Monday, November 14, 2011

रोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.

“ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”

अनीलची आणि माझी अलीकडेच ओळख झाली होती.त्यासाठी त्याची माझी ओळख दुसर्‍याकुणी करून दिली नव्हती.अनीलेने स्वतःच मला रस्त्यात गाठून माझ्याशी ओळख करून घेतली होती.त्यानंतर कधीही तो मला भेटला की माझ्या नावा-गावानीशी आठवण लक्षात ठेवून बोलायचा.त्याच्याबरोबर रस्त्यावरून चालायचं म्हणजे दर पल्ल्यामागे त्याला कोणतरी ओळखीचा भेटायचा.

“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा? कुतूहल म्हणून मी तुला विचारतो”
असं मी अनीलला एकदा म्हणालो.
मला अनीलने मजेदार माहिती दिली.
तो म्हणाला,
“रोज नेहमी एखाद्या नव्या व्यक्तिशी माझी भेट व्हावी असं मला वाटत असतं.जर का लोक वेळ काढून रोज कुणातरी एका नव्या व्यक्तिला हलो म्हणतील तर मला वाटतं, मनात असलेल्या प्रतिकूल भावना नष्ट होतील. खरं म्हणजे हा धडा माझा मीच शिकलो आहे.

पूर्वी एकदा मी असाच माझ्या इतर मित्रांबरोबर शहरात येऊन गेलो होतो.शहरात आतंकवाद्यांचा हल्ला होण्यापूर्वी,शहरातले लोक, वस्ताद,दादागिरी करणारे,शिष्ट आणि उद्धट वृत्तिचे असतात असा समज दिला जात असायचा.तेव्हा थांबून कुणाशी गपशप करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीपण ह्यावेळेला मी आणि माझा मित्र मनात थोडा धीर आणून फुटपाथवर चालणार्‍या एका दोघाना एखादी गोष्ट कुठे मिळेल म्हणून सहज विचारण्याचा प्रयत्न करून पाहिला.

दोन चार लोक आपसूप येऊन सांगू पहात होते.आम्ही शहरात नवखे दिसल्याने,स्नेहपूर्ण वागणूक आम्हाला मिळत होती.माझ्या लगेचच लक्षात आलं की,आपला वेळ काढून गर्दीत दिसणार्‍या कुणाशीही बोलणं म्हणजेच विश्व पाहिल्यासारखं वाटणं.

मला आठवतं, माझ्या लहानपणी शाळेत हा प्रयोग मी करून पाहिला होता.माझ्या मनातली योजना अशी होती की,रोज एका अनोळख्याशी संवाद साधायचाच,हे शक्य होईल ह्याबद्दल मी थोडा साशंकच होतो.मी अनुमान काढलं होतं की लोक संवाद साधण्यासाठी अंमळ व्यस्तच असतात.माझं अनुमान खरं ठरलं.माझा प्रयोग असफल झाला.

पण ज्यावेळी मी कॉलेजमधे शिकायला शहरात आलो होतो त्यावेळी ही माझी भन्नाड कल्पना आचरणात आणण्याचं ठरवलं.ज्या परिसरात मी रहात होतो तिथे हा प्रयोग करून पहाण्याचं मी ठरवलं.फार फार तर काय होणार होतं की मी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना एखाद्याकडून मी उपेक्षित झालो असतो. परंतु,तसं झालं नाही.कारण ते लोक पूर्वीसारखे गर्दीतला एक चेहरा असं वागत नव्हते.

माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात रोज मी एका नव्या व्यक्तिशी संवाद साधत होतो.त्याचं नाव विचारत होतो, तो शहरात कुठल्या गावाहून आला म्हणून विचारत होतो शिवाय त्याच्याबद्दल कमीतकमी दोन निरुद्देश वास्तव विचारत होतो.ही सर्व माहिती मी माझ्या मनाच्या कप्प्यात आठवण म्हणून ठेवीत होतो.पुन्हा कधी जर का त्याची भेट झाली तर मैत्रीपूर्ण ओळख राखून ठेवण्याचा तो प्रयत्न होता.

कॉलेजमधले माझ्या बरोबरीचे मित्र हा माझा प्रयत्न,ही माझी धारणा, म्हणजे एक विनोद आहे असं समजत होते.पण मला तसं वाटत नव्हतं.ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”
हे त्यांच्या मनात आणण्यासाठीचा तो मार्ग होता.

कुणी म्हणू शकलं असतं की माझा हा प्रयत्न अगदीच असंगत होता,त्यातून काहीही मिळत नव्हतं, परंतु, मला मात्र त्यापलीकडे जाऊन वाटत होतं.माझ्याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून,नुसता संवाद साधण्यात, मी पुढाकार घेत आहे असं दिसलं जात होतं.हे आणखी वाढवून घेऊन आणि त्याच व्यक्तिची पुन्हा ओळख ठेवून मी आदर दाखवीत आहे असं दिसत होतं.दुसर्‍याला आदर दाखवून मी त्या व्यक्तिबरोबर सहिष्णुता दाखवतो असं दिसत होतं.”

अनीलचं हे सर्व ऐकून मला त्याचं खूपच कौतूक करावसं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा?”
हा एक साधा प्रश्न मी तुला विचारला खरा.पण त्या ओळखी होण्यामागे तुझी भन्नाड कल्पना आणि त्यानंतर तू घेत गेलेली भन्नाड मेहनत ह्याचंच हे फळ आहे हे तू मला सवित्सर समाजावून सांगीतलंस म्हणूनच कळलं.

मला ह्यातून एक लक्षात आलं की,तुझ्या ह्या प्रयत्नामुळे,
पुढाकार दाखवून,आदर प्रदर्शित करून,सहिष्णुता बाळगून हे विश्व शांतीने रहाण्याजोगं आहे असं दाखवता येतं.आपण जरका रोज एका नव्या माणसाला भेटलो आणि त्याची ओळख ठेवून राहिलो तर आपण आपल्यातच वेगळेपणा करीत नसून ह्या जगातही तसा एक चेहरा एकावेळी पहाण्याचा वेगळेपणा होत नाही हेही सिद्ध होतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com