Saturday, November 20, 2010

स्वयंपाक घरातला दिवा पेटताच असु दे.

“शरद तुंगारे ह्यावेळी मलाही अनुमोदन द्यायला विसरला नाही.”

सुलभा आणि तिचा नवरा शरद तुंगारे माझ्या मागून येत होते.मला कळलं जेव्हा शरदने माझ्या पाठीवर थाप मारून मला सावध केलं तेव्हा.त्यांचं घर अगदी जवळ होतं.आमच्या घरी चलाच म्हणून सुलभाने हट्ट धरला.
“नेहमी पुढच्या खेपेला येईन म्हणून आश्वासनं देता.आज मी तुमचं ऐकणार नाही.आणि तुम्हाला आवडतं ते बांगड्याचं तिखलं केलं आहे.आज रात्री जेवताना तुमची कंपनी आम्हाला द्या.”
असं सुलाभा आग्रहाने म्हणाली.आणि शरदने अनुमोदन दिलं.

माझा विक-पॉईन्ट -बांगड्याचं तिखलं-सुलभाला माहित होता.शिवाय खरंच मी तिला नेहमी तिच्या घरी येईन असं आश्वासन देत असे.तिचं घर जवळून दिसत होतं.आज मला कोणतंच निमित्त सांगायला नव्हतं.इतका आग्रह होत आहे तर जावं असं मी मनात आणलं आणि होकार दिला.मी मान उंचावून तिच्या फ्लॅटकडे पाहिलं.आणि बरेच दिवस मला विचारायचं होतं ते लक्षात ठेवून आज सुलभाला विचारूया असं मनात पक्कं करून काय विचारायचं ह्याची मनात उजळणी करीत तिच्या बिल्डिंगच्या पायर्‍या चढत चढत वर जात होतो.
वर गेल्यावर थोडा गरम चहा झाल्यावर,जेवणापुर्वी जरा गप्पा करायला बसलो.

“काय गं सुलभा,मी तुझ्या बिल्डिंग खालून जात असताना नेहमी पाहिलंय की मध्य रात्र झाली तरी तुझ्या स्वयंपाकघराचा दिवा पेटतच असतो.
बसमधून जातानाही वाकून पाहिल्यावर नेहमी दिवा दिसतोच.याच्या मागे काय खास कारण आहे?”
मी सुलभाला विचारलं.

मला सुलभा म्हणाली,
“माझ्या स्वयंपाक घरातला दिवा मी नेहमी पेटताच ठेवते.तो पेटताच ठेवायला मला विशेष वाटतं.माझ्या आईबाबांच्या घरात त्यांच्या स्वयंपाक घरातल्या छतावरचा दिवा अशीच शोभा आणायचा.”

“दिवा शोभा आणायचा हे खरं आहे पण आणखी काहीतरी त्याच्या मागे कारण असावं असं मला वाटतं.काय आहे ते तू मला सांगत नाहीस.त्याबद्दल मला कुतूहल आहे.”
मी सुलभाला म्हणालो.

हंसत,हंसत सुलभा म्हणाली,
“सांगते ऐका,
माझ्या लहानपणी मी माझ्या आईबाबांकडे वाढत असताना,त्यांच्या घरातला दिवा असाच पेटता रहायचा,ह्याचं कारण मला माझ्या आईने समजावून सांगीतलं होतं.ती म्हणायची,
“तुम्हा मुलांसाठी ती एक खूण असायची.आणि त्यातून एक इशारा असायचा की,बाहेर जीवन जगताना कुठलीही चूक जरी झाली तरी ती चूक एव्हडी गंभीर नसावी की त्याचा विचार करून कितीही रात्र झाली तरी तुम्ही घरी यायचं टाळावं.”
आम्ही चार भावंडं होतो.दोन भाऊ आणि दोन बहिणी.मागे पुढे शिकत होतो.माझे दोन्ही भाऊ कॉलेजात असताना मी शाळेत शिकायची.माझी बहिणही माझ्याबरोबर शाळेत शिकायची.”

“खरं आहे.शिक्षण घेत असतानाच्या त्या वयात,कधी कधी बारीक-सारीक कारणावरून मित्र-मंडळीशी तणाव होण्याचा संभव असतो.अशावेळी आपल्या हातून एखादा अतिप्रसंग झाल्यास,बेजबादारपणा होऊ शकतो.तुझी आई अशा प्रसंगाबद्दल काळजीत रहात असावी.”
मी सुलभाला म्हणालो.

“माझी आई अगदी देवभोळी होती.आपली मुलं बेजबाबदारपणे बाहेर वागावीत ह्यावर तिचा कदापीही विश्वास नव्हता. त्याबाबतीत ती भोळी होती.”
सुलभा सांगू लागली.पुढे म्हणाली,

“परंतु,काही कारणास्तव त्यांच्याकडून चूक झाली,अपराध झाला तरी प्रामाणिकपणे त्याची कबुली देऊन ती नेहमीच घरी येणारच असं तिला वाटायचं. प्रत्येक अपराधावर काही तरी निष्पत्ति असतेच.पण त्याचा अंतिम निर्णय माझी आई घ्यायची.तो निर्णय आमच्या नशिबावर सोडून द्यायची नाही.मार्ग चुकलेल्या आम्हा मुलाना घरातला दिवा हा एखाद्या संकेत-दीपा सारखा होता. आमचं घर हे सुरक्षित स्थान आहे हे तो दिवा भासवायचा.
माझे दोन्ही भाऊ शाळा शिकत असताना आणि कॉलेजात जाण्यापूर्वी माझ्या आईकडून त्यांना कधीतरी उशिरा-रात्रीचे उपदेश किंवा व्याख्यानं ऐकायला मिळायची.पण मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने माझ्या आईवर,आम्ही कॉलेजात जाई पर्यंत, क्वचीतच तणाव आणला.”

