Saturday, April 10, 2010

कां बरं हसावं?

“कुणीतरी म्हटलंय नाही काय,हंसणं संसर्गजन्य असतं म्हणून.”

आज तळ्यावर माझा फारच मजेत वेळ गेला.वसंत ऋतू चालू झाल्याने सूर्यास्त जरा उशीराच व्हायला लागला आहे. आणि पूर्वी सारखा हवेतला गारवा कमी होऊ लागल्याने फक्त एक स्वेटर घालून फिरायला जायला सुलभ झालं आहे. नाहीतर ती कानटोपी आणि थंडीचं जॅकेट घालायला मला तरी वैताग यायचा.
प्रो.देसाई नेहमी म्हणतात त्यांना असं हवामान फार आवडतं.काही तरी करावं, काही तरी वाचावं,जरा बाहेर जास्त वेळ घालवावा असं वाटतं.मलाच काल म्हणाले होते,
“उद्यापासून आपण लवकर फिरायला जाऊया.”
पण खरं तर मीच लवकर येऊन बसलो होतो.माझ्या मागोमाग ते आलेच म्हणा.इकडच्या तिकडच्या गप्पा होत असताना, लांबून भाऊसाहेबांची धाकटी मुलगी-राधिका- आपल्या मैत्रिणीबरोबर आमच्या दिशेने येताना पाहली. आमच्या जवळ आल्यावर आम्ही एकमेकाशी हंसलो.आपल्या मैत्रिणीची तिने ओळख करून दिली.
“ही सरीता सरवटे.माझ्याच ऑफीसात कामाला असते.अधून मधून मासिकात लेख लिहीते.हिचा ब्लॉगपण आहे.त्याचा पत्ता ती तुम्हाला नंतर देईल. हिला कधीही पहा, हिच्या चेहर्‍यावर नेहमी हंसू असतं.”
सरीता हे ऐकून जरा लाजली,पण हंसत होती.

सरीताला हंसताना पाहून मी म्हणालो,
“हास्याबद्दल,आनंदी रहाण्याबद्दल आणि प्रत्येक गोष्टीच्या उजळ बाजू्कडे पहाण्याबद्दल मलाही विशेष वाटतं.”
नाहीतरी मला काहीतरी विषय काढून बोलायचं होतं.आणि प्रो.देसायांची प्रतिक्रिया पाहायची होती.कारण ही मंडळी येईपर्यंत आम्ही कसला खास विषय काढला नव्हता.प्रो.देसाई बोलण्यापूर्वीच सरीता म्हणाली,

“हास्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे.माझ्या दिवसाची सुरवात कशीही असो,मी मात्र माझ्याकडून दिवसाची सुरवात हंसून करते.आणि मनात ठरवते की आजचा दिवस खरंच जगण्यासाठी उत्तम आहे.”
आता मात्र भाऊसाहेबाना रहावेना.तिचं बोलणं संपता संपताच लगेच म्हणाले,

“कुणीतरी म्हटलंय नाही काय,हंसणं संसर्गजन्य असतं म्हणून.
कुणी जर का हंसलं की तो आपलं सुखसमाधान प्रदर्शीत करतो एव्हडंच नाही,तर तो त्या आनंदाची देणगी दुसर्‍याला पण देतो.
कुणी जर हंसलं की त्याला विचारलं जातं कां हंसला? आणि विचारणाराच हंसायला लागतो,आणि त्याला कुणी विचारलं का? तर तो पण हंसतो, आणि असंच पुढे होत रहातं.”

“तुम्हाला एक गंमत सांगते.मी एका महिला मंडळाच्या गृहभांडारात जवळ जवळ दोन वर्षं काम करीत होते.त्यावेळी मी काम करीत असताना माझ्या लक्षात आलं होतं की काही गिर्‍हाईकं अजीबात हंसत नसायची.दुकानात शिरतानाच रागीष्ट चेहरा करून आत शिरायची.मला त्यांना विचारावंसं वाटायचं की,
“अहो,,तुम्ही हास्य परत का करीत नाही.असं करायला कितीसं कठीण असतं?.”
सरीताने आपला अनुभव सांगीतला.

