Friday, November 11, 2011

शिसपेन्सिल.


  • “मी शिसपेन्सिल नेहमीच वापरणार.जे अगोदरच उत्तमरित्या चालतंय त्यात अवघडपणा आणण्याची काय जरूरी आहे?”

    विनय नावाप्रमाणेच विनयशील आहे. त्याला जे वाटतं ते तो अगदी विनयशीलता ठेऊन सांगत असतो. सध्याच्या धामधूमीच्या जगात जितकं साधं रहावं तितकं रहाण्याच्या तो प्रयत्नात असतो.आणि तसं असण्यात त्याला अभिमान वाटत असतो.सध्या्च्या संपर्क साधण्याच्या आणि मनोरंजन करण्याच्या मोबाईल उपकरणापासून तो दोन हात दूरच असतो.ही उपकरणं वापरून मिळणार्‍या सुविधा त्याच्या मनावर प्रभाव पाडू शकत नाहीत.
    त्यासाठी तो त्याला वाटणारं त्याचं प्रांजाळ मत द्यायला कचरत नाही.

    “सगळं जग पुढे चाललं आहे.नवीन नवीन उपकरणं वापरून लोक आपलं जीवन सुखकर करीत आहेत.तू आयफोन वापरत नाहीस.घरातल्याच लॅन्ड फोनवर भागवतोस.रेडिओवरची गाणी लावून ऐकतोस. आयपॉडवर हजारो गाणी रेकॉर्ड करून लोक मनाला वाटेल ते गाणं,वाटेल तेव्हड्यावेळा ऐकत असतात.तू मात्र त्यातला नाहीस ह्याचं मला कुतूहल वाटतं.हे गौडबंगाल काय आहे.?”
    मी विनयला एकदा गप्पा मारताना विचारलं.

    “मी त्यातला नाही.”
    हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.आणि गौडबंगाल काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणून,थोडासा घसा खाकरून विनय मला म्हणाला,
    “एखाद्या साध्या शिसपेन्सीलबद्दल मला विशेष वाटतं. अशा साध्या पेन्सीलचं रुपांतर एखाद्या यांत्रिक गोष्टीत करण्याची जरूरी किंवा एखाद्या विकसित तंत्रविज्ञानविषयक गोष्टीत विकसित करण्याची जरूरी असायला हवी असं मला वाटत नाही.

    मला नेहमीच वाटत असतं की,जीवनात साधं राहून अर्थपूर्ण नाती ठेवायला मला सोपं जायला हवं.कारण माणसा-माणसातला संबंध,आत्मिक संबंध आणि प्राकृतिक संबंध बाळगण्यात मी आसावलेला असतो.

    ह्या जगात जीवनातल्या सहजतेच्या हरएक पैलुमधे तंत्रविज्ञानविषयाने एव्हडी व्याप्ति करून ठेवली आहे की, कुणालाही दुर्लभ अभयस्थान गाठायला जास्त प्रयत्नशील रहावं लागत नाही.
    मी पाहिलंय साध्यासुध्या रहाणीमुळे इतरांशी अर्थपूर्ण संबंध ठेवायला मला सोपं होत असतं.
    माणसा-माणसातला अर्थपूर्ण संबंध साधण्यात, तंत्रविज्ञानविषयाने अस्तव्यस्त झालेलं जीवन, अडथळा आणत असतं.आयफोन,आयपॉड सारख्या इलेक्ट्रॉनीक उपकरणापासून मोकळं राहिल्याने,रस्त्यावरून चालताना समोरून येणार्‍यांना मैत्रिपूर्ण हास्य देऊन किंवा मान हलवून सहमति देऊन जायला सोपं होतं.इतरांकडून मिळणारी ही स्वीकृति प्रसन्न रहाण्यास,आनंदात रहाण्यास महत्वाची ठरते.

    तंत्रविज्ञानाचं महत्व मी काही संपूर्णपणे नाकारत नाही.परंतु,आयपॉड,आयफोन स्वीकारून मी माझ्या इतर मित्र-मंडळीची जागा ह्या उपकरणाना द्यायला कबूल नाही.

    साधेसुधेपणामुळे,माझी शारीरीक क्षमता विकसीत करायला मला मदत होते.शारीरीक कष्टांवर आणि आपत्यांवर काबु आणण्याच्या प्रयत्नात, माझ्यातली कमजोरी आणि नश्वरता याबाबत मी जागरूक रहातो. एव्हडंच नाहीतर असं केल्यामुळे मला दिसून येतं की माझ्या मनात असलेल्या मर्यादा मी दाबून ठेवू शकतो.

    आपण व्यायामशाळेचं उदाहरण घेऊन पाहूया.
    तसं पाहिलं तर,सुनियोजीत व्यायाम शाळा उत्कृष्ट समजल्या पाहिजेत.पण मी पाहिलंय,व्यायाम शाळेतल्या उपकरणा ऐवजी,आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकवणार्‍या मद्तनीसा ऐवजी,मी माझ्या मनाला आणि शरीराला उच्च पातळीच्या परिश्रमासाठी तयार करू शकतो.आणि हे करण्यासाठी अगदी कुठेही आणि कमीतकमी उपकरणाच्या मदतीने मला ते करता येतं.

