Monday, April 5, 2010

न हंसणाराच हास्यास्पद दिसतो.

“मी एक पाहिलंय माझे वडील ज्यावेळी हंसतात तेव्हा ते छान दिसतात.”

स्वप्नील त्याच्या लहानपणी नेहमीच आपल्या वडीलांबद्दल माझ्याकडे तक्रारी करायचा.
“ते रागीष्ट आहेत.बारीक सारीक कारणावरून चिडतात.आई एव्हडं घर संभाळून आमची देखभाल करते त्याचं त्यांना काहीच नसतं.”वगैरे.
आता स्वप्नील दोन मुलांचा बाप झाला आहे.ह्यावेळी मला भेटला तेव्हा आपल्या वडलांची भारी स्तुती करीत होता.

मी त्याला म्हणालो,
“काय रे बाबा,तू मोठा झालास,तुझे बाबा वयस्कर झाले,आणि परिस्थितिही तिच राहिली नाही.तुझ्या मतपरिवर्तनाचं हे कारण असेल का?”
मला स्वप्नील म्हणाला,

“तुम्ही म्हणता ती सर्व प्रमुख कारणं आहेतच,पण त्याशिवाय चेहर्‍यावर हंसू आणणं हे एक मुख्य कारण आहे.ते आमच्या बाबात आल्याने हा फरक जास्त जाणवला.”

“मला वाटतं हंसण्यामुळे नैसर्गीकरित्या माणसाची मानसिक अवस्था उभारून येत असावी.त्याशिवाय हे ही नक्की माहित झालंय की, हंसण्याने माणसाची शारिरीक अवस्था पण सुधारते.तसंच हंसत राहिल्याने शरीरातला उष्मांक जाळता येतो कारण जवळ जवळ शरीरातले चारशे स्नायु हंसण्याच्या क्रियेत एकत्रीत केले जातात. हंसण्यामुळे आपण भयभीति आणि विपत्तिपासून मोकळे रहातो.शिवाय अश्रूनी भरलेले डोळे साफ होऊन बुळबूळीत रहातात.आणि हंसताना झालेल्या कंपनामूळे डोकं,नाक,कानही दोषरहीत रहातात.
काही दिवसापूर्वी कुणीतरी मला विचारलं,
“एखाद्या आचरट प्रश्नावरही मी कां हंसायला लागतो?”
हा प्रश्न विचारणारा अशी व्यक्ति आहे की,तो क्वचितच हंसतो.त्याला वाटत असतं की विश्वसनीयता असणं म्हणजे विवेक आणि प्रतिभा असणं.पण माझं मत ह्याच्या अगदी उलट आहे.”
मी स्वप्नीलला हंसण्याचे अनेक फायदे समजावून सांगण्याच्या प्रयत्नात होतो.तो जसजसा मोठा होऊन जगात वावरूं लागला, तसतसा त्याला अनुभव आल्याच्या कारणाने हंसण्याचे फायदे कळले आहेत हे त्याच्या नंतरच्या बोलण्यावरून मला दिसून आलं.

“माझ्या जीवनात काही वेळा एखादं साधं स्मित उत्तेजनदायक वाटतं.त्यामुळे माझा स्वाभिमान उभारला जातो.कुणा मित्राबरोबर किंवा एखाद्या नातेवाईकाबरोबर बोलत असताना बोलण्याच्या शेवटी निष्कपट हंसू आणि उत्तेजनाचे उद्गार ऐकून माझ्या मनाला बरं वाटतं.
जीवनात सकारात्मक राहिल्याने आपण केलेल्या निवदानाचा तो सुर होऊं शकतो.आपल्या अंगात चांगला जोम -जो असायला हवा- आल्यासारखा वाटतो.आपल्या जीवनात येणार्‍या समस्यांना दोन हात करण्यासाठी सकारात्मक रहाणं आवश्यक आहे.जो हंसत असतो तो त्याच्या व्यक्तिमत्वाची पातळी प्रदर्शीत करीत असतो. अशा व्यक्तिंच्या चेहर्‍यावर नेहमीच हास्याची छटा असते.मला वाटतं अशी व्यक्ति एखाद्याचा विश्वास उंचावते आणि ती स्वतःकिती समतोल वृत्तिची आहे हे दाखवून देते.”
स्वप्नील जेव्हां त्याचा अनुभव मला समजावून सांगू लागला,तेव्हाच मी समजलो की तो जे काही सकारात्मक असण्याबद्दल बोलत आहे,आणि हंसण्याचे फायदे सांगत आहे ते केवळ परिस्थितिच्या बदलावामुळे त्याला कळलं आहे.

