Sunday, October 10, 2010

असाच एक खवैय्या आचारी.

“तुम्ही तुमच्या अवघ्या आयुष्यात एकदा जरी एक कप चहा केलात किंवा एक पोळी भाजलीत तरी तुम्ही कळत-नकळत ह्या असामान्य पाककलेचा एक भाग होऊन जाल.”

मला आठवतं,त्या माझ्या कोकणच्या ट्रिपमधे एकदा मी एका रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो होतो.माझ्या एका मित्राने मला इथे जेवण्याची शिफारस केली होती.मी जेवत असताना कॅशरच्या टेबलाजवळ एक व्यक्ति कॅशरबरोबर बोलताना माझ्याकडे बघून बोलत होती.जेवण झाल्यावर बिल देताना मी कॅशर जवळ त्या व्यक्तिची चौकशी केली.
“आमचा तो मुख्य आचारी आहे”
असं तो म्हणाला.नांव विचारल्यावर,
“मकरंद कुळकर्णी” असं म्हणाला.
मी माझं डोकं खाजवीत राहिलो.आणि कॅशर म्हणाला,
“तो तुम्हाला ओळखतो”
“असं आहे,तर मग मला त्याच्याशी बोलायला आवडेल”
असं मी म्हणताच,त्याने त्याला बाहेर बोलावलं.
“मला तुम्ही ओळखणार नाही कारण अगदी लहान असताना तुम्ही मला पाहिलंय.”
असं मला मकरंद म्हणाला.
“मग तू मला कसं ओळखलंस?”
सहाजीकच मी त्याला उलट प्रश्न केला.

“मघाशी तुम्ही वेटरला ऑर्डर देताना, त्याच्याबरोबर बोलत होता,तेव्हा मी स्वयंपाक घरातून ऐकल्यावर तुमचा आवाज परिचयाचा वाटला म्हणून डोकावून तुमच्याकडे पहात होतो.मालवणी हेल काढून तुमची बोलण्याची पद्धत, आणि त्या वेटरबरोबर हंसला तेव्हा तुमच्या उजव्या गालावरची खळी मला प्रकर्शाने जाणवली. मला तुम्ही ओळखाल न ओळखाल म्हणून मी पुढे आलो नाही.”
मला हे सांगताना मकरंद लाजून बोलत होता.
“तू मला अजून आठवत नाहीस.जरा विस्ताराने सांगशील का?”

असं मी म्हणाल्यावर मकरंद मला भूतकाळात घेऊन गेला.आणि त्याने माझी स्मृति जागृत केली.
“माझी आजी गेली.पण मी आणि माझी आई रहातो.तुम्हाला वेळ असेल तर माझ्या घरी तुम्ही अवश्य या.माझ्या आईला तुम्हाला इतक्या वर्षानी बघून खूप आनंद होईल.”
मकरंद मला म्हणाला.

मी त्याचा पत्ता घेतला आणि दुसर्‍याच दिवशी त्याच्या घरी गेलो.
मला त्याची आई म्हणाली,
“मकरंद बीए झाला.ते माझ्या जबरदस्तीमुळे.त्याचं ह्या कॉलेजच्या शिक्षणात विशेष लक्ष नसायचं.त्याला लहानपणापासून पाककला आवडायची.मला म्हणायचा मी बीए होऊन कुठेही कारकून म्हणून नोकरी करणार नाही.मला शेफ व्हायला आवडेल.शेफ व्ह्यायचं त्याच्या डोक्यात खूळ होतं.आणि त्याने ते पुरं केलं.आता एका रेस्टॉरंटमधे आचार्‍याचं काम करतो.पण लवकरच तो त्याच रेस्टॉरंटचा पार्टनर होणार आहे.”

मी मकरंदच्या आईला म्हणालो,
“कोण केव्हा काय होईल हे आपल्याला अगोदरपासून माहित नसतं.होऊन झाल्यावर आपण म्हणतो जे विधिलिखीत आहे ते झालं.खरंतर असं म्हणण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे?.ज्याला जे हवं ते झाल्यावर तो सुखी झाला म्हणजे जीवनात आणखी काय हवंय.?”

