Tuesday, July 26, 2011

मज्जा.


“मला पण मजा करायला आवडतं.मला मौज-मस्ती करायला आवडतं.माझ्या कल्पनाविलासाला कुणी तरी गुदगुदल्या केल्या तर मला आवडतं.मला नेहमीच वाटतं की प्रत्येकाला काही करण्यात मजा येत असते.”

श्रीधर, मिलिटरीत उमेदवाराना ट्रेनिंग देण्याचं काम करतो.त्यासाठी त्याला देशाच्या निरनीराळ्या भागात जावं लागतं.त्याची बदली झाली की तिथे त्याला साधारण सहाएक महिने रहावं लागतं.ट्रेनिंग देणं,ते करून घेणं,त्यावर लेखी परिक्षा घेणं आणि नंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणं ही त्याची ठोस कामं असतात.बरेच वेळा सगळेच उमेदवार उत्तीर्ण होतात.
हे सर्व मला श्रीधरने मागे एकदा सांगीतलं होतं.

अलीकडेच, मी त्याल भेटलो त्यावेळी मला म्हणाला,
“वरचेवर बदल्या होत असल्याने,मुल होईपर्यंत, माझ्या सतत होणार्‍या बदल्यांबद्दल काही वाटलं नाही.पण किशोरच्या जन्मानंतर आणि तो शाळकरी झाल्यानंतर जरा समस्या यायला लागल्या.मिलिटरीची स्कूल्स पण चांगली असतात.काही वर्षं किशोर आमच्याबरोबर राहिला.नंतर त्याला त्याच्या काकाजवळ नाशिकला स्थिरकाळ ठेवला होता.आता तो शाळ संपवून कॉलेजमधे जाणार आहे.”

किशोरचं कॉलेज चालू होण्यापूर्वी त्याला घेऊन ही तिघं मंडळी युरोपला ट्रिपवर जाणार होती हे मला कळलं होतं.ती सर्व जाऊन आली असं कळल्यावर मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी कुलाब्याला गेलो होतो.श्रीधर आणि त्याची बायको घरी नव्हती.एकटाच किशोर होता.किशोर बापासारखाच गप्पीष्ट आहे.आई वडील येईपर्यंत तो मला युरोपच्या ट्रीपच्या गप्पा सांगण्यात गर्क झाला होता.युरोपमधे कुठे कुठे गेल्याचं
सांगीतल्यावर तिकडचे लोक मजा कशी करतात ते तो मला रंगवून सांगत होता.

“मुळात हे युरोपमधले सर्व देश सांपत्तिक परिस्थितीने चांगले आहेत.लोकवस्ती बेताचीच.कारण घरात मुलं जास्ती नाहीत.पैसे उरतात. उरलेल्या पैशात मजा करायची हेच त्यांचं मुख्य ध्येय.मात्र मजेसाठी सुट्टी घेण्यापूर्वी कामावर असताना मरमरेस्तोपर्यंत लोक कामं करतात.त्यामुळे देशाची सतत प्रगतीच होत असते.”
किशोर मला म्हणाला.

“तुला कुठल्यां गोष्टींची खास मजा वाटली ते तर सांग.”
मी किशोरला म्हणालो.
“तसं जाईन तिथे मजा होती.पण मला खास मजा वाटली ती फ्रान्समधे नॉरमॅन्डीला.तिथल्या एका खेळात मी भाग घेतला होता.”
किशोर मला सांगायला अगदी आतूर झाला होता.

पुढे म्हणाला,
“तिस मजल्यावरून खाली पडत आहो अशी कल्पना करा.वारा तुमच्यावरून आणि खालून तुम्हाला चापकाचे फटके देत आहे आणि भेडसावून टाकीत आहे.तुम्ही किंचाळता, तेव्हडंच तुमच्या कानावर पडत आहे.आणि तुम्ही सतत खाली कोसळत आहात.तुमची खाली कोसळण्याची क्रिया शंभर वर्षं तरी टिकणार आहे असं तुम्हाला वाटत असतं.ह्या कोसळण्याच्या तणावामुळे तुमच्या मेंदूत, तयार झालेल्या केमिकल्समुळे, एका मागून एक स्पंदनं निर्माण होत आहेत.तोंडावर घामाच्या धारा वहात आहेत.तुमचं हृदय ढोल पिटल्यासारखा आवाज करीत आहे.मेलेल्या बेडकासारखे तुमचे हात आणि पाय पसरले आहेत. जवळ येत राहिलेली जमीन, तुमच्या शरीराचा चक्काचूर होणार आहे म्हणून तुम्हाला धोक्याची खूण देत आहे.खाली खाली येणं जरा मंद झालं आहे.अगदी दहा फुटावर येऊन लागलीच तुम्ही बंदूकीच्या गोळी सारखे उंच हवेत प्रवेश करता.अशी ही आवर्तनं होत राहून शेवटी जमीनीपासून शंभर फुटावर येऊन तुम्ही पूर्णपणे थांबता.ह्यालाच बंजी जम्पींग म्हणतात.ह्यालाच मज्जा म्हणतात.
ही मजा मला फारच आवडली.”

