Saturday, November 6, 2010

हास्यप्रदेची क्षमता.

“आपण इतक्या लवकर नरकात पोहोचूं असं वाटलं नव्हतं”

प्रो.देसाई मला, आपल्या लहानपणाची आठवण येऊन, एक किस्सा सांगत होते.
“एकदा मला आठवतं,मी नऊएक वर्षांचा असेन,मी घरातून बाहेर मागच्या अंगणात धांवत धांवत जात होतो. संध्याकाळची वेळ होती.किचनमधे माझी आई अंधारात निवांत बसून होती.तिचा तो दुःखी चेहरा पाहून मला खूपच वाईट वाटलं.सकाळपासून संबंध दिवसभर माझी आई हंसताना मी पाहिली नव्हती.नंतर मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी गेला आठवडाभर तिला हंसताना पाहिलं नव्हतं.आणखी मागे जाऊन विचार केल्यावर माझ्या लक्षांत यायचं टाळलं गेलं नाही की गेला महिनाभर माझ्या आईला मी खुसखुसून हंसताना पाहिलंच नाही.”

प्रो.देसाय़ांच्या आईचा आज जन्मदिवस होता.तिला आवडणारे बेसनाचे लाडू मला द्यायला म्हणून आले होते. आईच्या आठवणीने भाऊसाहेब नेहमीच भाऊक होतात.दर खेपेला आईचा विषय निघाल्यावर जुन्या आठवणी काढून एखादी घडलेली घटना डोळ्यात पाणी आणून मला सांगतात.

“तुमच्या बरोबर मी बरेच वेळा माझ्या आईच्या जुन्या आठवणी सांगत आलो आहे.आज तर तिचा जन्मदिवस आहे.अगदी अगत्याने मी तिच्याबद्दल हे सांगत आहे.”
असं मला म्हणाले.

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुम्ही सांगा आणि मी ऐकतो.अहो,आपल्या आईबद्दल कुणाला ऐकायला आवडणार नाही.?तुमचा किस्सा ऐकताना मलाही माझ्या आईची आठवण येऊन धन्य वाटतं.”

भाऊसाहेब खूश झाले.मला पुढे सांगू लागले,
“त्यानंतर मी माझ्या मनात ठरवलं की यापुढे आईला हंसवायचं.आणि हे काही सोपं काम नव्हतं.लहानपणी मी तसा गप्पच वृत्तिचा मुलगा होतो. थट्टा-मस्करी करण्याची माझी प्रकृति नव्हती.इतकं असूनही कधी कधी मी विनोद करायचो,पण ते विनोद म्हणजे, कुणा एखाद्या जाड्या मुलाला पोटात गॅस झाल्यामुळे खालून कसा सोडायचा आणि ते प्रात्यक्षीक करून दाखवायचं,किंवा शेंबड्या मुलाची नक्कल करून दाखवायचो.

मला आठवतं त्यावेळी असलेच विनोद मी माझ्या आईला करून दाखवले.ऐकून तिने तिचे डोळे फिरवले नाहीत किंवा मोठे करून माझ्याकडे पाहिलंही नाही.ती नुसती गालातल्या गालात हंसली.तिचं ते हंसूं पाहून मी समजलो की माझ्या मनात काय आहे ते तिला कळलं असावं,पण,का कळेना, तिला खुसखुसून हंसायचं नव्हतं.
असेल कदाचीत, त्यावेळी तिला वाटत असावं,की ती हंसूच शकत नसावी.पण शेवटी हंसली, पण कोणत्या विनोदावर माझी आई नंतर हंसली ते मला आठवत नाही.

मी मोठा झाल्यावर मला एकदा माझी आई म्हणाली की तिला ती घटना आठवते.कठीण काळातून बाहेर यायला तिला माझ्या त्या हंसवण्याची चांगलीच मदत झाली.किती प्रमाणात तिला फायदा झाला हे,नऊ वर्षाच्या, मला समजलं नाही पण एक मात्र खरं की आम्ही दोघं मनाने खंबीर झालो.”
भाऊसाहेबांच्या ह्या हंसण्य़ा-हंसवण्याच्या किश्यावरून माझ्या मनात आलं ते आपण सांगावं म्हणून मी त्यांना म्हणालो,
“तुमचे हे ऐकून मला एक आठवण आली.
२६/११ चा ताजमहाल होटेलवर आणि आणखी काही ठिकाणी मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या दिवशी मी मुंबईत होतो. मला आठवतं त्या घटनेनंतर बरेच दिवस मुंबईकरांच्या चेहर्‍यावरचं हंसंच निघून गेलं होतं. नव्हेतर लोक इतके क्षुब्ध झाले होते की चेहर्‍यावर हंसूं आणण्याची वेळच आली नाही असं त्यांना वाटायचं.
पण मला मात्र वाटायचं की,चेहर्‍यावर आणलेलं हंसूं अख्या मुंबई शहराला झालेली जखम हळू हळू भरून काढायला मदत निश्चितच करील.
शहराच्या एका मोठ्या जागी एका पोस्टरवर राक्षसारखे दिसणार्‍या आतंकवाद्यांचं चित्र होतं आणि खाली लिहिलेलं मी वाचलं. ते एकमेकाला म्हणत होते की,
“आपण इतक्या लवकर नरकात पोहोचूं असं वाटलं नव्हतं”
अलीकडे माझ्या लक्षात आलंय की,श्रद्धा ही मुळातच हास्यप्रद असते.कृष्णकन्हया गाई सांभाळताना आपल्या संवगड्याने घेऊन खेळायचा त्याच्या संवगड्यात पेंद्या नावाचा विदुषक होता.त्याची टिंगल करून सर्व हंसायचे.
मी एकदा माझ्या एका क्रिश्चन मित्राच्या नातेवाईकाच्या प्रेतयात्रेला गेलो होतो.आपल्या जवळच्या प्रेमळ व्यक्तिच्या जाण्याने दुःखी होऊन जमलेल्या समुदायात एखाद्या क्षणी हास्य असायचं.”

माझं हे ऐकून प्रो.देसाई जरा विचारात पडले.मला काही तरी मूंबईच्या घटनेच्या संदर्भाने व्यापक विचार त्यांना सांगायचा होता.
मला म्हणाले,
“हास्यप्रद श्रद्धेची नजर, जगात होणार्‍या हानीकडे आणि नुकसानीकडे,लागलेली असते आणि त्याकडे पाहून ती श्रद्धा हंसत असते.आपल्याला पण दुःखाला, हानीला आणि आतंकवादालासुद्धा पाहून हंसता येतं.
विदुषक स्वतःला पाडून घेतो,पण नेहमी उठून ऊभा होतो. हीच तर हास्यप्रदेची क्षमता म्हटली पाहिजे.आपण फिरून प्रोत्साहित होत असतो.ती मुंबईची घटना घडून गेल्याच्या दुसर्‍या दिवसापासून मुंबईकर कामाला लागले.कारण त्यांची श्रद्धा होती की हंसत राहूनच पुढचं कार्य साधत गेलं पाहिजे.
म्हणतात ना शो मस्ट गो,तसंच काहीसं.”

मला दिलेल्या बेसनाच्या लाडवातून दोन लाडू काढून एक मला आणि एक त्यांना देऊन त्यांच्या आईचा जन्मदिन आम्ही साजरा केला.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com