Friday, November 26, 2010

जेव्हा गळाला मासा लागतो

“कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे.”

वेंगुर्ल्याहून आजगांवला जाताना वाटेत मोचेमाड हे गांव लागतं.मोचेमाड येई पर्यंत लहान लहान दोन घाट्या जढून जाव्या लागतात. जवळच्या घाटीच्या सपाटीवर पोहोचल्यावर, त्या डोंगराच्या शिखरावरून खाली पाहिल्यावर, असंख्य नारळांच्या झाडा खाली, छ्पून गेलेलं मोचेमाड गांव दिसतं.पण त्याहीपेक्षा डोळ्यांना सुख देणारं दुसरं विलोभनिय दृष्य म्हणजे मोचेमाडची नदी.
जवळच समुद्र असल्याने ही नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते.पण त्यापूर्वी नदीतलं गांवाजवळचं पाणी अगदी गोड असतं.नदीत मासे मुबलक आहेत.समुद्राच्या दिशेने गांवाजवळून गेलेली नदी नंतर गोड-खारट पाण्याची होते.थोडंसं खाडी सारखं वातावरण असतं.त्यामुळे ह्या ठिकाणी मिळणारी मासळी जास्त चवदार असते.नदीतला मासा आणि समुद्रातला मासा यांच्या चवीत जमिन-अस्मानाचा फरक असतो.पण खाडीतला मासा अत्यंत चवदार असतो.
गुंजूले,शेतकं,सुळे ही मासळी लोक उड्यामारून घेतात.त्याशिवाय करड्या रंगाची कोलंबी-सुंगटं-चढ्या भावाने विकली जातात.कारण ती दुर्मिळ असतात.

मी वेंगुर्ल्याला शिकत असताना, माझ्या वर्गातला एक मित्र पास्कल गोन्सालवीस, मला सुट्टीत मोचमाडला घेऊन जायचा.तिथे त्याचं घर होतं. वाडवडीलापासून गोन्सालवीस कुटूंब मोचेमाडला स्थाईक झालं होतं.
पास्कलच्या आजोबापासूनचं नदीच्या किनार्‍यावर त्यांचं मासे विकण्याचं दुकान आहे.ताजे मासे दुकानात मिळायचेच पण त्याशिवाय दुकानाच्या अर्ध्या भागात तळलेल्या आणि शिजवलेल्या मास्यांचं होटेल होतं.मला पास्कल ह्या दुकानात नेहमी घेऊन जायचा.भरपूर मासे खायला द्यायचा.मला तळलेले मासे जास्त आवडायचे.इकडे लोक तळलेली कोलंबी चहा पितानासुद्धा खातात.

नदीच्या किनार्‍याजवळच बरीच दुकानं असल्याने,मासे पकडायला जाण्यासाठी लहान लहान होड्या सुंभाने,खांबाला बांधून नदीच्या पाण्यात तरंगत ठेवल्या जायच्या. पाण्यात निर्माण होणार्‍या लहान लहान लाटांवर वरखाली होताना ह्या होड्याना पाहून मला गरगरायचं.त्यामुळे मला होडीत बसणं कठीणच व्हायचं.

म्हणून पास्कल मला नदीच्या जवळ असलेल्या एखाद्या मोठया खडकावर बसून गळाने मासे पकडण्याच्या कामगीरीवर न्यायचा.वाटेत आम्ही मास्यांविषयीच गोष्टी करायचो.कुठचे मासे गळाला चावतात,कुठच्या जागी चावतात,मास्यांना लुभवण्यासाठी लहान लहान किडे,अगदी छोटे मासे,अगदी लहान सुंगटं एका पिशवीत जमवून ठेवून बरोबर ती पिशवी कशी ठेवावी लागते. गळाला खुपसून ठेवण्यासाठी ती लुभवणी असतात.

गळ,गळाचा हूक,ऐंशीची दोरी,आणि वेताची लवचीक काठी एव्हडा लवाजमा बरोबर घेऊन जावं लागतं.
अलीकडे पास्कल मुंबईला, त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला, मोचेमाडहून आला होता.त्याच लग्नात त्याची माझी भेट झाली.
मी त्याला माझ्या घरी चहाला बोलावलं होतं.पुर्वीच्या आठवणी निघाल्या.गप्पांना जोर आला.

मला पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी जास्त सृजनशील असतो.त्याचं कारण अगदी सोपं आहे.गळ पाण्यात टाकून मासा लागण्याची वाट पहात असताना विचार करायला भरपूर वेळ असतो.”

मी पास्कलला म्हणालो,
“रोग आणि त्याच्यावर उपाय,तसंच जागीतीक संघर्ष सोडवण्यासाठी योजले जाणारे उपाय,गळाला मासा लागण्याच्या प्रतिक्षेच्यावेळी केले गेले आहेत.असं मला कुणीतरी सांगीतल्याचं आठवतं.कदाचीत ही अतीशयोक्ति असेलही.”

