Wednesday, November 3, 2010

जादूगार डॉ. बावा.

“माझी आजी मला जे सांगायची त्यावर मी आता दोनदोनदा विचार करतो.”

रघूनाथच्या पायाला वरचेवर सुज यायची हे मला अगदी पूर्वी पासून माहित होतं.पण अलीकडे तो त्या सुजेची तक्रार करीत नव्हता.
त्याचं असं झालं,माझ्या बहिणीच्या मुलाला पण असाच व्याधी झाला होता.तिनेपण त्याच्या सुजेवर बरेच उपाय केले होते.संधिवातामुळे असं होतं म्हणून डॉ.मसूरकरानी तिला सांगीतलं होतं.त्या व्याधीबरोबर आता त्याला आयुष्य काढावं लागणार असंही डॉक्टर तिला म्हणाले.फक्त त्याला आराम मिळण्यासाठी काही औषधं आणि उपाय सुचवले होते.
मी माझ्या बहिणीला म्हणालो,
“रघूनाथला मी विचारून बघतो.त्याचे पाय आता बरे झाले आहेत.त्याने कोणता उपाय केला ते कळेल.”

रघूनाथ मला म्हणाला,
मला अगदी लहानपणापासून एक व्याधी होता.माझ्या दोन्ही पायाचे घोटे थोडे कमजोर होते.माझी आजी मला नेहमीच धरधावून सांगायची की,
“त्या घोट्यांना दुखापत करून घेऊ नकोस,तुला संधिवात -आर्थाइटिस सारखं- दुखणं होईल.काळजी घे”

सांध्यांची हालचाल झाल्यावर येणार्‍या हाडातल्या आवाजावर खास असं औषध नाही.आणि काही मुलं बोटं मोडून करीत असलेला आवाज ऐकायलाही गमतीदार वाटतो.
पण माझ्या आजीचं ते म्हणणं माझ्या मनावर नकळत दीर्घकाळ छाप ठेऊन राहिलं.पुढेमागे ही व्याधी वाढण्याची शक्यता झाल्यावर माझ्या आजीचा तो सल्ला इतका पोरकटासारखा धुडकावून लावण्याजोगा न व्हावा एव्हडंच मी मनात म्हणायचो.”

“पण मग तू बरं व्ह्यायला काय उपाय केलास?”
मी आतुरतेने रघूनाथला विचारलं.

“ती पण एक गंमत आहे.आणि योगायोग आहे”
असं सांगून म्हणाला,
“ह्या प्रसंगाला सामोरं यायला माझी ती आतुरतेने वाट पहात राहिलेलो दिल्लीची ट्रिप मला भोंवली.
त्याचं असं झालं,दिल्लीच्या करोलबागच्या बाजारात मी विन्डो-शॉपींग करीत जात असताना अपघाताने एका मातीच्या ढिगार्‍यावर धडपडून माझ्या पायाच्या घोट्यांना दुखावून घेतलं.पाय थोडा सुजला.मी माझ्या वडीलांना फोन करून माहिती दिली.त्यावेळी माझे वडील कोकणात होते.त्यांनी मला सल्ला दिला की मुंबईला परत आल्यावर प्रिन्सेसस्ट्रिटवर पारशी अग्यारी जवळ एक डॉ.बावा म्हणून पारशी माणूस आहे.त्याला तुझा पाय दाखव.पुढे
जाऊन त्यांनी मला त्यांच्याच एका मित्राची गोष्ट सांगीतली.त्याच्या पाठीत खूप दुखायचं.खूप उपाय आणि औषध-पाणी करून झालं.शेवटी तो कुणाच्या तरी सल्ल्यावरून ह्या पारशी डॉक्टरकडे गेला.एक्सरे वगैरे न घेता, त्याने त्याची पाठ हाताने चाचपून पाहिली.आणि नंतर त्याला ओणवं बसायला सांगून त्याच्या पाठीवर आपला उजवा पाय जोराने दाबून मग उठायला सांगीतलं.खरंच चमत्कार म्हणजे त्याची पाठ दुखायची थांबली.
अशीच त्यांनी त्यांच्या आणखी एका मित्राची कथा सांगीतली.
तो ह्या डॉ.बावाकडून कसा बरा झाला ते सांगीतलं.”

“मुंबईसारख्या शहरात राहून अशा उपायावर तुझा विश्वास कसा बसला?”
मी रघूनाथला निक्षून विचारलं.

“मुंबईसारख्या शहरात राहिल्याने,माझ्या सारखा एखादा, आपोआप नैतिकदृष्ट्या छिन्नमनस्कता असलेला असूं शकतो.आणि त्याच्या वृत्तित शास्त्रीयदृष्टीने केलेले उपाय आणि अशास्त्रीयपद्धतिने केले जाणारे उपाय ह्याबद्दल चौकसपणा आल्याने अशा प्रकारच्या उपायांच्या फलश्रुतिबद्द्लचा दावा प्रश्नचिन्हात नेण्याकडे त्याचा कल जाऊ शकतो.असे उपाय इतके संदिग्ध असतात की,
“हे औषध महिनाभर घेतल्यावर तुमचं वजन वीस किलोने कमी होईल”
अशा पद्धतिच्या जाहिराती सारखं होईल.”
रघूनाथ मला म्हणाला.

