Monday, November 29, 2010

शुभेच्छा पत्र.

“ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”

पोस्टमनने घरात ढीगभर पत्रं आणून टाकली आणि त्यात तुम्हाला एखादं शुभेच्छेचं पत्र असेल तर एका क्षणात तुमचा दिवस आनंदाचा जातो किंवा तुमची लहरपण बदलते.
समजा तुमच्या जीवनातला एखादा दिवस अगदी गचाळ असेल,किंवा तुम्ही नशिबवान असाल तर तो दिवस कदाचीत तुम्हाला आनंद देणाराही असेल, आणि अशावेळी तुम्हाला कुणाचंतरी शुभेच्छेचं पत्र आलं असेल,तर आतुन तुम्हाला नक्कीच बरं वाटतं.
त्यादिवशी माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला त्याच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ मी एक शुभेच्छा पत्र त्याला पाठवायचं या उद्देशाने माझ्या एका मित्राच्या दुकानात कार्ड विकत घ्यायला गेलो होतो.मित्र दुकानात नव्हता.त्यांचा विशीतल्या वयाचा मुलगा काऊंटरवर बसला होता.

मला म्हणाला,
“नवल आहे.हल्ली शुभेच्छा संदेश इमेलवरून पाठवतात.त्यामुळे आमच्याकडे असली कार्ड घ्यायला येणारी गिर्‍हाईकं बरीच कमी झाली आहेत.”

मी त्याला म्हणालो,
“मी त्यातला नाही.शुभेच्छाच द्यायच्या झाल्यास प्रत्यक्ष त्या व्यक्तिच्या घरी जाऊन देण्यात जी मजा आहे ती आगळीच असते.पण सर्वांच्याच घरी जाणं शक्य होत नाही.अशावेळेला निदान शुभेच्छा पत्र आपल्याकडून त्या व्यक्तिला मिळावं अशा विचाराचा मी आहे.”

हे ऐकून तो मला म्हणाला,
“माझ्या लहानपणी मला कुणाची पत्रं येत नसायची.पण माझ्या जन्मदिवशी मला कुणाचं शुभेच्छेचं पत्र आल्यास, किंवा त्यादिवशी माझ्या आजीचं कोकणातून बंद लिफाफा यायचा आणि त्यात थोडे पैसे असायचे अशावेळी मला मी ढगात पोहल्यासारखं वाटायचं.”
आणि पुढे म्हणाला,
“अलीकडे लोक ईमेलने शुभेच्छा पाठवतात.पण मला वाटतं,पुर्वीच्या रीतिप्रमाणे लिफाफ्यावर पोस्टाचा स्टॅम्प असलेलं शुभेच्छा पत्र मिळणं हेच खरं आहे.”

माझ्यापेक्षा लहान असून माझी आणि ह्या मुलाची मत मिळती जुळती आहेत हे पाहून मला विशेष वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“एखाद्याची तुम्ही किती कदर करता ते अशा पत्रातून दाखवता येतं.मला वाटतं त्यामानाने ईमेलचा तेव्हडा परिणाम होत नसावा.लोक त्यांचं अशा तर्‍हेचे पत्र इतकं व्यक्तिगत करतात,की त्यांना स्वतःला विशेष समजूनच ते असं पत्र पाठवतात.ज्या व्यक्तिला ते शुभेच्छा पत्र पाठवलं जातं त्याच्या पत्रात मजकूर लिहून त्या पत्र वाचणार्‍या व्यक्तिला तो मजकूर, आपल्या मनात त्याला विशेष मानुन, लिहिला गेलाय हे भासवायचा त्यांचा खास उद्देश असतो.”

मला म्हणाला,
“खरं म्हणजे माझ्या वडीलांचं ह्या शुभेच्छा कार्डाचं दुकान आहे.पण प्रामाणिकपणे सांगतो की,शुभेच्छा पत्र पाठविण्याच्या माझ्या विचाराशी ह्याचा कसलाच संबंध नाही.
कधी कधी मी माझ्या वडीलांच्या दुकानात असताना,पाहिलंय,कार्ड विकत घ्यायला आलेली गिर्‍हाईकं कार्डावरचा मजकूर वाचून कधी डोळ्यात पाणी आणतात,कधी चेहर्‍यावर हंसू आणतात. आणि हे असं होणं, सर्व त्या मजकूरावर आणि वाचणार्‍याच्या भावनावर अवलंबून असतं.आणि दुसरं म्हणजे,मला माहित आहे की,लवकरच ते कार्ड ज्याला पाठवलं जाणार आहे तोही तसाच डोळे ओले करणार असतो किंवा हंसणार असतो.आणखी एक
म्हणजे, ते शुभेच्छा कार्ड काय म्हणतं हे विशेष जरूरीचं नसून कुणी पाठवलं आणि का पाठवलं हे विशेष असतं.मला असंही वाटतं की शुभेच्छा कार्ड निवडून काढत असताना ती व्यक्तिसुद्धा आनंदी हो्त असते.हे सर्व होत असताना ती व्यक्ति आपल्या जीवनातल्या सर्व कटकटीबद्दल थोडावेळ विसर पडू देऊन, त्या ऐवजी ज्यांना ते पत्र पाठवणार असतात त्या व्यक्ति आपली काळजी घेणार्‍या असतात हे लक्षात आणून त्यांच्यावर त्याचं लक्ष केंद्रीभूतकरीत असतात.

मी लहान असल्यापासून माझ्या आईने असली मला आलेली सर्व कार्ड जमवून ठेवण्यासाठी एक खोकाच तयार केला आहे.एखादा असाच वाईट दिवस आल्यास मी हा खोका पहातो.आणि माझ्या लक्षात येतं की माझ्यावर प्रेम करणारे आणि माझी काळजी घेणारेकिती व्यक्ति जगात आहेत.

मला ज्यावेळी मुलं होतील तेव्हा मी नक्कीच माझ्या मुलांना हे उदाहरण दाखवून देणार आहे.अर्थात मी माझा हा खोकाही त्यांना देणार आहे.त्यामुळे कदाचीत माझ्या जीवनाकडे त्यांचं लक्ष जाईल आणि मी कोण आणि माझ्यावर प्रेम करणारे कोण ह्याबद्दल त्यांना माहिती मिळेल.”

नवीन घेतलेल्या कार्डाचे पैसे देत मी त्याला म्हणालो,
“मला असं वाटतं,ह्या व्यस्त जगात प्रत्येकजण थकला भागलेला असतो.अशानी आपले काही क्षण वापरून एखादं योग्य शुभेच्छा कार्ड निवडून आपण ज्यांवर प्रेम करतो त्यांना पाठवल्यावर त्यांनाही कळून चुकेल की आपल्या मनात ते किती खास म्हणून टिकून आहेत.
ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com