“मला माहित आहे.तुझी आई मला नेहमी म्हणायची,
“माझ्या दोन्ही मुली गुणी आहेत.मला त्यांची काळजी नाही.”
आणि मी तिची समजूत घालून म्हणायचो,
“मुली नेहमीच गुणी असतात.निसर्गाची त्यांना देणगी आहे.
पुढे त्यांना “आई” व्हायचं असतं.सहनशिलता,समजूतदारपणा,त्याग,प्रेम अशा तर्‍हेचे असतील नसतील त्या सर्व गुणांचा भडिमार निसर्गाने स्त्रीवर केला आहे.”आईचे” गुण घेऊन एखादा पुरूष वागला तर त्याच्याकडून कसलाही प्रमाद होणार नाही.”

सुलभा थोडी ओशाळलेली दिसली.पण झालेल्या चूकीचं समर्थन न करता मला म्हणाली,
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण स्त्री झाली तरी ती माणूस आहे.तिच्याही हातून चुका होणं स्वाभाविक आहे.
मी त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होते.तणाव न आणण्याचा हा शिरस्ता माझ्याकडून मोडला गेला.
तो दीवाळीचा पहिला दिवस होता.मी लाजेने मान खाली घालून,पण एकवार त्या स्वय़ंपाक घरातल्या दिव्याकडे नजर टाकून,घरात आले.मला घरात येताना पाहून माझ्या आईच्या तेव्हाच लक्षात आलं की काहीतरी घोटाळा झाला आहे.मी घाबरी-घुबरी झालेली आईकडे कसला तरी कबुली जबाब देण्याच्या तयारी होते.
मी आईला म्हणाले,
“आई,तू माझा नक्कीच तिटकार करणार आहेस.”
माझा गळा दाटून आला.पण त्याही परिस्थितीत मी म्हणाले,
“मला दिवस गेलेत “
हे ऐकल्याबरोबर माझ्या आईने आपले दोन्ही हात उघडे करून मला आपल्या मिठीत घेतलं.आणि त्यापरिस्थितीत माझा रोखून धरलेला हुंदका मी तिच्या खांद्यावर मोकळा केला.तिने माझ्या पाठीवर हात फिरवला.आणि माझ्या कानात हळूच पुटपूटली,
“मी तुझा कधीच तिटकार करणार नाही.मी तुझ्यावर प्रेम करते.सर्व काही ठिक होणार.”

असं म्हणून माझ्या आईने त्या संकेत-दीपाचा प्रकाश मला दाखवला.आणि मला शेवटी जाण आली.
दिव्याचा प्रकाश दिसणं म्हणजेच,बिनशर्त प्रेम असणं.ते आपल्या मुलांसाठी असणं.कारण जेव्हा जीवन कष्टप्राय होतं तेव्हा ते प्रेम संरक्षणाची शेवटची फळी असते.त्याचाच अर्थ आपल्या मुलांचा उघडपणे स्वीकार करणं,जास्त करून, अशावेळी की ती स्वतःचाच स्वीकार करायला तयार नसतात. त्याचाच अर्थ, समजून घेणं,आणि सहानभूति ठेवणं.खरं तर, प्रेम करणं, जेव्हा ते करणं सोपं असतं, तेव्हा नसून जेव्हा ते महान कठीण असतं तेव्हा करणं
योग्य असतं.”

अशा तर्‍हेचं हे प्रेम, मी स्वतः आई होई तोपर्य़ंत माझ्या पूर्ण ध्यानात आलं नाही.
माझी मुलं आता एक एकरा वर्षाचं आणि एक नऊ वर्षाचं आहे.मुलं आता संदेहास्पद किशोरावस्थेत पदार्पण करीत आहेत.
कॉलेज मधला माझ्या मित्राशी, शरद तुंगारेशी माझा प्रेम विवाह झाला होता.
मुलांना जरी समजण्यात येत नसलं तरी मी स्वय़ंपाक घरातल्या दिव्याची गोष्ट त्यांना समजावून सांगीतली आहे.
मला जरी वाटत असलं की, त्यांना मान खाली घालून घरात येण्याची पाळी येणार नाही तरी, मी त्यांना आश्वासन दिलं आहे की,
“काही जरी झालं तरी घर हे असं स्थान आहे की तिथे प्रेम मिळतं. जीवनात गडद अंधार आला तरी मी स्वय़ंपाक घरातला दिवा का पेटता ठेवते ते त्यांनी समजून असावं”

सुलभाकडून हे ऐकून मला तिची खूप किंव आली.
मी तिला म्हणालो,
“सुलभा,माझं कुतूहल तू छान समजावून सांगीतलंस.कित्येक दिवस ते माझ्या मनात होतं.आता तू केलेल्या बांगड्याच्या तिखल्याचं तेव्हडं कुतूहल जेवल्यानंतरच समजावलं जाईल. खरं ना?”
शरद तुंगारे ह्यावेळी मलाही अनुमोदन द्यायला मात्र विसरला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com