Thursday, October 28, 2010

सुधाताईची आजी.

“कुणीतरी म्हटलंय,
असं जीवन हे अपूर्व जीवन असतं,अगदीच थोडक्याच वेळात बरंच शिकण्यासारखं हे जीवन असतं.”

सुधाताईची आजी बॅण्ण्व वर्षाची झाली हे मला अलीकडेच कळलं.आणि तशात तिला स्मृतिभ्रम झाला आहे हे आत्ताच सुधाताईकडून कळलं.वाटलं आपण सुधाताईकडे जाऊन आजीला भेटून यावं.ती मला ओळखेल की नाही असं मनात आलं.पण तिने मला चांगलंच ओळखलं.मला बरं वाटलं.

सुधाताई बोलताना मला म्हणाली,
“घरात वृद्धावस्थेत असलेल्यांची-जेव्हा त्यांना स्वतःचीच काळजी घेणं शक्य होत नाही अशांची- सेवा करायला मला खूप आनंद होतो.
बोलायला सोपं आहे पण मी “शंभर गोष्टी” करण्याच्या यादीतून-जशा मी तुमच्यावर खूप माया करते असं मुलांना सांगावं,दारात आलेल्या पाहूण्याची विचारपूस करावी-अशा यादीतून ही गोष्ट निवडीत नाही.वृद्धावस्थेत असलेल्या लोकांची सेवा करणं म्हणजे जीवन कसं जगावं हे दाखवून दिलं जातं असंच नाही तर, मी पूर्ण विश्वास ठेवते की तेच खरं जीवन आहे.”

मी सुधाताईला म्हणालो,
“तुझ्या आजीला एकाएकी असं काय झालं?”

मला ती म्हणाली,
“माझी आजी बॅण्णव वर्षांची आहे.ती कित्येक दिवस माझ्या मामाकडे रहात होती.ती कित्येक दिवस स्मृतिभ्रमाने आजारी असावी.तिला स्मृतिभ्रम होत असल्याची लक्षणं मला अलीकडे दिसायला लागली त्यापूर्वी मला कल्पना नव्हती. ह्या रोगाबद्दल मला थोडीशी माहिती आहे.वृद्ध मंडळी आपल्या भ्रमात घरातून बाहेर पडून हरवली जायची असं मी ऐकलंही होतं.पण माझी आजी तशी नव्हती. माझे आजोबा गेले त्यानंतर माझ्या आजीने स्वतःचं छोटसं जग निर्माण केलं होतं.एकटेपणापासून तिने आपला सुटकारा करून घेतला होता.आपल्या दोन मुलांबद्द्ल-म्हणजे माझ्या आईबद्दल आणि माझ्या मामाबद्दल-फिकीर करीत असायची.”

हळू हळू तिच्या मनात भ्रम निर्माण व्हायला लागला. एकटीच बसून रहायची.मला वाटायचं तिच्या तिच त्याला कारण असावी.ती आपल्या मेंदूला त्रास द्यायला तयार नसावी.तिलाच लोकांना-अगदी तिच्या वयाच्या-भेटायला आवडत नसायचं.

जसं मी मागे वळून पहायला लागली तसा तो काळ मला आठवायला लागला.मी तिची खुशामत करायची पण माझ्या म्हणण्याला मिळणारी तिची ती निष्क्रिय,आक्रमणशील सहमति पाहून,आता माझा मलाच अंचबा वाटायला लागला की मी स्वतः माझ्या आजीला किती अल्प ओळखायची. त्यावेळी माझ्या ध्यानातही आलं नाही की माझी आजी मोहक तर होतीच त्याशिवाय तिचा स्वभाव गुंतागुंतीचाही होता.”

हे सुधाताईचं ऐकून मला एक किस्सा आठवला.मी तिला म्हणालो,
“तुझी ही वृत्ति पाहून मला तो विनोद सांगीतल्याशिवाय राहवत नाही.
त्या तरूण नातवाला आपल्या आजोबांना जीवनाची सूत्रंच कळलेली नाहीत असं वाटायचं.जोपर्यंत हा तरूण वर्षभर कुठे जाऊन आला नव्हता तोपर्यंत,पण तो जाऊन आल्यानंतर आपले आजोबा किती सुधारले आहेत ते त्याला कळून आल्याने तो चकित झाला.तुझं तुझ्या आजीबद्दलचं मत असंच सुधारलं असावं.”

माझं म्हणणं ऐकून सुधाताई जरा खजील झाल्यासारखी दिसली.मला म्हणाली,
“अलीकडे बरीच वर्ष माझी आजी माझ्या आईकडे रहात आहे.त्यावेळी आईकडे जाउन रहायला तिला कष्टदायी विस्थापन वाटलं होतं.पण नंतर काही वर्षांनी ती स्थिर झाली.सर्व काही चांगलं चालत होतं.तिची तब्यत सुधारली होती.आणि माझी मदत घेऊन ती आपल्याला सांभाळून रहायची.कधी कधी तिचा स्मृतिभ्रम पाहून मला वैताग यायचा.मी बरेच वेळा तिच्या विचारांची विसंगति पाहून हर्षित व्हायची. माझं मन दुखे पर्यंत ती मला हंसवायची. तिचा तो शब्दाचा अनभिप्रेत दुरोपयोग,हिंदी शब्दाचा खरा अर्थ आणि तिच्या मनाने ठरवलेला अर्थ, आणि ती हिंदी भाषा समजण्याची अपात्रता : उदाहरणार्थ,आम्ही कुणी घरी नसताना जर का फोन आला तर ती घ्यायची.
एकदा अशाच फोनवरच्या विक्रेकराच्या बोलण्याला प्रतिसाद देताना “चीनी” ह्या शब्दाची ती गफलत करीत होती.
तो चीनी-मातीच्या भांड्यांच्या सेटबद्दल बोलत होता,आणि हिला चीनी म्हणजे साखर विकण्याबाबत वाटत होतं.मी आणि माझी आई,नेहमीच आजीच्या “मग”-म्हणजे नंतर- आणि “mug”-म्हणजे प्याला- ह्या शब्दातल्या अर्थाला आणि त्याच्या साम्य उच्चारातून होणार्‍या घोटाळ्यातून होणार्‍या विनोदाला पोट दुखे पर्यंत हंसायचो.अर्थात त्या हंसण्यामुळे तिच्या मनाला दुखू न देण्याच्या प्रयत्नात असायचो.
माझी आजी दोनयत्ता शिकलेली होती.पण ती कविता करायची.

आता ह्या वयात तिचा शरिरांच्या अवयवांवरचा ताबा गेला आहे.जेमतेम संपर्क साधते.बरेच वेळा मनातून घोटाळलेली असते, उदास असते,घाबरीघुबरी झालेली असते.पण माझ्या आजीची सेवा करणं म्हणजे माझ्या जीवनाशी माझा सामना आहे असं मी समजून असते.त्यात बड्पन आलं,वेदना आल्या,समस्या आल्या,विसंगति आली,दुःखान्त घटना आली आणि हो!
प्रसन्नता आणि आनंद पण आला.ह्यालाच मी खरं जीवन समजते.मृत्यु्कडे रोजच एकटक पाहिल्यासारखं हे जीवन आहे.”

उठता उठता मी म्हणालो,
“कुणीतरी म्हटलंय,
असं जीवन हे अपूर्व जीवन असतं,अगदीच थोडक्याच वेळात बरंच शिकण्यासारखं हे जीवन असतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com