Thursday, March 18, 2010

” ******आणि देव देत नाही दोनही डोळे.”

“जीवनातल्या अन्यायाशी दोन हात केल्याने जीवन संपन्न होतं.जीवन दोषहीन नसणं हे एका अर्थी बरं आहे असं म्हटलं पाहिजे. नाहीपेक्षा जीवन जगायला काहीच राहिलं नसतं.”

“आपण ज्यावेळी लहान असतो त्यावेळी आपल्याला सांगीतलं जातं की,
“चांगलं वागा”
“आपल्या जवळ असेल त्यातून भागीदारी करून दुसर्‍याला द्या.”
“तुम्हाला जर कुणी चांगलं वागवायला हवं तर दुसर्‍याशी तुम्ही चांगलं वागा.”
हे सगळे अगदी अनमोल उपदेश आहेत असं म्हटलं पाहिजे.”
अरूण परदेसी मला आपल्या लहानपणाच्या आठवणी काढून सांगत होता.

त्याचं असं झालं,मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी तो रहात होता त्या वृद्धाश्रमात गेलो होतो.त्याच्याच रूममधे अरूण परदेसी रहायला आला होता.
“अरूण एका संशोधन संस्थेत सुरवातीला लिफ्टमन म्हणून कामाला लागला.आणि नंतर तीथूनच निवृत्त झाला.जवळचं असं कोणीच नातेवाईक नसल्याने त्याने वृद्धाश्रमात जाऊन रहावं असा त्याला सल्ल्ला दिला गेला.”
अरूण परदेसीची ओळख करून देत माझा मित्र मला म्हणाला.

अरूण तसा बोलका-बडबड्या वाटला.माझा मित्र पण मला म्हणाला,
“मला दिवसभर काही ना काही तरी जीवनातले अनुभव सांगत असतो.माझा वेळ ही मजेत जातो,आणि माझी करमणूकही होते.”

मी अरूणला म्हणालो,
“आपण दुसर्‍याशी चांगलं वागलो तर दुसरे आपल्याशी चांगलं वागतील अशी आपण अपेक्षा करीत असतो. आपण मोठे होत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं आपण इतरांशी चांगलं वागलो तरी आपलं जीवन तेव्हडं काही चांगलं जात नाही. आपल्या जीवनात येणार्‍या प्रश्नांशी आपण सामना करायला गेलो की लक्षात येतं की काही गोष्टी न्यायसंगत नसतात.”

मला वाटलं अरूणला माझं हे म्हणणं पटलं असावं.लगेचच मला तो म्हणाला,
” मग त्यावर एकच उपाय असा की सकारात्मक वृत्ति ठेवून आनंदी राहाण्याच्या प्रयत्नात राहिलं पाहिजे.जरी सामाजीक गळचेपी सहन न करण्याचा आपण आपल्या मनात घाट घातला तरी शारिरीक हानि झाली असल्यास ती स्वीकारून त्यावर मात करायच्या प्रयत्नात आपल्याला रहावं लागतं.”

हे अरूण कडून ऐके पर्यंत माझ्या लक्षात आलं नाही की अरूण परदेसीला चांगलं दिसत नसावं.त्याला अंशतः अंधत्व असावं. त्याने सांगीतलेल्या पुढच्या निवेदनावरून ते माझ्या लक्षात आलं.
मला अरूण म्हणाला,

“माझ्या बाबतीत विचाराल तर सुरवातीपासून माझ्या आयुष्याने माझ्याशी अन्याय केला होता.माझी दृष्टी पहिल्यापासून अधू होती.शाळेत शिकत असताना माझ्या लक्षात आलं की काही क्षेत्रात मला इतर मुलांपेक्षा जोमाने काम करायची पाळी आली होती.मी भरपूर गृहपाठ घेऊन घरी यायचो.आणि इतर माझे मित्र सिनेमा नाटकाला जायचे, क्रिकेट मॅच बघायला जायचे. मी मात्र माझे गृहपाठ करायचो.

मी वर्षानूवर्ष माझ्या आईला म्हणायचो,
“हा अन्याय आहे.”
आणि त्यावर ती म्हणायची,
“बाळा,जीवनात अन्याय होत असतो.”

मला अरूणची कीव आली.उभ्या आयुष्यात ह्या व्याधीमुळे त्याला किती कष्ट काढावे लागले असतील याला सीमाच नसावी. मी त्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“प्रत्येकाच्या जीवनात अन्याय होत असतो.एखाद्याचे आई किंवा वडील आजारी असतात, एखाद्याची गरीब परिस्थिति असते किंवा आणखी काही कारणाने जीवन अन्यायाने भरलेलं असतं.सकारात्मक वृत्ति आणि मिळालेले आशिर्वाद ह्यानेच जीवन सुखी होत असावं.कुणाचंच जीवन दोषहीन नसतं.”

हे माझं ऐकून अरूणला आपल्या आईची आठवण आली असावी. मला म्हणाला,
“माझ्या पूर्‍या आयुष्यात माझ्या आईचं म्हणणं खरं आहे हे कधी कधी मला वाटायचं.मी ते स्वीकारलं.एक वास्तविकता म्हणून स्वीकारलं आणि आयुष्याचा पुढचा मार्ग पत्करला.”

“मग तू लिफ्टमन म्हणून त्या संस्थेत कसा काय राहिलास?.तुला त्या संस्थेचा पत्ता कुणी दिला?”
मी कुतूहलाने त्याला प्रश्न केला.

