Sunday, March 14, 2010

जीवनातली सूत्रं.

“हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.”

वसंत ऋतू येत आहे ह्याची चाहूल लागली.अलीकडे न दिसणारे पक्षी दिसायला लागले आहेत.मलबरी झाडाला आता पून्हा पालवी फुटायला लागली आहे.इकडे पानं पडून गेलेल्या झाडांना पुन्हा पालवी फूटताना फुलं येतात.त्यातून मग पानं येतात. नंतर ज्यावेळी फळं यायची वेळ येते तेव्हा पून्हा झाडाला फुलं येतात.त्यातून मग फळं जन्म घेतात.चक्क उन पडत असल्याने उन्हात बसायला बरं वाटतं हे खरं असलं तरी उन भासत नाही कारण बाहेरचं तापमान थंडी वाटेल एव्हडं असतं.जरा ढग येऊन सावली आली की एकदम कुडकुडायला होतं.निदान आमच्या ह्या वयावर असं वाटतं.
वसंत ऋतूचा पहिला दिवस असल्याने प्रो.देसायाना फोन करून विचारलं की ते आज तळ्यावर येणार का?.भाऊसाहेब हो म्हणालेच आणि वर म्हणाले येताना प्रि.वैद्यांना पण घेऊन येतो.
प्रोफेसरांच्या मनात आज काही तरी नवीन चर्चा करण्याचा विचार दिसतो अशी माझ्या मनात कल्पना आली.आणि ती खरी ठरली.

संध्याकाळी तळ्यावर उन चांगलंच पडलं होतं.मी बराच लवकर येऊन बसलो होतो.येताना चिं.त्र्य.खानोलकरांची कोंडुरा कादंबरी वाचायला म्हणून घेतली होती.पर्शरामतात्यांचं त्यांच्या मनाविरूद्ध तात्यामहाराज म्हणून परिवर्तन कसं होतं आणि लोकच त्याला कसे कारणीभूत असतात हे वर्णन वाचत होतो.प्रो.आणि प्रि. केव्हा आले ते कळलंच नाही.

“कोकणातले संस्कार माणसाना कसं बनवून तयार करतात ह्याचं खानोलकरानी सुंदर विश्लेषण केलं आहे.मी ही कादंबरी वाचली आहे”
असं पुस्तकाचं नाव वाचून भाऊसाहेब म्हणाले.आपल्यावर आपल्या आईचे आणि आजोबांचे संस्कार कसे झाले हे सांगावं असं त्यांच्या मनात आलं असावं.

प्रो.देसाई मला म्हणाले,
“माझ्या आईचा आणि आजोबांचा दुसर्‍याला मदत करण्याबाबत गहन दृढ विश्वास असायचा.अगदी साध्या पद्धतिने, राहून, विचारपूर्वक राहून,उदार राहून आणि नाम रहित राहून मदत करायची त्यांची पद्धत असायची. आणि हे करीत असताना मनात ते प्रामाणिक श्रद्धा बाळगून असायचे.मी फार क्वचीत माझ्या आईकडून कुणाची अवहेलना झालेली पाहिली आहे. कुणाच्याही संपर्कात आल्यावर त्याच्या अंगचे उत्तमोत्तम गुण ती पाहायची. शेवट पर्यंत ती परिपूर्ण जीवन जगली.चूपचाप भविष्याकडे नजर ठेवून कोणत्याही बदलावासाठी तीचं दार नेहमी ती उघडं ठेवायची.”
हे सांगून झाल्यावर भाऊसाहेबानी प्रि.वैद्यांकडे वळून त्यांना त्यांचं मत विचारलं.

प्रि.वैद्य प्रो.देसायाना म्हणा्ले,
“जीवनातल्या सूत्रांचं विश्लेषण करून ते शब्दात उतरायला जरा कठीणच असतं.ही सुत्रं इतकी आपल्या मनात खोलवर असतात की त्यावर आपली कृती आपण आपोआपच करत असतो.ज्यावेळी मी ह्या कृतींचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्याची उत्पत्ति काही माझ्याकडून होत नाही.मी जे काय ऐकलंय आणि मी जे काय स्वप्नात पाहातोय त्यातून ही उत्पत्ति होत असते.माझी कृती दुसर्‍यांच्या कृतीवर अवलंबलेली असते. मिळत असलेल्या उदाहरणावरून त्या कृतींचं आयोजन होत असतं.”