“कुणीतरी एखादा चूटका ऐकून दुसर्‍याला सांगीतला की समजावं की त्यादिवशीचा त्याचा दिवस भरला.हजार वर्षाच्या दुष्काळानंतर पावसाची सर येऊन गेल्यावर कसं वाटेल तसं हास्याचं आहे.कोंबडीच्या पिल्लाने रस्ता का ओलांडला? तर बघ्यांना हंसवण्यासाठी असं म्हटल्यासारखं आहे.हास्य हे आत्म्याला आणि मनाला एक औषध आहे”
मी माझ्याकडून सरीताला दुजोरा देत म्हणालो.

“काही झालं तरी हंसल्यानंतर कुणालाही बरं का वाटतं?”
राधिकाने प्रश्न विचारून झाल्यावर, जीभ चावत आपल्या वडलांकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होती.पण मीच तिला उत्तर द्यायचं ठरवलं.

“कधी कधी हंसून झाल्यावर,काही लोक एव्हडे आनंद पावतात की आपण जगाचा राजा आहो असं त्यांना त्यावेळी वाटतं. आणि कुणी दुःखी किंवा उदास असल्यावर जणू सर्व जगाचा भार आपल्या खांद्यावर आहे असं त्यांना वाटतं. आपण आनंदात असलो की जगात सर्व काही ठाकठीक आहे असं आपल्याला वाटतं.जरा का सर्दी झाली की आपल्याला बेचैन होऊन थकल्यासारखं होतं,अगदी जीव नकोसा होतो.कुणी जवळपास असूं नये असं वाटतं.आणि एकाएकी बरं वाटू लागल्यावर,पहिलवानाची शक्ति अंगात आल्यासारखं वाटू लागतं. म्हणूनच हंसणं हे एक मनाचं आणि आत्म्याचं औषध
आहे.असं मी मघाशी म्हणालो.”
माझं हे बोलणं ऐकून भाऊसाहेब गालातल्यागालात हंसत होते.काही तरी गंमतीदार किस्सा सांगतील असं मला वाटत होतं.

“एखाद्या सिनेमात दाखवतात की,तो आपल्या बाल्कनीतून समोरच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या मुलीकडे तिला हंसताना बघून प्रेमात पडतो.पणअसं हे होऊ शकतं असा विचार तरी आपल्या मनात येईल काय?
इतर उथळ मनाचे असल्यानेच आपल्यावर लट्टू होतात कारण आपण दिसायला सूंदर आणि आकर्षक दिसते असं एखाद्या मुलीने म्हटलं तर ते काही खरं नसावं.पण तुम्हाला विनोद समजतो आणि तुम्ही हंसता, एव्हडं सुद्धा, लोकांना हंसायला पुरं असतं.
चीडखोर माणासाचा सहवास कुणालाही आवडणार नाही,जीवनाकडे वाईट दृष्टीकोन ठेऊन पहाणारा कुणालाही आवडणार नाही,सतत दुसर्‍यावर टिका करणाराही कुणाला आवडणार नाही.”
प्रोफेसर सांगून गेले. आणि मला मनात वाटलं होतं, तेच खरं ठरलं काही तरी गंमतीदार किस्सा त्यांनी सांगीतला.

“तुम्ही हंसला नाही तर तुम्ही उदास दिसता.हंसणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे.त्याला काही पैसे पडत नाहीत.काही वजन उचलावं लागत नाही,कुठे लांब जावं लागत नाही.फक्त तोंडावर हंसं आणायचं.”
मी माझा विचार सांगीतला.

सरीता म्हणाली,
लहानपणी चेहर्‍यावर हास्य आणणं मला इतकं सोपं नव्हतं.माझे बाबा कडक स्वभावाचे होते.पुरूष सहसहा मर्दानी वृत्तिचा हवा असं त्यांना वाटायचं. दुसर्‍यांना आज्ञा द्यायला त्यांना आवडायचं.काही प्रमाणात मी आणि माझी लहान भावंडं आमच्या घरात छोटे सैनिक कसे राहून त्यांच्या आज्ञा घ्यायचो.आमच्या बाबांना बरं वाटावं म्हणून आम्ही असं करायचो.घरी आल्यावर त्यांना घरात गोंगाट मुळीच आवडायचा नाही.बाबा घरी आल्यावर आम्ही सर्व चूपचाप असायचो.
माझ्या बाबांची समज होती की पुरूषाने हंसायचं नाही.रोज जेवताना जेवणाच्या टेबलावर आम्हाला ते आठवण करून द्यायचे की,
“खरे पुरूष हंसत नाहीत. तुम्ही हंसला तर त्याचा अर्थ तुम्ही कमकुवत आहात.पुरूषाला कठोर असायला हवं.”
ह्या माझ्या बाबांच्या वृत्तिमुळे माझा जीवनाकडे पहाण्यात फरक झाला.आणि सर्वांत मोठं भावंडं म्हणून मला त्यांच्या पावलावर पाऊल टाकावं लागलं.त्यांच्या त्या सततच्या सांगण्याने मला वाटायला लागलं की मी मुलगी असले तरी जर का हंसले तर मी माझा कमकुवतपणा दाखवीन.”

