Saturday, April 3, 2010

विनोदीवृत्ति.

“आपलं भविष्य अधांतरी लटकत असतं. आणि आपले प्रियजन आपल्याला सोडून जात असतात.”

कुसूमच्या आजोबांना बुद्धिभ्रम झाला होता.मी ज्याज्यावेळी त्यांना भेटायला जायचो त्यात्यावेळी ते मला नव्या नावाने ओळखायचे. पण त्यांच्या बोलण्यातला संदर्भ वस्तुस्थितिला धरून असायचा. ते गेल्याचं जेव्हा मला कळलं तेव्हा मी कुसूमला भेटायला गेलो होतो. कुसूमचं आपल्या आजोबावर अत्यंत प्रेम होतं.कुसूम माझ्याच ऑफीसात कामाला होती. रिटायर्ड झाल्यावरही आम्ही आमचा स्नेह कायम ठेवला होता.

मला म्हणाली,
“माझे आजोबा गेल्यानंतर प्रत्येक दिवस मला त्यांची काहीनाकाही तरी आठवण देऊन जायचा.गेल्या आठवड्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते.
“प्रत्येकाचा काही ना काही गोष्टीवर विश्वास असतो.” असा माझ्या मनात विचार आला.
मी धुऊन सुकलेल्या कपड्यांच्या घड्या करीत होते,आणि मी गालातल्या गालात हंसले.
कित्येक दिवस अगदी ह्याच गोष्टीबद्दल मी विचार करीत होते.प्रश्न जरा कठीणच वाटत होता.काहीना प्रश्न सुटत असावा. कुणाचा “प्रेमाच्या क्षमतेवर”,तर कुणाचा “समानुभूतिवर” विश्वास असतो..”विनोदवृत्ति असणं ” ह्या गोष्टीबद्दल मला विशेष वाटतं.कारण ती एक सहजसुंदरतेची बचत म्हणावी लागेल.”

मला कुसूमच्या म्हणण्याचा रोख समजत होता.कुसूमचे आजोबा सदा हंसत-खेळत राहाण्याच्या वृत्तिचे होते.त्यांच्या टेबलावर नेहमी कार्टून्सची पुस्तकं,विनोदी नाटकांच्या सीड्या,विनोदी लेखकांची पुस्तकं पहायला मिळायची.त्याची आठवण येऊन मीच कुसूमला म्हणालो,
“आयुष्यात तशी गंभीरताच जास्त असते.खरं तर जीवन औपचारिक आणि भयभीत असतं.अशा परिस्थितित तुझ्या जवळच्या लोकांनी काय पाहिलं असेल तर तुझ्या आजोबांची विनोदवृत्ति.ह्या वृत्तिमुळे ते प्राप्त परिस्थिति काही मामूली करण्याच्या प्रयत्नात नव्हते.उलट ते ती परिस्थिति तेजाळण्याचा प्रयत्न करीत होते.”

आपल्या आजोबाबद्दल अगदी योग्यतेच अवलोकन करून मी सांगतो आहे हे पाहून कुसूमला फारच बरं वाटलं.
मला म्हणाली,
“अलीकडेच माझ्या आजोबांना बुद्धिभ्रमाची बाधा झाली होती.माझ्या मते त्यांना ती फाशीचीच शिक्षा झाल्यासारखं मला वाटत होतं. त्यांना ते कळत नव्हतं.हळू हळू ते शांत आणि गंभीर व्हायला लागले होते.माझे बडबड करणारे, जीवनावर प्रेम करणारे,आजोबा तसे राहिले नव्हते.त्यांचं जग घटलं होतं,त्यांचं शरीर घटत जात होतं.त्यांचं व्यक्तित्व घटत होतं.मी माझी आई,माझे मामा,मावशी कोणी ना कोणी सतत त्यांच्या सहवासात रहात होतो.
तरीपण आजोबा कधीकधी इकडे तिकडे गंमत करायचे.विनोदीवृत्तिचा एक लहानसा तुकडा त्यांच्या जवळ असायचा. जुन्या विनोदी नट-नट्यांच्या आवाजाच्या टेप्स ते लावायला सांगायचे.त्यांना ऐकून ते हंसायचे.
जाण्यापूर्वीच्या दिवशी ते अधीक अधीक झोपेत होते.त्यांना उठवायला जरा कठीण होत होतं.अन्न जवळ जवळ सोडलं होतं.मी त्यांची सेवा करण्यासाठी चौवीस तास घरी रहायचं ठरवलं होतं.मी त्यांच्या झोपण्याच्या खाटीपासून जवळच जमीनीवर चटईवर झोपत होते.रात्रीचे ते कमीच झोपायचे.मी जरा माझी कुस वळवली की त्यांना जाग यायची आणि ते माझ्याशी बोलायला तयार व्हायचे.आम्हा सर्वांना तोपर्यंत लक्षात आलं होतं की त्यांचं काही खरं नाही.”

