Thursday, July 14, 2011

मी नेहमीच काळजीत असते.तुम्ही का नाही?



“गोव्यातली मंदीरं,बिच,ऐतिहासीक चर्चं,प्रसिद्ध खानावळी ह्यांना भेट द्यायची.मजा करायची.अगदी शब्दशः काळजी करायला वेळ आणि भानच ठेवायचं नाही.”

“आमच्या घरात मी मोठी होत असताना,मला एक शिकवलं जात होतं.ते म्हणजे काळजी करीत कसं रहावं.मला खात्री नाही पण मला वाटतं हे माझ्या आजीकडून आईकडे आणि नंतर माझ्याकडे आलं असावं.पण एक नक्की पुढे पुढे मी त्यावर विश्वास ठेवायला लागले आणि मनात म्हणायची,मी एखाद्या गोष्टीची काळजी करीत राहिले की,असं केल्याने,सकारात्मक गोष्ट साध्य होण्याची, आपल्यात क्षमता येते.”
चित्रा मला आपलं मत सांगत होती.चित्राला चार वर्षाची मुलगी आहे.

मला हे चित्राचं म्हणणं ऐकून गंमत वाटली.मी म्हणालो,
“पटकन मनात येतील अशी काळजीची कोणती उदाहरणं तू मला सांगू शकतेस?”

“अगदी सोपं आहे”
असं म्हणून चित्रा सांगू लागली,

“उकळत्या चहाचं भांडं चिमट्यात धरून गाळणीतून चहा कपात ओतत असताना चिमटा सरकला तर?गरम चहा अंगावर ओतून भाजायला झालं तर?

मोठ्या बहिणीची दोन वर्षाची मुलगी अंगणात खेळत असताना तोल जाऊन पडली आणि तिचा हात मोडला तर?

माझ्या थोरल्या भावाचा मुलगा मोटर-सायकल नुकताच चालवायला शिकला आहे.भर वेगात ती चालवत असताना त्याला अपघात झाला तर?

असे एक ना हजार विचार मनात येऊन मी काळजीत असायची.अशी काळजी करीत राहिल्याने जे होणार आहे असं वाटत रहातं,ते होऊ नये म्हणून काळजी करीत रहावं. असं मला वाटायचं.

आता ह्याची दुसरी बाजू म्हणजे नेहमी आनंदात रहाणं.पण हे काही खरं नाही. आनंदात रहाणं टाळालायला हवं.कारण आनंदी असणं बरं नाही.समजा तुम्हाला काही गोष्टीची मजा वाटून आनंद झाला,किंवा तुम्ही एखाद्या घटनेत चटकन सुखावला किंवा थोडसं सुखावला तर मी म्हणेन निश्चिंत रहा, हा आनंद जास्त काळ टिकणार नाही.सकाळ येईपर्यंत निवळून जाणार.”

मी चित्राला म्हणालो,
“एकाच वेळी आनंदात आणि काळजीत राहण्याच्या ह्या दोन अवस्था,तुझ्या मनाची फसवा-फसवी करतील असं मला वाटत नाही.कसं ते सांगतो.
तुला आनंदी रहाण्याची सुरवातच करता येणार नाही, कारण त्यानंतर शेवटच्या क्षणाला चिंतेत राहून सर्व काही सकारात्मक होईल अशी तू अपेक्षा करणंही बरोबर होणार नाही.

दुसर्‍या बाजूने पाहिलं तर तू चिंतेत रहायला सुरवात करणं,मग आनंदात रहाणं, आणि त्यानंतर चिंतेत रहाणं आणि त्यामुळे तुझं सकारात्मक होईल ह्याची अपेक्षा करणं. असल्या ह्या जुळवाजुळवीला इथे जागा नाही.काळजी करीत रहाणं का तर सकारात्मक होईल म्हणून आणि आनंदात रहाणं,मला वाटतं, तसंच काही तरी सकारात्मक होईल ह्याची अपेक्षा असल्यामुळे.”

“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.माझे डोळे एका नर्सने उघडले.”
चित्रा मला म्हणाली.आणि पुढे सांगू लागली.
“ह्या मुलीला जन्म देण्यापूर्वी मला खूपच कष्टातून जावं लागलं.
एक वर्षतर,मी आणि रमेश-मुलीचे बाबा- ना ना प्रयत्न करून पाहिले.डॉक्टरी सल्ले, देव-देवस्की काही विचारू नका.सर्व प्रयत्न असफल झाले.ह्या घटनेसाठी मी काळजी, काळजी आणि काळजी करीत होते असं म्हटलं तर अगदीच नम्रपणे बोलल्यासारखं होईल.पण सकारात्मक होण्याची चिन्हं काही दिसेनात.

मला आठवतं,असंच एक दिवशी डॉक्टरांच्या क्लिनीकमधे गेल्यावर,पुन्हा असफल निर्णय मिळाल्याचं पाहून,त्या अनुभवी नर्सने मला एका बाजूला बोलावून सांगीतलं,
“ही गोष्ट सफल व्हायला हवी असेल तर तुम्ही काळजी करायचं सोडून द्या”
“फक्त सफलता मिळेपर्यंत ना?”
अधीर होऊन मी तिला लागलीच म्हणाले.
“माझ्या अनुभवातून मी सांगते.जर का तुम्ही चिंतामुक्त होऊन आनंदात राहिला नाहीत तर तुम्हाला कधीच शक्य होणार नाही.(सफलता मिळणार नाही.)”
मला त्या नर्सने निक्षून सांगीतलं.

अर्थात,हे तिचं ऐकून त्यावेळी माझ्या मनात एकच विचार आला,हे सर्व मी दुसर्‍या एखाद्याला,म्हणजे त्या नर्सला सुद्धा,फक्त माझी आजी आणि आई सोडून,माझा काळजी करण्याचा उद्देश कसा समजावून सांगू ?
“की,काळजी करूनच माझ्या सारख्यांना सफलता मिळत असते.”
खरं पाहिलंत तर,मला त्या नर्सच्या डोळ्यात माझ्याबद्दल कळकळ दिसली.
माझ्या मनातले विचार तिला सांगायला मी धजले नाही.
म्हणून मी,मान हलवून होकार दिला.
“थोडा बदल म्हणून बाहेर कुठेतरी जाऊन मजा करायची काळजी करायचीच नाही.” असं मी माझ्या मनात आणलं.

मी आणि रमेशने कामावरून सुट्टी घेतली.सुट्टी म्हणायचा माझा अर्थ,सुट्टी घेऊन गोव्याला जायचं ठरवलं.सर्व गोवं आणि आजुबाजूचा परिसर पहाण्यात मजा करायची. गोव्यातली मंदीरं,बिच,ऐतिहासीक चर्चं,प्रसिद्ध खानावळी ह्यांना भेट द्यायची. अगदी शब्दशःकाळजी करायला वेळ आणि भान ठेवायचंच नाही.योगायोग म्हणा किंवा दुसरं काही म्हणा मी सफल झाले.

नंतर मला ही मुलगी झाली.आता ती चार वर्षाची आहे. जेव्हा ती नाराज होत असते तेव्हा मी तिला सांगत असते,
“चिंता करून कसलीही चांगली गोष्ट साध्य होत नाही.चिंता करून चांगली गोष्ट जन्मालाही येत नाही.विश्वास ठेव माझ्यावर.तू तर नक्कीच आलेली नाहीस.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com