मी किशोरला म्हणालो,
“मला पण मजा करायला आवडतं.मला मौज-मस्ती करायला आवडतं.माझ्या कल्पनाविलासाला कुणी तरी गुदगुदल्या केल्या तर मला आवडतं.मला नेहमीच वाटतं की प्रत्येकाला काही करण्यात मजा येत असते. नुसतं पुस्तक वाचन असो,चित्र काढणं असो.शेवटी मजा म्हणजे तरी काय?”
मी किशोरला प्रश्न केला.

तो म्हणाला,
“समजा मला क्रिकेट खेळण्यात मजा येत असेल, तर कुणाला शॉपींग करण्यात मजा येत असेल.शेवटी आपल्याला कशात स्वारस्य आहे ह्यावर मजा अवलंबून आहे.आणि ते सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.मजा करताना माझ्या मेंदूत केमिकल्सचा ओघ निर्माण होतो ते मला आवडतं,कुणाला बुद्धिबळ खेळण्यात मजा येत असेल तर कुणाला कंप्युटरवर खेळ खेळायला मजा येत असेल.

मजा म्हणजेच भ्यायला वाटून घेणं,जसं बंजी-जम्प करताना वाटतं तसं.किंवा आराम मिळणार्‍या स्वातंत्र्यात मौज आणणं.मला आठवतं,क्रिकेट खेळायला प्रथमच मी बॅट हातात घेतली तेव्हा माझ्या नसानसातून मजा वहात आहे असं मला वाटलं होतं.पण ते फक्त मलाच वाटलं.”
“मज्जा म्हणजे काय वाटतं तुम्हाला?”
किशोरने मला प्रश्न केला.

मी किशोरला म्हणालो,
“मजा कशाला म्हणावं? हे कळल्यानंतर मजा म्हणजे काय ते कुणालाही सांगता येईल.
ज्याला जे आवडतं तेच करायला मुख्य कारण होतं ती मजा.मजा मनात प्रसन्नता निर्माण करते.प्रसन्नतेने सुख निर्माण होतं.सुखावल्याने मेंदूला संदेश दिला जातो,
“खरंच,कधीतरी हेच मला पुन्हा करायला हवं.”
मजा असते तेव्हा जीवन कारणास्तव असतं.मजा नसेल तर कुणीही दुःखाच्या आणि नाराजीच्या समुद्रात हरवलेल्या शंखासारखा असतो.मजा नाही तर मुद्दा नाही,हेतू नाही.मजेशिवाय जीवनाचा खरा अर्थ न समजण्यासारखं आहे.मजा म्हणजेच सुखावलेल्या भावना,सनसनाटी आणि अर्थात मजेची जाणीव.
म्हणूनच तू म्हणतोस तसं तिकडचे लोक मजा करण्यात स्वारस्य घेतात.त्यासाठी काही लोक नवे नवे खेळ तयार करतात.काही ठिकाणी शिकार करण्यात मजा येते.हा पण मजेचा एक खेळ असतो.पण हा जरा श्रीमंती खेळ आहे.आणि काहीसा निष्टूर असा खेळ आहे.काही युरोपीयन देशात कोल्हे आणि लांडगे ह्यांची पैदास वाढली की त्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून आणि मजा म्हणून त्या मुक्या प्राण्य़ांची शिकार करण्याचा खेळ खेळतात.हा मला वाटतं मजेचा निघृण प्रकार आहे.पण ते शिकार करण्यात मजा वाटणारे लोक म्हणतील,
“तुम्हाला त्यात मजा वाटत नसेल तर आम्हाला पर्वा नाही.आम्हाला मजा वाटते.”
ह्या म्हणण्यात त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही.”

