Wednesday, April 21, 2010

एलिझाबेथ पर्फ्युम.

“पण तुझ्या प्रत्येक झग्याला “एलिझाबेथ पर्फ्युमचा” सुवास नक्कीच येणार.”

इंदु माझी चुलत बहीण.तिच्या आयुष्याचा बराचसा भाग कोकणात वास्तव्य करण्यात गेला.तशी अधुनमधून ती मुंबईला तिच्या मुलीच्या फ्लॅट्मधे राहायला यायची.ह्यावेळी ती आली हे मला कळल्यावर तिला भेटायला मी गेलो होतो.
दरवाजा उघडताच झगा नेसलेली इंदु मला दिसली.
“अगं,इंदु तू?”
मी विस्मयीत होऊन तिला पहाताक्षणीच प्रश्न केला.तिची आजी नऊवारी लुगडी नेसायची.आणि इंदु सहावारी साड्या नेसायची.हा तिच्यात बदल कसा झाला?माझं कुतूहल वाढलं.
“कारे बाबा,तू काही झग्यातल्या बायका पाहिल्या नाहीस?”
इंदुने धीर करून मला प्रश्न केला.
मी म्हणालो,
“मी ज्यावेळी गोव्यात जातो त्यावेळी तुझ्या वयाच्या किरीस्तांव बायका ह्या पेहरावात पहातो.पण तुझा सहावारी साडीतला इमेज जो माझ्या डोक्यात होता त्याला थोडा धक्का बसला एव्हडंच.”
इंदु मला म्हणाली,
“ह्या बदलावाला एक पार्श्वभूमी आहे.ह्यावेळी माझ्या नाती जेव्हा अमेरिकेहून आल्या तेव्हा त्या माझ्या मागेच लागल्या मला म्हणाल्या,
“ग्रॅन्डमा,इकडच्या हवामानामदे आनि जास्त करून उन्याल्यामदे तुला सिक्सयार्ड सारी नेस्नं कसं जमतं.? आज पासून तू हे झ्यगे नेस.आमची तुला शपत आहे.तुझ्यासाठी जे.सी.पेनी मधून हे झगे विकत आनले आहेत.ममा म्हनाली होती तू ऐकनार नाहीस म्हनून, पन ते काय चालनार नाही.आपन ममाला सरप्र्याईझ देऊंया.”

मग काय करणार बाबा,जमाना बदलत आहे.माझंच खरं आणि दुसर्‍याला काही कळत नाही,अशी वृत्ति ठेवून राहिल्यास आपण मागेच पडणार आणि दुसरे वाट न पहाता पूढेच जाणार.फाजील घमेंड बाळगून चालत नाही. पुढच्या पिढीचं ऐकलं नाही तर एकमेकापासून दूर जाऊ.खरं तर हे झगे आता एकदा वापरायला सुरवात केल्यावर नंतर काहीच वाटत नाही म्हणा.”
इंदुने मला पार्श्वभूमी सांगीतली.आणि थोडीशी विचारत पडली.मी तिच्या डोळयात पाणी बघीतलं.डोळे पुशीत मला म्हणाली,
“मी माझ्या आजीला नऊवारी साडी शिवाय दुसरं काही नेसलेलं पाहिलंच नव्हतं.माझ्या लहानपणापासून मला नेहमीच वाटायचं, एव्हड्या उष्म्याच्या दिवसात ह्या नऊवारी साडीत आजी आरामात रात्री झोपायची तरी कशी? सकाळी ऊठल्यावर माझी आजी तरतरीत कशी दिसायची?”

“हल्लीची नातवंडं फार हुशार आणि खरं ते चटकन सांगणारी आहेत.”
मी इंदुला तिच्या आजीच्या वेळेतला आणि आता ती स्वतः आजी झाल्यानंतरच्या वेळेतला माणसाच्या आचार-विचारातला समज तोच असूनही स्पष्ट सांगण्याच्या हिम्मतीतला फरक एका वाक्यात समजावून देण्याचा प्रयत्न करीत होतो.
इंदुचं आपल्या आजीवर खूप प्रेम होतं.तिची आठवण आल्यावर बरंच काही मला सांगावं असं तिच्या मनात आलं असावं.म्हणून तिने आपले डोळे पुसले असावेत.

