Saturday, November 5, 2011

साध्या प्रश्नातली ताकद.


“लगेचच माझ्या अंगातला लढा,लढाऊ वृत्ती म्हणा हवं तर,जागृत झाली.मी काय बरं करावं?मी माझं संरक्षण करावं का? का,त्यांने मला धमकावं आणि मी माझा स्वाभिमान कमजोर करून घ्यावा?”

मी मधुकरच्या घरी गेलो होतो.माझं त्याच्याकडे थोडं काम होतं.त्या कामाविषयीच गप्पा चालल्या होत्या. इतक्यात बाहेर रस्त्यावर आरडाओरड चाललेली ऐकू आली.मधुकरचा मुलगा धावत वरती आला आणि आपल्या बाबांना कसली गडबड झाली ते सांगत होता.दोघां माणसात बोलण्या-बोलण्यात बाचाबाची झाली होती आणि प्रकरण हातघाईवर आलं होतं.

मुलाचं सर्व ऐकून घेतल्यावर मधुकर मिष्कील हसला.
मी त्याला विचारलं,
“तुझं हसण्याचं कारण काय?काहीतरी तुला सांगायचं आहे असं दिसतं.”
मला मधुकर म्हणाला,
“माझं हसण्याचं कारण म्हणजे,
“बोलण्या-बोलण्यात बाचाबाची झाली”हे जे माझा मुलगा म्हणाला त्यावरून माझ्याच लहानपणीचा एक किस्सा मला आठवतो.तो तुम्हाला सांगावा असं मनात येऊन मी तो माझा प्रसंग कसा सांभाळला ते आठवून हसू आलं.”

“असं काय ते ऐकूया तर खरं”
मी मधुकरला बोललो.

“मला आठवतं त्यावेळी मी सोळाएक वर्षाचा असेन.”
मधुकर मला सांगायला लागला.

“माझे आईबाबा आणि मी गाव सोडून शहरात रहायला गेलो.माझ्या वडीलाना एका चांगल्या नोकरीची संधी आली होती.पण मला हा बदल तितकासा आवडला नाही.गेली कित्येक वर्षं मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेचा आणि मित्र-मैत्रीणींचा मला सराव झाला होता.त्यांना सोडून आता मला नव्या वातावरणात आणि नव्या शाळेत एक अपरिचित म्हणून थोडाकाळ का होईना रहावं लागणार होतं.
त्याबद्दल मी नाराज होतो.

मला त्या नव्या शाळेतला पहिला दिवस आठवतो.मी अगदी एकांडा पडलो होतो.लंच घेण्याची घंटा वाजली आणि मी शाळेच्या कॅन्टीनमधे जायला निघालो.बहुदा मी एकदम पहिलाच मुलगा कॅन्टीनमधे प्रवेश करीत होतो.त्या कॅन्टीनच्या मोठ्या हॉलमधे मी एका कोपर्‍यात असलेल्या टेबलावर जाऊन बसलो आणि मी माझ्या आईने दिलेला डबा उघडून जेवायला सुरवात केली होती.

जसजशी आणखी मुलं हॉलमधे यायला लागली ते पाहून माझ्या लक्षात आलं की एक कंपू माझ्या जवळ आणि जवळच्या टेबलावर येऊन बसला.आणि हॉलच्या दुसर्‍या कोपर्‍यात दुसरा असाच कंपू जमा होऊन बसला होता.हे पाहून मला जरा विचित्र वाटायला लागलं.जणू ह्या दोन कंपू मधे एक सीमा आखलेली होती आणि तो हॉल दोघांत विभागला गेला होता.हे आपणहून केलं गेलेलं विभाजन मला जरा नवीनच होतं.पण मी जिथे होतो तिथेच बसलो.

माझ्या जवळच्या कंपूने,मी तिथे बसलो असताना, माझ्याकडे काहीसं विचित्रपणे पाहिल्यासारखं केलं.पण मी माझ्या डब्यातलं निवांतपणे खात बसलो होतो.लंचची वेळ होत असताना मधेच एक उंच,धिप्पाड मुलगा, उठून उभं राहून माझ्याजवळ येऊन टेबलावर हात पसरून माझ्याकडे बघत बसला.आणि मला म्हणाला,
“तू कदाचीत चुकीच्या कंपूत तर नाही ना बसलास?”
असा प्रश्न करून माझ्याकडे पहात राहिला.

