Saturday, October 23, 2010

अमेरिकेतला भारतीय बाप.

“कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त वाटायचं आणि मोठी माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.”

आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती.
दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.
पण आज काही विशेष त्याना सांगायचं होतं असे त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.

“काय भाऊसाहेब आज विशेष काय?” असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.
मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले,
“सामंत ,काय हो तुम्हाला आठवतं का,ज्यावेळेला तुम्हाला पहिलं मुल झालं तेव्हा तुम्ही कधी त्याला कौतूकाने घेऊन फिरवत होता त्याचे कपडे बदलणं त्याचे आपण पुर्वी लंगोट म्हणायचो- त्याला इकडे डायपर म्हणतात- तसं काही तुम्ही बदलायचा का त्याला कधी मांडीवर घेऊन झोपवलं आहेत का तुम्ही?बहूतेक नसणार कारण तुमच्यावर ती पाळीच कदाचीत आली नसणार.पण इकडे बघा आमचे जांवई हे सर्व करतात.
त्याना म्हणे इकडे ट्रेनींग देतात.ही मुलांची सर्व कामं इकडे आई बाबानां मूल होण्यापुर्वी शिकून घ्यावी लागतात.
त्याना ही सर्व कामं करताना पाहून मला जरा कौतुक वाटतं.
बापाला दुधाची बाटली पण द्यायचं शिकवतात.
म्हणजे बघा बापाला जवळ जवळ आईची कामं शिकवतात. आणि हे बाबा पण ही सर्व कामं अगदी आनंदाने आणि अगत्याने करतात.
आता आजी आजोबा झाल्यावर नातवंडाची हीच कामं आपल्याला करायला किती आनंद होतो.
सामंत,तुमचं म्हणण काय आहे याच्यावर ते जरा विस्तारने मला सांगा बघू.”

हे त्यांचं म्हणणं ऐकून,
“मी थोडा विचार करून मला काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला उद्या आपण भेटू तेव्हा चर्चा करूं.”
असं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही भेटलो तेव्हा ह्या विषयावर उहापोह केला.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,ह्याला मुख्य कारण इकडची कुटुंब संस्था आणि इकडची(म्हणजे अमेरिकेतली) परिस्थीती मुख्यतः कारण असावी.
अहो,त्यावेळी भारतात आपल्या एकत्र कुटुंब संस्थेमूळे किती माणसं जवळ असायची बघा.
त्यामुळे मुलाची ही कामं करायची पाळी बापावर कशी येणार?.आणि इतकं असून तसं करायला जरी जायचं तरी एक म्हणजे त्या वयात थोडी लाज वाटाची आणि बायको पण कामं करू द्यायची नाही. कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त वाटायचं आणि मोठी माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.
उलट इथे आईबाबा आणि मूल ह्या शिवाय घरात कोणच नसतं.गडीमाणसं इकडे परवडत नाहीत. आणि ही कामं एकट्याची नसून दोघांची असतात हे पटवलं गेल्याने- विशेष करून पुरुषाला- त्यामुळे असली काम करणं भागच असतं.
आणि दुसरं म्हणजे मदतीला आजी आजोबा जरी भारतातून आले तरे त्यांचा सहा महिन्याचा व्हिसा असतो मग सहा महिन्यानी ते गेल्यावर ही कामं कुणी करायची सांगा?

आपण आजोबा म्हणून जेव्हां नातवंडाचे कौतुकाने लाड करत असतो ना, त्याचं पण कारण एका अनुभवी व्यक्तीने मला समजावून सांगीतलं.त्याच म्हणणं असं की तरुण बाप असताना सुप्त राहिलेली कौतुक करण्याची इच्छा आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो.कारण आजोबांची टिंगल कोण कशी करणार?.
तसंच आजीला पण वयोमनाप्रमाणे जमत नसल्याने आजोबाला पण असली कामं वाटून मिळतात.हे त्या अनुभवी माणसाचे तत्वज्ञान.मला हे पटतं भाऊसाहेब ,तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मला उद्या विचार करून सांगा ह्यानंतर आम्ही हा विषय इथे संपवला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com