हे ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
“मी ह्याच तत्वावर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वागायचं ठरवलं. त्याचा फायदा मला एव्हडा झाला की लोकांकडून मला माझ्यात विश्वास निर्माण करायला मिळाला.कुणाचीही प्रशंसा केल्याने सुखाला आणि यशाला मार्ग खूला होतो हे मला माहित झालं.
व्यक्तिपेक्षा आयुष्य खूपच मोठं असतं.असं असलं तरी जसा मी मोठा होत गेलो तसं माझ्या लक्षात आलं की आपलं त्यामधलं योगदान बरंच कमी असतं.आणि त्यामुळे आपल्यातल्या थोडक्यांचंच नाव इतिहासाच्या पानावर फडकत असतं.”

मी काहीतरी म्हणावं असं भाऊसाहेबांच्या चेहर्‍यावरून दिसलं.ते तसं म्हणण्यापूर्वीच मी त्यांना म्हणालो,
“पण तुम्ही तुमचं काम निष्टेने करीत राहिला,ज्यात विश्वास ठेवत होता त्यासाठी ते केलं,तुम्ही ते काम स्वार्थी न राहाता केलं,जर तुमच्यातलं कसब तुम्ही तुमच्यासाठी न वापरता दुसर्‍या कशासाठी वापरलं,तर मग तुम्हाला त्यात नाम रहित अमरत्व मिळेल अशी माझी धारणा आहे.तुमचा चांगूलपणाचा अंश ह्या जगात तुमच्या पश्चात जो राहिल तो राहिल.पण ह्यात काही नवीन असं काही नाही, अपवादात्मक असं काही नाही.परंतु ते तुमच्या विचारसरणीचं वैशिष्ट्य ठरेल एव्हडं नक्की.”

मला प्रो.देसाई म्हणाले,
“माझी स्वप्न साकार करताना मला अपयश येणार हे मला माहित होतं. तरीपण मी प्रयत्नात राहिलो. आज जे काय जगात चालंय,जे काही तणाव आहेत, कुट विवाद आहेत ते मला दुःखी करतात. प्रजातंत्रावर माझा भरवंसा आहे. राजकारणी संप्रदाया्चं प्रजातंत्र मी म्हणत नाही.मी म्हणतो ती प्रजासत्ता ज्यात मुळ कल्पना असते की कुणीही कुणापेक्षा श्रेष्ट वा कनिष्ट नसतो.ह्या जगात जो जन्माला येतो तो स्वतः स्वताचं निवारण करायला येतो. प्रत्येकाला हवी ती संधी मिळायला हवी.मेहनत करून किंवा योगायोगाने काही प्राप्त करू शकला तर ते शक्य झालं पाहिजे.आणि त्याचं प्रतिक म्हणून त्याला इतरांसाठी त्याच्यावर आलेला कर्तव्याचा भार जास्त वाढला आहे हे कळलं पाहिजे.”

मी म्हणालो,
“द्वेष,पक्षपात,विरोध ह्यांची उत्पति वेगळ्या उद्धिष्टाने पाहिल्यावर होते. हे पाहिल्यावर मला याचा अचंबा वाटायला लागतो. नवीन आणि अपरिचीत बाबींकडे प्रत्येकाने मन उघडं ठेवून राहायला पाहिजे. कारण त्यात बदलाव असतो.आणि जीवन म्हणजेच बदलाव आहे ह्यात काहीही वाद असू नये.”

प्रि.वैद्य म्हणाले,
“शक्यतो आपले आदर्श वरच्या पातळीवरचे असावेत.ज्यात विशेषता असते आणि व्यवस्था पण असते.म्हणून जीवनात ह्यापेक्षा चांगली गोष्ट होणार नाही असं कधीच म्हणता येणार नाही.जर का आपल्याला पूर्ण विश्वास असेल,आपल्यात कौशल्य असेल,दृढ निश्चय असेल तर आपण हजारोना आनंदी करू शकू.मनुष्याच्या ज्ञानात भर टाकू शकू.ह्या सर्व गोष्टी आश्चर्य वाटावं अशा तर्‍हेने आपल्या जीवनाला मार्गदर्शक ठरतात.निक्षून सांगायचं झाल्यास ह्यात काही नवीन असं काही नाही.एकच हा एक सकारात्मकपणे विश्वासलेला विचार आहे.”

हे ऐकून झाल्यावर दोन मिनटं कुणीच काही बोलेना.माझ्या लक्षात आलं,हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.सर्वांनीच ते कबूल केलं आणि आम्ही घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com