Thursday, November 24, 2011

माझ्याच स्वप्नांचा सन्मान.


“विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

ए.एम.चौगुले माझ्याबरोबरच माझ्या ऑफिसात कामाला होता.तो सिव्हिल इंजिनीयर होता.पण त्याला कागदावर नकाशे काढायला खूपच आवडायचं.
तो आमच्या ड्राफ्टिंग खात्यात वरच्या पातळीवर काम करायचा.मला नेहमीच म्हणायचा “तू आमच्या घरी ये”. डोंगरीला तो रहायाचा. डोंगरीला मी पूर्वी एकदा काही कामाला गेलो होतो.
खूपच झोपड्यानी भरलेला हा भाग आहे.पण अधून मधून पांढरपेशांची स्वच्छ घरं पण आहेत. चौगुलेला आमच्या ऑफिसने कुलाब्याला जागा देऊ केली होती.पण त्याला आपल्याच गोतावळ्यात रहायला आवडायचं.म्हणून त्याने ती ऑफर नाकारली.त्याचं कारण त्याने मला सांगीतलं होतं.
तो मला म्हणाला होता,
“मी कुलाब्याच्या जागेत सुखी होईन पण माझ्या कुटूंबातल्या मंडळीना डोंगरीची जागा सोडून जाववत नाही.”

चौगुल्याचा मुलगा चांगला शिकला होता.आणि तो संधी मिळताच युरोपमधे रहायला गेला. चौगुल्याने एक दोन वेळा मुलाकडे जाण्यासाठी ट्रीप्स काढल्या होत्या.त्याची एकूलती एक नात युरोपात शिकून थोड्या दिवसासाठी ह्यावेळेला तिच्या आजोबाकडे रहायला आली होती.तिला त्याने एक पार्टी द्यायचं ठरवलं होतं.त्यासाठी मला त्याने घरी बोलावलं होतं.माझं इंप्रेशन होतं ते चूकीचं ठरलं.चौगुल्याचं घर फारच सुंदर होतं.आजूबाजूला स्वच्छ परिसर होता.आणि ह्याच्या घरात चांगली टापटीप होती.

अबदूल महंमद चौगुले माझ्या कोकणातला.धर्माने मुस्लिम असला तरी त्याच्या घरचे नेहमीचे संस्कार सगळेच कोकण्यातल्या स्थानिक संस्काराप्रमाणेच होते.मुख्य म्हणजे तो अस्खलित मराठी बोलायचा.घरातली सगळीच मंडळी मराठीतच बोलायची.जरूरी वाटल्यास उर्दूत बोलायची पण ती कोकणी मिश्रीत उर्दू असायची.ऐकायला मजा यायची.

आपल्या नातीला माझी ओळख करून देताना कोकणी मिश्रीत उर्दूतच बोलला.ती जन्मापासून युरोपमधे राहिली असली तरी संस्कार इकडचेच होते.
माझ्याशी ती मराठीतच बोलत होती.

इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगल्या होत्या.मुस्लिम असून सुद्धा आपण आपले संस्कार तिकडे कसे जोपासून असते हे सांगण्यासाठी मला म्हणाली,
“स्वप्नं पहाणं मला आवडतं.जास्त करून, पडलेलं स्वप्नं खरं करण्यासाठी जे काही करावं लागतं ते करायला मला आवडतं.मनाने धीट असल्यावर चुका केल्या गेल्या तरी काही हरकत नाही अशी समजूत करून घ्यायला मला विशेष वाटतं.स्वप्नांशिवाय आणि खुळ्या चुका केल्याशिवाय काही साध्य होत नसतं आणि काही शिकलंही जात नसतं असं मला नेहमीच वाटत असतं.

अगदी माझ्या लहानपणापासून माझ्याबद्दल आणि सभोवतालच्या विश्वाबद्दल माझी मोठी मोठी स्वप्नं असायची. मला ज्यात आनंद होईल त्या गोष्टी मी करणार आणि त्या केल्याने मी काहीतरी साधलं ह्याबद्दल मला आनंदही होणार हे मला माहित असायचं.ही स्वप्नं कधीकधी अगदी मामुली असायची आणि कधीकधी खिचकट असायची.

सनातनी मुस्लीम घराण्यात माझा जन्म झाल्याने मी नेहमीच विचारात असायची की ह्यातली काही स्वप्नं खरोखरच मी साध्य कशी करून शकेन?
आणि अलीकडेच मला जाणीव व्ह्यायला लागली की ह्या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत.

मला आठवतं त्यावेळी आमच्या कॉलेजची ट्रीप आल्प्स पर्वतावर गेली होती.माझ्या अंगावर बुरखा होता.पण त्यामुळे मला त्या वातावरणातला मस्त अनुभव मिळायला त्याची काही आडकाठी आली नाही.आणि आजुबाजूचे कुणीही मी माझ्या अंगावर काय घेतलं आहे ह्याची पर्वाही करीत नव्हते.त्या बुरख्यावर जोपर्यंत मी माझ्या रक्षणासाठी लागणारा पोषाक वापरत असायची तोपर्यंत त्यात कसलीच बाधा येत नव्हती.

एकदा मी बन्जी-जंपिंगसाठी टर्की ह्या देशात गेली होती.जमीनीपासून पंचावन्न मिटर उंचावर असलेल्या एका धातूच्या कमानीवर उभी राहून,ती कमान वार्‍याच्या प्रत्येक झोतीबरोबर डुलत असताना आणि माझ्या पायाला बांधलेला साखळीदंड मला ओढून धरत असताना,खाली पाहिल्यावर माझी ही उडी म्हणजे माझ्याकडून होणारा महामूर्खपणा होत तर नाही ना असा विचार सारखा माझ्या मनात येत होता.

त्या थंड धातूच्या कमानीवर माझे अनवाणी पाय जोराने दाबून ठेवून भरपूर क्षमता माझ्या स्नायुत आणण्याचा माझा प्रयत्न म्हणजे माझ्या उडी घेण्याच्या सहासापासून मी दूर रहावं असं वाटून घ्यावं,असा हा माझा समज हा माझा आणखी महामूर्खपणा होता.परंतु,शेवटी मी उडी घेतली.ते सहास फारच आनंदीत करणारं,मग्न करणारं होतं.

असलं हे साहस मी पुन्हा करण्यासाठी माझ्यात तेव्हडं धैर्य मी आणू शकेन का कुणास ठाऊक. पण माझ्यातलं एक लहानसं खुळं स्वप्न मी परिपूर्ण करू शकले हे मात्र खरं.असली स्वप्न माझ्या अंगामासात असल्याने त्यासाठी मी नक्कीच खुश आहे.

माझ्या वयक्तिक जीवनात मी असल्या खूप चुका केल्या आहेत.पण प्रत्येक चुकीतून मी माझ्याचबद्दल शिकले.आणि माणूस म्हणून मी असं शिकत शिकत वाढत आहे.सर्वात महत्वाचं असं मी शिकले ते म्हणजे कुणाबद्दल मत बनवु नये.कुणीही परिपूर्ण नसतो.किंवा मी असं म्हणेन विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

आपल्या नातीचं चिंतन ऐकून चौगुले आनंदून गेला होता.
मला म्हणाला,
“मला माझ्या नातीचा अभिमान वाटतो.”

मलाही रहावलं नाही.मी त्याला म्हणालो,
“मी ह्याबद्दल तुझ्याशी जास्त सहमत होऊच शकत नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com