Wednesday, November 2, 2011

कोकणातला उन्हाळा.




“त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता.”

कोकणातला पावसाळा जसा मला आवडतो तसा कोकणातला उन्हाळापण आवडतो.उन्हाळ्यातला तो ताज्या हवेचा थंड वारा,फुलझाडांच्या आणि मोहर आलेल्या आंब्याच्या पानामधून जेव्हा घाईगर्दीने शिरून बरोबर फुलांचा आणि आंबेमोहराचा सुगंध दरवळत आपल्या नाकावर येऊन आदळतो आणि सोनचाफ्यासारख्या उंचच उंच वाढणार्‍या झाडावरच्या चाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या हळुवार जमीनीवर पसरवतो किंवा पारिजातकाच्या फुलांचा सडा झाडाच्याच खाली घालतो, तेव्हा अनुभवलेला एखादा बहारदार दिवस आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं.

निरभ्र आकाशातला एखादा पांढरा ढग सूर्याला अडवीत असताना काही सोनेरी किरणं जेव्हा आकाशातून खाली येतात तेव्हाचं वातावरण आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं.

पावसाळा फारसा दूर नसल्याने,कधी कधी वळवाच्या पावसाचं वातावरण निर्माण करून काळोख्या रात्री, अतिशय कोरड्या हवेमुळे दोन ढगात वीजेची चकमक होत असते. अशावेळी एखाद दूसर्‍या काळ्या ढगातून, बाहेर परसात खुर्च्या टाकून बसलेलं असताना, दोन चार पावसाचे थेंब अंगावर झिडपले जातात त्या वातावरणाची मला फार मजा यायची.

उन्हाळ्याच्या दिवसात शाळेला सुट्टी असायची.झोप काढायला भरपूर वेळ मिळायचा.शिवाय सुट्टीत मजा करण्यासाठी बरेचसे बेत आखलेले असायचे.

आदल्या दिवशी बाजारातून आणलेले रंगीबेरंगी पण काजूच्या बीसकट आणलेले बोंडू कापून त्याची तिखट करमट खाऊन झाल्यावर रात्रीच्या काळोखात, परसातल्या तीन दगडावर पाण्याचा हंडा ठेवून सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी बनवलेल्या चुलीतल्या उरलेल्या लाकडाच्या कोळशात, ह्या काजूच्या बिया भाजून,नंतर त्या फोडून आतला काजूगर काढून भावंडाबरोबर खायला मजा यायची.

उन्हाळातल्या दिवसात एखाद दिवशी खूपच उष्मा व्हायचा.
अशावेळी आम्ही सर्व भावंडं,गावातल्या सखल भागात वहाणार्‍या ओहळात पोहायला जायचो.मोत्याला न्यायला विसरायचो नाही.कारण ओहळा जवळच्या वडाच्या झाडाखाली काढून ठेवलेल्या आमच्या कपड्यांचं राखण तो करायचा.ओहळात बरोबर वडाच्या झाडाच्या खालच्या भागात ओहळ जरा खोल होता.दोन पुरूष खोल खड्डा असावा.विहीरी सारख्या खोल असलेल्या त्या ओहळाच्या जागे पासून आम्ही दूर पोहायचो.
त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता.घोडग्यांचा दत्तू त्या खड्ड्यात पोहायला गेला आणि त्याला सुनेच्या भुताने आत खेचल्याने तो त्यात बडून मेला.त्याचं प्रेत दुसर्‍या दिवशी मिळालं.
कोकणात भुता-खेताच्या गोष्टींना मिणमिणत्या दिव्यात,असल्या गोष्टी आजींकडून ऐकताना, उत येतो असं आम्हाला आमची आई सांगायची.

सकाळीच आम्ही सर्व भावंडं बाजारात जायचो.लाल,हिरवे आणि सफेद रंगाचे रसाने पुष्ट असलेले नुकतेच शेतातून पानासकट काढून आणलेले उस विकत मिळायचे.ते घरी आणून गाठी,गाठी जवळ कोयत्याने कापून उभे चिरून त्याची चिवट साल काढून टाकून लहान लहान करवे करून चावून चावून खायचो.माझी मोठी भावंडं स्वतःच्या दातानेच उसाची साल काढून दातानेच करवे तोडून खायचे.आम्हाला असं तुम्ही करू नका म्हणून सांगायचे.कारण म्हणे आमचे दात अजून दुधाचे दात आहेत.

