Sunday, October 24, 2010

माझा मोत्या.

“चवदा वर्षं माझ्या घरात राहून माझ्या मोत्याने मला जबाबदारीने कसं रहावं हे शिकवलं असेलच.पण त्यापुढे जाऊन मला त्याने जगावं कसं हे ही शिकवलं.”

सुरेशने मला आज खास घरी बोलावलं होतं.मी त्याला माझ्या घरी भेटलो नाही.पण त्याने घरी मला निरोप ठेवला होता. कशासाठी ते मला घरी आल्यावर कळेल असंही माझ्या पत्नीकडे सांगून गेला होता.
मी ज्यावेळी त्याच्या घरी गेलो तेव्हा तो त्याच्या हॉलमधे एका मोठ्या फ्रेममधे कुत्र्याच्या फोटोला हार घालून त्याच्या समोर बसलेला पाहिला.
मी विचारण्या पूर्वीच मला म्हणाला,
“आज मोत्याला जाऊन पंचवीस वर्षं झाली.दरवर्षी तो गेल्यापासून मी असाच एकटा त्याच्या फोटोला हार घालून त्याच्या समोर बसून,त्याच्या जुन्या आठवणी काढून तो दिवस संपवतो.”

“मग आज मला बोलावण्याचं काय खास कारण?”
मी सुरेशला विचारलं.

“मी लहान असताना माझ्या आईकडे मला एक कुत्रा हवा म्हणून हट्ट धरला होता.तुम्हीच तुमच्या एका मित्राकडून मला एक पिल्लू आणून दिलं होतं.माझ्या आईला समजावणं महाकठीण काम तुम्ही केलं होतं.आज मोत्याला जाऊन पंचवीस वर्षं झाली.त्यावेळची ती घटना लक्षात आल्यावर तुमची आठवण आली.”
मला सुरेश आठवण काढून काढून सांगत होता.

“मोत्या गेल्या नंतरच्या माझ्या आयुष्यात मला त्याच्याबद्दल काय काय आठवलं ते तुम्हाला सांगायला हाच दिवस योग्य आहे असं वाटून तुम्हाला माझ्या मनातले विचार जास्त भावतील असं वाटून मी तुम्हाला बोलावलं.”

“सांग,सांग मला ऐकायला आवडेल”
मी सुरेशला म्हणालो.

“जीवन सुखाने कसं जगावं ह्याबद्दल हवी असलेली सर्व माहिती मी माझ्या मोत्याकडून शिकलो.आता तो या जगात नाही.
मी तर म्हणेन कुणालाही त्यांच्या मुलांनी जबाबदारी घेऊन कसं रहायचं हे शिकवायला हवं असेल तर त्याच्यासाठी एखादा कुत्रा घ्यावा.पारंपारिक विवेक हेच शिकवतो.निदान माझ्या बाबतीत हे खरं ठरलं आहे.”
सुरेश सांगत होता.

“पण माझ्या मोत्याने मला बेजबाबदारीबद्दल पण जादा शिकवलंय,जे कुणा दुसर्‍याला माहित नसावं.
जेव्हा मी आठ वर्षाचा होतो,तेव्हा मी माझ्या आईला-जी घरात कुठचाही प्राणी ठेवायला घृणा करायची-समजावण्याच्या प्रयत्नात होतो की मला घरात एक कुत्रा हवाय म्हणून.आणि तुम्ही ते काम केलंत.
मोत्या केसाळ होता.आणि खूप प्रेमळ होता.ह्या व्यवहारातून मी एक शिकलो की माझी आई सौदा करण्यात बरीच चौकस होती.

मोत्या त्याच्या चवदा वर्षावर हे जग सोडून गेला.तो पर्यंत तो बराच म्हातारा झाला होता.प्राण्यांच्या डॉक्टराची आणि आईच्या संमतीची त्याने मुळीच मदत घेतली नाही.तो गेला त्या वयात त्याला बराच गॅस व्हायचा.त्या त्याच्या वयात मी कॉलेजात असल्याने,माझ्या आईनेच त्याची देखभाल केली होती.