मी येणार आहे म्हणून मकरंदाने आज सुट्टी घेतली होती. मला ही त्याच्याशी चर्चा करायला हवं होतं.
मी त्याला विचारलं,
“हा तुझा शेफ होण्याचा विचार कसा काय तुझ्या डोक्यात आला? त्यात वाईट काहीच नाही.आपल्याला जे आवडतं त्यावर आपण प्रेम करतो.फक्त कुतूहल म्हणून मी विचारतो.”
मला मकरंद म्हणाला,
माझ्या आईला नेहमीच विचारलं जातं की,तिचा मुलगा पाककलेत कसा काय स्वारस्य घ्यायला लागला?.आणि माझ्या आईकडून तिच्या नेहमीच्या अभिमानरहित,नम्रतेने दावा केला जातो की तिचाच आळशीपणा त्याला कारण आहे.
मला आठवतं,मी अगदी पाच वर्षाचा भुकेलेला मुलगा अंथरुणातून उठलो आणि आरडाओरडा करून सकाळचा नास्ता मागायला लागलो तरी माझी आई निवांतपणे आपला वेळ घेत घेत तिच्या अंथरूणातून उठून स्वयंपाक घरात यायची.

पण मला काही तेव्हडा धीर नसायचा.मग मी तिच्या शिवाय सुरवात करायचो.पहिल्यांदा अगदी साध्या गोष्टी असायच्या. गरम दुधाचा प्याला,आणि काहीतरी खायला,लाडू वगैरे घ्यायचो.नंतर अंड्याचा पोळा करायला शिकलो.त्यातही हळू हळू पोळ्याचे दोन,चार प्रकार शिकलो.तरीपण माझी आईच मला ह्या पाककलेच्या खूशी्साठी सुरवात करायला कारणीभूत झाली नाही,तर सदभिरूची असणारी माझी आजीही कारणीभूत होती.तिच्याबद्दल आणखी काही सांगण्यापूर्वी मी एक सांगेन की ती खरी खवैय्या होती.कुणीही जेवायला बोलवल्यावर त्यांच्या घरी मला नचुकता घेऊन जायची.किंवा आम्ही प्रवासात असलो तर ती चांगल्या रेस्टॉरंटमधे मला घेऊन जायची.आणि मला तिच्याबरोबर काहीही खायला भयभीती नसायची.माझ्या अगदी लहानपणातल्या दिल्यागेलेल्या ह्या स्वातंत्र्यामुळे माझ्यात ही खाण्याविषयी बेदरकार प्रवृत्ति निर्माण झाली.सरतेशेवटी,अतीशय असाधारण,कल्पनीय
स्वादांची छानबीन करण्याची स्वाधीनता मला घेता आली.ह्या अनेक रेस्टॉरंटमधे जाऊनच मला जेवण करायची स्फुर्ती मिळाली एव्हडंच नाही तर माझी आई आणि आजी ह्या दोघांनी मला त्यांना जे काही माहित होतं ते शिकवलं आणि मी ते शिकण्याचा ध्यास घेतला.”

मकरंद किती सहजपणे आपल्यात तयार होणारा आचारी, आपल्या पोथीबंद, विचाराच्या सीमा उलटून जाऊ शकतो हे सांगत असताना माझ्याही डोक्यात विचार आला.त्याच्या व्यवसायाचं समर्थन करण्याच्या दृष्टीने मी त्याला म्हणालो,
“कला,संगीत,करमणूकी सारखं,आहारसुद्धा संस्कृतीचा एक मुलभाग आहे.आहाराचं हे क्षणभराचं अस्तित्व असतं.कारण नंतर तो खाल्ला जातो,संपवला जातो. तरीपण त्या आहारात गतकालाचा इतिहास असतो,प्रथा असते.आचारी आणि त्याचा सभोवताल ह्यामुळेच घडला जातो.विविध समानान्तर लोकांत आहार दुवा जोडतो. एखादं भोजन,कुटूंबियात,मित्रमंडळीत घेतलं गेल्याने,एकमेकातलं बंधन आणि जाणीवा समक्रमिक बनवून,आणखी मजबूत करतं.त्याचप्रमाणे आचारी आपल्या निर्मितीमधून जगाशी दुवा साधून,आहाराचा उपयोग त्याच्या वयक्तिक शैलीचं आणि तत्वविचाराचं विवरण करण्यात करतो.आहारामुळेच आपण ह्या धरतीचं आणि त्यावरच्या प्राणीमात्रांची कदर करायला शिकतो.
जर का आपण आहाराला आपल्याशी बोलू दिलं तर,नेहमी धरतीमातेचा आवाजातून,आपल्याला जीवंत ठेवण्याच्या अवलंबनाची भेट दिली असल्याचं एकायला येईल.”

