Monday, March 29, 2010

कोकणातले बोंडू.

“आठवणी येतात,आठवणी जात नाहीत पण गेल्या तर मात्र असं डोळ्यात पाणी आणून जातात.खरं ना?”

माझी बहिण मालिनीताई माझ्या पेक्षा सतरा वर्षानी मोठी आहे.मी जेव्हडं माझ्या आजोबांना पाहिलं असेल त्या पेक्षा खूप वर्ष माझी ताई माझ्या आजोबांच्या सहवासात होती.ह्या आठवड्यात ती आमच्याकडे राहायला आली होती. सकाळीच मी बाजारात जाऊन भाजी आणताना पाच सहा काजूसकट बोंडू आणले होते.स्वच्छ धूऊन त्याची करमट करावी म्हणून पिशवीतून बोंडू बाहेर काढलेले पाहून ताईच्या डोळ्यात एकदम पाणी आलं.ती डोळे पदराने पुसत असताना पाहून मी तिला काय झालं म्हणून विचारलं.मान हलवून काही झालं नाही असं भासवून ती आत स्वयंपाक घरात गेली.
संध्याकाळी जेव्हा आम्ही गप्पा मारीत गच्चीवर बसलो होतो तेव्हा मी सकाळची घटना ताईला विचारली.

ती म्हणाली,
“बरेच दिवसानी बोंडू पाहून मला आपल्या आजोबांची आठवण आली.आणि माझे डोळे पाणावले.”
माझ्या ताईचं आमच्या आजोबावर खूप प्रेम होतं.हे मला माहित होतं.पण बोंडूचा किस्सा काय तो मला माहित नव्हता. तेव्हा मी तिला म्हणालो,
“आजोबांच्या तुला अनेक आठवणी आहेत हे मला माहित आहे.कधी कधी वाटायचं की तुझ्याकडून काही आठवणी ऐकून घ्याव्या.आज चांगलाच मोका आहे,तेव्हा सवित्सर ऐकायला मजा येईल.”
ताई पण बरीच मुडमधे होती.

मला म्हणाली,
“मी माझ्या आजोबांचीच नात. माझे आजोबा जगात सर्वोत्कृष्ट असायलाच हवेत असं मला नेहमी वाटायचं. शिवराम आजगावकर अशा तर्‍हेची व्यक्ति होती,की जिला “आजोबा” म्हणायला अगदी शोभून दिसेल.आणि मी मला नशिबवान समजते कारण अशा व्यक्तिची मी नात आहे.”
“इतकी वर्षं तू त्यांच्याबरोबर खेड्यात राहिलीस.सांग तरी त्यांच्या गमतीजमती.”
मी ताईला जोर देत म्हणालो.

“आम्ही खेड्यात रहाणारे लोक.शुक्रवारच्या दिवशी माझे सर्व मामा,मावश्या आणि त्यांची मुलं रात्रीच्या जेवणाला हजर असायलाच हवीत.आणि त्या दिवशी जेवणं झाल्यावर बाहेर पडवीत आम्ही सर्व जमून सुरेल आवाजात कुणी तरी चांगल्या कविता म्हणायची.कुणी प्रसिद्ध भावगीत गायचं.कुणी सुचवल्यास गाण्याच्या भेंड्या खेळायच्या.”
ताई अगदी जून्या आठवणी काढून काढून सांगायला लागली.पुढे म्हणाली,

“उन्हाळा आला की आम्ही मुलं आजोबांबरोबर सकाळी मागच्या परसात जाऊन कुठच्या झाडाला किती फळं आली, कुठच्या पानवेली किती उंच झाल्या.सोनचाफ्याला ह्या उन्हाळ्यात भरपूर फुलं येणार की नाही,नागचाफा एव्हडा का रोडावला,माडाचे कवाथे किती जोमाने उंच होत आहेत, केवड्याच्या वनात साफसफाईची जरूरी आहे का, सदैव पाण्याने तुडूंब असलेली विहिर ह्या उन्हाळ्यात इतकी कशी आटली,अश्या सारख्या गोष्टींची चर्चा करीत असूं.

