Tuesday, March 2, 2010

“जे शोधाल तेच सापडेल”

“हा क्षण माझ्या आयुष्यात गेले वीसएक वर्षं माझ्या डोक्यात ठाण मारून बसला आहे.”

“बहुतेक वेळा लोकं ज्याच्या शोधात असतात तेच त्यांना सापडत असतं असं मला वाटतं. सर्वजण एकाच वास्तविक परिस्थितीत भाग घेत असतात असा मी नेहमी विचार करायचो.पण एकदा माझ्या शाळेत असताना मी निराळाच प्रकार पाहिला.”
माझा मित्र मनोहर मला आपले जूने दिवस आठवून एक प्रसंग समजावून सांगत होता.

तो म्हणाला,
“ते खूपच उकाड्याचे दिवस होते.प्रत्येकजण पावसाची वाट पहात होता.एकाएकी जोराचा वारा आला आणि रस्त्यावरचा आणि आजुबाजूचा कचरा वार्‍याबरोबर हवेत उडत होता.हवेच्या स्पर्शाने अंगावर थंडावा वाटायला लागला.आणि सर्वांना वाटायला लागलं होतं की आता मस्त पाऊस पडून पावसाळ्याची सुरवात होणार आहे.
माझ्या सकट आम्ही सर्व आमच्या वर्गात जायला निघालो.आणि आपआपल्या सीटवर जाऊन बसलो.ढग आल्याने खिडकीतून पाहिल्यावर बाहेर एकदम काळोख होऊन रात्र झाल्याचं भासत होतं.आमच्यातला एक प्रफुल्लीत होऊन मोठ्या आवाजात ओरडून सांगत होता,
“असे आल्हादायक दिवस आल्यावर प्रत्येकजण खूश नाही का होणार?”
एका क्षणाचाही विलंब न लावता आमच्यातला एक दुसरा पुटपूटला,
“खरं सांगू का,ही नुसती वावटळ आहे पाऊस नक्कीच पडणार नाही.ह्या वर्षी पावसाळा खूपच लांबवलेला आहे.असं म्हणतात.”

मनोहरने हा वर्णन केलेला प्रसंग ऐकून मला वाटलं की त्याला नक्कीच काहीतरी चिंतनीय गोष्ट सांगायची आहे.कारण असे छोटे,छोटे प्रसंग लक्षात ठेऊन कुठचंतरी तत्वज्ञान सांगायची त्याची पहिल्यापासूनची हातोटी मी जाणून होतो.

तो पुढे म्हणाला,
“हा क्षण माझ्या आयुष्यात गेले वीसएक वर्षं माझ्या डोक्यात ठाण मारून बसला आहे.कारण त्यावेळी माझ्या डोक्यात चक्क प्रकाश पडला होता आणि तो धक्कादायक होता की जीवघेण्या उकड्यातून एकदाचा सुटकार मिळण्याच्या आशेत असताना त्याऐवजी त्या दुसर्‍याने चलाखी करून सोन्याच्या तुकड्याकडे पितळ म्हणून पाहिल्यासारखं केलं. कारण तो चलाखी करून दाखवून देत होता की हे जग जणू शुभचिन्तकानीच भरलेलं आहे.क्षण एकच होता वातावरण एकच दिसत होतं तरीपण विचार भिन्न भिन्न होते. उन्हाळ्याचे दिवस एकदाचे संपुष्टात आले म्हणून मी मनात पाघळत राहिल्याने ज्या शोधाची मला जरूरी होती तेच मला सापडत होतं.आणि त्या माझ्या मित्राचं पहिलं पाघळणं म्हणजे ती त्याची चलाखी जी त्याला सांगत होती की जग खोट्या आशेत आणि विश्वासघातात असतं.तो पण ज्या शोधात होता ते त्याला सापडलं होतं.”

हे ऐकून मी मनोहरला म्हणालो,
“तू शिक्षक आहेस त्यामुळे तुझ्या असल्या चिंतनाचा तुझ्या विद्यार्थ्याना भरपूर फायदा होत असेल.”
मला म्हणाला,
“अलबत,माझ्या विद्यार्थ्याना काही सांगायचं झालं तर मी एकही संधी सोडत नाही.
मी शिक्षक असल्याने माझ्या विद्यार्थ्यानी जगात कशाच्या शोधात असावं हे समजावून सांगण्याची माझी जबाबदारी आहे हे माझ्या लक्षात येत असतं.ज्यामुळे माझ्या विद्यार्थ्यात आशा,विश्वास आणि स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. मला हे दाखवण्यासाठी एखादा नकाशा काढून दाखवता येणार नाही की तो पाहून ते यशस्वी होऊन आत्मसंतुष्ट होतील. समजा जर का त्यांना भासलं की ते घाबरले आहेत आणि सापळ्यात अडकून एखाद्या रानात हरवले आहेत तर मग त्यांचं पहिलं पाऊल ह्या रानातून सुटका करून घेण्यासाठी योग्य मार्ग पहाण्याच्या शोधात पडलं पाहिजे.
पण ह्यातून मार्ग नाही असं जर का त्यांनी मनात आणलं तर मात्र कशाचाही शोध ते घेणार नाहीत.”

“म्हणजे,तुझ्या वर्गातल्या त्या मित्राप्रमाणे तुझे विद्यार्थी समजा फक्त पुराव्यासाठीच शोध करू लागले उदाहरणार्थ, त्यांना कसलाच दर्जा नाही,त्यांच्यामुळे जगात काही फरक पडणार नाही,किंवा त्यांची स्वप्न वेडपटासारखी आहेत तर तो सर्व पुरावा त्यांना शोध घेतल्यामुळे सापडेलही.असंच काहीसं तुला म्हणायचं आहे ना.?”
असा प्रश्न करून मी मनोहरला अप्रत्यक्षपणे म्हणत होतो की “शोधा म्हणजे सापडेल असं तुला म्हणायचं नसून “जे शोधाल तेच सापडेल” असं म्हणायचं आहे.

“अगदी माझ्या मनातलं बोललास”
असं चेहर्‍यावर खूश झाल्याचं दाखवून मनोहर म्हणाला,
“उलटपक्षी मी जर त्यांना विचार करायला लावलं की त्यांच्यात यशस्वी होण्याचा मार्ग आहे,त्यांना स्वाभिमान आहे,तर ते तो सापडूं शकतील.कारण लोकं ज्याच्या शोधात असतात तेच त्यांना सापडतं. ह्यावर माझी श्रद्धा आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com