किशोर म्हणाला,
“शिकारीवरून मला आठवतं.मी कुठेतरी वाचलंय,
जेव्हा कुणी स्वारस्य घेऊन काही गोष्ट करतो तेव्हा मजा आलेली असते.सनसनाटी करायला अंगात जेव्हा जोश येतो त्यावेळी त्यांना आनंद होतो आणि मजेची जाणीव होते.माणसं जेव्हा गुहेत रहायची तेव्हापासून त्यांना मजा काय ते माहित झालं असावं.प्रथम शिकार करताना माणसाला मजेची जाणीव झाली असणार. मला एखादी समस्या सोडवायची असली तरी मजा येते.आता हे तुम्हाला मी सांगतोय तेव्हाही मला मजा येते.मनात राग आला असताना किंवा मन निराश झालं असताना,काही आवडेल असं केलं तरी मजा येते.

“मजा कुठे असते त्याबद्दल मी तुला माझा विचार सांगतो.”
मी किशोरला सांगत होतो.
“मेंदुच्या आत आणि बाहेर मजा असते.मेंदुला आव्हान द्यायला लोकाना मजा येते.एखाद्या गोष्टीत स्वारस्य असलं आणि ती समस्या सोडवायची पाळी आली की ती मजा म्हणून स्विकारली की आनंद होतो.मजा मेंदुच्या बाहेरपण असू शकते.मग ते क्रिकेट खेळण्यासाठी मैदानवर गेल्यामुळे असो,किंवा घरातल्या कोचावर बसून व्हिडियो गेम खेळण्यातली असो.मजा टिव्हीमधली असो नाहीतर बाहेर मैदानात फुटबॉल खेळण्यात असो.मजा अवती-भोवतीअसते. सर्व ठिकाणी असते.काहीना मजेपासून सुटकार मिळत नाही. आपण सृजनशील असल्यानंतर कोणत्याही गोष्टीचं रुपांतर मजेमधे करू शकतो.”

मजा कशी असते?
मजाही मजेसारखी असते.मजा म्हणजे आनंद वाटणं.मजा म्हणजे सहानुभुतीयुक्त वाटणं आणि स्नेह असण्याचा भाव मनात येणं.मजा सहजपणे निर्माण करता येते.मात्र कुणावर लादता येत नाही.ह्यात मजा आहे की नाही हे माझ्या मीच ठरवलं पाहिजे.मजा म्हणजे सुख,कुतूहल.मजा वाटल्याशिवाय कोण एखाद्या गोष्टीकडे आकर्षिला जाणार नाही.लोकांच्या समुहात असताना,समुहात असण्याचा आनंद वाटावा हीच मजा. क्रिकेट खेळताना,फुटबॉल खेळताना,हॉकी खेळताना, नाचताना मनात खळबळ माजली की ती मजा समजावी. मला एखाद्या गोष्टीत मजा वाटायला लागली असताना दुसरा त्या गोष्टीचा कसा विचार करतो ह्याची मला पर्वा वाटत नाही.”

“बंजी-जम्पबद्दल मला तुम्हाला हेच सांगायचं आहे.”
किशोरला ह्या जम्पची त्याच्या मनावर चांगलीच छाप बसली होती.म्हणून तो सांगत होता,
“म्हणून जेव्हा तुम्ही तिस मजल्यावरून बंजी-जम्प घेता त्यावेळी तुम्हाला माहित असतं की तुम्ही मरणार नाही,तुमचा चक्काचूर होणार नाही, तुमच्या अंगातलं रक्त इतस्ततः फेकलं जाणार नाही. तुम्ही वाचणार आहात.त्यानंतर तुम्ही सुखाने जगणार आहात.तुम्हाला तिसाव्या मजल्यावर सुरक्षीतपणे खेचून आणलं जाणार आहे.आणि लिफ्टमधून तुम्हाला तळमजल्यावर आणलं जाणार आहे.तेसुद्धा धडधाकट परिस्थितीत. तुमच्या अंगातले स्त्राव तुमच्या अंगातच असणार आहेत. तुमचं हृदय हळूवारपणे शांत होणार आहे.तुम्ही बंजी-जम्प घेतली ती इतराना मुर्खासारखं केलं असं वाटणार असेल.पण तुम्ही मात्र कारणास्तवच केलं आहे-एकच कारण मजेसाठी.”

तेव्हड्यात बेल वाजली.किशोरचे दोन मित्र त्याला भेटायला आले होते.मी उठता उठता किशोरला म्हणालो,
“तू,तुझ्या ह्या मित्रांना बंजी-जम्पबद्दल जरूर सांग.त्यांनाही ऐकायला मजा येईल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com