मला इंदु म्हणाली,
“अंथरूणात खिळलेली माझी आजी,नाकाला ऑक्सीजनची नळी लावून,एका डोळ्याने अधु झालेली,अलीकडेच हृदयविकाराचा झटका आलेली,दुसरं काही नाही तर अगदी सैल असा झगा घालून,झग्याची काही बटणं थोडीशी उघडी टाकून,काहीश्या नग्नावस्थेत झोपलेली पाहून ते दृश्य त्यावेळी माझ्या कल्पनांच्या पलीकडचंच मला वाटलं होतं”.
मी ह्या दोन नातवंडांची आजी होण्याआधी कोकणात असताना एकदा आजीच्या साड्यांचा विषय मी माझ्या मावशीकडे काढला होता, याची आता मला आठवण आली.”

इंदुच्या आजीच्या नऊवारी साड्या,इंदुच्या जमन्यात “आऊट ऑफ फॅशन” झाल्याने कुणी नेसल्या नाहीत आणि तशाच पडून राहिल्या.तसंच आपल्या सहावारी साड्या,अशाच पडून रहाणार असं काहीसं इंदुच्या मनात येऊन, रिवाज बदलल्यानंतर वस्तू कशा निकामी होतात हे माझ्या ह्या नातवंडांना कळत नसावं असा काही तरी मुद्दा तिला मांडायचा विचार आहे असं मला वाटलं.आणि मी तिला म्हणालो,
“सहावारी साड्या नेसण्याची अजून फॅशन आहे.वाटलं तर दे कुणाला तरी नेसायला.”
माझं हे ऐकून इंदु का हंसली ते मलाच कळलं नाही.

मला म्हणाली,
“तुला वाटतं तसं मुळीच नाही.माझ्या मनात त्यावेळी निराळाच विचार आला होता.माझ्या मावशीने जेव्हा मला माझ्या आजीच्या साड्या दाखवल्या तेव्हा माझ्या पटकन ध्यानात आलं की मी ह्या साड्यांचं काही तरी बनवावं. जुन्या आणि नव्या रंगीबेरंगी साड्या एकमेकावर दोन रकान्यात नीट रचून ठेवल्या होत्या ते पाहून,मी जेव्हा माझ्या मावशीला म्हणाले,
“मला ह्या साड्यांच्या गोधड्या करायच्या आहेत.”
ते ऐकून तिचा चेहरा मला अगदी शंकेखोर दिसला.
माझी मावशी माझा विचार ऐकून म्हणाली,
“ह्या साड्या मौल्यवान आहेत,आठवण म्हणून त्या नेसल्या गेल्या पाहिजेत.त्या काही कापण्यासाठी नाहीत.”

इंदुच्या मावशीचं हे बोलणं ऐकून मी इंदुला म्हणालो,
“तुझ्या मावशीच्या तिच्या आईबद्दलच्या भावना समजण्यासारख्या आहेत.तिचा चेहरा तसा होणं अगदी उघडंच आहे.”

मला इंदुने सरळ सांगून टाकलं,
“माझी आजी गेल्यानंतर,मी त्या साड्यांच्या गोधड्या करण्याचा माझा विचार पुढे दामटला.पण ज्यावेळी माझ्या आजीच्या साड्या कापायची वेळ आली त्यावेळी मला मोह टाळावा असं वाटूं लागलं.
मी त्या साड्या कापून आजीला अनादर दाखवीत आहे असा मला वाटणार्‍या माझ्या मावशीच्या आरोपापेक्षा ती वास्तवीकता,की त्या साड्यांचं तलमी कापड,तसं चैनीचं होतं आणि माझ्या आजीच्या अंगाला इतकं लपेटलेलं असायचं की त्यातून तिची दिसणारी विनयशीलता,व्यक्त करणारं तिचं स्त्रीत्व, ऊन्हापासून संरक्षण करण्याची पात्रता,आणि नेसल्यावर सौन्दर्य खुलून दिसण्यात होणारी भर ह्याची आठवण येऊन मला मोह टाळावा असं वाटलं.”

इतकं मनात वाटून सुद्धा इंदुने साड्या कापल्या की नाही ह्याचं कुतूहल माझ्या मनात वाढू लागलं.अधीर होऊन मी तिला विचारलं,
“मग त्या साड्या कापल्यास की नाही?”