लगेचच माझ्या अंगातला लढा,लढाऊ वृत्ती म्हणा हवं तर,जागृत झाली.मी काय बरं करावं?मी माझं संरक्षण करावं का? का, त्यांने मला धमकावं आणि मी माझा स्वाभिमान कमजोर करून घ्यावा?ह्या कंपूतले इतर अगदी शांत झाले.माझ्या प्रतिसादाची वाट पहात असावेत.
तो धिप्पाड टारगट आखाड्यात उतरूं पहात होता पण मी त्याचं आव्हान न घेण्याचं ठरवलं.

मी त्याच्याकडे नजर देऊन,मी अगदी भोळा आहे असं दाखवून त्याला विचारलं,
“चुकीच्या कंपूत म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?”
माझं हे ऐकून तो आश्चर्याने आवाक झालेला दिसला.माझ्याकडे दोन सेकंद नजर लावून पाहू लागला. आपल्याच मानेला झटका देऊन तो बाजूला झाला.

माझ्या साध्या प्रश्नाने तो निशःस्त्र झाला.माझ्या विश्वासाची मी तडजोड केली नाही.किंवा त्याच्या कंपूगीरीला मी मान्यता दिली नाही.मी हळू हळू शांत झालो.आणि काही प्रकरण न करता मी माझ्या डब्यातलं उरलं होतं ते खाल्लं.

ह्या घटनेने मे एक शिकलो की,एखादा साधासा प्रश्न म्हणजे,
“तुला काय म्हणायचं आहे?”
असा प्रश्न जबरदस्त ताकदवान असतो.त्या प्रश्नातून संदेश दिला जातो की,समजून घ्यायची माझी इच्छा आहे आणि ऐकून घेण्याची माझी तयारीपण आहे.

माझ्या त्या साध्या प्रश्नाने, सहिष्णुतेने असहिष्णुतेशी, टक्कर दिली. असं मला वाटलं.एरव्ही,
“मी जिथे बसलो आहे तिथे बसण्याचा माझा हक्क आहे आणि तुझ्या वाटेने तू जा”
असं मी त्या दांडगटाला सांगून वाद घालू शकलो असतो.परंतु,तसं केलं असतं तर,रक्षात्मक पवित्रा घेऊन, मी जास्त आरडाओरडीला जन्म दिला असता आणि ते प्रकरण जरका तिथेच संपलं असतं तर मी नक्कीच भाग्यवान झालो असतो असं म्हणायला हवं.त्याऐवजी एकाअर्थी मी त्याला माझ्याशी बातचीत करायला आमंत्रण दिलं होतं.

त्यावेळी माझ्या डोक्यात असा विचार आला की माझ्या त्या प्रश्नामुळे त्या धट्टींगणाला, कंपूगीरीशीच त्याने दोनहात करावे, असं आव्हानच दिलं होतं.पण हे कितपत खरं होतं मला माहित नाही.एक मात्र मला कळलं जेव्हा मी,पुढचं अख्खं वर्ष, त्याला कॅन्टीनमधे पहायचो,तेव्हा तो माझ्याजवळ नजर करून पहायचा आणि चालू पडायचा.जरी तो माझ्याशी केव्हाही हसला नाही तरी त्याच्या स्वीकृतीवरून मी एक समजून गेलो की त्याचं ते तसं करणं हा एक माझ्याशी दुवा सांधण्याचा संदेश असावा.”
मला हे मधुकरने सांगीतल्यावर,माझ्या मनात विचार आला की मधुकर त्या लहान वयात विचाराने किती पोक्त होता.

मी त्याला म्हणालो,
तुझं खरंच कौतूक केलं पाहिजे.हातघाईवर जाण्याऐवजी तू त्यावेळी बातचीत करण्याचा मार्ग पत्करलास.
साध्या प्रश्नात काय ताकद असते हा तुझा विश्वास तुला त्या प्रसंगातून सहजच वाचवू शकला.मला वाटतं, साध्या प्रश्नाने, नम्रतेचा आणि आलोचनात्मक ऐकून घेण्याच्या तयारीचा,त्या साध्या प्रश्नातून संदेश दिला जातो. असहिष्णुतेशी दोन हात करण्यासाठी हे अस्त्र किती ताकदवान आहे हे दिसून येतं.”

“मी तुमच्याकडून ह्याच विचाराची अपेक्षा करीत होतो.म्हणूनच मी तुम्हाला तो माझा किस्सा सांगीतला.”
असं म्हणून मधुकरने माझ्या कामाविषयी चर्चा करायला पुन्हा सुरवात केली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com