केवड्याच्या झुडपात फणेरी पिवळा नाग असतो.तो चावला तर सगळंच संपलं.त्याचं विष उतरवून घ्यायला मांगल्याकडे -मांत्रीकाकडे-जावं लागेल.ते व्याप नकोत.”
आमच्या आजीचं बोलणं आम्ही तेव्हड्यापूरतं ऐकून घ्यायचो.
आम्ही केवड्याच्या झुडपात नागाला कधीच पाहिला नव्हता.

ही आमची ह्या जागी यायची पळवाट होती,आमचं स्वातंत्र्य होतं, ती त्या दोन भल्या मोठ्या वडाच्या झांडांसाठी.वर चढून बसण्याची हौस होती.उत्तमरित्या झाडावर चढून जाण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी,अभिमान वाटण्यासाठी, सगळ्य़ा शेजारच्या मुलांमधे आम्हीच प्रथम हुडकून काढलेली ही दोन वडाची झाडं असल्याने,त्याबद्दल आम्हाला विशेष वाटायचं.

त्यावेळी हे माझ्या लक्षात आलं नव्हतं.पण आजोळी शिकायला राहिलेल्या माझ्या जीवनात ह्या झाडांनी मला जे शिकवलं ते आणखी कुणीही शिकवू शकलं नाही हे मला आता समजायला लागलं आहे.
शाळा संपल्यानंतर रोज मी माझ्या भावंडांबरोबर ह्या वडाच्या झाडाकडे यायचो.
मला आठवतं,मी आणि माझी भावंडं रोज कुठे जातो ह्याबद्दल एक आठवड्यानंतर आमच्या शेजारातल्या सर्व मुलांना कुतूहलतेचा विषय झाला होता. आम्ही हे छपवूं शकलो नाही. काही दिवसानी आजुबाजूची सर्व मुलं आमच्या पाठोपाठ यायला लागली.वडांच्या लोंबत्या पारंब्यावर झोके घ्यायला लागली.असं कित्येक दिवस होत होतं.

माझ्यासाठी मात्र ही जागा “फक्त स्वपनात दिसणारी जागा” असं वाटू लागलं. कित्येक दिवसानंतर मुलांची गर्दी कमी व्हायला लागली.वडाच्या पारंब्या मोकळ्या दिसायला लागल्या. एकदा मी माझ्या एका मामेभावाला विचारलं,
“ही सर्व मुलं गेली कुठे?
त्याने मला जे उत्तर दिलं ते मी केव्हाही विसरणार नाही.
तो पायवाटेवरची धुळ पायाने उडवीत मला म्हणाला,
“ती मुलं आता मोठी झाली आहेत.हायस्कूलमधे जायला लागली आहेत.”

हे त्याचं ऐकून त्याचवेळी मी मनात ठरवलं,मला मोठं व्ह्यायचं नाही आणि मला हायस्कूललाही जायचं नाही.असं करायला माझ्या हाती काहीच नव्हतं हे त्यावेळी माझ्या डोक्यातही आलं नाही.

इतर मुलं ज्यावेळी पारंब्यावर झोके घ्यायची त्यावेळी मी आणि माझी मामेभावंडं वडावर चढून बसायचो.पारंब्यावर झोके घेण्यात आम्हाला स्वारस्य नव्हतं.इतर मुलं जे म्हणायची पण कधीच आचरणात आणायची नाहीत ते मी एक दिवस करायचं ठरवलं.वडाच्या झाडाच्या सर्वात उंच फांदीवर चढायचं मी ठरवलं.माझ्या भावांना हा माझा विचार रुचला नव्हता. तेव्हा एक दिवस दिवाळीच्या सुट्टीत हळूच एक दिवस छूः होऊन त्या वडांच्या झाडांच्या जागी गेलो.हे मला कुणा दुसर्‍यासाठी करायचं नव्हतं.मला स्वतःसाठी करायचं होतं.मी माझ्याच मला आव्हान देत होतो.

एका झाडावर मी उंच चढत गेलो.एकदा फक्त माझा भाऊच इथपर्यंत चढला होता त्या उंच फांदीवर मी पोहोचलो.त्याहूनही उंच जाण्याचं मी ठरवलं. जेव्हडा वर चढत गेलो तेव्हड्या फांद्या विरळ व्ह्यायला लागल्या आणि वरवरच्या फांद्यावर जायला कठीण व्ह्ययला लागलं.

मला आठवतं वरून खाली जमीनीकडे पाहून मी किती उंच गेलो ते अजमावलं,आणि वर पाहून आणखी किती वर जायचं राहिलं तेही अजमावलं.त्या दिवशी मी माझं लक्ष्य गाठू शकेन हे एव्हडंच शिकलो नाही, तर मी आणखी काही शिकलो,जे मला त्यावेळी स्पष्ट झालं नाही पण नंतर जीवनात स्वतःहून उघड झालं.

त्या दिवशीच्या त्या वडाच्या फांद्याकडे मागे वळून मी पहातो आणि त्यानंतर त्याची तुलना माझ्या आताच्या जीवनाकडे करतो.जीवनात मी मागे पाहिलं तर इथपर्यंत आल्याचं दिसून येतं,पण भविष्यात पाहिलं तर अजून मला जायचं आहे हे निक्षून लक्षात येतं.

आता पायवाटीचा रस्ता मोटार जाण्यासाठी रस्ता झाला आहे.मी पण वयाने मोठा झाल्याने गाडी घेऊन त्या दोन वडाच्या झाडांकडे जाऊ शकतो.मी त्या दोन्ही झाडांकडे बघतो,तेव्हा त्या उंचच उंच फांद्या अजूनही दिसतात.काही पारंब्या वाढल्या आहेत.काही जमीनीला स्पर्श करायला लागल्या आहेत. जोरदार वारा आल्यावर वडाच्या झाडाच्या पानातून तसाच सळसळीत आवाज येत असतो.तो स्वातंत्र्य देणारा सुटका करणारा आवाज.

मी गाडीमधून उतरून रस्त्यावरची धूळ पायाने उडवतो आणि माझ्या लक्षात येतं की,माझ्या बालपणी मी जो व्हायला नको होतो असं वाटायचं, तो झालो आहे. माझ्यात वाढ झाली आहे. इथे आल्यावर जरी मला वाटत रहातं की अनेक गोष्टी बदलल्या आहेत,तरी त्या तशा बदललेल्या नाहीत.

ती दोन वडाची झाडं माझ्या ऐतीहासीक स्मृती माझ्यासाठी तशाच धरून आहेत. कारण माझ्या बालपणाच्या आठवणी त्यांच्या फांद्याशी बांधून ठेवल्या आहेत.आणि आता माझ्यात एव्हडी वाढ झाली आहे की ती वडाची झाडं आता मला तेव्हडी मोठी वाटत नाहीत.गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या फांद्यावर चढलो नाही,पण एक मला माहित आहे की त्या फांद्यावर चढून जाऊन जे मी धडे शिकलो ते माझ्याजवळ जीवनभर रहाणार आहेत.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com