Saturday, March 20, 2010

जयदेवचं हंसणं.

“जेव्हा जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा हंसण्याची वेळ आलेली असते.”

कमल आपल्या दोन मुलांना घेऊन आमच्या घरी आली होती.तिचा मोठा मुलगा जयदेवसारखा-तिच्या भावासारखा- दिसत होता.
मला जयदेवची आठवण आली.
“जयदेवला जाऊन आता किती वर्ष झाली असतील?”
मी कमलला विचारलं.

“सोळा वर्षापूर्वी माझा भाऊ जन्माला आला होता.मला आठवतं त्यावेळेला गावात प्रचंड वादळ आलं होतं.हे माझ्या नीट लक्षात आहे कारण मला आठवतं,माझी आजी त्याला पाहायला आली असताना ती ओल्या जमिनीवरून घसरून पडली होती. आणि तिचा पाय लचकला होता.पण जेव्हा आजी माझ्या पिटुकल्या भावाला गोधडीत घेऊन बसली होती,तेव्हा त्याच्या शांत, हंसर्‍या चेहर्‍याकडे पाहून तिची दुखापत ती विसरून गेली होती.”
कमल आपल्या भावाची आठवण काढून सांगत होती.आणि पुढे म्हणाली,
“एक म्हण आहे की “जेव्हा जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा कठीण गोष्टच जात असते” ही म्हण ऐकून थोडं ज्ञानवर्धक वाटतं खरं,पण मी ह्यापेक्षाही जरा सखोल विचार करणारी गोष्ट मनात आणते.तो विचार माझ्या भावाने-जयदेवने- माझ्या मनात आणून दिला.
मला वाटतं जेव्हा,
“जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा हंसण्याची वेळ आलेली असते.”

मी कमलला म्हणालो,
“मला वाटतं,जयदेवने त्याच्या जन्माच्याच दिवशी आजीपासून हंसण्याची जादू दाखवायला सुरवात केली होती.”
जयदेवची आठवण काढून कमल जरा खजील झाली होती.म्हणाली,
“मला जयदेव खूप आवडायचा.त्याची मोठी बहिण म्हणून मी नेहमीच त्याच्याशी आऊचा बाऊ करून त्याला पीडायची. इतरांची भावंड कशी करतात तसं केव्हा एकदा जयदेव मोठा होऊन माझ्या बरोबर दंगामस्ती करील याची मी वाट पहायची.”

मला आठवत होतं की कमलचा जयदेव बर्‍याच उशिराने चालायला लागला होता.कमलचे आईवडील खूप उपचार करून थकले होते.
“इतरांपेक्षा जयदेव जरा उशिराच चालायला लागला.तुम्ही त्याला उचलून घ्यायचा.त्याचे पाय थोडे अधू वाटायचे.केव्हा पासून तो चालायला लागाला?”

मी कमलला विचारल्यावर म्हणाली,
“जयदेव चालायला लागला तोच मुळी दोन वर्षाचा झाल्यावर.तो जेमतेम जिना चढायचा.आणि चढलाच तर आजुबाजूचा आधार घेऊन स्वतःला वर ढकलंत चढायचा.अगदी सुस्थ झाल्यासारखा करायचा.त्याला जोरात धावता येत नव्हतं.लांब उडी मारता येत नव्हती.मला वाटतं त्याचे पाय त्याला हवं ते करत नव्हते.”

“अमेरिकेहून एक निष्णात डॉक्टर आले होते.त्याला दाखवणार आहो असं तुझे वडील मला म्हणाल्याचं आठवतं.”
मी कमलला म्हणालो.

“तो ज्यावेळी चार वर्षाचा झाला त्यावेळी त्याला त्या डॉक्टरनी तपासून पाहिल्यावर सांगीतलं की त्याचे स्नायू एक एक करून निकामी व्हायला लागले असून पायापासून सुरवात करून हळू हळू त्याच्या ह्र्दयावर आणि फुफ्फुसावर पण परिणाम होणार आहे. जेमतेम आणखी दहा एक वर्ष तो राहिल असं डॉक्टर पुढे म्हणाले. खरं तर हे ऐकून मला माझं उरलेलं आयुष्य त्याला द्यावसं वाटलं.”
कमल हे सांगताना खूपच कष्टी झालेली दिसली.

