Saturday, March 27, 2010

निरंतर चित्र काढतो

“शेवटी महत्वाचं म्हणजे तू जनतेवर विश्वास ठेवतोस.त्यांच्या जीवनात थोडीशी हास्याची भर घालण्यात तुला अपार आनंद होत असणार.”

“सूर्या,तू आता प्रसिद्ध व्यंगचित्रकार झाला आहेस हे मला माझ्या एका मित्राने सांगीतलं.तुला कधीतरी तुझ्या ऑफिसमधे येऊन भेटायचा माझा विचार होता.आज तुझी इथेच गाठ पडली हे बरं झालं.”
मी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधे काही कामासाठी गेलो होतो.तिथे सूर्यकांत कानडे मला भेटला त्याच्याशी बोलत असताना मी त्याला म्हणालो आणि आम्ही कॅन्टीनमधे गप्पा मारण्यासाठी जाऊन बसलो.

“तसं पाहिलंत तर मी चार पाच वर्षाचा असल्यापासून चित्र काढायला लागलो.अगदी पहिलं चित्र मी काढलं होतं ते मला आठवतं”.
सूर्या लहानपणाच्या आठवणी काढून मला सांगायला लागला.

“माझ्या आई बरोबर मी माझ्या मावशीची गावाला जायचो.आम्ही तिकडे एकदोन आठवडे रहायचो.कोकणात जी छोटी मोठी शहरं आहेत त्यापासून दूर दूर गेल्यावर निसर्गसुंदर खेडी पहायला मिळतात. माझी मावशी जिथे रहायची ते असंच सुंदर खेडं होतं. भात-शेतीचा प्रदेश असल्याने कुणग्या कुणग्यात भात लावलं जायचं,दोन कुणग्यातल्या उंचवट्याला मेर म्हणतात.शेती तुडवत न जाण्यासाठी ह्या मेरीवरून कसरत करत जावं लागायचं.
जाता जाता उंच उगवलेल्या भाताच्या रोपट्यावर आलेल्या कोवळ्या तांदळाच्या कुसराला ओढून त्यातले कच्चे तांदूळ खाताना गाईच्या दुधाची लज्जत यायची.”

मी म्हणालो,
“सूर्या तू नुसता चित्रकार नसून एक चांगला लेखकही आहेस.तू जे वर्णन करून सांगतो आहेस ते लेखातही लिहू शकशील.”
सूर्या खजील झाला.मला म्हणाला,
“एका चित्रकाराला चित्र काढण्यापूर्वी दृष्याचा आढावा घ्यावा लागतो.काही चित्रकार तो आढावा मनात साठवून ठेवतात आणि मग चित्र काढायला लागतात.मी माझं मन फक्त तुझ्याकडे उघडं करून सांगत आहे.”

“सांग,सांग मला ऐकायला आवडेल.आणि मी पण कोकणात वाढलो असल्याने माझ्या बालपणातल्या आठवणीचा देखावा तू उभा करीत आहेस, याच्यापेक्षा आणखी कसला आनंद व्हायचा.”
मी सूर्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो.

“तर मी काय सांगत होतो? हां! शेती संपता संपता नदी दिसायची. कोकणातल्या नद्या फक्त पावसात दुथडी भरून वाहतात.एरव्ही उन्हाळात पाण्याची ठणठण असते. नदीकडे जाण्यासाठी शेताच्या मधून पायवाटा असायच्या.
शेतकर्‍यांची गुरं-गाई,वासरं,म्हशी,रेडकं-नदीत धूवायला आणि म्हशीना पाण्यात डुबवून ठेवण्यासाठी नदीवर आणल्या जायच्या. मला हे दृष्य पाहायला फारच आवडायचं.माझे मावस भाऊ त्यांच्या गुरांना नदीवर घेऊन येताना मी त्यांच्याबरोबर न चुकता जायचो.
मग नदीजवळच्या एखाद्या खडकावर बसून कागदाच्या पॅडवर हे दृष्य -ती नदी,नदीवर येणारी गुरं,बेवारशी हडकुळी कुत्री,त्यांच्या बरोबरचे माझ्या भावांसारखे इतर शेतकरी,तसंच डोक्यावर कळश्या घेऊन रंगीबेरंगी लुगडी नेसलेल्या बायका नदीकडे किंवा नदीकडून जाताना पाणी आणताना- पाहून त्याचं चित्र काढायला हुक्की यायची.माझं अगदी पहिलं चित्र होतं ते एका शेतकर्‍याच्या मागे एक संतप्त झालेली म्हैस पाठलाग करतानाचं.”

मी म्हणालो,
“अगदी पहिलं चित्र सुद्धा किती लक्षात असतं बघ.ते तू सांभाळून ठेवलं असशील ना?”
“हो.मी माझी सर्व चित्र सांभाळून ठेवतो.काही वेळेला माझे मित्र त्यावेळी माझी चित्र घरी दाखवायला घेऊन जायची.पण परत आणून देण्याच्या बोलीवर मी त्यांना द्यायचो.
त्या वयात सुद्धा मला कुठचीही गोष्ट चित्रीत करायला मजा यायची. कधीतरी मी मोठा चित्रकार व्हावं असं मनोमन वाटायचं. माझी घरची मंडळी विशेषकरून माझी आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. पुढे पुढे मला आठवतं माझ्या खोलीत चित्र काढायला लागणार्‍या बर्‍याचश्या गोष्टी इतस्ततः पडून असायच्या. शहरात आल्यावर माझ्या मित्रांबरोबर आर्टगॅलरीझ, म्युझियम,आणि वाचनालयाला माझ्या नियमीत भेटी असायच्या.
मी माझं जे.जे.कॉलेज संपवून काम शोधायला लागलो त्यावेळी मी नव्या जगात पदार्पण केल्या सारखं वाटलं.ख्याली खुशालीचे दिवस आता संपले होते.कधी कधी मी माझी चित्रं घेऊन निरनीराळ्या कचेर्‍यात जाऊन ती दाखवायचो.बरेच वेळा त्यात कोकणातल्या सृष्टीसौन्दर्याचे सीन,घरातल्या हॉलमधे लटकवण्यासारखे म्युरल्स,कुणाच्या तरी मावशीचे पोर्टेट,किंवा मासिकासाठी मुख्यपानावरची काही चित्र असायची.”