सकाळची वेळ असल्यास जास्वंदीची,शेवंतीची,पांढर्‍याचाफ्याची,तसंच झाडाखाली सडा पडलेल्या प्राजक्ताच्या फुलांची जमवाजमव करून आजोबांनी धरलेल्या फुलाच्या परडीत भरभरून ठेवायचो.दुपारच्या पुजेच्या वेळी आजोबा जांभळ्या रंगाचं पितांबर नेसून यायचे.वरून उघडे असायचे,आणि लांब सफेद,स्वच्छ जानवं खांद्यावरून कमरेपर्यंत लटकत ठेवीत त्याला गाठवलेली त्यांच्या कपाटाची चावी लटकताना दिसायची.माझे आजोबा गोरेपान असल्याने त्या वयात पण राजबिंडे दिसायचे. आमच्या पैकी एक- पण बरेच वेळा मी- आजोबांसाठी सुगंधी खोडाचं चंदनाचं गंध सांडेवर उघळून
ठेवायचं. मग आजोबा उजव्या किंवा डाव्या हाताच्या मधल्या बोटाने आपल्या दोन्ही दंडावर, मानेच्या दोन्ही बाजूला, आणि कपाळावर ते गंध फासायचे.आणि नंतर पूजा व्हायची.
आजोबा गायीत्री मंत्र आणि इतर पुजेच्या प्रार्थना करून झाल्यावर, ताम्हाणात जमलेलं आचमनाचं पाणी आणि फुलांच्या पाकळ्या घेऊन घरासमोरच्या औदुंबराच्या चौथुर्‍यावर चढून जायचे आम्ही पण त्यांच्या बरोबर वर चढून ते काय करतात ते न्याहाळायचो. औदुंबराला पाच प्रदक्षिणा घालताना आम्ही आमच्या आजोबांच्या मागे असायचो.”
औदुंबराच्या फळांविषयी मी ताईकडून पूर्वी ऐकलं होतं.त्यांना ती गावठी अंजीर म्हणायची.त्याच्याबद्दलच ती सांगत होती.

“औदुंबराची पिकलेली फळं चौथुर्‍यावर पडून फुटल्यावर,फळांच्या चीरातून मुंग्या आत शिरून मध खायच्या.एखाद्या फळाला मुंग्या शिवल्या नसल्या की आम्ही ती फळं घरी नेऊन धूवून खायचो. अंजीरासारखी दिसणारी ही फळं आतून अंजीरासारखीच दाणे दार असायची.

खेड्यात असल्याने थंडी बरीच पडायची.बाहेर आल्यावर आजोबा आपला जूना ठेवणीतला स्वेटर फुसून, झटकून वापरायला काढायचे. आम्ही पण आमचे रंगीबेरंगी स्वेटर वापरायला काढायचो.
दिवाळसणात मोठया बायका अंगण सारवून रांगोळ्या घालायच्या. आजोबा आराम खूर्चीवर बसून नीट अवलोकन करायचे.जरूर पडल्यास सुचनाही द्यायचे.सकाळ संध्याकाळ गरम गरम पेजेचा नीवळ पिण्याचा शिरस्ता असायचा. थंडीच्या दिवसात शरीर गरम न ठेवल्यास निमोनीया होईल असं आजोबा आम्हाला हटकून सांगायचे.
दिवाळीत फक्त फुलबाज्या जाळायचो.मोठे आवाज करणारे फटाके आजोबांना आवडत नसायचे.लहान मुलं,पाळीव प्राणी आणि वयस्कर लोकांना त्याचा त्रास होतो हे आम्हाला समजावून सांगायचे.”

“हे सगळं ऐकून खूपच बरं वाटलं पण मुळ विषय बोंडूचा होता.त्याचं काय झालं? तुझ्या डोळयात सकाळी बोंडू पाहून पाणी का आलं?ते अजून कळलं नाही”
मी ताईला म्हणालो.
“ऐक सांगते”
असं म्हणून पुढे म्हणाली,
“मला आजोबांची सर्वात जास्त आठवण येते जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर जवळच्या डोंगरावर चढून बोंडूच्या झूडपातून बोंडू काढायला जायचो तेव्हा. कधी कुणी मुलं नसली तर मला आजोबा निक्षून घेऊन जायचे.त्यांच्याबरोबर डोंगराच्या पायवाटेवर चढून जाताना दिसेल त्या झुडपातून बोंडू देठापासून पिरगळून काढताना मजा यायची.हावरटासारखं, काजूसकट ते फळ बरोबर घेतलेल्या गोणपाटाच्या पिशवीत जमा करायचो. लाल-भडक,पिवळे-धमक,हिरवे-गार,रंग मिश्रीत,बोंडू झाडावर लटकत असताना सुंदर दिसायचे.आजोबांना दिसण्यापूर्वी मला एखादं फळ दिसलं की मी झूडपात बोट दाखवून आजोबांच्या लक्षात आणून द्यायचे.आणि त्यांनाही दिसल्यावर ते जेव्हा आनंदाने “ह्हे!” असं ओरडून सांगायचे त्यावेळी त्यांचा चेहरा पहाण्या सारखा असायचा.