“मग मी म्हणते,मजेत वेळ जाईल अशा व्यक्तिबरोबर सहवासात राहिल्यास किंवा,तुमचे चूटके कितीही मुर्खपणाचे असले तरी त्यावर तो हंसतो अशाच्या सहवासात राहिल्यास कसली हरकत असावी.?
हंसा.आनंदात असा.कुणाच्याही अंतरात तुमचं हंसू शिरू द्या.हंसून त्यांच्या डोळ्यात चमक आणू द्या.मला तरी हंसणं आवडतं.”
राधिकेने आपलं मत दिलं.

“राधिके,तू अगदी माझ्या मनातलं सांगीतलंस.मी माझंच उदाहरण सांगते”
असं सांगून सरीता सांगू लागली,
पाच वर्षापूर्वी माझं लग्न झालं.मला आठवतं एक दिवस माझ्या नवर्‍याने मला आमचा फोटो आल्बम पहायची इच्छा दाखवली होती.प्रत्येक फोटो तो निरखून पाहात होता.प्रत्येक पान तो भरभर उलटत होता.प्रथम मला वाटलं की माझ्या जून्या मित्र मंडळींचे फोटो त्याला पहायचे नसावेत.किंवा माझ्या आईबाबांचे आणि भावंडांचे फोटो त्याला पहायचे असावेत.त्याच्या वागण्याकडे बघून मी जरा घाबरलेच.मी त्याला विचारलं,
“काय पहात आहेस? काही गडबड आहे का?”
त्याने मलाच विचारलं,
“तुझ्या चेहर्‍यावर हंसं का नसतं.?”
माझे आल्बममधले फोटो पाहून त्याने समज करून घेतला असावा. माझ्या नवर्‍याने माझा चेहरा हंसरा दिसावा यासाठी हरप्रयत्न करून पाहिलं.मला त्याने विनोदी नाटकांच्या प्रयोगाला नेलं होतं.निरनीराळे सरदारजी चुटके सांगून हंसवायचा प्रयत्न केला होता.हो,मी त्याच्याशी लग्न केलं होतं.
एखादेवेळी सुखी नसतानाही कसं चेहर्‍यावर हंसं ठेवायचं हे मी त्याच्याचकडून शिकले.”

आता जर एखादी वाईट गोष्ट घडली तर चेहर्‍यावरचं हास्य मला खुशीत ठेवतं.
हंसत रहाणं ही एक उपचारात्मक प्रक्रिया असावी.हे असं चेहर्‍यावर हंसं ठेवण्याची संवय करायला मला बराच समय द्यावा लागला. आता मला वाटायला लागलंय की, ह्या महत्वाच्या संवयीला माझ्या जीवनात आणण्यापासून मी बराच काळ दूर राहिले होते.हंसण्याची कृति खरोखरच विस्मयजनक आहे.आता मी दिवसभरात अनोळख्याशी पण हंसते.काही लोकाना हे माझं करणं वेड्पटासारखं वाटत असेल.पण मी उलट जास्तच हंसते.मला वाटतं बरेच वेळा एक तरी हंसू मिळण्याची आपल्याला जरूरी भासते.प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे कारण जीवन अगदीच क्षणभंगूर आहे.”

“अगदी बरोबर आहे.”
मी म्हणालो.
बाहेर आता काळोख व्हायला लागला होता.दुसर्‍या दिवशी राधिकेची मैत्रीण सरीता आपल्या गावाला जाणार होती. आमची हास्यावरची चर्चा आवरती घेणं भाग होतं.
म्हणून मी उठता उठता म्हणालो,
“एखाद्या बॅन्केतल्या कारकूनाशी,एखाद्या वाण्याशी,पत्र टाकून जाणार्‍या पोस्टमनशी हंसायला हवं.कारण कधी कधी आपल्यालाच आठवण करून घ्यावी लागते की सर्व काही आलबेल आहे.मला वाटतं प्रत्येकजण निदान एका हंसूला पात्र असतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com