Wednesday, November 17, 2010

स्थीर गती आणि माझे बाबा.

“ती वेळ लवकरच येणार आहे. कारण तुलाच तुझ्या स्वतःच्या गतीला स्थीर करायची पाळी येणार आहे.”

मंगला आपल्या वडीलांवर खूप प्रेम करायची.अलीकडे बरेच दिवस वार्धक्याने ते आजारी होऊन दवाखान्यात होते. एकदा मी त्यांना दवाखान्यात भेटून आलो होतो.पण त्यांचं निधन झालं हे ऐकल्यावर मी मंगलाला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.
माझ्याशी बोलताना मंगला आपल्या बाबांच्या आठवणी काढून मुसमुसून रडत होती.

मला म्हणाली,
“मला नेहमीच वाटतं की आपल्या आईवडीलांच उदाहरण किंवा त्यांचा अनुभव हा एक चिरस्थायित्वाचा धागा असून तो पिढ्यांन पिढ्यांना एकमेकात गुंतून ठेवीत असतो.माझ्या बाबांच्या बाबतीत ते मला खरं वाटतं.
माझ्या लहानपणी मी पेटी वाजवायला शिकायची.आणि त्यावेळी माझे बाबा मी वाजवताना ऐकायचे.
“मला वाटतं तू जरा जास्त गतीत वाजवत आहेस”
मला माझे बाबा मी पेटी वाजवीत असताना नेहमीच म्हणायचे.

कदाचीत त्यांचं खरंही असेल.संगीत शिकताना नवीन नवीन गाणी वाजवताना,माझी बोटं जेव्हडी जोरात फिरायची त्या गतीत रोजच प्रगति केल्याने मी ह्र्दयस्पर्शी गाण्यांतलं स्वरमाधुर्य घालवून बसायचे.हे मला माहित असायचं. तरी असं असतानाही जास्त करून माझ्या वडीलांचे ते शब्द मला झोंबायचे.त्यावेळी मनात यायचं की,
“बाबा तुम्ही तुमचं पहा ना तुम्हाला काय करायचंय?”

मी म्हणालो,
“मला आठवतं,मी तुझ्या घरी आलो असताना,तुझी चौकशी केल्यावर तुझे बाबा म्हणायचे,
“मंगला माझ्यावर रागावून बाहेर गेली आहे.तिचा राग तिच्या नाकाच्या शेंड्यावर असतो.”
मी विचारायचो,
“असं काय तुम्ही तिला बोललात?”
मला तुझे बाबा म्हणायचे,
“असंच काहीतरी तिच्या पेटीवाजवण्याच्या बाबतीत बोललो असेन.आणि तिला राग आला असावा.”

माझं हे ऐकून मंगला म्हणाली,
“अशावेळी नेहमीच मी पेटी बंद करून,दहा वर्षाची मी राग नाकाच्या शेंड्यावर ठेऊन,बाहेर निघून जायची.त्यावेळी हे माझ्या लक्षात येत नव्हतं की,माझे बाबा, मला दाखवत असायचे की ते, नीटपणे माझी पेटी ऐकायचे.संगीताची तितकीशी पर्वा नकरणार्‍या त्यांना,स्वरमाधुर्य,आणि भाव ह्याबद्दल तितकच माहित होतं पण संगीताची लय आणि गती मात्र त्यांना काहीशी कळत असावी.”

माझ्या बाबांनी केलेली टीप्पणी,मला सैरभैर करायची.त्यामुळे मी माझ्या जीवश्च-कंटश्च मित्रा पासून, मला उत्तेजन देणार्‍या माझ्या प्रेमळ माणसापासून,ज्यांचे हात, मला उचलून लोंबकळत्या पिवळ्या पिकलेल्या आंब्याला, झुकलेल्या फांदी पासून, उचकून काढण्यासाठी मदत करायचे, किचनमधे खुर्चीवर चढून राघवदास लाडवाचा डबा काढण्याच्या प्रयत्नात माझे हात डब्यापर्यंत पोहचत नाही हे पाहून, मलाच वर उचलून लाडवाच्या डब्याला घेण्यासाठी मदत करायचे,त्या हातापासून,माझ्या बाबांपासून मी दूर जाऊ लागले होते.खरं म्हणजे ह्या माझ्या सर्व धडाडीत माझे बाबा नेहमीच माझ्या मागे असायचे.”

