Friday, October 1, 2010

“भोजन”, खरा अर्थ हरवलेला शब्द.

“आमच्या कुटूंबात,आमच्या विश्वाचा मध्यभाग म्हणजे आमचं स्वयंपाकघर आणि मध्यभागी ठेवलेलं जेवणाचं टेबल, असं म्हटलं तरी चालेल.मी ज्या वयात शेगडी जवळ उभी राहून चहा करायला शिकले,तिथपासून आतापर्यंत मी माझा जेवणाबद्दचा जोश विकसीत करायला शिकले.”
माझी भाची पुष्पा मला आवर्जून सांगत होती.

त्याचं असं झालं,आम्ही सर्व टेबलावर बसून जेवण करीत होतो.त्यादिवशी कोजागीरी-पौर्णिमा होती.पुष्पा सातबंगल्याला राहायची.वरसोवाचा समुद्र तिच्या घरापासून अगदी जवळ.
मला तसंच तिच्या इतर मित्र मंडळीना बोलावून जेवणं झाल्यावर आम्ही पौर्णिमेच्या पिठूळ चांदण्यात मजा करायला जाणार होतो.बरोबर गरम दुधाची कॉफी घेतली होती.आणि फरसाणही घेतली होती.
जेवताना “भोजन” ह्या शब्दावर चर्चा चालली होती.

मला काहीतरी सांगावसं वाटलं म्हणून मी म्हणालो,
“जेवणातून आपण आपलं एकमेकाबद्दलचं प्रेम आणि जीवनातला आनंद वाटायला शिकतो असं मला वाटतं.माझ्या म्रुत्युशय्येवर मला जर का कुणी प्रश्न केला की माझ्या आयुष्यातल्या सर्वात उत्तम दहा घटना कोणत्या,तर मी नक्कीच सांगेन की, त्यातल्या निदान आठ घटना जेवणाच्या टेबलाभोवतीच्या असाव्यात.मस्त जेवण वाढलेलं असावं आणि माझे प्रेमळ कुटूंबिय सभोवताली बसलेले असावेत अशा घटना.बरेच वेळा,पण नेहमीच नाही,अशा घटना सणावारालाच घडत असतात.”

माझं बोलणं संपता संपता पुष्पा म्हणाली,
“सणावारावरून तुम्ही म्हणता ते मला पटतं.कारण जरी गणपतिचा सण बर्‍याच लोकांचा-इतर पंथांचा आणि धर्मांचा-जरी झालेला असला,तरी त्या उत्सवामागच्या धार्मिक भावना कमी झालेल्या नाहीत.माझे कुटूंबीय अगदी कडक प्रथा पाळून तो सण साजरा करतात.आणि हे सर्व जेवणाभोवती परिभ्रमण होत असतं.

गणपति उत्सव हा काही एकच सण नाही.दसरा सणा दिवशी माझी आई घरगुती श्रीखंड केल्या शिवाय रहात नाही. बरेच दिवस अगोदर भरपूर साय येईल असं दुध आणून,त्याचं दही मुरवून,मग दह्यातलं पाणी काढून घट्ट चक्का करून,त्यात केशर,वेलची,चारोळ्या-पिस्ता टाकून घोटून घोटून चवदार श्रीखंड तयार करते.बाजारातल्या श्रीखंडावर तिचा मुळीच विश्वास नाही.मेहनत पडली तरी चालेल पण तिचा श्रीखंड घरी बनवण्याचा हट्ट ती सोडत नाही. श्रीखंडाबरोबर खांडवा गव्हाच्या पिठाच्या पुर्‍या हव्याच.”

पुष्पाच्या नवर्‍याने आपला विचार सांगितला.तो म्हणाला,
“दिवाळी सण असाच साजरा होतो.त्यादिवशी जरी देवळात जाऊन देवा समोर नारळ फोडून तो देवा जवळ ठेवून उरलेल्या नारळाचा प्रसाद घरात आणून सर्वांना वाटल्यावर मग फराळाची चव घ्यायला सुरवात केली जात असली तरी,सकाळी उठून सुगंधी उटणं लावून आंघोळ करण्यापूर्वी पायाखाली कडू कारीट फोडून “शंभो,शंभो,शंभो असं त्रीवार ओरडून,संकासूराचा वध केल्याचं समाधान झाल्यावर त्या कारटाची कडू चव घेतल्यावरच गरम गरम पाण्याचा तांब्या अंगावर ओतला जातो.ह्या प्रथा न चुकता सांभाळल्या जातात.

दिवाळीचा सण येण्यापूर्वी आठ-पंधरा दिवस अगोदरपासून अनेक गोड पदार्थाच्या फराळाची तयारी मनावर कुठचाही ताण न आणता केली जाते.सर्वच तर्‍हेचे फराळ झाले पाहिजेत याची आवश्यकता न बाळगता त्याचा अनेक तर्‍हांचा संग्रह असला तरी चालतो.अर्थात जितक्या जास्त तर्‍हा तेव्हडं बरंच म्हणा.”

पुष्पा म्हणाली,
“तसे वर्षभरात बरेच सण येतात म्हणा.होळीच्या दिवशी पूरणपोळी,मकरसंक्रांतीला तीळगूळ आणि तिळाचे लाडू, कोजागीरी पौर्णिमेला मसाले दुध, नारळी पौर्णिमेला नारळी भात. एकनादोन असे अनेक सण कोकणात साजरे केले जातात.”

पुष्पा आणि तिचा नवरा आपलं म्हणणं केव्हा संपवतात याची मी वाट पहात होतो.कारण मला “भोजन” ह्या विषयावर जास्त बोलायचं होतं.चान्स मिळताच मी म्हणालो,
“अशा ह्या वेगवेगळ्या सणात कुटूंबीयाबरोबर भोजनकरण्याचा मनातला जोश म्हणजेच मानवी मनातली जडं असून ती खोलवर रुतलेली असावीत. आणि हे जेवणाचं टेबल किंवा पंगत बसण्याची खालची जमीन ही जागा म्हणजे एक पोषण करण्याचं,निर्भयत्वाचं,आणि शांती समाधानीचं स्थान आहे असं म्हणावं लागेल.आणि हा जोश आपल्या भाषेतल्या शब्द्वव्युत्पत्तित एव्हडा खोलवर रुतला आहे की “भोजन” म्हणजेच “साहचर्य” असं म्हणावं लागेल.”

माझं म्हणणं पुष्पाला इतकं पटलं की,ती मला म्हणाली,
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.कारण सतत वापरून वापरून “भोजन” हा शब्द अर्थ हरवलेला झाला आहे. यात सत्य आहे.कारण तुम्ही जे जेवता ते तुम्ही आहात. म्हणून कोण कसं आहे हे समजण्यासाठी,त्यांच्या अंतरात आणि आत्म्यात काय आहे हे समजण्यासाठी, जितकं त्यांच्याबरोबर मैलभर चालून समजणार नाही तितकं त्यांच्या बरोबर जेवणाच्या टेबलावर बसून भोजन केल्यावर समजेल.”

पुष्पाच्या नवर्‍याला समुद्रावर जायची घाई झालेली दिसली.
“चला आपण उठूया.हीच चर्चा गरम कॉफी आणि फरसाणाची चव घेता घेता समुद्वावर जाऊनच बोलूया.”
कल्पना सर्वांनाच आवडली आणि आम्ही सर्व जेवण आटोपून समुद्रावर जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com