माझं हे ऐकून मकरंदला आनंद झाला. मला म्हणाला,
“विस्तवाच्या,धारदार चाकूच्या,चमच्याच्या आणि हाताच्या क्षमतेबद्दल मला विशेष वाटतं.आहार घेणार्‍या जगाला हाताचं कसब वापरून,समाजाला लागणार्‍या,महत्वपूर्ण बुद्धिजीवी विशिष्टता,लक्षात घेऊन त्या मधून मनात असलेला प्रत्येक समझ प्रेरित करून,संस्कृतीचं खरं सार काय आहे,खरं स्वरूप काय आहे हे स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात ही क्षमता मला उपयोगात आणता येते याचं मला विशेष वाटतं.
मला आहार म्हणजे नुसतं जीवंत रहाण्यासाठीच एक मुलभूत साधन आहे एव्हडच वाटत नाही.तर आहार हा एक आत्म-अभिव्यक्तिचं एक महत्वाचं द्वार आहे,मार्ग आहे असं वाटतं.पाकशास्त्राच्या कलेवरचं माझं प्रेम हे एक छंद असण्याच्या पलीकडचं आहे.माझ्यातला तो एक उत्कट आवेश आहे.जरी टीव्हीवरच्या माझ्या आवडत्या आचार्‍याची पाककृतीची प्रत्येक हालचाल मी अभ्यासीत असलो,तासनतास,अगदी नवं पाककलेचं पुस्तक घेऊन नाक खुपसून वाचत असलो किंवा माझ्या स्वयंपाक खोलीतली स्वतःचीच चालाखी वापरीत असलो,तरी शेवटी त्या दिवसाचा तोच महत्वाचा भाग होऊन जातो.”

“अन्न म्हणजे स्वाधीनता आहे.अधुनमधूनची अन्नबाधा सोडल्यास अन्नावर अटकाव कधीच आणला जात नाही.अन्न हे एक स्वतंत्र प्रकार असून,ते सदैव विकसित होत असतं. पाककला ही अशी एकच कला आहे की तिच्याकडे जैविक आवश्यकता म्हणून बघीतलं जातं.”
मी मकरंदला म्हणालो.

“प्रत्येक प्रांतात ख्यातिप्राप्त व्यक्ति असतात.परंतु,कुठचाही जगनमान्य आचारीसुद्धा ह्या पाककलीची सुरवात आपल्या घरापासून करतो.आपल्या आईकडून किंवा आजीकडून शिकतो.ते शिक्षणसुद्धा एखाद्या चालू शेगडीवर आणि चालू स्वयंपाक घरात शिकतो.अन्य प्रांतातल्या एखाद्या कलेतल्या ख्यातिप्राप्त व्यक्तिबद्दल असं म्हणता येणार नाही.
माझ्या ह्या तेजीने विस्तारणार्‍या रंगपेटीमुळे मला माझ्या सभोवती असलेल्या आहाराच्या संपन्न जगात जाण्याची वाट सापडली,त्यामुळे मी जो आहेतो घडला गेलो.
अलीकडेच माझी आजी गेली.परंतु,तिने माझ्यावर केलेले संस्कार कधीच क्षीण होणार नाहीत.ती आणखी काही जरी असली तरी मला ती,मी जसा आहे तसा आचारी म्हणूनच होती.”
मकरंद मला म्हणाला.

मला रहावलं नाही.मी त्याला म्हणालो,
“तुम्ही तुमच्या अवघ्या आयुष्यात एकदा जरी एक कप चहा केलात किंवा एक पोळी भाजलीत तरी तुम्ही कळत-नकळत ह्या असामान्य पाककलेचा एक भाग होऊन जाल.
अशी कला जी आपल्या भोवती आणि आपल्या अंतरात जीवीत असते,प्रकट होत असते.”

आमच्या चर्चेत खंड आला जेव्हा मकरंदची आई मला म्हणाली,
“मकरंदच्या रेस्टॉरंटमधे जाऊन तुम्ही केव्हाही मकरंदच्या हातचं जेवू शकाल.पण आजचं हे जेवण मी शिजवलंय. मकरंदपण खूप दिवसानी तुमच्याबरोबर मी केलेलं जेवील.नाहीतर तो नेहमीच त्याच्या रेस्टॉरंटमधून जेऊन येतो. चला,जेवायला चला.”
आपल्या आईचं हे बोलणं ऐकून मकरंदच्या चेहर्‍यावरचा आनंद मला जास्त बोलका वाटला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com