Saturday, April 24, 2010

राधिकेची श्रद्धा.

“वा! वा! बहूत अच्छे! होऊन जाऊदे.आज तुझ्या अंगात प्रोफेसरांचं वारं शिरलेलं दिसतंय.ऐकीन तेव्हडं कमी आहे.” मी म्हणालो.

“मिळालेलं रीतसर शिक्षण आणि मिळालेला अनुभव ह्याने मला जरी आधुनीक तर्कशास्त्र समजण्याच्या अवस्थेत आणून ठेवलं असलं तरी ते मला नेहमीच्या जीवनातल्या अनुमानात,निष्कर्षात आणि वास्तवीक निर्णयात चिकटून राहायला सर्व अपूरं वाटतं. त्यामुळे कुठच्याही गोष्टीची श्रद्धा ठेवणं हे तर्कसंगत विचाराला जरूरीचं आणि मनाला दिलासा देण्यासाठी पूरक आहे असं वाटतं.”
राधिका मला आपल्या मनातले विचार सांगताना म्हणाली.

आज प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.पण भाऊसाहेब घरी नव्हते.ते त्यांच्या मुलाकडे त्यांच्या प्रकृतीच्या ऍन्युअल-चेकअपला गेले होते.त्यांच्या प्रायमरी-केअर-फिजीशियनचं (पी.सी.पी.) क्लिनीक त्यांच्या मुलाच्या घराशेजारीच आहे. असं मला त्यांची मुलगी राधिका म्हणाली.
प्रो.देसायांची मुलगीच ती!.एखाद्या विषयावर साधक-बाधक चर्चा करायला मागे पहाणारी कशी असेल.?
नुकतंच मी रेडीयोवर “फेथ” ह्या विषयावर एक भाषण ऐकलं होतं.ते राधिकेने पण ऐकलं होतं.त्याच्या संदर्भात ती मला सांगत होती.

मीच तिला विषय काढून विचारलं होतं,
“खरं म्हणजे श्रद्धेचा अर्थ तरी काय असावा? ह्या प्रश्नाला समर्पक आणि सम्मिलित असं साधं उत्तर नाही.”

“ह्यापेक्षा जास्त मी तुमच्याशी सहमत होऊंच शकणार नाही.”
असं म्हणून राधिका पुढे म्हणाली,
“मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतली माझी शिक्षीका प्रशंसा करण्यालायक होती. तिची जी श्रद्धा होती त्यावर तिचा विश्वास होता.मी ज्या शाळेत संगीत शिकायला जायचे त्या बाईंचं पण तसंच होतं.माझा सुद्धा माझ्या मनात जी श्रद्धा आहे त्यावर पूर्ण भरंवसा आहे.”

मी राधिकेला म्हणालो,
“विश्वास बसावा अशी क्षमता असलेल्या आणखी अनेक प्रकारच्या श्रद्धा आहेत.उदा.लोकांवरची श्रद्धा.मला नेहमीच वाटत असतं की लोकांमधे वाईटपणा ऐवजी चांगूलपणाच जास्त असतो.आणि म्हणूनच लोकशक्तिवर माझा विश्वास आहे.लोकशाही किंवा लोकशक्ति हा शब्द वापरायला मी थोडासा कचरतो.
कारण अलीकडे त्या शब्दाचा अर्थ थोडा विकृत झाला आहे.पण माझी खात्री आहे की खरा लोकशक्तिचा अर्थ,योग्य समय आल्यावर,स्पष्ट होईलच.
आणि म्हणूनच माझी तरी समयावर श्रद्धा बळावली आहे.”