“जयदेव सात वर्षाचा झाल्यावर त्याला व्हिलचेअर वापरावी लागली. ज्या वयात इतर मुलं क्रिकेट मधे धांवा काढायची, स्केटींग करायची त्या वयात जयदेव चढाव-उतारावर वर-खाली खेळ खेळण्यासाठी म्हणून जायचा. इतर मुलं तो असं करीत असताना त्याच्याकडे टक लावून पाहायची त्याकडे तो दुर्लक्ष करायचा.त्याने ते मनाला कधीच लावून घेतलं नाही. ती वेळ तो हंसून घालवायचा.एखादा वात्रट मुलगा त्याला “ए पांगळ्या” असं म्हणायचा तेव्हा जयदेव त्याला हंसून प्रत्युत्तर द्यायचा.”
कमल सांगत होती.

“त्या डॉक्टरनी पुढे पुढे मोठा झाल्यावर त्याला व्हिलचेअर द्या असं सांगीतलं होतं. असं तुझे वडील म्हणाले होते.आणि त्यासाठी ते सिंगापूरला गेले आणि त्याच्यासाठी एक व्हिलचेअर घेऊन आले होते.मला आठवतं”
मी कमलला म्हणालो.

“व्हिलचेअरचा आणि जयदेवच्या हंसण्याच्या संवयीचा किस्सा सांगते”
कमल त्या प्रसंगाची आठवण काढून आणि त्याच्या हंसण्याच्या संवयीची आठवण काढून म्हणाली,
“एकदा तो हंसला होता ज्यावेळी त्याची व्हिलचेअर चिखलात रूतून तो खाली पडला होता. आणि त्याच्या हाताला खरचंटलं होतं.एकदा तो हंसला होता ज्यावेळी मी त्याच्या अगोदर जाऊन फ्रिझमधून आईसक्रिम काढलं आणि तो तसं माझ्या अगोदर करू शकला नव्हता.नेहमीच असंच काहीतरी असायचं जेव्हा जयदेव हंसण्यावर भागवायचा.
जयदेव आम्हाला हंसायला लावायचा.आम्ही हंसूच याची तो खात्री करायचा.”

“मला आठवतं,त्याचं जेव्हा जास्त झालं त्यावेळी तुच त्याला गाडीत घालून हॉस्पिटलात नेलं होतंस.तुझे वडील घरी नव्हते. आणि तो हॉस्पिटल मधून परत आलाच नाही.माझं बरोबर आहे ना?तुला आठवत असेल तो प्रसंग.”
मी कमलला म्हणालो.

“तो प्रसंग मी कसा विसरीन. तो आम्हाला सोडून जाण्यापूर्वी जेव्हा मी त्याला गाडीत बसवून हॉस्पिटलमधे ड्राईव्हिंग करीत नेत होते.
तो खूपच क्षीण झाला होता.त्याची फुफ्फुसं एव्हडी निकामी झाली होती की त्याला ऑक्सिजन सिलिंडर लागायचा. त्याच्याकडे बघायला सुद्धा मला कठीण व्हायचं.
“अग,ताई तुला माहित आहे का पुरषांपेक्षा बायका जास्त का जगतात?”
“कां?”
मी नेभळटासारखी त्याला प्रश्न करून गाडी पार्किंगसाठी इकडे तिकडे जागा शोधून काढण्याच्या प्रयत्नात होते.

“कारण,देव त्यांना पार्किंगची जागा शोधून काढण्यासाठी त्यांच्या आयुष्यात जादा समय देतो. हो ना?”

त्याला खात्री होती की तो आता जास्त जगत नाही.पण त्यावेळीही त्याने मला हंसवलं. नव्हे तर मी नक्की हंसेन ह्याची खात्री केली.
जयदेव निघून गेल्यावर अश्रू ढाळले गेलेच पण हंसू पण होतं. प्रत्येकजण आठवून आठवून जयदेवचं काहीतरी गमंतीदार वागणं सांगायाचा.
आज,जयदेवच्या जीवनाच्या पुस्तकातून ते पान मी काढून घेत आहे.माझ्या वादळी जीवनातून मी हंसत आहे.कारण जेव्हा जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा हंसण्याची वेळ आलेली असते.”

मला हे ऐकून राहवलं नाही.मी शेवटी कमलला म्हणालो,
“आता माझ्या चांगलंच लक्षात येतंय, किती सुंदरतेने जयदेवने आपलं जीवन हास्यमय केलं होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com