जेव्हा गोणपाटाची पिशवी पूर्ण भरून जायची तेव्हा माझे आजोबा मला जवळ घेऊन माझी पाठ थोपटायचे.मला खूप बरं वाटायचं.मग ते माझ्याकडून पिशवी घेऊन आपल्या जवळ उचलून घ्यायचे.मला त्या पिशवीचा भार सहन करता येत नाही हे त्यांच्या नजरेतून अजिबात चुकायचं नाही.
जड पिशवीची समस्या आपल्या अंगावर घ्यायचे.बिचार्‍यांना त्या वयात पिशवीचं वजन जेमतेम तोलायचं.फिरकीच्या तांब्यातून आणलेलं पाणी पेल्यातून काढून दोघांच्या चेहर्‍यावर झपकारायचे आणि मग ते आमच्याच विहिरीतलं बर्फासारखं थंडगार पाणी त्या रखरखत्या उन्हात प्यायला द्यायचे.”

“आज बाजारात बोंडू पाहिल्यावर त्याची करमट करायची माझ्या मनात आलं कारण मी पण कोकणात बोंडूची करमट खायचो.मला खूप आवडायची.
तुला ही आवडते म्हणून मुद्दाम घेऊन आलो होतो.चौकशी केल्यावर कळलं पालघर होऊन काही बायका हे बोंडू आणतात. नाहीतर मुंबईत हे फळ किती लोकाना आवडत असेल माहित नाही.”
मी ताईला बोंडू का आणले ते सांगत होतो.

आपली कोकणातली आठवण काढून ताई सांगायला लागली,
“घरी आल्यावर ती सर्व फळं आमच्या घरात काम करणार्‍या बाईकडून स्वच्छ धुवून घेऊन त्याचे काजू निराळ्या भांड्यात बाहेर सुकायला ठेवायला आजोबा सांगायचे.आणि विळीवर बोंडूच्या फोडी करून पितळीमधे थोडं मीठ आणि थोडं तिखट शिंपडून “बोंडूची करमट” आम्हा सगळ्या लहान मुलांना खायला द्यायचे.हात खराब होऊ नयेत म्हणून केरसूणीच्या हिराची कांडी वितभर तोडून प्रत्येकाला फोडीत खूपसून बोंडूची फोड तोंडात कशी घालायची ते पण शिकवायचे.

काजू उन्हात चांगले सूकून आल्यावर मांगरात जाळ करून त्यात ते काजू भाजून काढायचे.काजू भाजत असताना आतलं तेल उडतं आणि अंगावर पडल्यावर तो भाग भाजतोच शिवाय त्याचा अंगावर डाग रहातो म्हणून ते आम्हा सर्व मुलांना दूर बसायला सांगायचे.
भाजलेल्या काजूची टरफलं विटेने फोडून आतला काजूगर निराळा करायचे.ही सर्व कामं आमच्या घरातल्या गड्याकडून करून घ्यायचे.
भाजून आलेले काजूगर मुठभर प्रत्येकाला खायला द्यायचे.जास्त खाल्यास पित्त होतं हे ही सांगायचे.”
हे सांगून झाल्यावर माझी ताई थोडी फिलॉसॉफिकल झाली.आवंढा गिळून,थोडी गंभीर झाल्यासारखी होऊन म्हणाली,

“माझ्या आजोबांबरोबर बरीच कामं करतानाच्या आठवणी जरी मला असल्या तरी डोंगरातले बोंडू काढायला जाण्याची आमची प्रथा मला विशेष वाटायची. आता आजोबानंतर जीवन जगताना जीवनातल्या समस्या म्हणजेच,आंबट गोड बोंडू चाखताना आजोबा माझ्या बाजूला असणार ह्याचा मला भास होत असतो.आणि प्रत्येक बोंडू पिरगळताना आणि पिशवी जड झाल्यावर ते तिचं ओझं माझ्याकडून काढून घेऊन आपण सांभाळीत तशा आता माझ्या समस्या सांभाळतील अशी फक्त आशाच करण्यात रहावं लागतं. सर्व कठीण समस्या साभांळताना त्याचं ओझं आपल्याकडे घेऊन मला मदत
करणारे माझे आजोबा मला दूरून पहात असतील अशी फक्त कल्पनाच करावी लागते.
डोंगरावर जाऊन झुडपातून बोंडू पिरगळून ओझं होईतो भार कसा संभाळायचा हे माझ्या आजोबांनी मला नकळत शिकवलं होतं.

आता जेव्हा तू आणलेले बोंडू मी सकाळी पाहिले तेव्हा मी मनात हंसले आणि रडले…दोन्ही कारणानी माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी पदराने डोळे पुसले.कारण त्याच वेळी माझ्या मनात आलं की वरून माझे आजोबा पण माझ्याशी हंसत असतील.”
माझ्या ताईला मी जवळ घेत म्हणालो,
“आठवणी येतात,आठवणी जात नाहीत पण गेल्या तर मात्र असं डोळ्यात पाणी आणून जातात.खरं ना?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com