मला पास्कल हंसत हंसत म्हणाला,
“फीश टॅन्क ऐवजी थिंक टॅन्क म्हणायला हरकत नाही.”
आणि पुढे म्हणाला,
“कुणीसं म्हटल्याचं आठवतं की, गळाला मासा लागायची वाट बघत असताना,व्यस्त राहिल्याने,डोक्यात आलेले सर्व विचार कागदावर टिपून ठेवायला वेळ मिळाला असता तर खूप शोध लावता आले असते.कारण एकदा का गळाला ओढ लागली की मनं बदलून जायची.गळाच्या काठीला किती ओढ असायची यावर लागलेल्या मास्याचा आकार-विकार समजून घेण्यात,अन्य विचारावर स्थिरावलेलं मन, सर्व काही विसरून जाऊन मास्याकडे केंद्रीभूत
व्ह्यायचं.

पास्कलच्या हाटलात तळलेली कोलंबी भरपूर विकली जायची आणि आताही जाते.थाळीतून दिलेली कोलंबी डझनावर मोजली जायची.एक डझन हवी,दोन डझन हवी अशी ऑर्डर मिळायची.

पास्कलच्या हाटेलात मास्यावर ताव मारताना पास्कलबरोबर माझ्या गोष्टी व्हायच्या.मला ते आठवलं.ते सांगीतल्यावर पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी,जास्त आशावादी असतो.बराच वेळ पाण्यात टाकून राहिलेला गळ मधेच कधीतरी वर काढून घ्यायचो.कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे. तसं काही तरी झालं असावं ते तपासून पहाण्यासाठी गळ पाण्याच्या वर काढायचो.त्यामुळे पहिल्यांदा गळाला लागलेला मासा आणि दुसर्‍यांदा लागणारा मासा ह्याच्या मधल्या समयात गळ पाण्याबाहेर काढून
तपासण्याचा आणि लागलीच गळ पाण्यात टाकण्याचा एक उद्दोग करावा लागायचा. आठ,आठ तासात एकदाही गळाला मासा न लागणं हे थोडं जिकीरीचं काम वाटायचं.तरीपण आम्ही आशा सोडत नसायचो.कधी कधी आम्ही सूर्योदय पाहिल्यापासून सुर्यास्त पाही पर्यंत पाण्यात गळ टाकून बसतो.जमतील तेव्हडे मासे टोकरीत टाकतो. दिवसभरात पक्षी उडताना दिसतात,मोचेमाडच्या नदीतून खपाटे,गलबतं माल वहातुक करताना दिसतात. त्यामुळे दवडल्या गेलेल्या वेळात कमी मासे मिळाले तरी दिवस अगदीच गचाळ गेला असं वाटत नाही.

गळाला मासे लागणं, हे जणू कसलीच वचनबद्धता न ठेवता स्वर्गाला पोहचल्या सारखं वाटणं.गळाला थोपटलं गेलं, झटका मिळाला,खेचाखेची झाली की समजावं खरा क्षण आला.ऐंसाची लांबच लांब दोरी,लवचीक काठी आणि कमनशिबी गळाला लावलेलं सुंगट, ही सर्व सामुग्री जणू कर्ज फेडीचं धन आहे असं वाटतं.पाण्यातून खेचून आलेला मासा बसल्या जागी आणल्यावर थोडासा विराम घेता येतो.तत्क्षणी काहीतरी प्रचंड झाल्याची ती जागरूकता असते.
पेनिसिलीनचा शोध नसेल,चंद्रावरचं पहिलं पाऊल नसेल पण काहीसं खरंच महान झाल्यासारखं वाटतं.निसर्ग माउलीच्या डोळ्यात धुळ फेकून विनासायास तिच्या कडून बक्षिस मिळालं असं मनात येतं.दोरीच्या शेवटी गळाला लागलेला ऐवज पाहून आपल्या चातुर्याची साक्ष मिळाली असं वाटतं.

पण तो ऐवज,म्हणजे तो तडफडणारा मासा, जरका,मनात भरण्यासारखा नसला किंवा त्याची जास्त तडफड पाहून दया आल्यास पुन्हा पाण्यात सोडून दिला जातो,कदाचीत इतर मास्यांना आपली कर्म कथा सांगायला त्याला मोकळीक दिली गेली असं समजलं तरी चालेल.

हल्ली,हल्ली तर ज्याच्या त्याच्या हाटलात,एका बोर्डावर,आपल्या गळाला लागलेला मोठ्यात मोठा मासा दाखवून फोटो काढला जाऊन,आपल्या कडून विशेष कामगीरी झाल्याचं प्रदर्शन म्हणून चिटकवलं जातं.नदीच्या किनार्‍यावर बसून निरनीराळे कोळी निरनीराळे मासे हातात धरून फोटो काढतात.
प्रत्येक फोटोत कोळ्याच्या चेहर्‍यावरचं हास्य बोलकं असतं.”

उठता उठता मला पास्कल म्हणाला,
“वेळ काढून तू नक्की चार दिवस रहायला मोचेमाडला ये.
तुझ्या जून्या आठवणींची उजळणी होईलच शिवाय आता मोचेमाड किती सुधारलंय ते तुला दिसून येईल.”

“लवकरच येईन “
असं पास्कल मी सांगीतलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com