Sunday, November 27, 2011

श्रद्धा आणि चंगळ



"मनात दुसर्‍याबद्दल चिंता करणं म्हणजेच स्वतःला शांती मिळवण्याचा उत्तम मार्ग शोधणं"

काल प्रो.देसाई माझ्या घरी आले होते.बाहेर थंडी खूपच होती.ह्या वयात प्रकृती सांभाळणं आवश्यक असतं.कडक उन्हात थंडी तेव्हडी भासत नाही. म्हणून ते लवकरच आले होते.एकदा संध्याकाळ झाली की मग बाहेर जाववंत नाही.
भाऊसाहेब थोडावेळ बसल्यावर,चहाचा कप त्यांना देत मीच त्यानां म्हणालो,
"श्रद्धा असणं आणि त्यावर विश्वास ठेवणं हे नेहमीच काही लोकांच्या मनात गोंधळ आणित रहातं. निश्चितता आणि तितकाच तीव्र संशयवाद ह्यामधे

त्या लोकांचं जीवन जास्तीत जास्त विदीर्ण होत जात असतं."


माझं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"काहीवेळा त्यांच्या त्यांनाच सिद्ध न होणार्‍या संकल्पना पटवून घेण्याच्या त्यांच्यात असलेल्या क्षमतेमुळे त्यांना काहीशी शांती मिळाल्यासारखं

वाटतं हे मात्र खरं असतं.
परंतु,ही सहायता तूटपुंजी असते.


नैराश्य आणि वाटतं ते सर्वकाही खोटं आहे, ह्या दोघामधला दूवा अगदीच तकलादू असतो.त्यांच्या बाहेरच्या जगात ह्या मतभिन्नतेचं प्रतीबिंब त्यांना दिसून येतं.विशेष करून ते जेव्हा एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जात असतात तेव्हा.एक टोक म्हणजे गूढवादी जगाचा विचार करण्याचा आणि कधीकधी फक्त चंगळ करण्याचा हव्यास हे दुसरं टोक."


मी त्यांना म्हणालो,
"भाउसाहेब,काही लोक,त्यांच्या मनात जी श्रद्धा असते ती विकसीत करण्याच्या प्रयत्नात असतात.कुणीतरी म्हटलंय ना,
"श्रद्धेवर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करणं"
तसं काहीसं त्यांचं होतं.खरी श्रद्धा त्यांना भ्रांतिजनक असते.
त्यांच्या मनात श्रद्धेमधून निघणार्‍या सुंदर,प्रेरणात्मक अर्थाची अल्प झलक,हळुहळु कंटाळा करण्यात किंवा खेद करण्यात क्षीण होत जाते.ते अगदी

निराश झालेले दिसतात."


थोडासा विचार करून रिकामा चहाचा कप समोरच्या स्टुलावर ठेवून गंभिर चेहरा करीत भाऊसाहेब म्हणाले,
"काहींच्या खर्‍या आत्मविषयक समस्या भोवतालच्या जगामुळे नसतात तर त्या त्यांच्याच आत्मकेन्द्रिततेमुळे असतात आणि हे पाहून खरोखरच

धक्का बसतो.स्वतःला तृप्ती वाटली म्हणजे झालं अशा तर्‍हेची वृत्ती उराशी बाळगून जवळच्या लोकांना दुखावलं जातं हे त्यांना कळत नाही.

अनुभवासारखा गुरू नाही ह्या रुढोक्तिने काही लोक नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात शिकून जातात.काही लोकाना तर अनुभव हाच गुरू असतो.आणि काही

लोक ते मार खाऊन शिकतात."


"भाऊसाहेब,माझ्या मनात आणखी एक प्रश्न येतो."
असं मी म्हणाल्यावर प्रो.देसाई हसले आणि मला म्हणाले,
"विचारा.संध्याकाळ होण्यापूर्वी चर्चा संपवूया.एकदा थंडी वाजायला लागली की विचार-शक्ति खुंटते."


मी म्हणालो,
"चंगळ करण्याच्या वृत्तीतून काही लोक जीवनातली काही वर्ष हरवून बसतात.व्यसनाधीन होतात.प्रथम त्यात ते मजा म्हणून मश्गुल होतात. हे

करणं म्हणजे पश्चातापाची पूर्वखूण हे वेळीच न ओळखल्याने, नैराश्य आणि एकटेपण येतं.पहिलं कारण असतं आणि दुसरा त्याचा परिणाम असतो. जणू ते दुष्ट चक्रच असतं.काही लोकांची एव्हडी मजल जाते की एकतर त्यांनी त्यातून बाहेर पडावं नाहीतर मरण पत्करावं असं त्यांच्या मनात सारखं येत रहातं."


"श्रद्धा आणि अनुभव ह्याच्या कात्रीत ही मंडळी सापडलेली असतात."
असं सांगून प्रो.देसाई म्हणाले,
"परंतु,लोकांत शिकण्याची क्षमता असते.त्यांचा स्वतःचा विवेक त्यांच्यात नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर शेवटी ज्यांना असा विवेक आहे

त्यांच्याकडून शिकण्यासाठी ते आपले दरवाजे उघडे ठेवतात.काही लोक दुसर्‍या मोक्याची वाट पहातात.हे फाल्तु उघड सत्य आहे असं मानणारे नंतर

लक्षात आणतात की खरंतर त्यात तथ्य आहे.
कुणीतरी म्हटलंय खरं,
"घेण्यापेक्षा कुणालातरी देणं बरं"
श्रद्धेपेक्षा काही लोक हे अनुभवाने शिकतात.


हे सुंदर,विरोधाभासयुक्त सत्य म्हणजेच दुसर्‍याचं कुशल मनात आणल्याने त्यांचाच खर्‍या समाधानीचा मार्ग खुला होतो हे शेवटी त्यांच्या ध्यानात

येतं.
अशा तर्‍हेने आदर्श रहाणं जरी सातत्याने त्यांना जमलं नसलं तरी माझी खात्री आहे की,

"सगळ्या जगात आनंद समाविष्ट झालेला असतो तो केवळ
इतरांचं भलं इच्छिल्याने झालेला असतो
तसंच,
सगळ्या जगातले क्लेश हे फक्त स्वतःलाच आनंद मिळण्याच्या प्रयत्नाने झालेले असतात."
ह्या श्रद्धेवर त्यांचा विश्वास नक्कीच असेल."

प्रो.देसायाना आणखी एखादा प्रश्न विचारण्याचं मनात आलं होतं.तेव्हड्यात त्यांचा नातु आलेला पाहिला.
"आजोबा,आई म्हणाली तुम्ही संध्याकाळी चालत घरी यायला निघाला तर तुम्हाला थंडी नक्कीच वाजणार.म्हणून मला तिने गाडी घेऊन जाऊन

तुम्हाला घेऊन यायला सांगीतलं.माझ्या मागेच लागली.सॉरी,तुमच्या चर्चेत मी खंड आणला."


"नाही रे,आमची चर्चा संपली होती तू अगदी वेळेवर आलास"
असं मी त्याला सांगीतल्यावर आजोबा आणि नातू दोघेही घरी जायला निघाले.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com