Tuesday, April 13, 2010

माळरान.

“अजून जीवनात खूप शिकायचं आहे.आणि त्याचा विचार करायचा आहे.पहाटेच्यावेळी आजोबांबरोबर त्यांच्या माळरानात जाऊन विचार येत होता अगदी तसाच विचार मी म्हणतो.”

“माझ्या आजोबांबरोबर त्यांच्या दूरच्या माळावर पहाटे उठून त्यांच्याबरोबर जायला मला खूप आवडायचं.माळ संपता संपता माळरान लागतं.आणि माळरानाच्या पलीकडे झाडांनी गच्च भरलेल्या डोंगराचा पायथा लागतो.पायथ्याशी पोहचल्यावर डोकं उंच करून वर पाहिल्यावर घनदाट अरण्य असेल असा भास व्हायचा. पण डोंगर चढून खरोखर वर जायला लागल्यावर,करवंदाची झुडपं,गावठी आंब्यांची उंचच उंच झाडं,लांबून काळीभोर दिसणारी पण हातात घेतल्यावर जांभळ्या रंगाची टपोरी जांभळं असलेली उंच जांभळाची झाडं,सळसळत्या पानांची पिंपळाची झाडं,असं दृष्य पाहिल्यावर का वाटू नये की वर घनदाट अरण्य असावं म्हणून?”

अरूण दातार आता जुहूला एका बंगल्यात आपल्या उद्योगपति मुलाबरोबर निवृत्तिचं आयुष्य जगत आहे.कोकणात तो लहानपणापासून शिकला,मोठा झाला आणि शिक्षक म्हणून एका शाळेतून निवृत्त झाला.तो आता लहान-सहान लेख लिहीतो आणि कविता करतो.कोकणातल्या जीवनाचा त्याच्यावर एव्हडा पगडा आहे की कवितेत किंवा लेखात कुठे ना कुठे त्या जीवनाचा उल्लेख आला नाही असं होत नाही.
माझ्याशी गप्पा मारताना मला आपलं लहानपण वर्णन करून सांगत होता.
मला म्हणाला,
“ह्या उन्हाळ्यात तू माझ्याबरोबर नक्कीच ये म्हणजे मी काय म्हणतो त्याची सत्यता तुला कळेल.”

“मी नक्की येईनच पण आता तू मला तुझ्या आठवणी सांग.मला ऐकायला आवडेल”
असं मी म्हणाल्यावर,थोडा रंगात येऊन अरूण मला सांगायला लागला,
“चालून चालून माणसानी बनवलेल्या पायावाटांवर चालताना पाया खाली सुकून पडलेल्या पानांचा पाचोळा जेव्हा चूरचूर आवाज करतो,तेव्हा वाटतं हलक्या पावलांनी चालणं अगदीच अशक्य आहे.चालतानाची चूरचूर ऐकून रंगीबेरंगी सरडे आणि सरपटणारे प्राणी जीव वाचवायला वाट दिसेल तसे पळत रहायचे.कधी कधी जवळच दिसणार्‍या झाडावर सरसर चढून कुठच्या तरी फांदीच्या मागे दडून बसायचे.”

“तो डोंगर,ते माळरान आणि ते घनदाट अरण्य पाहिल्यावर खरोखरंच वाटतं की ही काहीशी अद्भूत आणि अखंड असं वातावरण देणारी जागा असावी.”
मी अरूणला म्हणालो.

“आमच्या बरोबर असणारा आमचा घरगडी कमरेला पट्टा बांधून कमरेच्या उजव्या अंगाला कोयता लटकवीत डोक्यावर रिकामी टोपली घेऊन आमच्या मागोमाग यायचा.जांभळांनी गच्च भरलेल्या एखाद्या जांभळाच्या झाडावर त्याला चढवून आजोबा त्याच्या कडून जांभळाचे भरीव घोस काढून त्याने स्वतः बरोबर नेलेल्या टोपलीत जमा करून झाडाच्या एखाद्या मजबूत फांदीचा रहाटासारखा उपयोग करून,सुंभाच्या दोरखंडाच्या साह्याने जांभळं न फुटता खाली आणून घ्यायचे.”
“मग एव्हडी जांभळं तुम्ही काय करायचा?”
मी त्याला प्रश्न केला.

“घरी नेल्यावर सर्व जांभळं स्वच्छ धूऊन त्याचा रस काढून ग्लास ग्लास भरून आम्हा सर्वांना ते प्यायला द्यायचे.माझ्या आजीला हा जांभळाचा रस खूप आवडायचा.हा रस पिण्यामुळे मधूमेह होत नाही असं ती म्हणायची.”

माझ्या प्रश्नाचं उत्तर देत अरूण पुढे सांगायला लागला,
“अर्थात हे उन्हाळ्याचे दिवस असायचे.आमच्या शाळांना चार महिन्याची सुट्टी असायची.हा उन्हाळ्याचा एक मे महिना आणि पावसाळ्याचे तीन महिने मिळून ही सूट्टी असायची.विद्यार्थ्यांपैकी बरेचजणांची शेती असल्याने पावसाळ्याच्या सुट्टीत शेतीकामासाठी त्यांच्या सूट्टीचा घरच्यामाणसांना उपयोग व्हायचा.
अशाच वेळी आणि अशाच जागी शाळेच्या वेळापत्रकाच्या बंधनाच्या सक्तिपासून आणि शाळकरी जीवनाच्या शाळेतल्या संपर्कापासून दूर रहाण्याचा आम्हाला लाभ व्हायचा.”