एकदा मी त्यांचं म्हणणं न जुमानता माझ्या दाताने उसाची साल काढण्याचा प्रयत्न केला.मला आठवतं मी माझा खालचा दात केव्हा गमावून बसलो ते कळलंच नाही.कारण दात पडल्यावर म्हणावं तसं रक्त काही आलं नाही.कदाचीत उसाच्या करव्याला चावताना आणि रस गिळताना रसाबरोबरच तो दात पोटात गेला असावा. सकाळी उठल्यावर दंतमंजन मशेरी दाताला चोळताना गायब झालेला दात मझ्या लक्षात आला असावा.

कधी कधी आम्ही संध्याकाळी कॅम्पात फिरायला जायचो.बाबल्याच्या हाटेलातलं दूध-कोल्ड्रींग प्यायला आमची चूरस लागायची.थंड दुधात आईसक्रीम टाकून त्यावर साखरेचं सुवासीक रंगीबेरंगी पाणी शिंपडून केलेलं हे दुध-कोल्ड्रींग प्यायला मस्त लागायचं.मुंबईत अशाच ड्रींकमधे सब्जाच्या बिया टाकून विकत असलेल्या ड्रींकला फलुदा म्हणतात हे आम्हाला नंतर कळलं.कोकणातल्या उन्हाळ्याच्या दिवसात असलं ड्रींक प्यायला मिळत असल्याने उन्हाळा हवा हवासा वाटायचा.इतक्या लांब कॅम्पात जायला न मिळाल्यास, बाजारातून आईसफ्रूट, बर्फाचा गोळा म्हणजेच पॉपसीकल आणून आम्ही सर्व भावंडं ते चोखून-चाटून खाण्यात आनंद मानायचो.

मला आठवतं,अशावेळी मी किती चोखंदळ असायचो.मला समजत नसायचं की,काही गोष्टी दिसतात त्यापेक्षा जास्त महत्वाच्या असतात.आमच्या आजोबांनी मला शिकवलं होतं की,लहानसहान गोष्टीतच मन रमवून जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा.उन्हाळ्यात गावात आनंद-मेळा भरायचा. आमचे आजोबा आम्हाला पाळी पाळीने जवळ घेऊन फिरत्या उंच चक्रात चक्कर मारून आणायचे.

अशावेळी उन्हाळा आम्हाला सर्वात जास्त आवडायचा.तसं पाहिलंत तर प्रत्येक ऋतू आपआपल्यापरीने आवडण्यासारखाच असतो.पण उन्हाळ्यातली मजा निराळीच.पावसाळ्यात खेळायला मिळायचं नाही. उन्हाळ्यात पोहायला मिळायचं.जीवनातला प्रत्येक उन्हाळा आठवणीने इतका समृद्ध होत असतो की पाठीमागे कसलाच खेद उरलेला नसतो.

एखाद्या दिवशी मागे वळून सर्व आठवणी ताज्या करून पहाताना,आपल्याच जवळच्या माणसासमोर लज्जा येण्यासारखा एखादा वेडपटपणा केल्याची घटना किंवा एखाद्या भावंडाबरोबर मस्करी करीत असताना त्याची परिणीती कुस्करी होण्यात व्हावी अशी घटना किंवा आजोबांबरोबर सर्वानी बंदरावर जाऊन त्या गरम गरम वाळूत उभं राहून स्वच्छ निळ्या निरभ्र आकाशाकडे पाहून गडद निळ्या समुद्रात सूर्याचं लालबूंद बिंब बुडताना पहातानाची ती घटना,लक्षात आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं.

वाईट असो किंवा चांगली असो प्रत्येक स्मृती गोड तशीच अनमोल असावी.प्रत्येक स्मृती खास आणि विशीष्ट असावी.
कोकणातला प्रत्येक उन्हाळा,आठवणी देऊन गेला.त्या आठवणी उगाळून उगाळून तसंच काहीसं वाटतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com