“पण इतर शहरी डॉक्टरचे उपाय,पायाला बर्फ चोळण्याचा आणि पाय बरा होई तोपर्यंत कुबड्या वापराण्याचाच सल्ला देण्या व्यतिरिक्त काही सांगणार नाहीत.हे माहित असल्याने,त्यापेक्षा डॉ.बावाच्या उपायाला तू स्वीकृति देण्याचा विचार केलास की काय?
मी रघूनाथला आतूरतेने प्रश्न केला.

“अगदी बरोबर”
असं म्हणून तो मला म्हणाला,
“डॉक्टर बावाच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा होता.बहुदा तो चष्मा बाबा आझमच्या काळात घेतलेला असावा. त्याच्या अंगात तलम आणि झीरझीरीत सफेद पैरण होती.पायात जाड पट्ट्याची चप्पल होती.मला, समोर ठेवलेल्या स्टूलावर बसायला सांगून आपण एका वेताच्या खूर्चीवर बसला.माझ्या पायाचा सुजलेला घोटा त्याने क्रमबद्ध पद्धतिने तपासून पाहिला.आणि जाहिर केलं की माझ्या पायचं हाड वगैरे काही मोडलेलं नाही.
त्यानंतर त्याने एका चिनीमातीच्या भांड्यात तीव्र वास येणारी पावडर टाकून,घोटून घोटून त्याची पेस्ट बनवली. भांड्यात ती पेस्ट मांजराच्या विष्टेसारखी दिसत होती.ती पेस्ट आपल्या बोटांनी काढून एका केळीच्या पानाच्या तुकड्यावर एखाद्या निष्णात अनुभवी माणसासारखी लावली. आणि ते पान माझ्या पायाच्या घोट्यावर ठेऊन चापचापून धरून बॅन्डेज केलं. आणि अशीच दोन तिन वासमारणारी केळीच्या पानामधे ती पेस्ट घालून तयार
केलेल्या पुरचूंड्या मला देऊन,चार चार तासांनी प्रत्येक पुरचूंडी गरम करून अशीच पायाला चपापून लावायची माहिती दिली.
डॉ.बावाने केलेल्या मदतिबद्दल मी त्याचे थॅन्क्स मानले.त्याना दोनशे रुपये- त्याने दिलेल्या ट्रिटमेंटचे म्हणून- दिले.”

मी हे ऐकून माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि त्याला म्हणालो,
“किती दिवसात गूण आला?”

“पुढे ऐकतर खरं.”
माझ्या कपाळावर आलेल्या आठ्यांकडे बघून रघूनाथ हंसत म्हणाला,
“त्याच्या दवाखान्यातून अक्षरशः लंगडत,लंगडत माझं घर गाठलं.खरंच सांगायचं तर, ह्या घटनेमुळे माझ्या मनात झालेला गोंधळ आणि मनाला लागलेला धक्का बराचसा जबरदस्त होता.शहरी डॉक्टरकडून उपाय करून घेणार्‍या मला ह्या घरगुती उपाय करणार्‍या डॉक्टरला प्रश्नावर प्रश्न करून- उपाय करून घेण्यापूर्वी- त्याच्याकडून उत्तरं घेता आली असती.पण मात्र,
“शहरात रहाणार्‍या ह्या अर्धवटांना घरगुती उपायाचं महत्व काय माहित असणार?”
अशी त्याच्या मनातल्या मनात आलेली शंका,उघडपणे नविचारतां,मारक्या नजरेने माझ्याकडे बघून,ती निर्देश करून घेण्याची मला माझ्यावर पाळी आणावी लागली असती.किंवा,
“माझ्या दवाखान्यातून खाली उतर”
असं रागाच्या भरात त्याने मला सांगीतलं असतं, तर ते ऐकून घ्यावं लागलं असतं.

पण अहो चम्तकार ऐका.मी सकाळी माझ्या बिछान्यातून उठल्यावर,माझं लंगडणं सोडाच,मला दुखायचंही बंद झालं.डॉ.बावाने लावलेलं बॅन्डेज पायावरून दूर केल्यावर माझ्या घोट्यावरची सुजसुद्धा पशार झाली.त्याने दिलेल्या पुरचूंड्याचा दुसर्‍या दिवशी त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे उपाय केल्यावर,तिसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर बॉलिवूडचं नृत्य करण्या इतपत माझी तयारी झाली होती.”

मी रघूनाथला म्हणालो,
हेच दुखणं शहरी डॉक्टरकडून उपाय करून बरं करायला तुझे तिन आठवडे गेले असते, डॉ.बावाच्या उपायाने तू तिन दिवसात बरा झालास.”

“आज तागायत मी निष्टापूर्वक डॉ.बावावर विश्वास ठेवायला लागलो.त्यानंतर मी अनेकदा त्याच्याकडे उपाय करण्यासाठी म्हणून गेलो असेन.
माझी आजी मला जे सांगायची त्यावर मी आता दोनदोनदा विचार करतो.”

नचूकता,मी रघूनाथकडून त्या डॉ.बावाचा पत्ता घ्यायला विसरलो नाही हे उघडच आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com