मी कुसूमला म्हणालो,
“तशी तुम्ही त्यांची त्यांच्या आजारात फारच काळजी घेत होता.मी ज्यावेळी यायचो त्यावेळी एखादी नर्स त्यांच्या औषधपाण्याची सोयकरताना,त्यांना कुशीवर वळवून पाठीमागे उषीचा लोड ठेवताना,त्यांचा अगदी आदर ठेऊन त्यांच्याशी बोलताना पाहिलं आहे.”

“त्यांची देखरेख करायला आम्ही दोन नर्ससीस ठेवल्या होत्या.त्या नर्सीस त्यांची आपल्या वडीलांची काळजी घ्यावी अशी काळजी घ्यायच्या.”
कुसूम मला सांगू लागली, “त्यातल्यात्यात त्यांना आवडणारी नर्स म्हणजे प्रेमाताई.
ते जायच्या दिवशी दुपारच्यावेळी प्रेमाताईची पाळी होती.चेहरा थोडा चिंताग्रस्त करून आजोबा मला म्हणाल्याचं आठवतं,
“मी झोपलो असताना प्रेमाताई आली तर गं?”
त्या माझ्या थकलेल्या परिस्थितित्त मी माझ्या आजोबांचीच नात असल्याने त्यांना म्हणाले,
“काही काळजी करूं नका.मी चटईवर झोपेन माझी कुस वळवीत राहीन म्हणजे तुम्ही जागे रहाल.”

माझं हे ऐकून आजोबा हंसले.पण ते त्यांचं नेहमी सारखं वेड्यासारखं हंसणं नव्हतं.अगदी पोटापासून खळखळून, मोठ्यांदा आवाज काढून केलेलं ते हंसणं नव्हतं.ते त्यांचं शांत हंसणं होतं. त्यांचे खांदे हलले.दांत विचकटून हंसल्या सारखा त्यांचा चेहरा दिसला पण कसलाच आवाज आला नाही.ते हंसत असल्या सारखे भासले.त्यांच्यावर विनोद केलेला त्यांना आवडायचा,त्यामुळे ते तसेच वाटले.त्यानंतर चौवीस तासानी ते गेले.”
कुसूम अगदी डोळ्यात पाणी आणून सर्व सांगत होती.

मी तिला म्हणालो,
“हे जग जुनं आणि कठोर आहे.आपण आपल्या कामाच्या मागे लागतो. मुलांच्या परिक्षा जवळ आलेल्या असतात. अंतीम क्षणाची आपल्याला चिंता असते.आपलं भविष्य अधांतरी लटकत असतं. आणि आपले प्रियजन आपल्याला सोडून जात असतात.”

हे ऐकून कुसूम गहिवरली आणि म्हणाली,
“आजोबा आम्हाला सोडून गेले ते पाहून उदव्हस्त झाल्यासरखं मला वाटलं. पण त्यांचा शेवट आला तरी त्यांच्या विनोदीवृत्तिने आम्हाला सावरलं. आजुबाजूचे सर्व त्यांच्यावर प्रेम करायचे.त्यांच्या विनोदी राहाण्याचं कौतूक करायचे. त्यांच्या विनोदीवृत्तिनेच,त्यांच्या जाण्याने झालेल्या दुःखातून, त्यांच्या गंभीर आजारातून,सरळ छेद घेतला होता.”

शेवटी मी कुसूमला म्हणालो,
“तुझ्या आजोबांच्या जाण्याने दुःखाने हळहळण्या ऐवजी त्यांच्या प्रेमळपणाबद्दल आणि विनोदीवृत्तिबद्दल आनंद व्यक्त करायला तुम्हाला त्यांनी मोका दिला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com