“घरातली मुलभूत मुल्य,कुटूंब आणि जवळचे ह्यांच्यात आपली श्रद्धा असणं स्वाभावीक आहे.मला हवंय आणि मला जरूरी पण आहे ती आहे प्रेमाची, सुखकर सहचर्याची,आदराच्या स्वीकृतिची. मी कुणाला नेहमी हवी,हवी व्हावं असंही मला वाटत असतं.”
राधिका आपला मुद्दा सांगू लागली.
“ही मुल्य त्यामधून,श्रद्धा साधतात. आणि त्यामुळे जीवनातल्या संघर्षाशी दोन हात करायला मला मजबूती आणतात. आशा-निराशा,आशाभंग आणि आश्वासनं असले प्रकार जीवनात येतच असतात.”

मला आणखीन एक श्रद्धा आठवली.मी म्हणालो,
“स्वतःबद्दलची पण श्रद्धा असते.ह्या श्रद्धेचं रूपांतर अहंकारी आत्मविश्वासात किंवा वयक्तिक मिथ्याभिमानात होता उपयोगी नाही.परंतु,जीवन जगताना कुशल आत्मविश्लेषण केल्याने सुरवातीपासूनच चुका होण्यापासून प्रतिबंध आणला जातो.तरीपण नम्रता बाळगून ठेवायला सततची सतर्कदृष्टी असावी लागते.”

माझं हे ऐकून राधिका थोडी विचारात पडली.तेव्हड्यात आत जाऊन येते असं म्हणून,येताना दोन चहाचे कप घेऊन येत एक माझ्या हातात देत मला म्हणाली,
“मी मला स्वतःला जर का योग्य दृष्टीकोनातून पहात राहिले तर असं जीवन जगणं कठीण होणार नाही.होऊन गेलेले, असलेले,आणि होणार्‍या अब्जावधी लोकांपैकी मी एक आहे.पण मी आणि माझी श्रद्धा काहीतरी उपयुक्त असं,मग ते कितीही सामान्य का असेना, पण अविरत प्रयत्न करून, त्याची जीवानात भर घालण्यात निभावले तरी मी म्हणते फत्ते.
भावी जीवनावर माझा भरंवसा आहे.सध्याची अवस्था असलेल्या जगात जिथे धर्म,सामाजिक धारणा,आर्थीक सिद्धांत, राजकीय उद्देश,आणि वयक्तिक महत्वाकांक्षा,आहेत तिथे श्रद्धा असण्याची असीमित आवश्यक्यता आहे.हे जग असंदिग्ध सौजन्य आणि असाधारण प्रतिभा असलेल्या लोकांनी पावन झालेलं आहे.माझी श्रद्धा आहे की कधी कठीण प्रसंग शिरोबिन्दुला येऊन पोहचल्यास हे लोक नक्कीच नेतृत्व उद्भवायला कारणीभूत होतील.इतिहासाने त्या श्रद्धेचं औचित्य सिद्ध केलेलं आहे.”

“वा! वा! बहूत अच्छे! होऊन जाऊदे.आज तुझ्या अंगात प्रोफेसरांचं वारं शिरलेलं दिसतंय.ऐकीन तेव्हडं कमी आहे.”
असं मी म्हणताच,मला राधिका म्हणाली,

“शेवटी मला सांगायचं आहे की श्रद्धेतच मला श्रद्धा आहे.वादळी वातवरणातली ती एक नांगर आहे.हवेतसे वारे वाहोत, वीजा चमकोत,गडगडाट होवो आणि प्रचंड वृष्टी होवो श्रद्धेवरची श्रद्धा मला नेहमी स्मरणच देत राहील की पुन्हा सूर्य तळपेल,तारे पुन्हा प्रकट होतील,आणि रात्रंदिवसातली वार्‍याची शांत झुळूक पुन्हा एकदा अस्तित्वात येईल.”

चहाचा शेवटचा घोट घेत मी राधिकेला म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“अभेद्य काळोखात सुद्धा माझी श्रद्धा दैदिप्यमान असेल.”

माझ्या हातातला चहाचा रिकामा कप घेत,उठता उठता राधिका म्हणाली,
“ह्याच आदर्शाच्या शोधात मी होते.आणि भविष्यात पण त्याच आदर्शाच्या शोधात मी राहिन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com