Tuesday, July 5, 2011

झोके झोपाळ्यावरचे.

“झोक्यावर झोके घेत राहिल्याने सर्व समस्या सुटल्या जातात असं मला वाटतं.”
मालती मला सांगत होती.

मालती,धाके कॉलनीतल्या नव्याने बांधलेल्या एका टॉवरमधे रहायला गेली होती.पूर्वी ती चारबंगल्याला एका चाळीत रहायची.ह्या टॉवरवर सोळ्याव्या मजल्यावर तिचा फ्लॅट होता.सगळ्य़ा घरात जुहूवरून सारखा वारा यायचा.
“बरेच वेळा आमहाला खिडक्या बंद करून ठेवाव्या लागतात.वारा नकोसा होतो.पावसाळ्यात तर खिडक्या बंदच ठेवाव्या लागतात.पावसाची वावझड एव्हडी असते की जमिनीवरची कारपेट्स भिजून जातात.”
मी मालतीच्या घरी गेलो होतो.तेव्हा ती आपली जागा आणि आतल्या खोल्या आणि सुविधा काय आहेत ते समजावून सांगत होती.
एका खोलीला मोठी उघडी बाल्कनी होती.कोरीव लाकडाचा ऐसपैस झोपाळा बाल्कनीच्या मधेच होता.नंतर त्याच झोपाळ्यावर बसून आम्ही गप्पा मारीत होतो.

मला मालती म्हणाली,
“कोकणात आमच्या घराच्या मागच्यादारी पोरसात एका उंचच उंच आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरखंडाचा झोपाळा बांधलेला होता.दोन दोरखंडामधे बसण्याचा पाट ठेवून त्यावर एक उशी ठेवून आम्ही झोके घ्यायचो. त्यावेळी सी.डी. वॉकमन सारख्या गोष्टी नव्हत्या.आमच्या आम्हीच गाणी म्हणायचो.रात्रीच्यावेळी कुणालाही त्रास न होईल एव्हड्या आवाजात गायचो.”

मधेच मालती उठून गेली.येताना दोन कप कॉफी घेऊन आली.एक कप मला देत म्हणाली,
“ह्या इकडच्या झोपाळ्य़ावर मी बसले की मला माझं कोकणातलं घर आणि मागचं पोरस आठवतं.जास्त करून झोपाळा आठवतो जो आता नाही.पण डोळे मिटून ह्या झोपाळ्यावर झोके घेत राहिले की मन कोकणात जातं.”

मी मालतीला म्हणालो,
“सर्वां नसे जाण त्या बालपणाची
नको तुलना दोन दिसाच्या पाहुण्याची
नसे तेव्हडी सुलभ असे महाकठीण
बालपणाच्या प्रीतिला विसरण्याची”

ह्या मी लिहिलेल्या एका कवितेच्या चार ओळी मला,तुझ्या ह्या बालपणातल्या आठवणी ऐकून,आठवल्या. सांग, सांग मला ऐकायला बरं वाटतं.

मालती खुश होऊन मला सांगू लागली,
“त्या झोपाळ्यावर बसल्यावर मला असं वाटायचं की मी काहीही करू शकेन.माझ्या कोणत्याही स्वप्नात,मी कोणही असू शकेन,कुठेही असू शकेन असं वाटायचं.समुद्रावरून येणार्‍या वार्‍याच्या झुळकेचा माझ्या चेहर्‍याला स्पर्श झाल्यावर असं वाटायचं की मी कुठेही पक्षासारखी उडून जाऊ शकेन.रात्रीचे आकाशातले चकमकणारे तारे बघून मला जगायला उमेद यायची.मी स्वतंत्र असायची.मला हवं ते करायला मी मोकळी असायची,माझं मला ऐकायला मी मोकळी असायची,माझं मला गायला मी मोकळी असायची थोडक्यात माझी मी असायची.

खरंतर,ह्याच झोपाळ्यावर बसून मी काही करू शकत होती.ह्या झोपाळ्यावर बसल्याने,जग बुडती होणार असं मनात यायला कारणीभूत होणार्‍या सगळ्या समस्यापासून माझी सुटका व्हायची.माझ्या थोरल्या भावाशी काल झालेलं भांडण एकाएकी,तितकं काही वाईट होतं असं वाटायचं बंद झालं.मला आठवतं आदल्याच दिवशी मला त्याने बाथरूममधे एक तास कोंडून ठेवलं होतं.पण मी काही माझ्या मनाला लावून घेतलं नव्हतं.मला आठवतं, माझी एक मैत्रीण माझ्यावर खूप रागावली होती.खरं म्हणजे मी तसं काहीच केलं नव्हतं.झोपाळ्यावर बसल्यावर हे सर्व मला विसरायला जायचं.

झोपाळ्यावरच्या दोरखंडाच्या दोर्‍या झोपाळा वापरून वापरून झाडाच्या फांदीवर घासून कोरम झाल्या होत्या.वर पाहिल्यावर एक एक दोरखंडाचं सूत तुटताना दिसायचं.नंतर मी वर पाहायचच बंद केलं.ज्या दिवशी झोपाळा तुटला त्याच्याच आदल्या दिवशी मी त्यावर तासनतास बसले होते.गाणी म्हणत होते,उंच झोके घेत होते,मोठे श्वास घेत होते.

मला आठतं त्याच दिवशी मी मलाच म्हणाली होती की,निष्कारण भांडण करणार्‍या मैत्रीणीशी माझी मैत्री नसली तरी चालेल.त्याच दिवशी जीवनाचा दृष्टीकोन काय हवा ते कळलं.शाळेत सकाळीच शारीरीक कवाईतेचं शिक्षण देतात,ते जरी कंटाळवाणं असलं तरी,जरूरीचं आहे.मला शहाणं व्हायला पाहिजे,चांगलं वागलं पाहिजे,ऐकलं पाहिजे.ह्याच झोपाळ्यावर झोके घेत, मला शाळेत चांगले गुण मिळवले पाहिजेत हे, मी ठरवलं होतं.आणि तसंच झालं.
शाळेचं शिक्षण संपल्यानंतर शाळा सोडून जाताना मित्र-मैत्रीणींचा निरोप घेताना एव्हडं जड झालं नव्हतं, जेव्हडं मला माझा झोपाळा निकामी झाल्याचं पाहून वाटलं होतं.”

मी हे सर्व मालती कडून ऐकून तिला म्हणालो,
“मालती, तू फारच भावनाप्रधान आहेस.काही काही लहानपणातल्या स्मृती मनात एव्हड्या घर करून असतात की,त्याची आठवण आल्यावर सैरभैर व्हायला होतं.आणि कुणालातरी सांगून टाकल्यावर मन हलकं होतं.”

माझं हे ऐकून मालती थोडी सावरल्यासारखी झाली.मला म्हणाली,
“मी पुढचा विचार करून म्हणते,जगातल्या प्रत्येकाने-गोंधळलेल्या ख्यातिप्राप्त व्यक्तिनी,खोटारड्या राजकरण्यानी, साहसी लोकानी,एकतरी झोपाळा खरेदी करावा. त्यामुळे ते कदाचीत शांतीपूर्ण जीवन जगतील.कारण मी खात्रीपूर्वक सांगते झोपाळ्यावरचे झोके सर्व समस्यांचं उकलन करतात.प्रश्न एव्हडाच आहे की कोण किती वेळ झोके घेत रहातो?.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com