    मुद्दा असा आहे की,कसरत करण्यासाठी कुठे आणि कसलं उपकरण घेऊन ती केली गेली पाहिजे हा नाही, तर श्रम घेतल्यामुळे आणि त्यात सफलता मिळत असल्यामुळे, कसरत व्हावी म्हणून यापूर्वी कधीही न घेतलेले काहीसे तीव्र आणि कठीण परिश्रम घेऊन मी एक नवीन मर्यादा प्रस्थापित करू शकतो आणि माझ्यात असलेल्या कमजोरीबद्दल आणि क्षमतेबद्दल मला उच्चतम जागरूकता मी आणू शकतो.

    माझ्यात ही जाणीव असल्याने मला माझ्या विधात्याबरोबर मजबूत दूवा निर्माण करता येतो.जीवनातला साधेसुधेपणा मला हा दूवा साधण्यात जास्त वेळ देऊ शकतो.
    माणसा-माणसातलं नातं साधल्यामुळे आणि माझी प्राकृतिक नश्वरता आणि त्याचवेळी निसर्गाने माझ्यात तयार केलेली क्षमता उघड झाल्याने माझ्यात आत्मिकदृष्ट्या मजबूती आणायला मी समर्थ ठरतो.

    मला राहून राहून वाटतं की आपण रहात असलेल्या ह्या गतिमान,तंत्रविज्ञानविषयक जगात साधेसुधेपणाची रहाणी उत्तम आहे.मला जरूरी भासते तेव्हा हा तंत्रविज्ञानविषय मी ते एक उपकरण म्हणून वापरतो.पण कोणतेही नवीन तंत्रज्ञान,जेव्हा मी अर्थपूर्ण दूवा साधून माझं जीवन परिपूर्ण आणि सुखी करीत असेन तेव्हा,आड येत असेल तर निश्चीतच तसं येऊ देत नाही.

    मी शिसपेन्सिल नेहमीच वापरणार.जे अगोदरच उत्तमरित्या चालतंय त्यात अवघडपणा आणण्याची काय जरूरी आहे?

    विनयचं हे तत्वज्ञान ऐकून मी मनात म्हणालो,
    “पसंत अपनी अपनी,खयाल अपना अपना.”

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com


  • जीवनभराची शिकवणूक.

    Posted: Wed, 09 Nov 2011 02:38:23 +0000

    “प्रत्येकाच्या अंगात ठरावीक कला असते तसंच त्याला ठरावीक ज्ञान असतं.असं असूनही आपल्याला खरा माणूस होण्यासाठी,आपला इतरांशी कसा संबंध असतो ह्यावर अवलंबून आहे.कष्ट घेणं हे नुसतच अनिवार्य नसून ते घेत असताना जीवनभराची अत्यावश्यक तालीम मिळणं हे त्याचं फळ आहे.”

    आता बरीचशी थंडी पडायला लागली आहे.झाडांची पानं पिवळी व्ह्यायला लागली आहेत.एखाद दुसरं जास्त पिवळं झालेलं पान देठासकट खाली पडून झाडाखाली पानांचा पाचोळा जमायला सुरवात झाली आहे. झाडावरच्या सफरचंदासारख्या फळांनी रंग घ्यायला सुरवात केली आहे.त्याचाच अर्थ आकाराने मोठी असलेली फळं खायला गोड लागणार आहेत.वेळीच ही फळं झाडावरून काढली नाहीत तर देठासकट ती खाली पडणार आहेत.एखाद दुसर्‍या फळावर पक्षांनी चोच मारून फळ खाल्याचं निदर्शनाला आणून दिलं आहे.म्हणजेच ही फळं खाण्यालायक झाली आहेत.
    मुबलक फळफळावळचा हा प्रदेश असल्याने ज्याने त्याने आपल्या परसात फळांची झाडं लावली आहेत. खाऊन खाऊन किती खाणार? शेवटी उरलेली फळं,पक्षी,खारी खाऊन टाकतात आणि झाडाखाली फळांचा खच पडतो.झाडाखाली पडणारी फळं कुजण्यापूर्वीच जमवून काढून टाकून जागा साफ केली नाहीतर गंदगी पसरते.

    आता जवळ जवळ मार्च महिना येईतोपर्यंत तळ्यावर जायचं विसरून गेलं पाहिजे.काळोख खूप लवकर येतो.संध्याकाळचे पाच म्हणजे रात्रीचे दहा वाजल्यासारखे वाटतात.अशावेळी प्रो.देसायांचा फोन येतोच.
    “आपण अधून मधून एकमेकाच्या घरी संध्याकाळच्यावेळी भेटूया.”

