Tuesday, November 9, 2010

झब्बू

“हा महत्वाचा संदेश मला मुलांना द्यायचा असतो.त्यानी हे शिकावं ह्यासाठी मी आतुर होत असतो.कारण त्यावर माझा भरवंसा आहे.” इती गणपत.

दीवाळी आली आणि सर्व जवळचे नातेवाईक जमल्यावर, घरात धमाल येते.पत्त्याचा डाव निश्चितच मांडला जातो.”
मी गणपतला सांगत होतो.

गणपत माझा मित्र.दीवाळीच्या फराळाला मी त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं.घरात पत्याचा डाव जोरात रंगलेला पाहून त्यालाही कुतूहल झालं.

मी त्याला पुढे म्हणालो,
“माझ्या लहानपणाची मला आठवण आली. दीवाळीसारख्या सणाला घरी मित्रमंडळी जमली की पत्यांच्या खेळाला उत यायचा.आमचा दिवाणखाना मोठा असल्याने बरीच मंडळी जमल्यानंतर गोल चक्राकारात बसून खेळायचो. सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे “झब्बू”.या खेळात मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व भाग घ्यायची.जेव्हडे मेंबर्स जास्त तेव्हडा खेळ जास्त रंगायचा.
पत्त्याचा बावन्न पानाचा सेट असल्याने,बावन्न आकड्याला, खेळणार्‍यांच्या आंकड्याने भागून पानं वाटताना जो भागाकार येईल तेव्हडी पानं प्रत्येकाला एकाच वेळी दिली जायची.उरलेली पानं पत्ते पिसणारा घ्यायचा.उद्देश असा की एक एक पान प्रत्येकाला वाटल्यास रंगाने हात व्ह्ययचा, तो होऊं नये आणि लगेचच झब्बू दिला जावा.

ह्या खेळात असं आहे की, नशीबाने येणारी पानं,पुढचा, कोणत्या पानावर देत असलेला झब्बू,आणि मागचा, कोणत्या पानावर घेत असलेला झब्बू हे लक्षात ठेवण्याचं कसब असणं म्हणजे लवकर आपली सुटका करून घेण्याच्या चलाखीवर आपण अवलंबून असणं.नाहीपेक्षां शेवटी “गाढव” होण्याची पाळी येते.

नंतर कुणीतरी गाढव होऊन झाल्यावर,आणि खेळाचा तो डाव संपल्यावर,
“कसा काय गाढव झालास?”
असा साधा प्रश्न गंमत म्हणून एखादा विचारायचा.
“त्याचं असं झालं,तसं झालं.”
अशी चरवीचरणाची चर्चा,गाढव झालेल्याने,सांगायला सुरवात केल्यावर लगेचच कुणीतरी,
“आपल्याला काय करायचं आहे”
असं म्हणून गाढव झालेल्याचं हंसं करण्यात इतरांची चढाओढ लागायची.

हंसं झालेला मात्र पुढल्या खेपेला गाढव झाल्यावर,
“कसा काय गाढव झालास?”
ह्या प्रश्नाला निक्षून उत्तर देत नसायचा.

माझं हे ऐकून गणपत म्हणाला,
माझ्या लहानपणी मी,माझे वडील,आई आणि माझी धाकटी आणि मोठी बहिण पत्ते खेळायचो.धो,धो,पाऊस पडायला लागला आणि बाहेर कुठेही जाण्याचा सुमार नसला की आम्ही हटकून पत्ते खेळायला बसायचो.

कोकणात पाऊस बेसुमार पडायचा.बाहेरच्या पडवीत बसून पत्ते खेळायला मजा यायची.मधुनच पावसाची वावझड आल्यावर अंगावर पाण्याचे तुषार पडायचे.अशावेळेला सोलापूरची जाडी चादर अंगावर लपेटून मी बसायचो.
गाढव व्हायला मला मुळीच आवडायचं नाही.माझी धाकटी बहिण गाढव झाली तर ती पुढचा डाव खेळायलाच तयार व्ह्यायची नाही.मग माझे वडील म्हणायचे,
“पत्तेच तुमचं ऐकतात.”
दुसर्‍या डावातल्या वाटपात कुणाला तरी जड पान्ं आल्यास-राजे,एक्के,गुलाम वगैर-आणि कुणी कुरकुर केल्यास माझे वडील म्हणायचे,
“कुरकुर करूं नकोस,पत्यांना ऐकूं येतं. कुरकुर कराणारा पत्यांना आवडत नाही.”

रमी खेळताना माझ्या वडीलांचं असंच व्हायचं.ढीगातून प्रत्येक पत्ता उचलताना,डोळे मिटून,ओठात पुटपुटून, स्वतःवर पूर्ण विश्वास आहे असं भासवून, पत्ता कसाही असो,आपल्या मनासारखा आला असं सांगून टाकीत.