मला स्वपनील पुढे सांगू लागला,
“काका,तुम्ही ज्यावेळी हंसता त्यावेळी तुमचं गालातल्या गालातलं हंसणं सुद्धा छपत नाही.काय कारण सांगू? तुमच्या उजव्या गालावरची खळी त्याला कारण आहे.पण मी माझ्या वडलाना क्वचितच हंसताना पाहिलंय.ते नेहमी गंभीर राहायचे.बरेच वेळा रागवायचे.अर्थात हे मी लहान असताना व्हायचं.
आता मात्र माझे वडील एक निराळीच व्यक्ति झाली आहे.कसं हंसायचं ते त्यांना कळलं आहे.”

स्वप्नीलचं हे अवलोकन अगदी मार्मीक वाटलं.म्हणून मी त्याला पुढे म्हणालो,
“चेहर्‍यावरचं हंसू निष्कपट असायला हवं,त्यासाठी काही संवय करून घ्यावी लागत नसावी.अगदी जणू लहान मुलं हंसतात तसं हंसणं मी म्हणतो. जेव्हा तुम्ही त्या लहान मुलांना शाबसकी दिल्यावर ती हंसतात तसं.त्यातलं मुख्य गूढ असं आहे की,मनुष्य स्वभावाला दाद दिली गेली पाहिजे. कारण एखाद्याच्या चेहर्‍यावरचं हंसू त्याचा स्वभाव कसा आहे हे सिद्ध करून दाखवतं.”

अलीकेडे त्याच्या वडलात झालेला फरक आठवून त्याला त्याच्या बाबांचा कणव आला असावा.जूनी आठवण काढून मला म्हणाला,
“माझा जन्म खेड्यात झाला.आमचं कुटूंब अगदी लहान होतं.मी,माझे आईवडील आणि माझी एकुलती बहीण.माझी आई घरात राहून आमची देखभाल करायची.माझे वडील जरा मर्दानी स्वभावाचे.नेहमीच स्वतःला चिडचिड्या स्वभावाचे समजायचे.प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांनी कुटूंबाला खूप मदत केली अगदी आम्हा दोघांची लग्न होई तोपर्यंत.ते बरेच वेळा शहरात काम करायचे.आणि तिकडून आम्हाला पैसे पाठवायचे.”

“मग आता तुझ्या बाबत विशेष असा काय फरक झाला आहे?कोण त्याला कारण आहे असं तुला वाटतं?”
मी स्वप्नीलला मुद्दामुनच विचारलं.थोडा विचार करीत मला म्हणाला,
“आता आपल्या नातवंडांबरोबर ते मजा-मस्करी करीत असतात.आमच्या मुलांनीपण आपल्या आजोबांना सुख-समाधानी दिली आहे.जी ह्या वयात लहान मुलांकडून अपेक्षीत असते.त्याशिवाय मी एक पाहिलंय माझे वडील ज्यावेळी हंसतात तेव्हा ते छान दिसतात,आणि आजुबाजूच्या लोकांना त्यांच्या अंगचा प्रेमळपणा दिसून आलेला पाहून माझ्या डोळ्यात आनंदाची भरती येते.”

“म्हणून मला वाटतं,हंसत राहिल्याने आणि विनोदीवृत्ति असल्याने कुणीही हास्यास्पद दिसला जाणार नाही.”
मी आमचं बोलणं आवरीत म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com