मी म्हणालो,
“मग आता तू स्वतःहून माळरानावर जात असशील नां?”
“हो तर,जेव्हा इकडे राहून मला कंटाळा येतो तेव्हा माझा मुलगा स्वतः गाडी चालवत मला इकडे आणून सोडतो.”
असं सांगून अरूण जरा भावनावश झाला.थोडावेळ थांबून मला म्हणाला,
“आता माझ्या आजोबांच्या माळरानावर पहाट असताना तिकडे गेल्यावर जे प्रश्न माझ्या मनात येतात ते पाहून माझ्या ह्या निवृत्त जीवनामुळे हे प्रश्न माझ्या मनात येत राहत असावेत असं मला सारखं वाटत असतं:
मी जो आता आहे ते पाहून माझ्या आजोबाना माझा अभिमान वाटला असता का?
माझ्या आजीचं माळावर रहाण्याचं त्यांना तिने दिलेलं वचन काही दिवसानी ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाळू शकली नाही.हे त्यांना माहित होतं का?
आजीचं आता काही खरं नाही.लवकरच ती त्यांना भेटणार आहे,त्याचा विचार येऊन मला किती दुःख व्हायचं ते त्यांना माहित आहे काय?”

“मग आता पुढे काय”
असं मी विचारल्यावर मला म्हणाला,
“हे माळरान आता त्या दोघांच्या पश्चात आणि नंतर माझ्या पश्चात इथेच रहाणार आहे.ह्या माळरानावर माझ्या आजोबांनी जूनी झालेली झाडं पाडून त्याचं जमलेलं लाकूड जमा करून ठेवण्यासाठी लाकडाची वखार बांधली होती. जरूरी प्रमाणे आंबे,फणस घरात ठेवून उरलेली फळं विकण्यासाठी ठेवायला त्यांनी एक पडवी बांधली होती.गावातले व्यापारी त्या पडवीवरून ती फळ योग्य सौदा करून विकण्यासाठी घेऊन जात असत.

शेतातून आलेली पिकं-तांदूळ,तूरडाळ,कुळीथ-माझी आजी भागेल्यांकडून मोजून घेऊन स्वतः त्यांच्याशी पैशाचा व्यवहार करून निभावून न्यायची.
आंब्या,फणासाचं पीक अतोनात आल्यावर घरातल्या काम करणार्‍या बायांकडून रस काढून घेऊन आंब्या आणि फणसाची साठं-पोळी-उन्हात सुकवून घरात आल्यागेलेल्याला खायला द्यायची.
कच्चे आंबे-कैर्‍या-आणि रेडेलिंब झाडावरून काढून मोठ्या चिनीमातीच्या बरण्यांत लोणच्यासाठी मुरवायला ठेवायची. आता त्या कंबरेपर्यंत उंच बरण्यां धूळ खात पडल्या आहेत.
आजोबांनी मला छेर्‍याची एक डबल-बार बंदुक देली होती.मला माळरानांत नेऊन कवडे मारण्यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा ते त्यांनी शिकवलं होतं.आता ती बंदूक माडीवर दोन खूंट्याचा आधार घेऊन तिथेच पडून आहे.”

मी अरूणला म्हणालो,
“मला वाटतं,डोंगरातली ही सर्व झाडं बदलत्या ऋतूत जशी बदलत असतात तशीच परिस्थिती तुझ्या आजी, आजोबात, आणि तुझ्या कुटूंबात आली असावी.”

“अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं”
असं म्हणून अरूण सांगू लागला,
“माझ्या आजीच्या उतारवयात तिचा सांभाळ करण्यासाठी माझ्या आईकडे असलेला तिच्याबद्दलचा कळवळा आणि कणव हा जणू भर उन्हाळ्यात दुपारच्यावेळी माळरानातल्या झाडांमधून सूर्याचं ऊन शिरून त्यांचं पोषण करतं, तशातलाच प्रकार होता.माझ्या मामाच्या अचानक निधनानंतर घरात आलेलं वातवरण रानाला आग लागल्यानंतर वाटावं अगदी तसाच अनुभव होता.

आता माझी आजी निर्वतल्यानंतर,थंडीच्या दिवसात पहाटेच्यावेळी डोंगराच्या पायथ्याशी जाऊन उभं राहिल्यावर उघडी-बोडकी फळंविरहीत आंब्या-फणसाची झाडं पाहून भकास वाटावं तसं वातावरण आमच्या घरात झालं आहे.माझ्या लहानपणी काही वेळा इतर संवगड्याच्या नादाला लागून क्रिकेट खेळण्याच्या ओढीमुळे गावातल्या मैदानात खेळायला गेल्यामुळे माझ्या आजोबांबरोबर माळरानात न गेल्याने त्यांच्या सहवासाला मुकावं लागलं ह्याची मला बरेच वेळा खंत होत असते.”

“मला वाटतं,ह्या माळरानातच तुझ्या आजोबांनी तुला पूर्णत्व आणलं. घराच्याबाहेर पाऊल टाकल्यावर जीवन काय आहे ते त्यांच्या कडून तू शिकलास.”
मी अरूणला धीर देत म्हणालो.

मला म्हणाला,
“अजून जीवनात खूप शिकायचं आहे.आणि त्याचा विचार करायचा आहे.पहाटेच्यावेळी आजोबांबरोबर त्यांच्या माळरानात जाऊन विचार येत होता अगदी तसा विचार मी म्हणतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com