पण त्यापूर्वी जवळ जवळ दहा वर्षं रोज दोनदा मी मोत्याला पावसात,थंडीत,उन्हाळात बाहेर फिरवून आणायचो.मी त्याला आंघोळ घालायचो,त्याच्या केसावरून ब्रश फिरवायचो आणि त्याची देखभाल करायचो.मला तो मित्रासारखा होता.माझा त्याच्यावर भरवंसा होता.
पारंपारिक विवेक जसं पुर्वानुमान काढील अगदी तसं मी जबाबदार तरूण कसा असावा तसा होतो.मी लग्न केलं.मला दोन मुलं झाली.गेली तिस-पस्तिस वर्षं रोज मी माझ्या जॉबवर जातो,घाईगर्दीच्या प्रवासातून वाट काढीत शिष्टाचार बाळगून जातो,मिटींग्सना नियमीत हजर रहातो,ऑफीसचं बजेट सांभाळतो, ऑफीसमधल्या सहकार्‍यांकडून होणार्‍या वयक्तिक समस्या-कदाचीत ते लहान असताना एखादा कुत्रा संभाळण्यापासून वंचीत झाले असल्याने उदभवणार्‍या समस्या-सोडवतो.

कुटूंबाच्या पोषणाच्या,कपडालत्याच्या,मुलांच्या कॉलेज शिक्षणाच्या आर्थीक जबाबदार्‍या संभाळून असतो. त्यांच्याकडून होणार्‍या चुकांच्या पण जबाबदार्‍या घेतो.वेळ आल्यावर घरात पत्नीला कामाला मदत पण करतो. कुटूंबातल्या कुणाच्याही वेळी-अडचणीला अंगमेहनत आणि हातमेहनतीलासुद्धा पुढे येतो.मला वाटत नाही की ह्या पेक्षा आणखी किती जबाबदार्‍यांना मी पुढे आलो असतो.

परंतु,प्रारंभापासून,माझ्या मोत्याने मला परिचय करून दिलेल्या,त्या सुखाने जगायच्या, गुढ आकांक्षांचा पाठपुरावा मी करीत राहिलो.
मोत्या कधीच संबंध दिवस कामात नसायचा.त्याने कधीच अंशतःही काम केलं नाही.एक पैसापण कमवला नाही. काही उपयोगी कामही केलं नाही.कधी लग्न केलं नाही,मुलंही झाली नाहीत.आणि त्यांची देखभालही केली नाही.कधी ट्रॅफिकमधे अडकला नाही,कुठच्याही मिटिंगमधे भाग घेतला नाही,बजेट संभाळलं नाही.एखादं वर्तमानपत्र वाचलं नाही की पुस्तक वाचलं नाही.टीव्ही पहाण्यात मोफत वेळ घालवला नाही की आतंगवाद्यांच्या काळजीत राहिला नाही.”

सुरेशला थोडंसं भावनाप्रधान होताना पाहून थोडी गंमत आणण्यासाठी मी म्हणालो,
“फक्त कदाचीत नंतरचं कुठचं झाड शोधू ह्या काळजीत राहिला असेल.आणि ते करतानासुद्धा प्रदुषणाचा काय असर होईल ह्याचा नीट विचार करीत राहिला असेल.”

सुरेशला हे ऐकून भडभडून आलं.मला डोळे पुशीत म्हणाला,
“माझा मोत्या,संपूर्णपणे,भाबडेपणाने आणि सुंदर ढंगाने बेजबाबदार राहिला.तो जसा होता आणि ज्यासाठी होता तसा मी त्याच्यावर प्रेम करायचो.

तुम्हाला माझ्याकडून ऐकून अचंबा वाटेल की, मला सदैव माझ्या जीवनातून काय हवं असेल तर,मोत्यासारखं टीव्ही बघताना माझ्या केसाळ पाठीवरून हात फिरवला जावा, सकाळीच समुद्राच्या वाळुतून मोकाट धांवत सुटावं,धो,धो पावसात संध्याकाळच्या वेळी पडवीत अंगाची कळवट करून एखादं शास्त्रीय गाणं कुणीतरी रेडिओवर मोठयाने लावलेलं ऐकावं.
चवदा वर्षं माझ्या घरात राहून माझ्या मोत्याने मला जबाबदारीने कसं रहावं हे शिकवलं असेलच.पण त्यापुढे जाऊन मला त्याने जगावं कसं हे ही शिकवलं.”

शेवटे मी सुरेशला म्हणालो,
“खरंच,माणसाला एव्हडं कळतं म्हणूनच तो सुखी आहे.तुझ्या सारखा एखाद्या पाळीव प्राण्यालासुद्धा माणूस समजून तो जगातून गेल्यानंतर त्याच्या आठवणीतून किती भाऊक होतो हे तुझ्याकडे पाहून आनंद होतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com