Friday, October 22, 2010

मस्त हंसायला मला बरं वाटतं.

“मस्त हंसायला मला बरं वाटतं कारण आपल्या दृष्टिकोनात आपल्याला बदल करता येतो.अगदी कायमचा.कदाचीत ती गोष्ट -एक माणूस एका दारुच्या गुत्यात जातो वगैरे-तुम्हाला माहीत असेलच.तर मी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही-थोडा वेळ का होईना- ती गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच आयुष्यभर तुम्ही ध्यानात ठेवलेली असणार.अर्थात दारू पिणार्‍याच्या दृष्टीकोनातून म्हणा.”
गप्पा गोष्टी करीत असताना गुरूनाथ मला असं सांगत होता.

गुरूनाथ तसा फारच बडबड्या म्हटलंत तरी चालेल.आणि त्याबरोबरीने तो सतत हंसतही असतो.पण एखादा विषय घेऊन काहीतरी तो सांगून जातो. म्हणून गुरूनाथ बरोबर थोडा वेळ टाकायला मला आवडतं.आज मी त्याला मुद्दाम विचारलं,
“प्रत्येक वाक्यागणीक तू हंसत असतोस.ह्याच्या मागचं तुझं गुपीत काय आहे?”
त्यावर त्याने वरील प्रस्तावना केली.

मी म्हणालो,
“मला ती तुझी दारू पिणार्‍याची गोष्ट माहीत नाही”

“तुम्हाला ती गोष्ट माहीत नसेल तर सांगतो.”
असं म्हणून गुरूनाथ सांगू लागला,
“एक माणूस दारूच्या गुत्यात जातो आणि तीन ग्लासीसमधे व्हिस्कीचे तीन पेग मागवतो.तो ते तिन्ही पेग पितो. असं तो रोजच गुत्यात जाऊन करतो.शेवटी गुत्याचा मालक त्याला सांगतो,
“मी ते तिन्ही पेग एकाच ग्लासातून तुला देऊ शकतो.पण तो माणूस त्याला सांगतो,
“मला असं प्यायला बरं वाटतं.माझे दोन भाऊ आहेत.ते माझ्या गावाला असतात.मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो.ह्या ग्लासातला हा पेग माझा भाऊ दत्तू ह्याचा आहे.आणि हा पेग गणूचा आहे,अशा पद्धतीने प्याल्याने आम्ही तिघेही एकत्र पित बसलो आहो असं मला भासतं.”

आणि हे असं रोजचं चाललेलं असतं.गुत्याचा मालक तीन पेग तीन ग्लासात घालून त्या माणसाला देत असतो.
आणि एकेदिवशी तो माणूस गुत्याच्या मालकाला म्हणाला,
“मला आज फक्त दोन ग्लासात दोनच पेग द्या.”
“काय झालं?तुझ्या एका भावाला काय झालं का?”
गुत्याच्या मालकाने त्या माणसाला विचारलं.
“नाही,नाही”
तो माणूस म्हणाला.
“ते दोघेही अगदी सुरक्षीत आहेत.फक्त मी स्वतः आजपासून पिणं सोडून दिलं.”
गुत्याचा मालक मस्त हंसला.आणि ह्या दारू पिणार्‍या माणसाबद्दलचा आपला दृष्टीकोन त्याने बदलला.

तर सांगायची गोष्ट अशी की,जीवनातल्या सर्व कटकटी आपल्या मनातून येतजात असतात.आणि रागा रागाने त्याच पाऊलवाटेवरून दणद्ण करीत त्या एकसारख्या जात असतात.जसं डोंगरावर चढून जाणारे यात्री मागे यात्रेकडे वळून पहातात,पण कधीही मनात आणत नाहीत की एखादी लवकर जाणारी,साफसुथरी,आणखी मजा आणणारी पाऊलवाट वर चढून जाण्यासाठी असू शकते का? पण नाही त्याच पाऊलवाटेवरून दणदण करीत ते जात
असतात.”

मला गुरूनाथची गोष्ट ऐकून खरंच हंसू आलं.
मी म्हणालो,
“परंतु,योग्यवेळी केलेली एखादी कोटी किंवा गोत्यात आणणारी एखादी चूक आपल्याला चिखलातून बाहेर काढू शकते.कारण ती खुबीदार असते आणि त्याचवेळी अनपेक्षीत असते.”

