Friday, April 16, 2010

“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”

“गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत, डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.”

सुधाकर करमरकरचा मुलगा,हर्षद, शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.नंतर शिक्षण पूरं झाल्यावर तिथेच स्थाईक झाला. स्वतःची कंपनी काढून तिथेच बिझीनेस करायला लागला.मुंबईत एखादं घर असावं म्हणून त्याने ठाण्याला घोडबंदर रस्त्यावर,टुमदार बंगले बांधणीच्या स्कीममधे पैसे गुतंवून आपल्यासाठी एक बंगला घेण्याचा बेत केला.
सुधाकर घरचा धनाड्य.त्याचे वडील,काका डॉक्टर होते.आत्या मुंबईला एका कॉलेजात प्राध्यापिका होती.सुधाकर स्वतः शेतकीइंजीनियरींग शिकला, आणि घरची शेतीवाडी पहात आहे.सरस्वती आणि लक्ष्मी करमरकरांच्या घरात स्थानापन्न होती.
हर्षदने अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याचं नुसतं मनात आणलं आणि त्याच्या मनासारखं झालं.

“आपले बाबा एव्हडं शेतीबद्दल शिकले आहेत मग त्यांचा उपयोग आपल्या बंगल्याच्या समोर आणि मागे एखादा सुंदर बाग-बगीचा करून घ्यावा.”
असं हर्षदच्या मनात आलं आणि मला त्याने तिकडून फोनकरून कळवलं. म्हणून मी मुंबईला थोडे दिवसासाठी येऊन बागेच्या तजवीजेला लागलो.”
सुधाकरने मला फोन करून ठाण्याला आपल्याला भेटायला ये म्हणून कळवलं.आणि मी त्याला भेटलो तेव्हा तो मला असं म्हणाला.

“मी निसर्गदृश्य रम्य दिसण्यासाठी सल्लागार म्हणून काम इथेच करावं असं इथे आल्यावर इकडच्या लोकांच्या मनात आलं. मला इकडच्या आणखी बंगल्यांची बगीचे बनवून घेण्याची कामं मिळाली.”
इतर टुमदार बंगले आणि सभोवतालचे बगीचे बघून मी सुधाकरला त्याबद्दल विचारल्यावर मला त्याने असं उत्तर दिलं.

सुधाकर पूढे म्हणाला,
“माझ्या गिर्‍हाईकाना उत्तम बगीचा देऊन त्यांना बगीच्यांची देखभाल ठेवायला कमीत कमी भार पडावा म्हणून बगीचे बनविण्यासाठी मी माझ्याकडून त्यांना मदत करायला लागलो.पण एखादं गिर्‍हाईक मला सांगायचं की असा बगीचा त्यांना हवा की तो तयार झाल्यानंतर त्यात मुळीच काम करण्याची आवश्यक्यता नसावी. हे ऐकल्यावर मला वाटायचं, सगळं सोडून बगीच्यात काम न करण्याची गरज यांना का भासावी.?”

मी सुधाकरला म्हणालो,
“अरे बाबा,आता जमाना पूर्वीचा राहिलेला नाही.पैशाच्या जीवावर आपोआप सर्व मेहनतीची कामं केली जावी अशी पैसेवाले अपेक्षा करतात.झाडांना हाताने पाणी द्यायला नको.आता टाईमर्स सहीत स्प्रिंक्लर्स आले आहेत.बाकी बागेतली कामं,उदा. विड्स, म्हणजे रानटी गवतांचे तृण उपटून काढणं, झाडांच्या जोमाने वाढणार्‍या फांद्या छाटणं,बाग साफ ठेवणं असली कामं करून देणार्‍या कंपन्या शहरात आल्या आहेत.कॉन्ट्र्याक्टवर त्या कंपन्या काम करून देतात.”

माझी ही सर्व माहिती ऐकून सुधाकर हंसायला लागला.
“मी ऍग्रीकलचरीस्ट आहे हे तू विसरलास की काय ?
असा प्रश्न करून मला म्हणाला,
“मी कोकणात शेतीवाडी पहात असलो तरी आधूनीक सुधारणाबद्दल पुस्तकं वाचीत असतो.माझा हर्षद मला त्या विषयांवर तिकडून मासिकं पण पाठवीत असतो.माझा मुद्दा निराळाच आहे.
बगीच्यात काम करणं हे प्रत्येकासाठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.नक्कीच,चांगला शारिरीक व्यायाम होतोच, तसंच कुणालाही बगीच्यात काम करण्याने,बागेची प्रशंसा करण्याची,चकित होण्याची आणि परख करण्याची संधी मिळते असंही मला वाटतं.”
सुधाकरचा बाग बनविण्याच्या तंत्रशास्त्राबद्दल कसलाच मुद्दा नव्हता. त्याला त्या शिवाय आणखी काही तरी सांगायचं आहे,हे कळायला मला वेळ लागला नाही.

मी म्हणालो,
“तुला कोकणातल्या शेतीवाडीचा एव्हडा अनुभव आहे आणि तू निसर्गात एव्हडा एकजीव झाला असावास की तू मला काही तरी निराळंच सांगणार आहेस ह्याची मला खात्री आहे.तू सांग मी ऐकतो.”