मी हे ऐकून मंगलाला म्हणालो,
“तुझे बाबा खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचे.त्यांच्या बोलण्यात वाक्यागणीक तुझं नांव यायचं.”

“मला आता त्याचा अतिशय पश्चाताप होतोय.बाबांचं प्रेम मला लहानपणा पासून माहिती असायला हवं होतं”
असं सांगून मंगला म्हणाली,
“माझ्या किशोरीवयात,जर का मला माहित असतं की,जेव्हा चापचापून चेहर्‍यावर मेक-अप करीत असताना माझे बाबा पहातील म्हणून मी दरवाजा बंद करून माझ्या खोलीत असायचे हे चूक आहे,माझ्या तरूणपणात,जर का मला माहित असतं की,बाहेर गावी नोकरी करीत असताना,एकटेपणा वाटत असताना,माझ्या बाबांच्या सल्ल्याची मला जरूरी आहे हे त्यांना सांगायला मी विसरून जायची हे चूक आहे.मी तरूण आईची भुमिका करीत असताना,माझ्याच मनमाने मी माझ्या मुलांचं संगोपन करायची,अशावेळी निवृत्त झालेल्या आजोबांकडून ज्ञानसंपन्न उपदेश मिळवून घ्यायची जर का मला दुरदृष्टी असती तर,जेव्हा माझी वाढ होत होती अशावेळी लहान मुलगी आणि तिचे आश्रय देणारे,सहायता देणारे बाबा यांच्या मधली जवळीक, खास दूवा, फिरून परत येत नाही,हे जर मला माहित असतं तर मी माझी ही वागणूक जरा हळूवारपणे घेतली असती.”

मी म्हणालो,
“तुझे बाबा,शांत स्वभावाचे होते.त्यांचे विचार स्थीर असायचे.त्यांना होणारे कष्ट ते तोंडावर दाखवत नसायचे.”

“तुमचं माझ्या बाबांबद्दलचं अवलोकन अगदी बरोबर आहे”
असं म्हणत मंगला पुढे म्हणाली,
“आम्ही मुलं वाढत असताना,आमच्याकडून जर का त्याना दुःखदायी वागणूक मिळाली असली तरी माझे बाबा ते दाखवत नव्हते.जसं माझं पेटीवादन होत असताना त्यांच्याकडून होणार्‍या उपदेशाच्यावेळी त्यांची स्वतःची गती स्थीर असायची.

जेव्हा डॉक्टरांनी त्यांना त्यांचा अंत जवळ आला आहे हे अन्य प्रकारे भासवलं,तेव्हा माझ्या बाबांनी आमच्या आईला प्रश्न केला,
“मुलींना आता मी काय सांगू?”
त्यांच्या ह्या प्रश्नातच त्यांच्या क्षमतेचं गुपीत छपून होतं,आपल्या कुटूंबाचा प्रथामीक विचार करताना,ते स्वतःचा राग,मनाला लागलेले घाव,आणि त्यांची बेचैनी, विसरून गेले होते.”

“काही गोष्टी आपल्या हातात नसतात.पण आपल्या प्रेमळ माणसाच्या आठवणी येत असतात.चांगल्या आठवणींची उजळणी करून जीवन जगायचं असतं”
मी मंगलला म्हणालो.

“मी माझ्या बाबांना खरंच दूरावून बसले.”
मला मंगला सांगू लागली,
“पण कधी कधी दिवसाच्या अखेरीस,नाकं पुसून काढताना,कुल्हे धूताना,दुध ग्लासात ओतताना,पडलेल्या गोष्टी जमीनीवरून पुसताना,घरभर पसरलेले खेळ जमा करून ठेवताना,अशा काही संध्याकाळच्या वेळी,जेव्हा मी, ती आराम खूर्ची आणि वर्तमान पत्रं पहाण्या ऐवजी ते वर्षाच्या अंतरातले लहान दोन जीव,चीडचीड करताना, रडताना, माझ्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट करताना पाहून लागट शब्द माझ्या मनात आणते आणि मला माझ्या बाबांची आठवण येते.
मग मात्र मी माझ्या त्या दोन पिल्लांना छाती जवळ घेऊन गोंजारते.”

मी उठता उठता मंगलला म्हणालो,
ती वेळ लवकरच येणार आहे. कारण तुलाच तुझ्या स्वतःच्या गतीला स्थीर करायची पाळी येणार आहे.”

“अगदी माझ्या मनातलं बोललात”
दरवाजा उघडताना आणि मला निरोप देताना मंगला मला म्हणाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com