“अगदी बरोबर बोललात”
असं म्हणत गुरूनाथ सांगू लागला,
“कोट्या किंवा खसखस अशाच कामाला येतात.आपण एक अपेक्षीत असतो आणि मिळतं दुसरंच.आणि ते सुद्धा विकृत करून पण निश्चितपूर्वक उचित असणारं.जगाकडे तिरक्या नजरेने पाहिल्यावर ते पहाणं तुम्हाला चिकटून रहातं. अशावेळेला तुमचा मेंदू नवा संपर्क साधतो-मला अलंकारीक किंवा लाक्षणीक रूपाने म्हणायचं नाही,तर अगदी शब्द्शः,आणि प्राकृतिक रूपाने म्हणायचं आहे-जसं तुम्ही नवीन भाषा शिकता किंवा नृत्यकरायला शिकता
तस्सं.तुमच्या मनातलं सूत्रं पक्क झालेलं असतं.”

मी म्हणालो,
“गुरूनाथ, तुझं ह्या मस्त हंसण्याच्या संवयीच्या स्पष्टीकरणाने मला एक मुद्दा सुचला.
जसं एखादं मस्त हंसं दिल्याने जग तुमच्याकडे नव्या दृष्टीकोनातून पहातं,तसं असंच एखादं मस्त हंसं, चारतर्‍हेचे लोक एकत्र आणू शकतं.
एखादवेळेला आपल्या सर्वांची भाषा एक नसली तरी एखादा मुक चित्रपट पहात असताना,त्याच जागी जोरजोराने हंसत असलो तर क्षणभर एकाच जगात असल्यासारखे असतो.थोपलेल्या हद्दीच्या शब्दापलीकडच्या जगात असतो.”

माझं हे ऐकून गुरूनाथ हंसत राहिला.मला समजलं ह्याला काहीतरी आणखी सांगायचं आहे.
“तुमच्या ह्या मुक चित्रपटाच्या मुद्यावरून मला एक गोष्ट आठवली.”
असं म्हणत सांगू लागला,
“जर तुम्हाला दोन व्यक्ति मिळून-जुळून रहाणार्‍या आहेत ह्याचं भाकीत करायचं असेल तर कशामुळे ते हंसू शकतात ते पहावं लागेल.हे खरं आही की प्रेम असल्यावर जातपातीची,शिक्षणाची आणि भाषेची सीमारेषासुद्धा पारकरून जाता येतं तरी त्या जीवनात जर का हास्यमय काही नसेल तर तुमच्या दीर्घकालीन सुखाची कुणी खात्री देऊ शकणार नाही.”

“मी कुठेतरी हंसत राहिल्याने होणार्‍या फायद्याबद्दल वाचलंय ते तुला सांगतो”
असं सांगून मी म्हणालो,
“शरीरात हास्यामुळे एन्डोर्फीन उत्पन्न होतं,आणि ते तणाव कमी करतं,आणि प्रतिकार शक्ती बळकट करतं. हास्यामुळे शरीराला मिळणारे लाभ मिळवण्यासाठी खरोखरच काहीतरी हास्यजनक झालंच पाहिजे अशातला भाग नाही.तुम्ही नुसते हंसू शकता.तुमच्या शरीराला त्याचं कारण कळायची जरूरीच नसते.काही लोक समुदायात व्यायाम करण्यासाठी म्हणून नुसते हंसत असलेले मी पाहिले आहेत.”

गुरूनाथ म्हणाला,
“मला सांगा तुम्ही कधी अशा परिस्थितीत होता का?
काही लोक एकत्र जमून एखादी समस्या सोड्वण्याच्या प्रयत्नात आहेत.पण त्यांना ते कठीण झालं आहे.कारण त्या समस्येचं उलघडणं चटकन दिसत नाही.नंतर काही कारणाने त्यातला एखादा त्यातल्या प्रत्येकाला हंसवायला कारणीभूत होतो.अशावेळी तणाव कमी होतो आणि निर्मितीक्षमता उफाळून येते.आणि काही मिनीटातच उत्तर सापडतं.तोपर्यंत ते कुणाच्याही लक्षात आलेलं नसतं.हे अनपेक्षीत असतं, पण होऊन जातं.”

“सरदारजीवर केलेले अनेक विनोद मला आठवतात आणि हंसू येतं.पण ते तेव्हड्या पूरतंच.तसे बरेच विनोद मी ऐकले आहेत पण सर्वच आठवत नाहीत.”
मी गुरूनाथला म्हणालो.

“माझ्या जीवनात आलेल्या बर्‍याचश्या गोष्टींचं मला विस्मरण झालं आहे.एखादी गोष्ट सहजगत्या माझ्या लक्षात असेल अशी कुणी अपक्षी करू नये पण ज्या गोष्टीमुळे मला मस्त हंसू आलं असेल अशी कुठलीही गोष्ट मी कधीही विसरलेलो नाही.”
हंसत,हंसत मला गुरूनाथ म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com