“माझ्या नातेवाईकांकडून, माझ्या गुरूजींकडून आणि मित्रांकडून मला जे प्रोत्साहन मिळायचं ते मी संपूर्ण समजण्यापेक्षा जास्त होतं.अशाच माझ्या एका मित्राने मला त्या संस्थेत अर्ज करायला सांगीतलं.तो मला म्हणाल्याचं आठवतं की ह्या संस्थेचे संस्थापक बरीच वर्षं अमेरिकेत शिकायला आणि तीकडच्या संस्थेत कामाला होते.अमेरिकेचे पूर्वीचे एक प्रेसिडेंट पोलियोच्या रोगाने अपंग होते.त्यांनी अमेरिकेतल्या अपंग लोकांसाठी स्वानुभवामुळे बरेच कायदे करून खूप सोयींची आणि त्यांच्या व्यवसायाची कायद्याने तरतूद करून ठेवली होती.ते पाहूनच ह्या संस्थेत आमच्या सारख्या अपंगाना आम्हाला जमेल ते काम लक्षात आणून त्याची तरतूद करायचा नियम आणला असावा.त्यामुळे मी अपंग असल्याने मला लिफ्टमनचं काम तिकडे मिळालं.”

“अमेरिकेत अपंग लोकांसाठी बर्‍याच सोयी असतात.होटेल,रेस्टॉरंट,हॉस्पिटल,चित्रपटगृह वगैरे जागी जीथे लोकांची वरदळ असते तीथे अपंगासाठी रॅम्प्स,एलिव्हेटर्स असतात.लाईन लागली असल्यास त्यांना सर्वांच्या अगोदर जायला मुभा असते.स्वच्छतागृहात त्यांच्यासाठी खास सीट असते.
सीटपर्यंत जाण्यासाठी आधार लावलेले असतात.ज्यांना ड्राईव्हिंग करता येईल अशाना ड्राईव्हींग सुलभ व्हावं म्हणून मोटारीतली ड्राईव्हर सीट आणि क्लच-ब्रेक विशेष पद्धतीचे असतात.पार्किंगसाठी त्यांच्यासाठी जागा राखून ठेवलेल्या असतात.रस्त्यावरून चालण्याची जीथे सोय आहे किंवा इमारतीत प्रवेश करण्याची जीथे सोय आहे तीथे अपंगाजवळ असलेला वॉकर,रोल्याटर,व्हिलचेअर असल्या सुवीधांचं कोणतीही अडचण न होता वापर करता येण्यासाठी सोय करून ठेवावी लागते. थोडक्यात माणूस वापरील अशी कुठचीही वापरण्याजोगी गोष्ट तयार करताना अपंगसुद्धा त्याचा वापर करतील अशी सोय करण्याचं कायद्याने बंधन करून ठेवलं आहे.एका वाक्यात सांगायचं झाल्यास,
“अपंगत्व हे शाप नसून वरदान आहे”
एव्हडं तरी त्यांच्या मनाला समाधान मिळावं असा एक माणूसकीच्या विचाराने आणि कायद्याने प्रयत्न केलेला असतो. खरंच तू नशीबवान आहेस.अशा संस्थेत राहून तू निवृत्त झालास.त्या संस्थेतल्या लोकांचे चांगले संस्कार तुला मिळाले असल्याने आणि तुझ्या आईचं म्हणणं तू लक्षात ठेवल्याने सुखी झालास.”
मी अरूण परदेसीला सद्बदीत होऊन म्हणालो.त्यालाही बरं वाटलं.

मला म्हणाला,
“शाळेत असताना आयुष्यात सुखी होण्यासाठी मी एका मार्गाची नीवड केली.जरी मला खूप गृहपाठ करावे लागले तरी माझ्या मित्रांबरोबर मला शाळेत जाता येत होतं आणि परत घरी येता येत होतं.ती नीवड केली नसती तर मला अंध मुलांच्या शाळेत जाऊन रहावं लागलं असतं.माझ्या जीवनात मी उदास रहाण्यापेक्षा माझ्यावर ईश्वराने केलेल्या दुसर्‍या कृपेकडे लक्ष केंद्रीत केलं.माझी स्मरणशक्ति इतकी चांगली होती की शाळेतून मिळणारी प्रचंड माहिती मी लक्षात ठेवीत असल्याने त्याची मला फारच मदत व्हायची.”

मी म्हणालो,
“मला वाटतं आनंदी असावं की नसावं हे आपल्या निवडीवर असतं”.
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
असं सांगून अरूण म्हणाला,
“शाळेत असताना जमतील त्या इतर खेळांच्या चढाओढीत मी भाग घ्यायचो आणि मी एकही स्पर्धा जिंकलो नाही ह्या विचारावर मन केंद्रीत करण्याऐवजी मला चढाओढीत भाग घेता आला ह्याचा मी आनंद मनमुराद घेत होतो.त्यानंतर मी शाळेच्या संगीताच्या वाद्यवृंदात बासरी वाजवण्याच्या कामात भाग घेतला होता.”

उठता,उठता मी माझ्या मित्राला आणि अरूण परदेसीला उद्देशून म्हणालो,
“जीवनातल्या अन्यायाशी दोन हात केल्याने जीवन संपन्न होतं.जीवन दोषहीन नसणं हे एका अर्थी बरं आहे असं म्हटलं पाहिजे. नाहीपेक्षा जीवन जगायला काहीच राहिलं नसतं.”

अरूण परदेसी मला शाळेतल्या आठवणी सांगत होता त्याचं कारण माझ्या लक्षात आलं नव्हतं.त्याचे आईवडील गेल्यानंतर त्याला खूपच कष्टाचं जीवन काढावं लागलं.पण ज्या आनंद देणार्‍या आठवणी आहेत त्याच दुसर्‍याला सांगून आनंद द्यावा अशा मताचा अरूण असल्याने तो आपल्या शाळेतल्या आठवणी सांगत होता असं माझ्या मित्राने मला नंतर स्पष्टीकरण केलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com