    ह्यावेळी मी भाऊसाहेबांच्या घरी गेलो होतो.मी जाण्यापूर्वीच आणखी एकदोन पाहुण्याबरोबर प्रोफेसरांच्या गप्पा रंगल्या होत्या.मी गप्पांत भाग घेताना म्हणालो,
    “मला वाटतं,असे काही लोक असतात की,त्यांना काही गोष्टी खचीतच माहित असतात.पण मला असंही वाटतं की,ह्या बोधगम्य गोष्टींचा,खास असा, परिणाम त्यांच्यावर होत नसावा.
    एखादा खास गणीत-तज्ञ संख्येबद्दल खरं काय ते जाणत असेल,आणि एखादा इंजीनियर प्राकृतिक बळाचा त्याच्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे चांगलं जाणत असेल.पण गणीत-तज्ञ आणि इंजीनियर ही प्रथम माणसं आहेत,त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बरोबर मलाही धरून ,विशेष वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्ञान किंवा अंगातली कला ही तितकी मोठी बाब नाही,इतरांबरोबर असलेले संबंध जास्त महत्वाचे आहेत. आपणासर्वांनाच इंजीनियर किंवा गणीत-तज्ञ व्ह्यायची जरूरी नाही पण इतरांबरोबर संबंध ठेवणं सर्वांनाच जरूरीचं असतं.”

    माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
    “आपली ही एकमेकासंबंधीत नाती,जी जीवनात जास्त महत्वाची असतात, ती सांभाळायला कठीण असतात, कारण बरेच वेळा खरं काय आणि खोटं काय ह्याचा प्रश्न उद्भवत असतो.
    मला वाटतं,आपल्याला खरं आणि खोटं याबद्दल खास ज्ञान नसतं.आणि जरी माहित असलं तरी,मला वाटतं, आपल्या वयक्तिक स्वारस्याच्या आणि आपल्या प्रवृत्तिच्या विरोधातही जे काही आपल्याला खात्रीपूर्वक खरं आहे असं वाटत असलं आणि शोधून काढणं निरन्तर कठीण आहे असं वाटत असलं तरी ते शोधून काढणं बरं असतं.

    तसं पाहिलं तर,काय सत्य आहे ह्याबद्दल आपल्याला जमेल तेव्हडं त्याचं उत्तम मुल्यांकन करून त्यानंतर आपणच ,भले त्यावर खात्री नसेना का, ती शर्त समजून कृती केली पाहिजे.

    खरं काय आहे ते समजायची खात्री नसल्याने आणि कदाचीत चुकीची समज असण्याचा संभव असल्याने आपल्यात आपण दयाळु वृत्ती आणि मन वळवण्याची वृत्ती ठेवायला हवी.परंतु,त्याचबरोबर खरं शोधून काढायला सफल होण्यासाठी, आपल्याला अविचल आणि हिमती रहायला हवं.
    योग्य काय आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात,नम्रता आणि कारूण्य ह्याचा मेळ जमवून सफलता आणणं काहीसं कठीण जातं.परंतु,खरं करून दाखवणं हे अंमळ कठीण असतं कारण त्यासाठी स्वतःशीच लढत द्यावी लागते.

    योग्य तेच करणं म्हणजेच स्वतःशीच लढत देणं,कारण,नैसर्गिक दृष्ट्या,आपण प्रत्येकजण असंच आचरण करण्याच्या प्रयत्नात असतो,प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण वागतही असतो की,जणू हे विश्व आपल्याच भोवती केंद्रीभूत झालेलं आहे आणि आपलं त्या विश्वात असणं हे ह्या विश्वाचा उद्देश आहे.

    मला खात्रीपूर्वक वाटतं,माझं तरी तसं काहीही नाही. परंतु,जणू आहे असं वागून, मी नक्कीच चुक करून घेणार आहे.
    त्यासाठी मला नेहमीच स्वतःशी लढत देत राहिलं पाहिजे.याचाच अर्थ,कष्ट,पीडा ही नुसतीच अनिर्वाय नाही तर ती जीवनभराची अत्यावश्यक तालीम आहे आणि ह्यातून मला माझं हित कसं साधायचं हे शिकता येतं.

    प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते.अशी ही माझ्या मनातली श्रद्धा कुठून आली असेल तेही मला माहित आहे.मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते.”

    भाऊसाहेब बोलायचे थांबले आहेत असं पाहून मी त्यांना म्हणालो,
    “कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
    “हे ब्रम्हांड हा एक एव्हडा मोठी चमत्कार आहे की,तो समजून घेण्यासाठी त्याच्या निकट जायला फक्त एकच मार्ग असणं महाकठीण आहे.”

    माझं हे विवरण ऐकून चर्चा संपवताना प्रो.देसाई म्हणाले,
    “धर्मातून मिळणारी शिकवणूक तसंच समाजातल्या इतर विद्वान लोकांकडून मिळणारी शिकवणूक ऐकून घेऊन मग आपलं मत ठरवण्याचे आता दिवस आलेले दिसतात.”

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com