“हा मस्तच पत्ता मला मिळाला.मला ह्या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे”
असं मोठ्याने बोलून दाखवीत.
त्यांची रमी झाली नाही तर,
“हरकत नाही.थोडक्यात चुकली.”
असं खिलाडू वृत्तिने म्हणत.
आणि त्यांची रमी झाली तर,अगदी घमेंडीने म्हणत,
“पाहिलत का मला माहितच होतं.”
पण अशावेळी माझी आई हे ऐकून,डोळे गरगर फिरवून म्हणायची,
“पुरे झाली,स्वतःचीच स्तुती”

तिस वर्षं झाली.आता मला नक्की माहित झालं आहे की पत्ते माझं ऐकत नाहीत.आणि कुणाचाही ह्या म्हणण्यावर विश्वास नसणार हे ही मला माहित आहे.माझे बाबा,गणीताचे शिक्षक असल्याने त्यांचा भरवंसा आंकडेशास्त्रावर होता, ओठाने पुटपुटलेल्या प्रार्थनेवर नक्कीच नव्हता.
आणि मी वकील असल्याने,पत्त्यांना कान असतात ह्यावर केस घालायला कोर्टात जाणार नव्हतो.पण सरतेशेवटी माझ्या बाबांचंच खरं होतं.
ते म्हणायचे,
“सकारात्मक दृष्टी ठेवून,भीतिला आनंदात रुपांतरीत करावं आणि निराशेला विजयात रुपांतरीत करावं.
तक्रारी असणं म्हणजेच प्रारंभालाच हार मागणं.पण सकारात्मक वृत्ति यशाच्या खात्रीला बळावते.

मंदिरं आणि किल्ले बांधले जातात,परोपकारता निधीबद्ध असते,विजय मिळवले जातात,संघर्ष मिटवले जातात, जीवन जगलं जातं,आणि पत्ते खेळले जातात,पण व्यवस्थितपणे केलं तर, भीति, नबाळगता,धास्ति नठेवता,निराश न होता,पण अपेक्षा बाळगून,आनंदी राहून आणि यशावर दृढनिष्ठा ठेवून राहता आलं तरच.”

अलीकडेच मी माझ्या नव्वद वर्षांच्या आजोबांना दवाखान्यात भेटायला गेलो होतो.ते हृदयाच्या झटक्यातून सुधारत होते.माझा हात त्यानी हातात घेऊन दुखेपर्यंत आवळला.
“कसं वाटतं?”
हात आवळत असतानाच मला विचारलं.
“आई गं”
मी ओरडलो.
माझ्या अजोबा आपला चपटा,हाडकुळा दंड दाखवीत म्हणाले,
“इतका काही वाईट नाही.”
ते हार मानणारे नव्हते.ती काही त्यांची मरणशय्या आहे असं ते मानीत नव्हते.

आता मी माझ्या मुलांबरोबर पत्ते खेळतो.आमची एक खास खेळासाठी म्हणून खोली आहे.तिथलं वातावरण नेहेमी जोशपूर्ण असतं.चारही बाजूला खेळणी पसरलेली असतात.माझा नऊ वर्षाचा नेहमी खेळाच्या टेबलावर विराजमान झालेला असतो.आणि सहा वर्षाची,पत्ते हातात घेऊन पिसत रहाते.खेळ सुरू झाल्यावर खोलीतलं तंग वातावरण कमी-जास्त गंभीर होत असतं.एखादा जवळ जवळ जिंकायला आलेला-बहुतेक वेळा तसंच होतं-असताना माझी मुलं ईर्षा आलेली,असूया आलेली,उर्मट झालेली आणि दुखावणारी होतात.हरली की रडतात, अंगावर धावून येतात. जिंकली की रागारागाने बघतात.अगदी मुलांसारखीच वागतात.अशावेळी मी माझे बाबा होतो.माझी पत्नी माझ्या आईसारखेच डोळे वटारते.अशावेळी मी माझ्या बाबांचा विचार पुढे ढकलतो,
“तक्रारी होऊ नका,आणि जे पत्ते मिळालेत त्यावर समाधान रहा.सर्व खेळ मजेसाठी आहे हे लक्षात असू द्या.पत्ते तुमचं ऐकणार”

हा महत्वाचा संदेश मला मुलांना द्यायचा असतो.त्यानी हे शिकावं ह्यासाठी मी आतुर होत असतो.कारण त्यावर माझा भरवंसा आहे.”
गणपतचं हे सर्व बोलणं इतर खेळणारे ऐकत होते.

“तुझा हा संदेश ह्या खेळणार्‍यांपर्यंत पोहोचला जावो”
असं म्हणत माझ्या पत्नीने फराळाचं ताट गणपतच्या समोर ठेवलं.आणि म्हणाली,
“दीवाळीच्या शुभेच्छा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com