Friday, July 29, 2011

सोमवारांची विशिष्टता


“सोमवारचे दिवस तसं पाहिलं तर फाल्तु दिवस म्हटले पाहिजेत.”

दर वर्षी प्रत्येक कोजागीरी पौर्णिमेला आम्ही वसंताच्या घरी जात असतो.मला आठवतं ह्यावेळची कोजागीरी शनिवारी आली होती.त्यामुळे रविवाचा दिवस आराम करायला सापडला होता.
वसंता आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना कोजागीरी साजरी करायाला गेली कित्येक वर्ष आग्रहाने आमंत्रण देत आला आहे.

कोजागीरी दिवशी आम्ही सर्व थोडावेळ चांदण्यात मजा करायला जुहू चौपाटीवर जातो.पहाट होण्यापूर्वी वसंताच्या घरी येतो.आल्या आल्या वसंताकडे मसाले दुध आणि बरोबर काहीतरी खायला असतं.पहा्टेची वेळ, गप्पा गोष्टी आणि पत्ते खेळण्यात घालवतो.नंतर ज्याला झोप येईल तो आपलं अंथरूण धरतो.ह्या वेळी दुसरा दिवस रविवार असल्याने सर्व जण आरामात उठलो होतो.दुपारी चमचमीत जेवण होतं.मासे होतेच तसंच खाटकाचं खटखट्णं पण होतं.वसंताची आई सुकं मटण आणि कलेजी मस्त करते.

मग काय घुटूं आलंच.घेणारे जेवण्यापूर्वी मनसोक्त पितात.आदल्या दिवसाचं कोजागीरीचं रात्रीचं जागरण आणि रविवारचं खाणं आणि पिणं झाल्यावर निद्रादेवी काही पाठ सोडत नाही.जाग येईल तसे लोक उठून मग रविवारची रात्र येईपर्यंत आपआपल्या घरी जायला निघतात.दुसर्‍या दिवशी सोमवार येतो.कामावर गेलं पाहिजे.ह्यावेळच्या कोजागीरीला असंच झालं.

वसंता कोजागीरी कित्येक वर्ष करीत आला आहे.आणि आम्हीपण त्याच्याकडे नियमीतपणे जात येत राहिलो आहो.
सहाजीकच आता वय होत राहिल्यावर पूर्वी सारखं जमायला, शरीर साथ देत नाही.मला वाटतं,वसंताच्या चर्चेच्या विषयाचं तेच कारण असावं.सर्व जण निघून गेल्यावर वसंता माझ्याशी गप्पा मारीत बसला होता.

मला म्हणाला,
“सोमवार ह्या दिवसाबद्दल मला विशेष वाटतं.खरं म्हणजे सर्व सोमवार निरूपयोगी आहेत.आणि कामावर गेल्यावर तो सोमवारचा दिवस असा तसाच जातो.

मला वाटतं,आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार ह्या दिवशी भरपूर झोपा काढून झाल्यावर भरपूर काम करायला लावणारा नंतरचा दिवस म्हणजे सोमवार. ह्या दिवशी काही लोक लंच टाईमच्या वेळी सुद्धा झोपा काढीत असतात.

मला नेहमीच वाटतं की,सोमवारचे दिवस हे नव्या आठवड्याच्या सुरवातीला तयारीत रहाण्यासाठीचे,त्या आठवड्याच्या इतर दिवसांची सुरवात म्हणूनचे दिवस असतात.पण तसं पाहिलं तर,सोमवार धरून, इतर सर्व दिवस तसेच असतात.

सर्व सोमवारचे दिवस हे साफसफाईसाठी राखून ठेवायला हवेत.ते साफसाफाईसाठी एव्हड्यासाठीच की आदल्या रविवारी बरीच मजा केली जाते.
पार्ट्या असतात.पार्ट्या आल्या म्हणजे,खाणं-पिणं आलं.केर कचरा आला.पिणं आल्याने काही यथेच्छ पिणार्‍यांना झोपेसाठी एक जादा दिवस असायला हवा.त्या दिवशी कुणी त्यांना कटकट केलेली आवडत नसते.

सोमवारचे दिवस तसं पाहिलं तर फाल्तु दिवस म्हटले पाहिजेत.कारण कामावर आल्यावर बर्‍याच जणाना पहिला अर्धा दिवस चिडचिडेपणात जातो आणि निरर्थक वाटत असतो.
लोक चिडचिडे असतात एव्हड्यासाठीच की,आदल्या आठवड्याचे सरते दोन दिवस,शनिवार,रविवार,मजा करण्यात आणि झोपा काढण्यात घालवल्यानंतर,येतो तो सोमवार. शिवाय सगळं शरीर म्हणत असतं आणखी काही वेळ तरी अंथरूणात पडून रहावं.

सोमवारचे दिवस बोअरींग असतात आणि कामावर आल्या आल्या लक्ष केंद्रीत करायला जमत नाही.कारण ज्याला त्याला अंथरूणात थोडं तरी झोपायला हवं होतं असं वाटत असतं.आणखी थोडा वेळ घरच्या लोकांबरोबर घालवायला मिळाला असता तर बरं वाटलं असतं.

मला वाटत नाही,शनिवार,रविवार हे आदल्या आठवड्याचे सरते दोन दिवस गेल्यानंतर,पुढच्या आठवड्यात सोमवारपासून रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी पा्च म्हणजे आठ तासाचं हे वेळेचं कोष्टक कुणालाही मान्य व्हावं.कामावर लक्ष केंद्रीत व्ह्यायला,आणि डोक्यावर जेव्हडा म्हणून ताण जमत असतो तो उतरवण्यासाठी, घरी शांत जीवन जगायला मिळायला हवं.
मला वाटतं,सगळी गोळा बेरीज केल्यास आपले सोमवारचे दिवस आपल्यासाठीच असायला हवेत.”

वसंताचं हे सोमवार पुराण ऐकून झाल्यावर, दुसर्‍या दिवशी, सोमवारी सकाळी, कामावर जावं लागणार म्हणून वसंता वैतागला होता.हे कळायला मला वेळ लागला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com