मला इंदु म्हणाली,
” अगणीत वेळा माझ्या आजीने त्या साड्यांच्या घड्या तिच्या हाताने केल्या असाव्यात.आणि माझ्याकडून कातरीने एकदा का कापणं झालं की त्या साड्या आतापर्यंत जशा होत्या तशा रहाणार नाहीत असं एक सारखं मला वाटायला लागलं.
“काही हरकत नाही.काप तू!”
मी माझ्या मलाच आज्ञा देऊन कापायला सुरवात केली. झालं त्यानंतर,कामगीरी सरळ झाली.गोधडी शिऊन झाल्यावर कुणालाही दिसू लागलं, की प्रत्येक तुकड्याच्या-थराच्या- बाजू एकमेकाशी सारख्या दिसत नव्हत्या. अगदी मऊसर फिकट नीळसर आणि भडक लाल रंगाचा साडीचा एक तुकडा सुंदर पिवळ्या,हिरव्या साडीच्या तुकड्याशी थोडासा न जुळल्यासारखा दिसायचा.गोधडीवर केलेली शिवण नियमीत आणि सफाईदार दिसत नव्हती.
परंतु,सगळे तुकडे एकत्र करून तयार झालेली गोधडी,ह्या सर्व त्रुटी दूर करून केवळ मीच करू शकले असं वाटून आपल्याआपणच सूंदर दिसायला लागली.”

मी इंदुला म्हणालो,
” गोधड्या बनवण्याचा केव्हडा तो व्याप.सर्व साड्या धुवायच्या, वाळवायच्या आणि इस्त्री मारून मग त्या कापायच्या.पण एक खरं आहे.येऊ घातलेल्या नातवंडांच्या प्रेमापोटी कुणीही आजी गोधड्या बनवण्याचा हा व्याप घ्यायला तयार असावी. स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोधडीत ते इवलंसं नातवंड स्वस्त झोपलेलं पाहून प्रत्यक्ष आजी झाल्याशिवाय तो ब्रम्हानंद कसा कळायचा? “
इंदु खूपच खूश झालेली दिसली.

मला म्हणाली,
“मी एकही साडी धुतली नाही.त्या साड्यांवरचे डाग आणि साड्यातून येणारा गन्ध, ती कसं जीवन जगली याचं चालतं बोलतं साक्ष देणारं उदाहरण होतं.आणि माझ्या रहाण्याच्या शैलीपासून अगदीच वेगळं होतं.
तिचं आयुष्य आमट्या शिजवण्यात,हळदीने साड्या डागळवण्यात, मोकळ्या पायांनी धुळीने माखलेल्या जमीनीवरून चालण्यात, पुजा-आर्चेच्या कर्मकांडात भाग घेण्यात,दुपारचं झोपून उठल्यावर चहा किंवा कॉफी पिण्यात,आणि जवळीक वाटणार्‍यांना घट्ट छाती जवळ घेऊन अलिंगन देण्यात गेलं.”

इंदु एव्हडी भावूक झालेली मी पहिल्यांदाच पाहिली.मी तिला जोर देण्यासाठी म्हणालो,
“मला खात्री आहे की आपल्या आजीच्या साड्या कापायला आपल्याला पूर्ण हक्क आहे.त्या काही खूंटीवर टांगून धूळ खात ठेवण्यासाठी नसाव्यात. मला वाटतं त्या साड्यापासून आपण जे काही बनवू त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपण निरहंकारी बनलं पाहिजे.
मला असं वाटतं की त्यावरचा प्रत्येक डाग घालवण्याची काही जरूरी नसते.शिवाय साडी कापल्याने त्याचं सौजन्य सांभाळलं जातं.
मला असंही वाटतं की,प्रेम करणं आणि त्या प्रेमाची अमर्याद गहराई प्रकट करण्यासाठी आपल्यात हिम्मत राखून आपण मिळालेला वारसा नव्या आकारात बदलला पाहिजे”

“पण बाबा,आता जमाना बदलला आहे.आता कोण एव्हडी मेहनत घेऊन गोधड्या तयार करतोय?सर्व काही बाजारात विकत मिळतं. माझी ही अमेरिकन नातवंडं माझ्या सहावारी साड्या कापून आपल्या नातवंडांसाठी गोधड्या बनवतील असं तुला वाटतं का?
त्यांना अलिंगन देत,देत एव्हडंच म्हणायचं माहित आहे,
“ग्रॅन्डमा,आय लव्ह यू!”
आणि नंतर,
“मी टू!”
असं मी म्हटल्यानंतर संपलं.”
जरा गंमत म्हणून मी ही हंसत हंसत इंदुला म्हणालो,
“पण तुझ्या प्रत्येक झग्याला तुझ्या नातवंडांच्या अलिंगनाने “एलिझाबेथ पर्फ्युमचा” सुवास नक्कीच येणार.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com