“तुझी पत्नी पण चित्रकार आहे असं तो मित्र मला म्हणाला होता.ती तुझी क्लासमेट होती असं काहीतरी तो म्हणाल्याचं आठवतं.”
मी सूर्याला म्हणालो.
“अगदी बरोबर.”
असं म्हणत सूर्या पुढे सांगू लागला,
“तोपर्यंत माझं लग्न झालं होतं.जरी माझ्या ह्या व्यवसायात वर यायला मला खूप दिवस लागले तरी माझ्या पत्नीनें मला खूप आधार दिला.कधी कधी आम्ही जेवण विसरायचो.पण आम्ही आशा सोडली नव्हती.हे सर्व सांगण्याचं कारण आमच्या प्रगतीला लोकानी आणि परिस्थितिने हातभार लावला होता.मी माझी घमेंड केव्हाच विसरून गेलो होतो. मला नेहमीच वाटतं की मी इतरांचं देणं लागतो.”

मी म्हणालो,
“मला वाटतं की कुणीही ह्या जगात एकदम स्वर्गातून उतरून येत नाहीत.अगदी सर्व दृष्टीने तयार झालेले,पोक्तपणा आलेले आणि आल्याआल्या इतरांवर आपल्या कलेचा, पान्डित्याचा आणि पाणीदारपणाचा वर्षाव करायला तयार असलेले असे कोणही स्वर्गातून येत नाहीत.”

सूर्या म्हणाला,
“मला जर का माझ्या लहानपणी माझ्या नातेवाईकांकडून शिकण्यासाठी असं सहजासहजी प्रोत्साहन आणि संधी दिली गेली नसती तर कॉलेजचं शिक्षण संपल्यावर आलेल्या काळात मी दम धरून राहू शकलो नसतो.माझ्या लहानपणी माझ्या जवळ असलेल्या घमेंडीचं, स्वतःवर भरवंसा सांभाळण्यात रुपांतर झालं नसतं.
हे मला फक्त चित्रकारीबद्दलच वाटतं असं नाही तर सर्व तर्‍हेच्या शिक्षणाबाबत वाटतं.आणि हे सर्वांना लागू आहे असं मला वाटतं. अर्थात हे एकमेकावर अवलंबून असतं.मी जो आज आहे ते माझ्या जीवनात घडलं म्हणून आहे.भूतकाळातल्या अनुभवाचा वारसा मिळाल्याने असा आहे.”

“पण आता तू या व्यवसायातून काय शिकलास ते समजून घेण्याची मला उत्सुकता आहे.”
मी सूर्याला म्हणालो.

“चित्रकलेतून मी एक शिकलो की मनसोक्त आणि सुखी जीवन मिळवण्यासाठी दुसर्‍याला समर्पण करावं लागतं. प्रत्येकजण कशात ना कशात प्रवीण असतो.एकदा त्याने त्याला हव्या असलेल्या गोष्टीची निवड केली आणि त्यात प्रगती करण्याची संधी घेतली मग मात्र तसं करणं त्याचा हक्कच बनतो.त्याला ते आव्हान असतं.मी माझ्या कामाची निवड ह्याच तत्वावर केली आहे.खूप पैसे मिळवण्याच्या दृष्टीने नव्हे.”
सूर्याने आपलं प्रांजाळ मत दिलं.

“पण तू आता व्यंगचित्रकार म्हणून ह्या लाईनीत कसा वळलास?”
माझा दुसरा प्रश्न करून मी त्याच्या चेहर्‍याकडे पहात होतो.
अगदी आनंदी चेहरा करून सूर्या म्हणाला,
“आता मी जो व्यंगचित्रकार झालो आहे त्याचं कारण ते काम मला आवडतं.आणि हे काम एक हास्य-जीवनातली अतिशय जरूर असलेली विक्रीची वस्तु असावी असं मला वाटतं.ही कला तुल्यकारक आणि संतुलन ठेवणारी आहे. तुल्यकारक एव्हड्यासाठी की चांगले विनोद, कामाच्या सर्व प्रांतातल्या लोकांना आवडतात आणि संतुलन ठेवणारी, कारण कुणालाही जीवनाकडे कडवटपणे पहावं लागत नाही.”

उठता,उठता मी सूर्याला म्हणालो,
“परिणामकारक आणि समयसाधून हास्यातून केलेलं अवलोकन -मग ते शब्दातून असो,चित्रातून असो किंवा दोन्हीमधून असो-अर्थ हरवलेल्या वचनातून आणि उघड सत्यातून छेद घेऊन जातं.
शेवटी महत्वाचं म्हणजे तू जनतेवर विश्वास ठेवतोस.त्यांच्या जीवनात थोडशी हास्याची भर घालण्यात तुला अपार आनंद होत असणार.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com