सुधाकरला मी असं म्हणाल्यावर जराशीही संधी न दवडता मला म्हणाला,
“उदाहरण म्हणून सांगतो,बागेत एखादं झाड मरण्याच्या पंथाला लागलेलं पाहून मला ते झाड आठवण करून देतं की,मी जीवंत असल्याने किती नशिबवान आहे. माझ्या बगीच्यातून मला ताजी भाजी मिळत असते ही आठवण भाजी खाताना होत असते.
बाहेर आमच्या बागेत काम करीत असताना,माझं मन शांत आणि उल्हासीत रहातं.काही गंमती पण पहायला मिळतात. गवताच्या तृणाच्या बिया, कित्येक महिने नव्हे तर कित्येक वर्षं सुप्त राहूनही जरा जरी वातावरण योग्य झालं की ते तृण उगवून वर येतात. गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.मला पोषण देणार्‍या भाज्या सूर्याच्या उन्हातून अन्न बनवतात.मी जर बागेत काम करायला गेलोच नाही तर ह्या गोष्टी माझ्या ध्यानातही येणार नाहीत.
हे झालंच त्या शिवाय मी तुला एक माझी आठवण सांगतो आमच्या ह्या बगीच्यातच मी काम करताना शिकलो की दुःखा़शी दोन हात करायचे नाहीत.”

आता सुधाकर मुळ मुद्यावर येऊन सांगू लागला,
“त्याचं असं झालं,मी त्यावेळी आठवी/नव्वीत शिकत असेन.माझी आजी न्हाणी घरात पडली आणि त्या अपघातातून ती उठलीच नाही.माझं माझ्या आजीवर अत्यंत प्रेम होतं.प्रेम करण्यासारखीच माझी आजी होती.माझ्या वयाचे माझे मित्र जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा आजीला भेटल्याशिवाय जायचेच नाहीत.
“रे माझ्या नातवा!”
असं म्हणून आमच्यापैकी कुणालाही तिने हांक दिली की,तिच्या तोंडून आलेले हे शब्द आम्हाला धीर द्यायचे.आजीच्या जाण्याने माझ्याबरोबर सर्व मित्रही हळहळले.

तर सांगायचा मुद्दा असा की त्या वयात मला जेव्हडं जमेल तेव्हडं त्या दुःखाला मी तोंड दिलं.आजीच्या जाण्याचं दुःख मला जमेल तेव्हडं मनातून काढण्याचा मी प्रयत्न करीत राहिलो.
त्यानंतर मला आठवतं हा माझा मुलगा ज्याने इथे हा बंगला बांधला आहे त्याच्या जन्मानंतर, मला झालेलं मी लहान असतानाचं ते आजीचं दुःख जे मी विसरण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालो होतो,ते परत माझ्या मनात यायला लागून मला फारच कठीण वाटायला लागलं.मनात म्हणायचो,मी आता मोठा झालो आहे,मुलांच्या जोपासनेची जबाबदारी माझ्यावर आहे, बागेत फोफाऊन आलेली ती रानटी गवताची तृणं उपटून काढायची आहेत,असं म्हणून मी आमच्या बागेत जायचो.

पावसाळा यायला अजून उशीर होता.पाणी नसल्याने जमीन तशी बरीच कोरडी झालेली होती.ते रानटी गवत उपटून काढायला जे श्रम लागायचे ते पावसाच्या आभावी जमीन घट्ट झाल्याने आहेत, हे मनात येऊन मी कष्टी व्ह्यायचो.मान वर करून आकाशाकडे पाहून काळ्या ढगांची अपेक्षा करायचो.
आणि चटकन लक्षात यायचं की हवामानाकडे काळ्याबेर्‍या दृष्टीने बघून उगाचच हवामानाशी मी शत्रुत्व घेत आहे. हवामान जसं आहे तसंच असणार. गरमी,उकाडा देणारं हवामान मला आवडलं जरी नसलं तरी माझ्या हातात काहीच नव्हतं शिवाय परिस्थितीशी जुळतं घेण्यापलीकडे.

“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”
मी माझ्या मलाच म्हणायचो.
नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या “अंतरातल्या हवामानाला”ही मी अस्वस्थ करतोय.मनात आलेल्या दुःखाला प्रतीरोध करीत होतो. कारण ते मला नष्ट वाटायचं,अगदी त्या कोरड्या जमीनीसारखं.पण ते तात्पूरतं होतं,आणि बर्‍याच वर्षानी झालं होतं.मी बागेत उकीरडा बसलो,माझे डोळे ओले झाले,गवताची तृण उपटताना आणखी डोळे पाणवले,आणि शेवटी माझ्या आजीची आठवण काढून मी शोकाकुल झालो.”
सुधाकर अगदी मोकळ्या मनाने आपलं दुःख माझ्याकडे उघड करीत होता.मलाही त्याची कींव आली.

“चल,तू मला तुझा बगीचा दाखव”
असं म्हणून चप्पल घालून आम्ही बंगल्याच्या बाहेर पडलो.
जाता जाता मी सुधाकरला म्हणालो,
“सध्याचा जमाना असा आहे की आराम आणि चैनीचा आपण उदोउदो करतो,खरंतर आपण कामातही व्यस्त असतो. त्यामुळे काही लोकाना बगीच्याची देखभाल कमीतकमी कष्टात व्हावी असं वाटणं सहाजीक आहे.
तरीपण बगीच्याची देखभाल करण्यात आपण कसलाच भाग घेऊ नये आणि नुसतं वरवरचं निसर्गदृश्य रम्य दिसावं अशी भलतीच इच्छा कुणी करूं नये कारण, बागेची राखण करताना आपण,बागेची परख करीत असतो आणि कृतज्ञतेची,मनुष्यत्वाची आणि आनंदाची जोपासना करीत असतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com