Monday, April 26, 2010

सुखावलेल्या स्मृति.

“अलीकडे मी जेव्हा,जेव्हा तुझ्याकडे यायचो त्यावेळी तुझ्या आजीशी बोलताना माझ्या लक्षात यायचं की दिवसे दिवस ती असंबंध बोलायची.”
मी सुरेखाला म्हणालो.
“एकदा तर तिने माझ्यासाठी दरवाजा उघडून चक्क विचारलं,
“तुम्ही कोण?”
त्याच वेळी मी समजलो तुझ्या आजीला अल्झाईमर सारखं काहीतरी झालं आहे.”

मला हे सुरेखाला सांगावं लागलं जेव्हा ती मला म्हणाली,
“माझी आजी जसजशी वयस्कर व्हायला लागली तसं मला वाटायला लागलं की तिच्या मनात खोड-रबराने बस्तान माणलं आहे आणि तो खोड-रबर हळुहळू तिचं स्मरण खोडायला लागला आहे.माझी आजी माझ्या आजोबांना, मुलांना आणि आपल्या नातवंडांना आठवूं शकत नव्हती.”

“अल्झाईमर ह्या रोगाला, म्हातार्‍या वयात लागलेलं “बाळं” असं कोकणात म्हणतात.ह्या रोगाने अगदी जर्जरलेली व्यक्ति लहान मुला सारखी-बाळा सारखी- वागते.”
सुरेखाला “बाळं” कशाला म्हणतात हे मी समजावून सांगत होतो.
“ह्या वयात हा रोग होण्याची अनेक कारणं असू शकतात असं शोध घेणारे म्हणतात.आणि हा रोग उतार वयात जास्त होतो.६५ आणि ७४ ह्या वयात जास्त होतो.त्याचं प्रमाण ३ टक्के आहे.७५ पेक्षा जास्त वयात प्रमाण १९ टक्क्यावर जातं.आणि ८५ हून जास्त वय असलेल्याना ४७ टक्के धोका असतो.”

सुरेखा आपल्या आठवणी जागृत करून मला म्हणाली,
“मला आजीकडे पाहून दुःखं व्ह्यायचं.मी तिला भेटल्यावर एव्हडाच प्रयत्न करायची की मी तुझी नात म्हणून तिला सांगायची.पण ती पटकन विसरून जायची.पण तिच्या चेहर्‍यावरचं हास्य मोहक असायचं.अगदी लहान मुल हंसल्यासारखं तिचं हसूं असायचं.माझं नाव सांगीतलं की ते परत परत म्हणायची आणि मान हलवून लक्षात आहे असं भासवायची.”

“अगदी बरोबर”
असं सांगून मी तिला म्हणालो,
“लक्षात राहत नाही.दुवा जोडता येत नाही.विचारलेला प्रश्न कदाचीत कळत नसल्याने संदर्भासहीत उत्तर देता येत नाही. शरीराला लागणार्‍या क्रिया-प्रातर्विधी,जेवण,आंघोळ- केल्या की नाही हे लक्षात रहात नाही.सगळे वागण्याचे प्रकार अगदी लहान बाळा सारखे असतात.”

सुरेखाला आपल्या आजीची आठवण येऊन खूपच वाईट वाटत होतं.
मला म्हणाली,
“नशिब म्हणायचं की माझी प्रेमळ आजी माझ्यावर तिची छाप ठेवून गेली.कदाचीत आपल्या नातीची छाप तिच्यावर पडण्या अगोदर ती देवाघरी गेली असावी.माझी आजी साधी होती पण ती चौकस होती. ती कुणी सांगीतलं तर सहजासहजी विश्वास ठेवायची.
आणि कुणाचं वाईट ऐकलं की सहानुभूती दाखवायची.”

सुरेखाला धीर द्यावा म्हणून मी तिला म्हणालो,
“गतकालाला एकटच सोडून द्यावं.कारण आता तो अस्तित्वातच नसतो.तरीसुद्धा चांगल्या स्मृति आपण जोपासून ठेवायला हव्यात.
ज्या गोष्टी आपण आपल्या स्मृतित कोरून ठेवल्या असतात आणि ज्या स्मृति आपण विसरून जायला हव्यात त्या दोन्हीही आपल्या मनात मागमूस ठेवून असतात.कधीकधी,जून्या आठवणी असण्यात परमानंद असतो.जून्या अनुभवांचे लहान लहान तुकडे जुळवून एखादं कोडं तयार केलं जाणं त्यालाच स्मरण म्हटलं पाहिजे.जशी ज्योत प्रकाशाचा गाभा असतो तसंच स्मरण हे आत्म्याचं आहे.ज्योतीविना प्रकाश तळपायचा कसा?”

हे ऐकून सुरेखा बरीच आनंदी दिसली.मला म्हणाली,
“मी दहा वर्षाची होईतो मी माझ्या आजीच्या सहवासात होती.तिच्या सहवासात राहून आनंददायी आठवणी ती माझ्याजवळ ठेवून गेली. माझ्या

आईबाबांइतकीच ती माझ्या जवळची होती.कुणालाही स्मरणशक्ति उजळण्यात आनंद होत असतो.माझी आजी सकाळीच उठून ताजं ताजं जोंधळ्याचं पीठ काढण्यासाठी जात्यावर बसून ओव्या म्हणायची त्या दिवसभरात मी कधी कधी त्यातली एखादी ओवी गायचे, ते ऐकून ती एव्हडी खूश व्हायची की मला जवळ घेऊन परत गायला लावायची.

मला वाटतं,आठवणी खरंच रम्य असतात.
माझी आजी माझ्या परकरातल्या नाड्या ओवायची,ब्लाऊझची तुटलेली बटणं शिवायची.

आठवणी खरंच जीवघेण्या असतात.
मी माझ्या आजीला तिच्या हाताला धरून ओढून ओढून माझ्या दोन वेण्या घालायला मदत मागायची.

मला वाटतं आठवणी स्फूर्तीदायक असतात.
मला आठवतं ती कधी बाजारात गेली तर माझ्यासाठी सोनचाफ्याची फुलं,ओवळीचे आणि बकुळीचे सर,किंवा आबोलीच्या वेण्या आणून मला जवळ बोलावून माझ्या डोक्यात माळायची.

खरंच मला वाटतं आठवणी सप्तरंगी इंद्रधनुष्यासारख्या असतात.
डोळे ओले झाल्यावरच इंद्रधनुष्य दिसायला लागतं.”

“स्मृति किती लक्षवेधक असतात सांगू.”
असं म्हणून, सुखावलेल्या स्मृतिचा आस्वाद घेत घेत सुरेखा स्वतः सुखावल्याचं पाहून मी तिला पुढे म्हणालो,
“स्मृतिशिवाय गतकालाला कुणीही स्पर्श करू शकत नाहीत.मला वाटतं आठवणी वेदनादायक असतात.तरीसुद्धा त्या आपल्याला वाढू देतात.आपण स्मृतिहीन झालो की आपली अवस्था नवजात मुलासारखी होते. मला वाटतं स्मृतिमुळेच आपल्या चेहर्‍यावर भाव दिसतात.मला वाटतं आठवणी असे पर्यंतच आपण आनंदित असणार.”
शेवटी सुरेखा मला म्हणाली,
“माझी आजी गेल्यावर मी खूप रडले.कायम राहायला मी तिला सांगू शकत नव्हते हे मला माहित होतं,पण माझ्या स्मरणात ती कायमची आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com